Tuesday, 8 February 2011

जकार्तामध्ये 'लावणी दर्शना'चा अफलातून कार्यक्रम!

१९ नोव्हेंबर २०१० रोजी जकार्ता येथील "इंडिया क्लब जकार्ता"च्या विद्यमाने "लावणी दर्शन" हा एक बहारदार मराठी कार्यक्रम पहायची संधी सर्व जकार्ताकरांना मिळाली. अहमदनगरजवळच्या 'सुपा' गावातील "कलिका कला केंद्र" या संस्थेचे पथक रशिया, जपान व इंडोनेशियाच्या दौर्‍यावर होते व जपानमधील कार्यक्रम संपवून जकार्ताला आले होते. ('सुपे' हे सुप्याला झालेल्या सुप्रसिद्ध लढाईमुळे मराठी लोकांना परिचित आहेच!)

"इंडिया क्लब जकार्ता"च्या कार्यकारिणीवरील एकमेव मराठी सदस्य श्री. विनय पराडकर यांच्या पुढाकाराने आणि ICCR, जवाहरलाल नेहरू इंडियन कल्चरल सेंटर (JNICC) आणि भारत सरकार यांच्या वतीने हे पथक इथे आले होते. पण टेलिव्हिजनच्या माध्यमातून त्यांची कीर्ती तर त्या आधीच आमच्या कानावर पडली होती. जकार्तामध्ये जेमतेम ७०-८० मराठी कुटुंबे आहेत, प्रौढांची संख्या असेल जेमतेम १२५! कदाचित् त्यामुळे असेल पण "तमन इस्माइल मार्झुकी" या नाट्यगृहसंकुलातील छोटे नाट्यगृह या कार्यक्रमासाठी योजण्यात आले होते. पण बिगरमराठी लोकांचासुद्धा इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला कीं एकादा तंग कपडा शिवणीवर उसवावा तसे हे नाट्यगृह "हाऊसफुल" तर भरलेच पण त्यानंतर आलेल्या गर्दीला सामावून घेण्यासाठी मिळेल तिथे खुर्च्या टाकून प्रेक्षकांची सोय करावी लागली होती.

इथले राजदूत श्री. बिरेन नंदा प्रकृती बरी नसल्याने येऊ शकले नाहींत व त्यांच्या अनुपस्थितील त्यांच्या सौभाग्यवतींच्या व सुरीनामच्या राजदूता श्रीमती अंजलिका यांच्या हस्ते समई प्रज्वलित केल्यानंतर कार्यक्रम सुरू झाला.

"कलिका कला केंद्र"च्या प्रमुख आहेत नृत्यांगना श्रीमती राजश्री काळे नगरकर! सोबत त्यांच्या नृत्यांगना भगिनी श्रीमती आरती काळे नगरकर आल्या होत्या. दोघीच्या मातोश्री श्रीमती काळेसुद्धा-त्यांनी भाग घेतला नसला तरी-मुलींचे कौतुक करण्यासाठी व्यासपीठावर हजर होत्या.

(पुढे राजश्री व मागे आरती काळे नगरकर "जेजूरीच्या खंडेराया" भंडारा उडवून सादर करताना)
या संघटनेचे वैशिष्ट्य हे कीं त्यांचे सर्व साथीदार स्वतः व्यासपीठावर हजर होते. (म्हणजे हल्ली ज्याला "ट्रॅक्स" म्हणतात अशी कांहीं कृत्रिम तजवीज नव्हती.) ढोलकी, ऑर्गन व गायन सारे अगदी LIVE होते. आणि या साथ करणार्‍या पथकाचे प्राविण्य फारच उच्च प्रतीचे होते. त्यात ढोलकीसम्राट श्री पांडुरंग घोटकर यांच्या बरोबरीने त्यांचे सुपुत्र श्री कृष्णा मुसळेही ढोलकी वाजवत होते, श्रीमती कीर्ती बने दीड-दोन तास तर्‍हेतर्‍हेची गाणी गायल्या-अगदी गणगौळणमधील शालीन भजनापासून ते "इचार काय हाय तुमचा, पावणं?" किंवा "मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की बारा"सारख्या नखरेल गाण्यातले लाडिक, शृंगारपूर्ण स्वरही त्यांनी तितक्याच सहजतेने आणि झकास काढले, ऑर्गनवरचे श्री. सुधीर जवळकर यांनी आपल्या वादनकौशल्याने सार्‍यांची मने जिंकली आणि श्री. नरेंद्र बेडेकर यांनी निवेदनाची बाजू सुरेख सांभाळली. त्यांच्या निवेदनात भरपूर माहिती, नर्मविनोदाची झालर आणि आवाजातील गोडवा, आदब आणि ढंग यांचा सुरेख संगम झाला होता.

(कलिका कला केंद्राचे संपूर्ण पथक. चित्रात श्री व सौ. पराडकर उजवीकडून चौथे व पाचवे)
(पुढे बसलेले ऑर्गनवादक सुधीर जवळकर, मधोमध राजश्रीच्या मातोश्री, त्यांच्या उजवीकडे निवेदक नरेंद्र बेडेकर, अगदी उजवीकडे 'ढोलकीसम्राट' पांडुरंग घोटकर व अगदी डावीकडे त्यांचे सुपुत्र मुसळे)

मुख्य नृत्यांगना राजश्री आणि आरती यांनी तर आपल्या नृत्यकौशल्याने व विभ्रम, नखरे व सूचक इशारे यांचा वापर करून सारे सभागृह डोक्यावरच घेतले. दीड-दोन तास शिट्ट्या आणि टाळ्या थांबल्याच नाहींत. जकार्तातील उच्चभ्रू लोकांना इतक्या भन्नाट शिट्या वाजविता येतात याची मला कल्पनाच नव्हती! पण काळे भगिनींचा कार्यक्रमच इतका अफलातून झाला कीं न येणार्‍यांनाही तिथल्या-तिथे शिट्टी वाजवायला येऊ लागली असावी असा मला संशय आहे. यातल्या बर्‍याच लोकांनी आयुष्यातली पहिली शिट्टी इथेच वाजविली असल्यास आश्चर्य वाटायला नको.

(राजश्री काळे नगरकर "किती थाटाने घोड्यावर बसतो"सादर करताना

(आरती काळे नगरकर "कवडसा चांदाचा पडला" सादर करताना, ऑर्गनवर सुधीर जवळकर)
कार्यक्रमाची सुरुवात गण-गौळण आणि मुजरा यांनी झाली तर शेवट "जेजूरीच्या खंडेराया"ने. गण म्हणजे गणेशपूजन (या नाचात रंगुनि गणपति हो), मुजरा म्हणजे हजर असलेल्या प्रेक्षकांना अभिवादन आणि गौळण म्हणजे राधाकृष्णांच्या नृत्यातून भारतीय संस्कृतीतील आध्यात्म व तत्वज्ञान यांची ओळख करून देणे (तुम्ही ऐका नंदाच्या नारी).
त्यानंतर एका पाठोपाठ नृत्ये सादर करण्यात आली. मुख्य नृत्यांगना आहेत राजश्री आणि आरती. त्यात राजश्री जास्त नृत्यनिपुण वाटली तर आरती खूपच खट्याळ, नटखट नर्तिका आहे. अगदी एक लता तर दुसरी आशा! राजश्रीने सादर केलेली मराठा वीरावरची लावणी (किती थाटाने घोड्यावर बसतो) तर सुरेख वठली. त्यात त्या मराठा योध्याची ऐट, रुबाब आणि त्याच्या घोड्यावर बसायच्या कौशल्याची नक्कल राजश्रीने सुंदररीत्या सादर केली, इतकेच नाहीं तर घोडा कसा दिमाखात धावतो, त्याची शेपूट कशी ऐटीत हलते हेसुद्धा घोड्यासारखे वाकून व आपला नऊ-वारीचा पदर फडकवून राजश्रीने दाखविले.

(राजश्री काळे नगरकर विटी-दांडू नृत्य "स्नेह तुजशी केला" सादर करताना)
आरतीने खिडाकीतून आलेल्या चंद्रप्रकाशाच्या कवडशाची आणि "इचार काय हाय तुमचा, पावणं, इचार काय हाय तुमचा" ही लावणी अशा कांहीं ठसक्यात, नखर्‍यात आणि लाडिकपणाने सादर केली कीं त्यांच्या नृत्यकौशल्याइतकेच त्यांचं चेहर्‍यावरील भावदर्शन, डोळ्यांनी आणि मानेच्या झटक्याने केलेले इशारे सारेच प्रेक्षकांच्या पसंतीची दाद घेऊन गेले.

("इचार काय हाय तुमचा" सादर करताना आरती काळे नगरकर)
राजश्रीने सादर केलेली सदा हरित "बुगडी माझी सांडली गं"लासुद्धा लोकांनी तुफान 'दाद' दिली तर "पिंजरा" या चित्रपटातील "छबीदार छबी, मी तोर्‍यात उभी" आणि "दिसला गं बाई दिसला" या लावण्यातून आरतीने लोकांची मनं जिंकली.

(चुगलि नका सांगु गंsssss, कुणि हिच्या म्हातार्‍याला ग हिच्या म्हातार्‍यालाssss)
सगळ्यात निराळी लावणी (स्नेह तुजशी केला) राजश्रीने सादरी केली विटी-दांडू खेळणार्‍या व्रात्य मुलीची! त्यात खेळण्यातला जोश, विटी दांडूवर पेलण्याची क्रिया, कुणी कुठे उभे रहायचे याबद्दल हुकूम वगैरे सर्व अगदी कप्तानाच्या आवेशाने तिने केले, जणू धोनीच शिरला होता तिच्या अंगात! विटी-दांडूसारख्या खेळावर आधारित इतकी चांगली लावणी असू शकेल यावर विश्वासच बसेना माझा!




(संबळ वाजवताना 'ढोलकीसम्राट' पांडुरंग घोटकर)
आमच्यासारख्या परदेशस्थ मराठी मंडळींना असले श्रवणसुख आणि नेत्रसुख क्वचित् आणि तेही खूप वर्षांनंतर अनुभवायला मिळत असल्याने अजीबात अतिशयोक्ती न करता मी सांगतो हा कार्यक्रम पहाताना कित्येकदा माझे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले.

("पिंजरा"मधील "छबिदार छबी मी तोर्‍यात उभी" ही लावणी सादर करताना)


(मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले कीं बारा" ही "नटरंग"मधील लावणी साजरी करताना राजश्री आणि आरती काळे)
"मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले कीं बारा" ही "नटरंग"मधील लावणीची घोषणा होताच सर्व मराठी मंडळींनी-विशेषतः तरुण मंडळींनी-विक्रमी शिट्ट्या व टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. या गाण्यातील शृंगार, नखरा व आर्जव या सर्व भावना गाऊन दाखविताना कीर्ती बने यांनी आपले अप्रतिम कलाकौशल्य दाखवत आशाताई भोसलेंची आठवण करून दिली!
छबीदार छबी या गाण्यातली "काय रे बत्ताशा, कशास पिळतोस मिशा?" ही ओळ मला पार माझ्या गावी-जमखंडीला-घेऊन गेली. तिथं लहानपणी पाडव्याच्या गुढीबरोबर लहान-लहान मुलांच्या गळ्यात बत्ताशाच्या माळा घालायची प्रथा होती. कदाचित् ग्रामीण महाराष्ट्रात आजही ही प्रथा असेलही.
नृत्यकौशल्यात व संगीतामधील वैविध्यात इतका श्रेष्ठ असलेला आणि मुख्यतः ग्रामीण असलेला व तिथे खूप लोकप्रिय असलेला "लावणी" हा मराठी नृत्यप्रकार त्या मानाने साचेबंद व वैविध्य नसलेल्या, अभिनयाला आणि गायनाला फारसा वाव न देणार्‍या व केवळ ठेक्यावर आधारलेल्या पंजाबी भांगड्यापेक्षा किंवा गुजराती दांडियापेक्षा कमी लोकप्रिय कां असावा हा विचार हा कर्यक्रम पहाताना पुन्हा डोक्यात आला. मला वाटते कीं यातले पहिले आणि महत्वाचे कारण हे असावे कीं महाराष्ट्रात लावणीसारख्या ग्रामीण नृत्यात (इतर नृत्यातही म्हणा) पुरुष कधी फारसा भाग घेत नाहींत त्यामुळे या नृत्याला "सामूहिक" स्वरूप कधीच येत नाहीं. शिवाय अभिनय, नृत्य, गायन, वादन, अर्थपूर्ण काव्य यांचा सुरेख संगम असलेला, भारतीय परंपरेचा (गण/गौळण) अंर्तभाव असलेला हा वैविध्यपूर्ण "लावणी" नृत्यप्रकार "एक शृंगारीक (चावट) नृत्यप्रकार" अशा चुकीच्या कलंकामुळे (जुनाट विचारांवर आधारित) मागे पडला असावा कीं काय असेही मनात येऊन गेले. तसेच इथे मराठी लोकांची "मार्केटिंग"मधील कमतरताही याला कारणीभूत असावी काय असेही मनात आले. कारण दिग्गज गायक तर सोडाच, पण अगदी उदयोन्मुख असलेले सारे पंजाबी गायक जेंव्हां जकार्ताला कार्यक्रम करतात तेंव्हां एकाच ढंगाची भांगडा गाणी तर गातातच पण वर सोबत प्रक्षकांनाही गायचे आवाहन करत वायरलेस माईक घेऊन प्रेक्षकांत हिंडतात. तसे आपण मराठी लोक फारसे करत नाहीं. हेही या तौलनिक पीछेहाटीचे कारण असावे. कुठल्याही कार्यक्रमात प्रेक्षकांशी केलेला सुखसंवादामुळे व प्रेक्षकांना त्यात सहभागी करून घेण्यातील पुढाकारामुळे अशा कलांची व अशा कार्यक्रमांची लोकप्रियता अनेक पटींनी वाढते. तसेच 'लावणी'चे थोडेसे "शहरीकरण"ही व्हायला हवे!
कार्यक्रमाच्या शेवटी राजश्री, आरती व त्यांच्या मातोश्री असलेल्या माझ्या आडनावभगिनींना आणि नावबंधूंना (सुधीर जवळकर) व इतर कलाकारांना शाबासकी देऊन आम्ही घरी परतलो!
(एक ऋणनिर्देशः या लेखाच्या एका वाचकाने (श्री. प्रसन्न केरकर) एक बारकाईचा मुद्दा आपल्या प्रतिसादात सांगितला. ते म्हणतात कीं 'लावणी' हा 'तमाशा'चा एक भाग असतो. तमाशात गण-गौळण असते, 'लावणी'त नसते. म्हणून या समारंभाला "तमाशा दर्शन" हे नांव जास्त उचित ठरले असते. पण कां कुणास ठाऊक, पण हा कार्यक्रम "लावणी दर्शन" याच-कदाचित् चुकीच्या-नावाने सादर झाला.)
एक पूरक वाचन म्हणून द मेकिंग ऑफ 'सांगत्ये ऐका' हा ई-सकाळमध्ये प्रकाशित झालेला मनोरंजक लेख जरूर वाचा http://www.esakal.com/esakal/20101117/4625380670850015419.htm या दुव्यावर!

Friday, 4 February 2011

498A कायद्याची काळीकुट्ट बाजू!

लोकसत्ता-चतुरंग दि. १८ डिसेंबर २०१०
हा कायदा ज्या स्वरूपात आहे ते स्वरूप चुकीचे आहे यात शंका नाहीं. जर स्त्रीवर अन्याय होत असेल तर तिने न्यायालयाकडे न्याय मागणे उचितच आहे. पण त्यातल्या "पतीला आणि त्याच्या आप्तांना विनाचौकशी तुरुंगात टाकण्याची तरतूद ही त्याची काळीकुट्ट बाजू आहे.
केवळ या एका कलमामुळे या कायद्याचा प्रचंड गैरवापर होत आहे. आणि जर याबद्दलचे http://ipc498a.wordpress.com/ या कॉपीराईट कायद्याने सुरक्षित दुव्यांसारखे जे अनेक दुवे (आणि त्यात अनेक ’उपदुवे’ही आहेत) आंतरजालावर (links on the internet) उपलब्ध आहेत त्यात या कायद्याने पीडित असलेल्या अनेक पुरुषांचे (आणि त्यातल्या आरोपी स्त्रियांचेसुद्धा) अनेक अनुभव आहेत. त्याचा सूर असाच आहे कीं या कायद्याने जर कुणाचा फायदा झाला असेल तर तो नागरिकाला न्याय देण्यासाठी कंकणबद्ध असलेल्या सरकारी यंत्रणेचा. त्यांना जणू सुगीचे दिवस आलेले आहेत! त्यात न्यायसंस्थेचे नावसुद्धा घालावे का? पण लगेच "न्यायालयाची बेअदबी" या भीतीने खरे बोलायचीसुद्धा चोरी! सुदैवाने आजकाल सत्र आणि उच्च न्यायालयातील भ्रष्टाचाराबद्दल खुद्द सर्वोच्च न्यायालयच कडक ताशेरे झाडत आहे. उदा. अलाहाबदच्या Uncle-type न्यायदानाबद्दल अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने झाडलेले कडक ताशेरे! सार्‍या समाजालाच भ्रष्टाचाराची कीड लागली आहे तिथे न्यायसंस्थेने का मागे रहावे?
या परिस्थितीत होते काय कीं पोलीस कोठडीच्या भयाने पुरुषाची बाजू त्यांच्यावरील आरोप अन्याय्य असूनही सामोपचाराचा मार्ग अवलंबू पहाते. जे कणखरपणे उभे रहातात त्यांना अनेक सांपत्तिक आणि मानसिक अडचणी भोगाव्या लागतात. नोकरी करणार्‍यांना नोकरी जाण्याचे भय तर व्यायसायिकांच्या धंद्याची वाट लागते. अन्याय खरा असेल तर असे होणे ठीकच आहे, पण खरा नसला तरी पुरुषाला आणि त्याच्या आई-वडिलांना आणि बहिणींना अनेक तर्‍हेचा त्रास होतोच.
मग काय करायला हवे? कांहींच जर केले नाहीं तर लग्नसंस्थाच कोलमडून पडेल. आज पाश्चात्य देशांत एकत्र रहाणे नेहमीचे झाले आहे ते भारतातही सुरू होईल, नाहीं झालेच आहे. एकवीसाव्या शतकात जन्मलेली मुले लग्न करतील असे वाटतच नाहीं. मग हे टाळण्यासाठी काय केले पाहिजे?
कुणाहीवर अन्याय झाल्यास त्याचे निवारण करण्यासाठी पोलिसात तक्रार करून न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्यासाठी "योग्य" कायदा करणे बरोबरच आहे. पण आजच्या परिस्थितीत हा कायदा योग्य आहे का? या कायद्यात काय बरोबर आहे आणि काय चूक आहे याचा विचार करायला नको का?.
सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुरुंगवासाची तरतूद रद्द केली पाहिजे. आजच्या स्वरूपात हा कायदा दोघांना सारखे लेखत नाहीं. "Every one is innocent until proven guily" हे आपल्या न्यायसंस्थेचे मूलगामी तत्व आहे. पण केवळ एका "अबला" बाईने तक्रार केली कीं त्या तक्रारीत ज्यांची नांवे आहेत त्यांना चौकशीशिवाय तुरुंगवास करविणे आणि जामीन नाकारणे हा कुठला न्याय? असा (तथाकथित अन्याय करणारे कुठे पळून जाणार आहेत? एवढीच भीती असेल तर त्यांचे पासपोर्ट्स न्यायालयाने ताब्यात घ्यावेत. पण अटक कशासाठी? हे कलम रद्द व्हायलाच हवे.
दुसरे म्हणजे स्त्रीने केलेले खोटे आरोप! ४९८अ कलमाखाली चालविलेल्या अशा खटल्यात पती आणि त्याचे आप्त निर्दोष सुटले तर स्त्रीने त्यांच्याविरुद्द्ध केलेले आरोप खोटे होते हे उघड आहे. मग अशा खोटारड्या फिर्यादी स्त्रीला कठोरात कठोर शिक्षा मिळण्याचे भय हवेच. त्यासाठी पतीला वेगळा खटला करण्याची गरज असू नये.
बर्‍याचदा स्त्रीपेक्षा तिचे आई-वडील तिला असा खटला करायला भरीस टाकतात. त्यामुळे जर अशा खटल्यात पती आणि त्याचे आप्त निर्दोष सुटले तर त्यांच्या व्याह्यांचीही चौकशी होऊन त्यांनाही शिक्षा झाली पाहिजे. फक्त पतीचेच आई-वडील कशाला भरडायचे?
शेवटी न्यायालयातले विलंब! न्यायालयात दाद मागितल्यावर त्याचा निर्णय होण्यासाठी अनेक वर्षें लागतात, तारखा "पडतात" (कीं पाडल्या जातात?), असे करत-करत ५-७ वर्षांनी खालच्या कोर्टात निकाल लागतो, मग उच्च आणि सर्वोच्च न्यायालये आहेतच अपील करायला! असे करत-करत निकाल लागयच्या आधीच त्यातल्या कांहीं आरोपीना देवाकडून बोलावणेही येते! तेंव्हां न्यायसंस्थेच्या आजच्या अवस्थेत स्त्रीला किंवा पुरुषाला न्याय मिळायला इतका वेळ लागतो कीं तो न मिळाल्यातच जमा आहे. म्हणून असे खटले Super-fast track न्यायालयांत चालविले गेले पाहिजेत.
या कायद्याची ही काळी बाजू त्यांच्याच मुलाविरुद्ध, भाच्याविरुद्ध, पुतण्याविरुद्ध किंवा अशा कुणा जवळच्या नातेवाइकाविरुद्ध असा खटला होईपर्यंत शारदाताईंच्या लक्षात येणार नाहीं! आमच्या तरी कुठे आली होती? पण ती भयाण आहे हे मी छातीठोकपणे सांगतो!

Saturday, 10 October 2009

डॉ. खान यांच्या पत्र प्रसिद्धीसाठी ही वेळ निवडण्यामागचे कारण काय?

लेखक: सुधीर काळे, जकार्ता
(हा लेख दै. सकाळने त्यांच्या वेब एडिशनवर दि. ८ ऑक्टोबर् २००९रोजी प्रसिद्ध केला)

२००३ साली आपली डच पत्नी हेनीला लिहिलेल्या पत्राचा मजकूर ब्रिटिश पत्रकार सायमन हेंडरसन यांच्या हातात २००७ साली आला, पण त्या पत्रातील मजकुरावर त्यांनी लेख लिहिला जवळ-जवळ दोन वर्षांनी! मिळाल्याबरोबर का लिहिला नाही व आता का लिहिला? एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का? वाचा तर.....
डॉ. अब्दुल कादीर खान यांच्या पत्राच्या प्रकाशनाने भारतीय वृत्तपत्रें, नियतकालिकें व टेलीव्हिजनसारखी सर्व माध्यमें यांच्यात सध्या एकच खळबळ माजली आहे. दि. २० सप्टेंबरच्या संडे टाइम्समध्ये श्री. सायमन हेंडरसन यांचा लेख प्रकाशित झाला आहे. (पहा http://tinyurl.com/mm3ll6 हा दुवा). डॉ. खान हे एकेकाळी सर्व पाकिस्तानी जनतेच्या गळ्यातला ताईत असलेले, पाकिस्तानी अण्वस्त्राचे जनक समजले जाणारे शास्त्रज्ञ! त्यांना नीशान-इ-इम्तियाज़ हा उच्चतम पाकिस्तानी मुलकी सन्मान दोनदा व हिलाल-इ-इम्तियाज़ हा द्वितीय क्रमांकाचा मुलकी सन्मान एकदा वेगवेगळ्या राष्ट्राध्यक्षांकडून मिळालेला आहे. असे असूनही त्या देशाच्या राज्यकर्त्यांनी स्वत:ची पापे लपविण्यासाठी त्यांना बदनाम करून आज गृहकैदेत टाकले आहे. एका कोर्टाने जरी त्यांना मुक्त केले असले तरी ते आता खरोखर मुक्त झाले आहेत कीं नाहींत याबद्दल शंका घेण्यास जागा आहे.
प्रसिद्ध झालेल्या लेखात त्यांनी आपल्या पत्नीला लिहिलेल्या चार पानी हस्तलिखित पत्रातील मजकूर जाहीर झाला आहे. जेंव्हां आपल्याला जिवे मारले जाईल अशी भीती त्यांना वाटू लागली तेंव्हां त्या पत्राच्या अस्तित्वाच्या भीतीमुळे कदाचित त्यांचा जीव वाचेल किंवा कमीत कमी जगाला ते कसे निर्दोषी होते हे कळेल या उद्देशाने आपल्या डच पत्नीला (हेनीला) घाई-घाईत लिहिलेले पण बर्‍यापैकी तपशीलपूर्ण असे हे पत्र आहे. या पत्रात त्यांना ज. इम्तियाज यांनी (कदाचित) बेनझीर भुत्तोच्या इशार्‍यानुसार इराण, उत्तर कोरिया, चीन व लिबिया या देशांना अण्वस्त्रनिर्मितीचे तंत्र व कांहीं महत्वाची यंत्रे विकायला सांगितले. त्यानुसार डॉ. खान यांनी कृतीही केली. पण ही गोष्ट प्रसिद्ध केल्यास सार्‍या पाकिस्तानची उरली-सुरली इज्जतही जाईल या भीतीने ही विक्री डॉ. खान यानी वैयक्तिक लोभापोटी केली असा अपप्रचार मुशर्रफ यांच्या कारकीर्दीत सुरू केला गेला व त्यांच्या कुटुंबियांनाही त्रास दिला जाईल अशी धमकी देऊन जुलूम-जबरदस्तीने त्यांना पाकिस्तानी चित्रवाणीवर असा कबुलीजबाब द्यायला भाग पाडले गेले. लगेच मुशर्रफ यांनी त्यांना मोठ्या मनाने माफीही देऊन टाकली!
संडे टाइम्समध्ये हा लेख प्रसिद्ध होताच अमेरिकेतील दूतावासाचे प्रवक्ते श्री. नदीम कियानी यांनी डॉ. खान यांची या पत्रातली विधाने अधिकृत नसून वैयक्तिक आहेत व त्यांचा पाकिस्तान सरकारशी काहीही संबंध नाहीं असे जाहीर केले आहे. पण एरवी शिकारी कुत्र्यासारखे टपून असणारी व कुठल्याही सनसनाटी बातमीवर हिंस्त्र श्वापदासारखी तुटून पडणारी अमेरिकत वृत्तपत्रे व अन्य मीडिया "अळीमिळी गुपचिळी"च्या पवित्र्यात अगदी गप्प कां आहेत? आयबीएन या "सीएनएन'च्या भारतीय अपत्याने ही बातली अगदी "हेडलाईन न्यूज"सारखी दिली असली तरी "सीएनएन' गप्पच! असे का? २००३ साली लिहिलेल्या या पत्राची प्रत आय.एस.आय. या पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेला डॉ. खान यांच्या पाकिस्तानातील घराच्या झडतीत सापडली. त्यावेळी त्यांना कळले की त्या पत्राच्या प्रती त्यांनी आपल्या पत्नीखेरीज त्यांच्या लंडनस्थित दीना या मुलीला व ऍम्स्टरडॅमस्थित कौसर खान या पुतणीलाही पाठविली होती. खूप दमदाटी करून त्यांनी डॉ. खान यांना दीनाला फोन करायला भाग पाडले व त्या पत्राची तिच्याकडे असलेली प्रत नष्ट करविली. कौसर खानच्या घरी डच गुप्तहेर संघटनेचे अधिकारी आले, त्या पत्रासकट कौसर खानला गुपचुपपणे त्यांच्या कार्यालयात घेऊन गेले व तिच्यादेखत त्यांनी तिने अद्याप न उघडलेले पत्र फोडले, मजकूर वाचला. कौसर खानला या मजकुराबद्दल माहिती होती का असे विचारले असता तिने नकारर्थी उत्तर दिले व ते पत्र तिला फक्त सांभाळून ठेवायला सांगितले होते असे तिने सांगितले. मग तिला जाऊ देण्यात आले. हे पत्र मग डच गुप्तहेर संघटनेने नक्कीच अमेरिकन गुप्तहेर संघटनांना दिले असणार. मग आतापर्यंत त्यावर काहीच कारवाई का झाली नाही व बेनझीरच्या मृत्यूनंतर ते आज का प्रसिद्ध करण्यात येत आहे? संडे टाइम्सच्या लेखानुसार जन. इम्तियाजही कालवश झाले आहेत. म्हणजे दोन्ही आरोपी (बेनझीर व जन. इम्तियाज) आज हयात नाहींत म्हणून हे आता फोडण्यात आले? कीं अण्वस्त्र बनवण्यात गुंतलेल्या पण ते नाकारणार्‍या इराणबरोबर लवकरच एक बैठक संयुक्त राष्ट्रांच्या विद्यमाने भरत आहे. त्या बैठकीच्या ऐन तोडावर त्यांची जगभर नाचक्की करण्यासाठी ही वेळ शोधण्यात आली? पाकिस्तानला अण्वस्त्रें बनविण्याचे तंत्रज्ञान कुठून मिळाले? हे तंत्रज्ञान अमेरिकेनेच रेगन/(थोरले)बुश यांच्या कारकीर्दीत पाकिस्तानला बहाल केले असण्याची दाट शक्यता आहे. कारण अफगाणिस्तानचे युद्ध चिघळ्ल्यास व रशियाबरोबर समोरासमोर अणुयुद्ध पेटल्यास पाकिस्तानी भूमीवरून अण्वस्त्रसज्ज क्षेपणास्त्रे डागणे सोपे होईल अशी कल्पना या दोन राष्ट्राध्यक्षांच्या जहाल गटातील सल्लागारांच्या/मंत्र्यांच्या सुपीक डोक्यात आली व त्यानुसार अमेरिकन विधिमंडळांना (congress) न कळविता व प्रसंगी त्यांना खोटी माहिती हेतुपुरस्सर देऊन हे तंत्रज्ञान पाकिस्तानला देण्यात आले असे मानायला जागा आहे. असे असल्यास या गौप्यस्फोट आता करून हे तंत्रज्ञान पाकिस्तानला चीनने दिले असा कांगावा करत "तो मी नव्हेच"चा प्रयोग करायला अमेरिका मोकळी राहील. पण पाकिस्तानला अण्वस्त्रें बनविण्याचे तंत्रज्ञान कुठून मिळाले? ते तंत्रज्ञान पाकिस्तानने 'down-the-line' कसे विकले? ज्याने पाकिस्तानला दिले त्या राष्ट्राने पाकिस्तानवर कसे काय कांहींच निर्बंध घातले नाहींत? आणि जर घातले असूनही ते न जुमानता पाकिस्तानने अण्वस्त्रप्रसाराला असा हातभार लावला असेल तर या बेलगाम वारूसारखे उधळणार्‍या व दहशतवादाविरुद्ध तोंडदेखले लुटपुटे लढणार्‍या पाकिस्तानला आजही अमेरिका पाकिस्तानला दहशतवादाविरुद्धच्या युद्धातील सच्चा मित्र या नात्याने अजूनही का वागवीत आहे व त्यांच्यावर पैशाचा पाऊस पाडत आहे?
आजही पाकिस्तान अमेरिकेशी दुटप्पीपणे वागत आहे. इकडे अमेरिकेचा पैसा घ्यायचा व तिकडे दहशतवाद्यांना आतून मदत करायची असा पाकिस्तानचा दुटप्पी डाव अमेरिकेला अद्याप कसा कळत नाहीं? अमेरिकेच्या या वागण्याने भारताचे अतोनात नुकसान होत आहे. पाकिस्तान एका बाजूला अमेरिकेकडून व दुसर्‍या बाजूला तिचा नजीकच्या भविष्यकाळातला कट्टर शत्रू चीन या दोन्ही बाजूंकडून आपले उखळ पांढरे करून घेत आहे. व अशा तर्‍हेने मिळालेले पैसे दहशतवादाविरुद्ध न वापरता भारताला त्रास देण्यासाठी वापरत आहे हेही आता उघड आहे. हे सारे अमेरिकेला कधी व कसे समजणार? आणि कोण समजावून सांगणार?
थोडक्यात खालील प्रश्न अनुत्तरित आहेत: १) डच गुप्तहेरखात्याने (नक्कीच) दिलेल्या माहितीवर आधारित कारवाई पाकिस्तानविरुद्ध वेळेवर का केली गेली नाहीं? २) ही माहिती आता उघड करण्याच्या मुहूर्तामागे काय कारणे आहेत? त्या पत्रातील मुख्य आरोपी बेनझीर भुट्टो व जन. इम्तियाजचा झालेला मृत्यू? कीं इराणबरोबर लवकरच सुरू होणार्‍या अण्वस्त्रविरोधी वाटाघाटींआधी इराणला बदनाम करणे? कीं डॉ. खान यांच्याकडून मिळालेल्या माहितीचा उपयोग करून इराणची थापेबाजी उघडी करणे? कीं पाकिस्तानला आम्ही अण्वस्त्रतंत्रज्ञान दिलेच नव्हते, ते चीनने दिले अशी जगाची दिशाभूल करणे? भारतीय वृत्तपत्रांनी याच्या मुळावर घाव घालून सत्य परिस्थिती जगापुढे मांडली पाहिजे व पाकिस्तानचा पर्दाफाश करून भारतावरचे ओझे कमी केलेच पाहिजे. असे न केल्यास fourth Estate या संदर्भातल्या कर्तव्याला ते खरे उतरले नाहींत असेच सारे जग म्हणेल.
- सुधीर काळे, जकार्ता

Tuesday, 1 September 2009

कोरी अक्वीनो यांच्या कांहीं हृद्य आठवणी

फिलिपाईन्सच्या माजी राष्ट्राध्यक्षा श्रीमती कोराझॉन (लाडके प्रचलित नांव "कोरी") अक्वीनो यांच्या कांहीं हृद्य आठवणी

दोन दिवसापूर्वी, १ ऑगस्ट रोजी, फिलिपाईन्सच्या माजी राष्ट्राध्यक्षा श्रीमती कोराझॉन (लाडके प्रचलित नांव "कोरी") अक्वीनो काळाच्या पडद्याआड गेल्या. २६ फेब्रुवारी १९८६ रोजी "लोकक्रांती"द्वारा (People Power) हुकुमशहा मार्कोस यांना चारी मुंड्या चित करून त्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले. त्या आधी मार्कोस यांनी अनेक कॢप्त्या लढवून निवडणूक "चोरण्या"चा प्रयत्न केला, पण तो लोकांनी हाणून पाडला. चुकीची मतमोजणी जारी ठेवावी म्हणून ज्या निवडणूक आयोगाच्या कर्मचार्‍यांवर दडपण आणले गेले ते कर्मचारी राजीनामे देऊन बाहेर पडले व मार्कोस यांचे पितळ उघडे पडले. वैधव्याच्या दु:खद अंधाराच्या गर्तेतून बाहेर पडून आपल्या देशाचे राष्ट्रपतीपद मिळवून आपल्या पतीचे स्वप्न साकार करणार्‍या या उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या बाईंच्या आयुष्यातील त्या दोन-तीन दिवसातील घटनांचा एक स्मृतीपट माझ्या डोळ्यांपुढून पुन्हा गेला. त्यातल्याच या कांहीं आठवणी.

१९८६ सालचा फेब्रुवारी महिना होता तो. मी इंडोनेशियाचे दुसर्‍या क्रमांकाचे शहर सुराबाया येथे काम करत होतो. सुहार्तो हे इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष व "सर्वेसर्वा" हुकुमशहा होते. वृत्तपत्रे, नियतकालिके, रेडियो व दूरचित्रवाणी या सर्वांवर सुहार्तोंची पोलादी पकड होती व कुणालाही कुठलेही नागरी स्वातंत्र्य नव्हते. TVRI (टेलीव्हिसी रिपुब्लिक इंडोनेशिया) त्यांच्या "दुनिया दालाम बरिता (बातम्यातले जग)" या रात्री ९ वाजता दिल्या जाणार्‍या बातम्यांमध्ये जे दाखवील तेच फक्त पहायला मिळायचे. आमच्यासारखी परदेशी मंडळी "बीबीसी"वर बातम्या ऐकायचा प्रयत्न करत, पण ते स्टेशन कधीच नीट tune व्हायचे नाहीं त्यामुळे फारच निराशा व्हायची व असहायतेची भावना मनात यायची.

मला अजूनही १९८६ सालची फिलिपाईन्समधली ती लोकक्रांती स्पष्टपणे आठवते. TVRI वर दाखवलेल्या कितीतरी चित्रफिती (video-clips) आजही मनाच्या पटलावर कोरलेल्या आहेत. जवळ-जवळ दहा लाख निदर्शक "एपिफानिओ द लॉस सांतोस ऍव्हेन्यू (EDSA)" या राजवाड्यासमोरील हमरस्त्यावर जमून निदर्शने करीत होते. लष्करी जवान आपापल्या मशीनगन्स त्यांच्यावर रोखून उभे होते. निदर्शकातल्या एका स्त्री-निदर्शिकेने एका बंदूकधारी ’जवाना’च्या हातात कसले तरी फूल दिले आणि गंमत म्हणजे असे कांहीं होईल याची कल्पनाही नसल्यामुळे तो जवान गोंधळून गेला व त्याने ते फूल स्वीकारले आणि मग एकदम तिथला तणाव कमी झाला. ही हृदयस्पर्शी आठवण आजही अगदी ताजी आहे. हुकुमशहा मार्कोस आणि त्याचा लष्करप्रमुख जनरल व्हेर यांच्यामधले संभाषणही TVRI ने दाखविले होते. मार्कोसही या अनपेक्षित कलाटणीने गोंधळून गेला होता आणि त्यामुळे तो कुठलाच निर्णय ठामपणे देऊ शकला नाही व त्यामुळे व्हेर खूपच गोंधळून गेल्याचेही दिसत होते.

जसजसे लोक त्या चौकात "चोरून" निवडून आलेल्या मार्कोस यांच्या (खोट्या) विजयाच्या विरोधात येत राहिले तसतशी मार्कोसच्या पाठीराख्यांमध्ये फूट पडू लागली. तेही लोक मार्कोसच्या राजवटीला विटलेले होतेच, त्यात प्रचंड असंतोषाचे असे विराट दर्शन घडताच सर्वात प्रथम संरक्षणमंत्री एनरीले व पाठोपाठ लष्करी सेनानी जनरल रामोस हे दोघे मार्कोसची बाजू सोडून अक्वीनोबाईंच्या बाजूला आले. (पुढे रामोस राष्ट्रपतीही झाले.) अक्वीनोबाईंनी शपथविधीनंतर जेंव्हा ज. रामोस यांची पदोन्नती केली तेंव्हा त्यांनी पिवळ्या कपड्यात दृढपणे व सुसंस्कृतपणे ऐटीत उभ्या असलेल्या आपल्या नव्या "कमांडर-इन्-चीफ"ना (अक्वीनोबाईंना) ठोकलेला कडक सॅल्यूटही मला आठवतोय व स्त्रीसुलभ डौलात गोड स्मितहास्य करून तो (सॅल्यूट) त्यांनी स्वीकारल्याचे दृश्यही माझ्या मनावर कोरले गेले आहे. शेवटी मार्कोस यांनी फिलिपाईन्समधून पलायन करण्याचा निर्णय घेतल्यावर त्याला व त्याच्या निवडक कुटुंबियांना अमेरिकन तळावर घेऊन जाणारी हेलिकॉप्टर्स TVRI वर दिसली व आनंदाने अंगावर रोमांच उभे राहिले.

अक्वीनोबाई स्वत: दु:खात बुडून गेलेल्या एक विधवा बाई होत्या. निवडणुकीचे डावपेच आखण्य़ासाठी त्यांच्या पतीला भेटायला घरी आलेल्या राजकीय मित्रांचा पाहुणचार करणे एवढाच त्यांचा तोपर्यंत राजकारणाशी संबंध. त्यांचे पती बेनीन्यो (निनॉय) अक्वीनो हे विरोधी पक्षाचे सिनेटर होते व जर मार्कोस य़ांनी "मार्शल लॉ" पुकारून ७३ साली घ्यायच्या निवडणुका रद्द केल्या नसत्या तर मर्कोसला हरवून ते राष्ट्रपतीही झाले असते. पण आधी देशद्रोहासारख्या खोट्या आरोपाखाली तुरुंगवास व नंतर अमेरिकेतल्या स्वत:हून घेतलेल्या हद्दपारीचा काळ संपवून हे निर्भय सिनेटर जिवावरच्या संकटाला न जुमानता १९८३ साली मनीलाला परत आले. त्यांना आपल्याला गोळ्या घातल्या जातील अशी शंका होती म्हणून विमानातून उतरायच्या आधी त्यांनी बुलेटप्रूफ जाकीटही घातले. पण त्यांच्या मानेत गोळ्या घातल्या गेल्या व ते मनीलाच्या विमानतळावर खाली उतरायच्या शिडीशेजारीच धारातीर्थी पडले. त्याच विमानात असलेल्या ’टाईम’ या अमेरिकन नियतकालिकाच्या वार्ताहाराने हे दृश्य विमानाच्या खिडकीतून पाहिले व त्यामुळे सर्व जगाला काय झाले याची माहिती मिळाली. (आज मनीला विमानतळाला उचितपणे त्यांचेच नांव दिलेले आहे.)

निनॉय अक्वीनो हे अतीशय लोकप्रिय सिनेटर होते व केवळ सत्तालालसे पायी त्यांचा निर्घृणपणे भर दुपारी वध करण्यात आला. सत्तापिपासू लोकांना कशी सदसद्विवेकबुद्धी नसते व खुर्चीसाठी ते कसे कुठल्याही थराला जाऊ शकतात याचे हे एक घृणास्पद उदाहरण आहे.

अगदी तरुण वयातही त्यांचा जनमानसावर चांगला पगडा होता. त्यांच्यावरील विश्वासामुळे व त्यांनी मध्यस्ती केल्यामुळे लुई तारुक या कम्युनिस्ट नेत्याने सरकारपुढे आत्मसमर्पण केले व त्यामुळे फाशीऐवजी केवळ तुरुंगवास भोगून तो बाहेर आला.
हद्दपारीच्या काळात अक्वीनो दांपत्य बोस्टनला रहात असे. त्यांच्या त्यावेळच्या शेजार्‍यांनी अक्वीनोबाईंच्या निधनानंतर खालील आठवण सांगितली. ते म्हणतात, "अक्वीनोबाई खूप साध्या बाई होत्या. लोकक्रांतीद्वारा राष्ट्रपतीपदावर चढलेल्यानंतर फिलिपाईन्सचे अध्यक्षपद त्या किती समर्थपणे पेलू शकतील याबद्दल सर्वांनाच शंका होती. पण त्या अतीशय सदसद्विवेकबुद्धीशील व कर्तव्यतत्पर असल्यामुळे ज्या गोष्टीत त्या लक्ष घालतील त्यात त्या यशस्वी होतीलच अशी खात्री तिला ओळखणार्‍या आम्हा सर्वांना होती." आणि तशा त्या यशस्वी झाल्याही.

फक्त फिलिपाईन्सच नव्हे तर सार्‍या दक्षिण-पूर्व आशियाखंडाने अक्वीनोबाई व त्याचे यजमान निनॉय याचे उपकार विसरू नयेत. कारण फिलिपाईन्सच्या पाठोपाठ या भागातल्या इतर राष्ट्रातही लोकशाही रूढ होऊ लागली.

त्यांच्या निधनाने एक लोकशाहीवादी ताराच निखळून पडला आहे. फिलिपाईन्सच्या लोकांच्या दु:खात अखिल जग आज सहभागी झाले आहे. सार्‍या दक्षिण-पूर्व आशियाखंडात मूळ धरलेली लोकशाही हीच त्यांनी जगाला दिलेली देणगी आहे. त्यांच्या आत्म्याला निरंतर शांती लाभो अशीच प्रार्थना सर्व लोक करतील!

सुधीर काळे, जकार्ता

मग ओबामा वेगळे कसे?

नुकत्याच झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत, अगदी "प्रायमरीज"पासून आजपर्यंत, मी राष्ट्राध्यक्ष ओबामा यांचा निस्सीम चाहाता आणि प्रशंसक आहे व मी त्यांचा प्रशंसक राहूही इच्छितो. त्यांच्या "Change we can believe in" या घोषवाक्याबरहुकूम त्यांची वाटचालही चालू आहे असे त्यांनी आतापर्यंत केलेल्या कारवायांवरून व त्यांच्या कांहीं विधानांवरून वाटत होते. उदा. "पाकिस्तान ही या जगातली सर्वात जास्त धोकादायक जागा आहे", "यापुढे पाकिस्तानला दिल्या जाणार्‍या मदतीच विनियोग ज्यासाठी ती दिली गेली आहे त्यासाठीच होत आहे याची कसून तपासणी (audit) केल्यावरच पुढच्या मदतीचे वितरण केले जाईल" अशी विधाने, त्याच्या शपथविधीच्यावेळी मुस्लिम राष्ट्रांना उद्देशून त्यांनी दिलेले दोन संदेश "यापुढे अमेरिका मुस्लिम राष्ट्रांशी परस्पर आदर व परस्पर हितसंबंध यावर आधारित संबंध जोडू इच्छिते" व "जर तुम्ही अमेरिकेविरुद्ध उगारण्यासाठी वळलेली मूठ उघडून आपला हात मैत्रीसाठी पुढे केलात, तर तुम्हाला अमेरिकेचा मैत्रीच्या उद्देशाने पुढे केलेला हात दिसेल" किंवा इजिप्तच्या कैरो या राजधानीतून मुस्लिम राष्ट्रांना उद्देशून केलेले भाषण यासारख्या त्यांनी घेतलेल्या पावलांमुळे माझे त्यांच्याबद्दलचे कौतुक वाढतच गेले.

पण त्यांचे रशिया-अमेरिका संबंध या विषयावरील त्यांच्या भाषणाच्या वृत्तांतातील "In the short period since the end of the Cold War, we've already seen India, Pakistan and North Korea conduct nuclear tests.” हे विधान वाचल्यावर मात्र ते आता वाट चुकू लागले आहेत कीं काय अशी शंका येऊ लागली आहे.

राष्ट्रपती या नात्याने त्यांना अलीकडचा अण्वस्त्रप्रसार व त्यातील अमेरिकेच्या घोडचुका व त्यानंतरचे त्यांच्या "पित्त्या" राष्ट्राचे (पाकिस्तानचे) विविध "प्रताप" याबद्दलची संपूर्ण व संकीर्ण माहिती नक्कीच दिली गेली असणार, तरीही त्यांनी असे विधान करावे याचे खूपच वैषम्य वाटते. पहिली गोष्ट म्हणजे भारताने अणुविषयक व अण्वस्त्रउत्पादना विषयीची विद्या स्वबळावर मिळविली आहे. ही विद्या भारताला कुणी फुकटची दिलेली नाहीं. याउलट "अमेरिकेचा अफगाणिस्तानच्या युद्धामधला व्युहात्मक साथीदार" म्हणून पाकिस्तानला अमेरिकन कॉग्रेसपुढे असत्य माहिती ठेवून, असत्य विधाने करून व तिची मुद्दाम दिशाभूल करून गुप्तपणे अमेरिकेनेच त्याला १९८५ ते १९९० च्या दरम्यान अण्वस्त्रसज्ज राष्ट्र बनविले. एवढेच नाहीं तर F-16 जातीची ६० विमाने ती अण्वस्त्रे वाहून नेऊ शकतील असे फेरबदल (modifications) करून पाकिस्तानला विकली व असे आम्ही केलेलेच नाहीं अशी पूर्णपणे असत्य विधाने प्रतिनिधीगृहापुढे केली हे काय ओबामांना माहीत नसेल? केवळ अशक्य! मग तरीही ते अशी विधाने कां करत आहेत?

मग वाटू लागले कीं ओबामा खरेच "बदल" करू इच्छित आहेत कीं तो एक "गोंडस" मुखवटा आहे? त्यांच्या अशा बेजबाबदार विधानांवरून तरी वाट चुकताहेत की काय असे वाटू लागले आहे. त्यांनी रेगन, बुश-४१ व बुश-४३ यांच्या पावलावर पाऊल टाकून वाटचाल करण्याची चूक अजिबात करू नये.

पाकिस्तानला अमेरिकेने कसे अण्वस्त्रसज्ज केले याची माहिती फारच उदबोधक आहे. (http://www.dawn.com/2007/05/04/top4.htm and http://us.rediff.com/news/report/2009/jun/16/paknuke-us-allowed-pak-to-go-nuclear.htm या लिंक्स् उघडा)

भारताने (किंवा इस्रायलने) ही अणुविद्या चोरून-छुपून अमेरिकेचेच कट्टर वैरी लिबिया, इराण व उत्तर कोरिया या राष्ट्रांना विकली नाहीं. ते ’सत्कृत्य’ पाकिस्ताननेच त्यांच्या ’बदनाम’ अणुतज्ञ अब्दुल कादिर खानतर्फे केले. मग आज ओबामा भारताला "खाया नहीं, पिया नहीं, खाली ग्लास तोडा, बारा आना" या न्यायाने या नीतीशून्य राष्ट्राच्या पंक्तीला कां बसवताहेत? वर आशियातले पहिले अण्वस्त्रसज्ज राष्ट्र असलेल्या इस्रायलचे नांव त्यांनी कां वगळले? ज्यू मतदारांच्या ’मतपेटी’ लक्ष ठेवून? म्हणजे अगदी आपल्या देशातील "सर्वधर्मसमभाव"चा जप करणार्‍या व "भारताच्या राष्ट्रीय संपत्तीवर अल्पसंख्यांकांना पहिला अग्रक्रम (priority) आहे" असे खोटे-खोटे नारे देणर्‍या कॉंग्रेस पक्षाच्या व लालू, मुलायम, रामविलाससारखे इतर पक्षांतील नेत्यांच्या पावलावर पाऊल टाकून. मग ओबामा "वेगळे" कसे?

रेगन, बुश-४१ व त्यांच्या चांडाळ चौकडीने पाकिस्तानला १९९० आधीच अण्वस्त्रसज्ज केले, तर भारताने आपले ५ अण्वस्त्र चांचणी-स्फोट १९९८ मध्ये केले होते. हे याय ओबामांना माहीत नाहीं?

ओबामांनी हे विधान करून भारताच्या दृष्टीने एक नवी डोकेदुखीच निर्माण केली आहे. कीं हे विधान त्यांनी केवळ अनवधानाने केले आहे?

मी इथले दैनिक "जकार्ता पोस्ट" व भारतातले गोव्याहून प्रसिद्ध होणारे इंग्रजी दैनिक "Navhind Times" या दोन वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली व ओबामांचे कौतुक करणारी बरीच पत्रे ओबामांना त्यांच्या व्हाईट हाऊस"च्या (१६०० पेन्सिल्वेनिया ऍव्हेन्यू, वॉशिंग्टन डी.सी.) या पत्त्यावर पाठविली होती, त्यामुळे असेल, पण आज माझे नाव व ई-मेल आय्.डी. ओबामांच्या "शासकीय" यादीत घातले गेलेले आहे. त्यामुळे त्यांची माहितीपर प्रकाशने मला वेळोवेळी येत असतात. त्यातल्याच एका निरोपाचे "reply" बटन दाबून मी माझे निषेधपर पत्र त्यांना व त्यांचा प्रमुख सल्लागार डेव्हिड एक्सलरॉडला (David Axlerod) यांना लिहिलेला आहे. ओबामांना ते वाचायला वेळ कुठला? पण एक्सलरॉड तरी वाचातील व ओबामांना योग्यसा सल्ला देतील अशी आशा करू या.
जास्तीत जास्त भारतीयांनी, त्यातल्या त्यात अमेरिकास्थित भारतीयांनी ओबामांवर अशा तर्‍हेच्या निषेधपत्रांचा "पाऊस" पाडला पाहिजे!

ओबामा कांहींही बोलोत किंवा करोत, भारत अभिमानाने आपली प्रगती करतच राहील व अमेरिकेच्या दुटप्पी धोरणात नक्कीच सहभागी होणार नाही. अमेरिकेने दोस्ती केली तर "सह" व नाहीं केली तर "शिवाय" हेच आपले धोरण राहील व त्या नात्याने भारताला अमेरिकेच्या मदतीची गरज नाहीं. अमेरिकेला मात्र चीनचा काटा काढायला भारताची गरज आहे व ती वाढतच जाणार आहे. अशा वेळी पाकिस्तानचा जसा दुरुपयोग अफगाणिस्तानच्या युद्धासाठी करून घेतला गेला तसा भारताचा दुरुपयोग चीनशी परस्पर लढविण्यात अमेरिकेला करून घेऊ देऊ नये याबद्दल भारताने सतर्क रहावे हेच भारताच्या हिताचे आहे.

- सुधीर काळे, जकार्ता

Monday, 31 August 2009

याला जबाबदार कोण?

या विध्वंसाला नेमके जबाबदार कोण?

पाच महिन्यांच्या युद्धबंदीनंतर गाझा पट्टीत पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडाला. तब्बल तीन आठवडे सुरु असलेले हे युद्ध सुरु होण्यामागचे नेमके कारण काय?

सर्व जगाने वृत्तपत्रांमधून आणि दूरचित्रवाहिन्यांमधून गाझा पट्टीतील नागरिकांच्या हाल-अपेष्टांची दृष्ये पाहिली. हा संहार पाहिल्यानंतर या परिस्थितीला कोण जवाबदार आहे, असा प्रश्‍न नक्कीच पडू शकतो. कारण इस्त्राईल म्हणते की, 'हमास'ने इस्त्राईलवर रॉकेट हल्ला करुन सर्वांत प्रथम कुरापत काढली. पण हमासने हे आरोप फेटाळून लावले आहेत. मग नेमके सत्य काय आहे?

आज उपग्रहाद्वारे आपण जगात काय चालले आहे, याचा 'आँखो-देखा हाल' थोडक्‍यात 'लाइव्ह' दृष्ये पाहू शकतो. शिवाय संगणकाद्वारे फोटो अधिक सुधारित करण्याच्या सोयीमुळे ते फोटो नीटही पाहू शकतो. असे असताना या प्रश्‍नात नक्की कुणी कुणाची कुरापत काढली, याचा निर्विवाद पुरावा आज ही पुढारलेली राष्ट्रे देऊ शकतात.

असे जर संयुक्त राष्ट्रसंघातर्फे करण्यात आले, तर हे युद्ध कोणी कोणावर लादले, हे सहज सिद्ध करता येईल व त्यानुसार या युद्धातला नायक कोण आणि खलनायक कोण हेही पक्के ठरवता येईल.

खरा गुन्हेगार कोण आहे, हे कळल्यानंतर जगभर जी काही निदर्शने होत आहेत, त्यालाही योग्य दिशा मिळेल. हे होणे अतिशय जरुरीचे आहे. याबाबतीत संयुक्त राष्ट्राचे प्रमुख बान की मून यांनी असे पुरावे सादर करण्याकडे लक्ष पुरवावे व जागतिक शांतीला निर्माण होणाऱ्या धोक्‍याचे वेळीच निवारण करावे.

सुधीर काळे, जकार्ता, इंडोनेशिया

पाकिस्तानच्या इतिश्रीची अथश्री?

स्वातमध्ये शरीया लागू झाल्यावर तालिबान समर्थकांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला होता

पाकिस्तानी लष्कराने तालिबानपुढे गुडघे टेकल्यामुळे तिथल्या स्वात खोऱयात व वायव्य सरहद्द प्रांतांतील काही भागात शरिया कायदा लागू झाला आहे. त्यामुळे बांगलादेश निर्मितीनंतर पाकिस्तानची पुन्हा एकदा विघटनाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. या अशा विघटनाचे भाकित राल्फ पीटर्स या अमेरिकी लष्करतज्ज्ञाने काही वर्षांपूर्वी केले होते.

सर्व गोष्टींचा विचार केल्यास वाटते, की पाकिस्तानी लष्कर आता आपला कमांडर इन चीफ कोण, पाकिस्तानी लष्कर की तालिबान या संभ्रमात पडले आहे असे वाटते. आणि हे सेनाधिकारी अशा नवीन शक्ती समीकरणात सहभागी होतील आणि अशा नव्या शक्ती समीकरणात सहभागी होतील यात शंका नाही.

हे नवे समीकरण पाकिस्तानच्या शेजारी राष्ट्रांना धोकादायक आहे. खासकरुन भारताला, कारण त्यामुळे अल् कायदा आणि तालिबान हे पाकिस्तानचे शत्रू भारताच्या सीमेच्या अधिकच जवळ येतील.

आजवर पाकिस्तानने व त्यांच्या हेरखात्याने आपल्याविरुद्ध एक प्रकारचे गनिमी युद्धच चालविले होते. पण त्याची झळ आता त्यांना स्वतःलाच जाणवू लागली आहे. बेनझीरची हत्या, वेळोवेळी घडणारे आत्मघातकी स्फोट, श्रीलंकेच्या खेळाडूंवरील हल्ला पाहता याची खात्री पटते.

खरं तर पाकिस्तानला हे असे विघटन नको असेल व एक समृद्ध राष्ट्र म्हणून शांततेत रहायचे असेल, तर त्याला भारताबरोबर मैत्री केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पाकिस्तानने भारताबरेबर मैत्री करुन भारताचे अनेक बाबतींत अमुकरण करण्याची तयारी दाखविली पाहिजे. उदा. - खरी-खुरी लोकशाही, स्वतंत्र न्यायव्यवस्था, घटनेनुसार चालणारी राज्यव्यवस्था.

राल्फ पीटर्सच्या भाकितानुसार जर खरोखरंच घटना घडल्या, तर येत्या काही वर्षांत पाकिस्तान आपल्याला एका चिंचोळ्या पट्टीच्या स्वरुपात दिसेल. त्याच्या एका बाजूला विशाल भारत व दुसऱया बाजूला आतापेक्षा मोठा झालेला अफगाणिस्तान दिसेल. आपल्या अफगाणिस्तानबरोबरच्या मैत्रीच्या संबंधांकडे पाहून पाकिस्तान आणि तालिबान थोडेसे चिंताग्रस्त झालेले असून पाकिस्तान सरकारने आतापासूनच पाकिस्तानचे विघटन भारत, अफगाणिस्तान आणि अमेरिकेने मिळून केलेला कट असल्याची कोल्हेकुई सुरु केली आहे.
अमेरिकेने पुढे मागे चीनला शह देण्याच्या धोरणाने भारताबरोबर अणुकरार केल्यामुळे व त्याहीपेक्षा पाकिस्तानला पाकिस्तानला याबाबतीत वेगळी वागणूक दिल्याने व भारताने अफगाणिस्तानच्या पुनिर्मितीत जोमाने भाग घेऊन त्या देशात बरेच भांडवल गुंतविल्यामुळे पाकिस्तान सरकार आधीच राग धरुन आहे. त्यांना माहित आहे, की भारताचे सर्व प्रयत्न अफगाणिस्तानमध्ये इराणच्या सीमेपर्यंत नवे रस्ते बांधून चबाहार या बंदराला जाणारा मुक्त मार्ग मिळविण्याचा आहे, जेणेकरुन पाकिस्तानच्या बंदरावर अवलंबून रहावे लागणार नाही व त्यादृष्टिने पाकिस्तानचे व्यूहात्मक महत्त्व कमी होऊन जाईल. त्यामुळे पाकिस्तानच्या भारतविरोधी कारवाया वाढत आहेत.

http://en.wikipedia.org/wiki/File:Ralph_Peters_solution_to_Mideast.jpg
http://www.nytimes.com/imagepages/2008/11/23/world/23pstan.graf01.ready.html

सुधीर काळे, जकार्ता, इंडोनेशिया