Monday 23 April 2012

पाकिस्तानमधील परिवर्तनासाठी त्यांच्या लष्करात आधी परिवर्तन व्हायला हवे!

पाकिस्तानमधील परिवर्तनासाठी त्यांच्या लष्करात आधी परिवर्तन व्हायला हवे!
मूळ लेखक: पाकिस्तानी स्तंभलेखक आणि तिथेले खासदार: अयाज अमीर
अनुवाद: सुधीर काळे, जकार्ता

पाकिस्तानी लष्कराने आणि लष्करशहांच्या डावपेचातील दुस्साहसामुळे पाकिस्तान आजच्या स्थितीला पोचला आहे. आज त्याला भेडसवणार्‍या आतंकवादाच्या पाउलखुणांचा उगम शोधू गेल्यास या पाउलखुणा अफगाणिस्तानच्या पहिल्या ’जिहाद’ युद्धापर्यंत गेलेल्या दिसतील. हे जिहादी युद्ध एक लष्कराच्या प्रेरणेने घडविले गेलेले युद्ध असून या युद्धाने पाकिस्तानला बुद्धिभ्रष्टतेच्या सीमेवर आणून उभे केलेले आहे. या राखेतून कुठलाच फिनिक्स पक्षी जिवंत होणार नसून लष्कराने आपली स्वत:ची विचारसरणी, मानसिकता, स्वत:चा दृष्टिकोन बदलल्याशिवाय पाकिस्तानमध्ये समजूतदारपणाचे पुनरागमन होणे शक्य नाहीं.
पाकिस्तानचे मुलकी सरकारही इथे अपयशी, थिटे ठरले आहे व त्याच्यावरही इस्लामच्या या बालेकिल्ल्यातील-पाकिस्तानमधील-सावळ्या गोंधळाची जबाबदारी येतेच. पण पाकिस्तानला आज आर्थिक दिवाळखोरीच्या कड्यावर आणून सोडणार्‍या रथाचे सारथी पाकिस्तानचे "परमपूज्य संरक्षक", तिचे खाकी वर्दीतील उच्च सेनानीच आहेत यात शंका नाहीं!
सावळ्या गोंधळाचे वाढते पुरावे असूनही पूर्वेकडूनच्या धोक्याचे निमित्त्य देणारे आणि अफगाणिस्तानवरील आपली पकड कायम ठेवण्याच्या शेख महमदी स्वप्नात मश्गुल  असलेले पाकिस्तानी लष्कर परिवर्तनास नकार देत आहे. अफगाणिस्तानचा राष्ट्राध्यक्ष ताजिकी आहे कीं उझबेक आहे कीं पठाण आहे याच्याशी पाकिस्तानला काय देणे-घेणे आहे आणि त्यांच्या भानगडीत नाक खुपसायची पाकिस्तानला काय गरज आहे ते देवालाच ठाऊक! त्यापेक्षा आपल्या समस्यांवर आपले लक्ष आपण केंद्रित नको कां करायला? आपल्याला धोका संभवतो तो पाकिस्तानमधूनच पण आपले लष्करशहा "बुद्धिबळपटू" स्वत:ला परराष्ट्र धोरणातील विशेषज्ञही समजतात व तिथेही लुडबुड करू पहातात!
आज जर स्टॅलिन जिवंत असता (असे आता कुठे व्हायला?) तर त्याने अतिरेक्यांना किंवा दहशतवाद्यांना ठार मारण्याआधी चित्रवाणीच्या कलामंचाMवर (TV Studios) लुडबुड करणार्‍या आमच्या परराष्ट्रनीतीतील "धुरंदरां"ना ठार केले असते!
कराचीतील हिंसाचाराची सूत्रे "मोसाद"च्या हातात थोडीच आहेत? मस्तुंग येथे शिया यात्रेकरूंवर झालेल्या हल्ल्यामागे CIA आहे? कराचीचे प्रमुख अन्वेषक चौधरी अस्लाम[१] यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्यामागे भारतीय गुप्तहेर संघटना "रॉ" थोडीच आहे!
कसाही हिशेब केला तरी पाकिस्तानकडे सध्या पुरेशी अण्वस्त्रे आहेत. कुठल्याही व्यवहार ज्ञानानुसार (राष्ट्रीय सुरक्षिततेच्या चर्चासत्रांत या व्यवहार ज्ञाननाचीच जबरदस्त उणीव आहे!) पाकिस्तानकडे भारताकडून होणार्‍या खर्‍या-खुर्‍या वा काल्पनिक धोक्याला परावृत्त करण्याची आणि त्याला तोंड देण्याची भरपूर क्षमता आहे. अशा परिस्थितीत आपण आपल्या सर्व शक्ती घरच्या शत्रूकडून असलेल्या धोक्याविरुद्ध वापरल्या पाहिजेत आणि हा धोका आहे इस्लामच्या झेंड्याखाली काहूर माजविणार्‍या दहशतवाद्यांकडून. 
यावर इलाज म्हणून अफगाणिस्तानच्या भवितव्याच्या चिंतेने झपाटलेल्या आपल्या फौजेतील आणि ISI मधील सेनानींना सद्बुद्धी देण्यासाठी आपल्याला हकीम लुकमान[२] यांच्या तोडीच्या एकाद्या ज्ञानी माणसासाठी जाहिरात द्यावी लागेल. अफागणिस्तानमुळे आपण चांगलेच पोळून निघालेलो, भस्म झालेलो आहोत. आजच्यापेक्षा जास्त त्रास घेण्याची आपल्याला गरज नाहीं. उलट पाकिस्तानाच्या हितासाठी आपण स्वत:ला अफगाणिस्तानच्या बिकट समस्यांपासून शक्य तितके दूरच ठेवले पाहिजे.
एक गोष्ट तर खरीच कीं अमेरिकेचा अफगाणिस्तानात शांतता आणायचा प्रयत्न पूर्णत: फसला आहे. हरायची किंवा माघार घ्यायची गोष्ट तर दूरच, तालीबान संघटना पूर्वी कधीही नव्हती इतकी आता मजबूत झालेली आहे. अफगाणिस्तान सोडायचा निर्णय अमेरिकेने घेतलेलाच आहे व त्यानुसार जेंव्हा अमेरिका आपले सैन्य तिथून पूर्णपणे काढून घेईल तेंव्हा अफगाणिस्तानात पुन्हा यादवी युद्ध माजेल ही दगडावरची रेघ आहे! या परिस्थितीत पाकिस्तानच्या डावपेचकुशल "विद्वानां"नी कुठल्याही मोहाला बळी न पडता कुणाचीही बाजू घेणे टाळले पाहिजे. तालीबनी विजयी होतात कीं आणखी कुणी दुसरा विजयी होतो यात पाकिस्तानला काय देणे-घेणे आहे?
म्हणूनचे भविष्यकाळातील युद्धाच्या डावपेचांत वापरण्यासाठी पाळलेले मोहरे आता कुचकामाचे आहेत. या तर्‍हेचे डावपेच खेळण्याची जबरदस्त किंमत आपण आतापर्यंत मोजली आहे! ती चूक आपण पुन्हा कदापीही करता कामा नये! आपण गुलबुद्दिन हिकमतयार याच्यासारखे मोहरे पूर्वी वापरले. त्यातून आपले काय भले झाले? आपण कितीही नाकबूल केले तरी आपले सध्याचे मोहरे आहेत सिराजुद्दिन हक्कानी आणि त्याचे टोळके[३]! त्यांच्याकडून आपले काय भले होणार आहे? ते आपला देश (अफगाणिस्तान) जपून ठेवायला ISI कडे थोडेच देणार आहेत? या परिस्थितीत या लष्करी धोरणाला महान डावपेच म्हणायचे कीं जुन्या घोडचुकांची पुनरावृत्ती म्हणायचे?
अबताबादच्या वृक्षाच्छादित परिसरात ओसामा बिन लादेन सापडला या घटनेने आपल्या राष्ट्रीय सुरक्षेला जबाबदार असलेल्या सेनानींना खाडकन् जाग यायला हवी होती. अशा तर्‍हेने वस्त्रहरण झाल्यावर लज्जेपायी का होईना पण कमीत-कमी त्यांच्या वागण्यात एक तर्‍हेची नम्रता दिसायला हवी होती. पण त्यांनी तर स्वत:ला आपल्या बंकर्समध्ये आणखीनच खोलवर गाडून घेतले आहे!
जसजशी अफगाणिस्तानच्या युद्धातील सत्यपरिस्थिती उघड होऊ लागली आहेत तसतशी अमेरिका "बकरा" तर शोधू लागली आहे व तिच्या आपल्याकडूनच्या अपेक्षा वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत आपण डावपेचांसाठी "मोहरे" पाळायचा जुना बदनाम सिद्धांत सोडून दिला पाहिजे. हक्कानी टोळके अफगाणिस्तानच्या हितसंबंधांसाठी उपयुक्त असेल पण कुठल्याही परिस्थितीत त्यांना पाकिस्तानचे अमेरिकेबरोबरचे जुने आणि उपयुक्त संबंध तोडण्याचा किंवा त्यांच्यात बिब्बा घालण्याचा अधिकार नाहीं!
उत्तर वझीरिस्तानात किंवा इतर कुठेही एकादी लष्करी मोहीम कार्यान्वित करण्याचा निर्णय केवळ पाकिस्तानचा असेल, जे पाकिस्तानच्या हिताचे आहे तेच पाकिस्तान आचरणात आणेल आणि त्याबाबतीत अमेरिकेकडून आलेले हुकूम पाकिस्तान पाळणार नाहीं असे जे ज. कयानी म्हणतात ते १०० टक्के बरोबर आहे. सारी पाकिस्तानी जनतासुद्धा एकमुखाने हीच मागणी करत आहे.
या परिस्थितीत "हक्कानी टोळक्याला ISI चा पाठिंबा आहे" हा संशय सर्वांच्या मनात तसाच रेंगाळत का राहू द्यायचा? इस्लामाबादच्या उच्चभ्रूंच्या संध्याकाळच्या "ओल्या" पार्ट्यांमध्येसुद्धा हा विषय चघळला जात आहे हे नक्की! हा संशय जर निराधार, बिनबुडाचा  असता तर प्रसारमाध्यमांना "गोंजारणार्‍या" ISI च्या यंत्रणेने हा संशय समूळ उपटून टाकण्यासाठी जिवाचे रान केले असते! पण पाकिस्तानने या विषयाला नीट न हाताळल्यामुळे हक्कानी टोळक्याला पाकिस्तानी लष्कराचे गुप्त समर्थन असल्याचा मुद्दा आता पेंटॅगॉन आणि पाकिस्तानी लष्कर यांच्यातला एक बोचरा विषय झालेला आहे. या संशयाचे पिशाच्च असे वाढू देण्यात आपल्या "पालनहार" मंडळींची मोठी चूकच झाली आहे.
अमेरिकेचे संरक्षणमंत्री लियॉन पॅनेटा आणि CIA चे प्रमुख ज. पेट्रेउस यांचे वक्तव्य म्हणजे कांही देवाने दिलेला कौल नाहीं आहे किंवा कुठली आकाशवाणीही नाहीं कीं ज्यांच्या वक्तव्यावर १०० टक्के कुणी विश्वास ठेवावा! ते जे सांगतील तो कांहीं ईश्वरी साक्षात्कार नव्हे! उत्तर वझीरिस्तान हा भाग तालीबानचे एक आश्रयस्थान बनले आहे कीं नाहीं किंवा हक्कानी टोळके या भागाचा एक सुरक्षित तळ म्हणून वापरता कीं नाहीं अशा प्रश्नांच्या बाबतीत आपण आपल्याशीच प्रामाणिक राहिले पाहिजे!
उत्तर वझीरिस्तान अशा दहशतवाद्यांचे आश्रयस्थान खरेच झाले असेल तर त्याबद्दल पाकिस्तानला कांहीं तरी ठोस कारवाई करायलाच हवी! अमेरिकेच्या आज्ञेचे पालन म्हणून नव्हे तर असे करणे पाकिस्तानच्या हिताचे आहे म्हणून! आणि त्या भागात आपण कांहीं करण्यास असमर्थ असलो तर आपल्या सारभौमत्वाबाबतचे अमेरिकेकडे पाठविलेले आपले निषेध[४] पोकळच म्हणावे लागतील.
मध्यपूर्वेपासून इराकपर्यंतपर्यंतच्या, अफगाणिस्तानपर्यंतच्या अनेक कुरापतींबद्दल आपण अमेरिकेला जबाबदार धरले पाहिजे यात शंका नाहीं पण मस्तुंगमध्ये आणि कराचीमध्ये थैमान घालणारी भुते अमेरिकेची नाहींत. त्यांना जन्माला घालून पोसले आहे आपणच व म्हणून या थैमानांची जबाबदारी पूर्णपणे आपल्याच खांद्यावर आहे.
ज्या दिवशी तालीबान संघटना अफगाणिस्तानात पुन्हा सत्तेवर येईल त्या दिवसाची आपण पाकिस्तान्यांनी धास्तीच घेतली पाहिजे. कारण या घटनेने धर्माच्या नावाखाली पाकिस्तानमधील होणार्‍या दहशतवादाला केवढी चालना मिळेल! मग कांहीं अमेरिका आपल्या बचावाला येणार नाहीं! त्यावेळी आपण एकटे स्वत:वरच निर्भर असू व त्यावेळी हक्कानी टोळके पूर्वी आपल्या डावपेचातले मोहरे होते कीं नाहीं याचा आपल्याला कांहींच फायदा होणार नाहीं. (ज्या व्यक्तीने "डावपेचातले मोहरे" हा शब्दप्रयोग शोधून रूढ केला ती अतिहुशार व्यक्ती कोण असावी? कारण त्या व्यक्तीला याबद्दलचे स्पष्टीकरण द्यावे लागेल!!)
पाकिस्तानला ज्या दहशतवाद्यांना तोंड द्यायचे आहे ते कशालाच बिचकत नाहींत! ते दयामाया नसलेले क्रूर लोक आहेत. पण तरी सामुदायिकपणे आपल्याला या धोक्यासंबंधी अद्याप जागृती आलेली नाहीं. म्हणूनच एक राष्ट्र म्हणून आपले त्यांना प्रत्युत्तर कधी मवाळ असते तर कधी जहाल! आपल्या न्यायालयांनी तरी आतापर्यंत किती दहशतवाद्यांना शिक्षा सुनावली आहे? अगदीच क्वचित्, अगदी हातांच्या बोटावर मोजता येतील इतक्यांनाच. सबब काय दिली जाते? कायदेशीर कारवाई कच्ची असते ही आणि पुरावाही यथा-तथाच असतो ही. पण एकादा आसिया बीबीसारखा खटला[५] सुनावणीला आला कीं त्याचा निकाल जलद लागतो व शिक्षाही कठोर ठोठावली जाते मग पुरावा ठोस असो अथवा कच्चा असो. कारण या तथाकथित गुन्ह्यामागे धार्मिक अर्थ ध्वनित असतो.
पाकिस्तानचे सरन्यायाधीश कराचीमधील अधिकारी वर्गाला-त्यातही खास करून पोलीस अधिकार्‍यांना-खडसावून त्यांची कानउघाडणी करीत आहेत पण असे नुसते ताशेरे ओढून काय साध्य होणार? न्यायसंस्थेतच काय त्रुटी आहेत, काय उणीवा आहेत इकडे जर सरन्यायाधीशांनी लक्ष दिले तर त्याचा खूप उपयोग होईल.
वर्षानुवर्षांच्या दुस्साहसांमुळे पाकिस्तानी लोकांची मनोवृत्ती विकृतच नव्हे तर दूषित झालेली आहे. आपण वास्तवसृष्टीत रहात नाहीं आहोत. आपल्या परराष्ट्र धोरणाच्या कल्पनांचे, आपल्या सामर्थ्यांचे आणि आपल्याला असलेल्या धोक्यांचे वास्तवतेबरोबर फारच थोडे नाते उरले आहे. या परिस्थितीच्या मूलगामी कारणांचा आपण शोध घेतला पाहिजे. आपण स्वत:च स्वत:ची अशी होळी कशी पेटविली? आपण आपल्या भ्रामक कल्पनांना कसे बळी पडलो?
पाकिस्तानी मनोवृत्तीची स्वत:च केलेल्या चुकांच्या विळख्यातून मुक्तता करण्याला आपण सर्वात उच्च प्राधान्य द्यायला हवे. यात जर आपल्याला सुदैवाने यश मिळाले तरच आपण एक सामान्य राष्ट्र म्हणून जगू शकू.
(या लेखाचे मूळ लेखक आहेत अयाज अमीर. ते एक नावाजलेले पत्रकार व स्तंभलेखक असून आधी "डॉन" या वृत्तपत्रासाठी लिहीत. सध्या ते The News International या "जंग" ग्रुपच्या मालकीच्या वृत्तपत्रात लिहितात. २००८सालच्या निवडणुकीत ते पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज या पक्षातर्फे ते चकवाल मतदारसंघातून पाकिस्तानी लोकसभेवर निवडून आले. मूळ लेख http://www.thenews.com.pk/TodaysPrintDetail.aspx?ID=69052&Cat=9 या दुव्यावर वाचता येईल)