Tuesday 8 February 2011

जकार्तामध्ये 'लावणी दर्शना'चा अफलातून कार्यक्रम!

१९ नोव्हेंबर २०१० रोजी जकार्ता येथील "इंडिया क्लब जकार्ता"च्या विद्यमाने "लावणी दर्शन" हा एक बहारदार मराठी कार्यक्रम पहायची संधी सर्व जकार्ताकरांना मिळाली. अहमदनगरजवळच्या 'सुपा' गावातील "कलिका कला केंद्र" या संस्थेचे पथक रशिया, जपान व इंडोनेशियाच्या दौर्‍यावर होते व जपानमधील कार्यक्रम संपवून जकार्ताला आले होते. ('सुपे' हे सुप्याला झालेल्या सुप्रसिद्ध लढाईमुळे मराठी लोकांना परिचित आहेच!)

"इंडिया क्लब जकार्ता"च्या कार्यकारिणीवरील एकमेव मराठी सदस्य श्री. विनय पराडकर यांच्या पुढाकाराने आणि ICCR, जवाहरलाल नेहरू इंडियन कल्चरल सेंटर (JNICC) आणि भारत सरकार यांच्या वतीने हे पथक इथे आले होते. पण टेलिव्हिजनच्या माध्यमातून त्यांची कीर्ती तर त्या आधीच आमच्या कानावर पडली होती. जकार्तामध्ये जेमतेम ७०-८० मराठी कुटुंबे आहेत, प्रौढांची संख्या असेल जेमतेम १२५! कदाचित् त्यामुळे असेल पण "तमन इस्माइल मार्झुकी" या नाट्यगृहसंकुलातील छोटे नाट्यगृह या कार्यक्रमासाठी योजण्यात आले होते. पण बिगरमराठी लोकांचासुद्धा इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला कीं एकादा तंग कपडा शिवणीवर उसवावा तसे हे नाट्यगृह "हाऊसफुल" तर भरलेच पण त्यानंतर आलेल्या गर्दीला सामावून घेण्यासाठी मिळेल तिथे खुर्च्या टाकून प्रेक्षकांची सोय करावी लागली होती.

इथले राजदूत श्री. बिरेन नंदा प्रकृती बरी नसल्याने येऊ शकले नाहींत व त्यांच्या अनुपस्थितील त्यांच्या सौभाग्यवतींच्या व सुरीनामच्या राजदूता श्रीमती अंजलिका यांच्या हस्ते समई प्रज्वलित केल्यानंतर कार्यक्रम सुरू झाला.

"कलिका कला केंद्र"च्या प्रमुख आहेत नृत्यांगना श्रीमती राजश्री काळे नगरकर! सोबत त्यांच्या नृत्यांगना भगिनी श्रीमती आरती काळे नगरकर आल्या होत्या. दोघीच्या मातोश्री श्रीमती काळेसुद्धा-त्यांनी भाग घेतला नसला तरी-मुलींचे कौतुक करण्यासाठी व्यासपीठावर हजर होत्या.

(पुढे राजश्री व मागे आरती काळे नगरकर "जेजूरीच्या खंडेराया" भंडारा उडवून सादर करताना)
या संघटनेचे वैशिष्ट्य हे कीं त्यांचे सर्व साथीदार स्वतः व्यासपीठावर हजर होते. (म्हणजे हल्ली ज्याला "ट्रॅक्स" म्हणतात अशी कांहीं कृत्रिम तजवीज नव्हती.) ढोलकी, ऑर्गन व गायन सारे अगदी LIVE होते. आणि या साथ करणार्‍या पथकाचे प्राविण्य फारच उच्च प्रतीचे होते. त्यात ढोलकीसम्राट श्री पांडुरंग घोटकर यांच्या बरोबरीने त्यांचे सुपुत्र श्री कृष्णा मुसळेही ढोलकी वाजवत होते, श्रीमती कीर्ती बने दीड-दोन तास तर्‍हेतर्‍हेची गाणी गायल्या-अगदी गणगौळणमधील शालीन भजनापासून ते "इचार काय हाय तुमचा, पावणं?" किंवा "मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की बारा"सारख्या नखरेल गाण्यातले लाडिक, शृंगारपूर्ण स्वरही त्यांनी तितक्याच सहजतेने आणि झकास काढले, ऑर्गनवरचे श्री. सुधीर जवळकर यांनी आपल्या वादनकौशल्याने सार्‍यांची मने जिंकली आणि श्री. नरेंद्र बेडेकर यांनी निवेदनाची बाजू सुरेख सांभाळली. त्यांच्या निवेदनात भरपूर माहिती, नर्मविनोदाची झालर आणि आवाजातील गोडवा, आदब आणि ढंग यांचा सुरेख संगम झाला होता.

(कलिका कला केंद्राचे संपूर्ण पथक. चित्रात श्री व सौ. पराडकर उजवीकडून चौथे व पाचवे)
(पुढे बसलेले ऑर्गनवादक सुधीर जवळकर, मधोमध राजश्रीच्या मातोश्री, त्यांच्या उजवीकडे निवेदक नरेंद्र बेडेकर, अगदी उजवीकडे 'ढोलकीसम्राट' पांडुरंग घोटकर व अगदी डावीकडे त्यांचे सुपुत्र मुसळे)

मुख्य नृत्यांगना राजश्री आणि आरती यांनी तर आपल्या नृत्यकौशल्याने व विभ्रम, नखरे व सूचक इशारे यांचा वापर करून सारे सभागृह डोक्यावरच घेतले. दीड-दोन तास शिट्ट्या आणि टाळ्या थांबल्याच नाहींत. जकार्तातील उच्चभ्रू लोकांना इतक्या भन्नाट शिट्या वाजविता येतात याची मला कल्पनाच नव्हती! पण काळे भगिनींचा कार्यक्रमच इतका अफलातून झाला कीं न येणार्‍यांनाही तिथल्या-तिथे शिट्टी वाजवायला येऊ लागली असावी असा मला संशय आहे. यातल्या बर्‍याच लोकांनी आयुष्यातली पहिली शिट्टी इथेच वाजविली असल्यास आश्चर्य वाटायला नको.

(राजश्री काळे नगरकर "किती थाटाने घोड्यावर बसतो"सादर करताना

(आरती काळे नगरकर "कवडसा चांदाचा पडला" सादर करताना, ऑर्गनवर सुधीर जवळकर)
कार्यक्रमाची सुरुवात गण-गौळण आणि मुजरा यांनी झाली तर शेवट "जेजूरीच्या खंडेराया"ने. गण म्हणजे गणेशपूजन (या नाचात रंगुनि गणपति हो), मुजरा म्हणजे हजर असलेल्या प्रेक्षकांना अभिवादन आणि गौळण म्हणजे राधाकृष्णांच्या नृत्यातून भारतीय संस्कृतीतील आध्यात्म व तत्वज्ञान यांची ओळख करून देणे (तुम्ही ऐका नंदाच्या नारी).
त्यानंतर एका पाठोपाठ नृत्ये सादर करण्यात आली. मुख्य नृत्यांगना आहेत राजश्री आणि आरती. त्यात राजश्री जास्त नृत्यनिपुण वाटली तर आरती खूपच खट्याळ, नटखट नर्तिका आहे. अगदी एक लता तर दुसरी आशा! राजश्रीने सादर केलेली मराठा वीरावरची लावणी (किती थाटाने घोड्यावर बसतो) तर सुरेख वठली. त्यात त्या मराठा योध्याची ऐट, रुबाब आणि त्याच्या घोड्यावर बसायच्या कौशल्याची नक्कल राजश्रीने सुंदररीत्या सादर केली, इतकेच नाहीं तर घोडा कसा दिमाखात धावतो, त्याची शेपूट कशी ऐटीत हलते हेसुद्धा घोड्यासारखे वाकून व आपला नऊ-वारीचा पदर फडकवून राजश्रीने दाखविले.

(राजश्री काळे नगरकर विटी-दांडू नृत्य "स्नेह तुजशी केला" सादर करताना)
आरतीने खिडाकीतून आलेल्या चंद्रप्रकाशाच्या कवडशाची आणि "इचार काय हाय तुमचा, पावणं, इचार काय हाय तुमचा" ही लावणी अशा कांहीं ठसक्यात, नखर्‍यात आणि लाडिकपणाने सादर केली कीं त्यांच्या नृत्यकौशल्याइतकेच त्यांचं चेहर्‍यावरील भावदर्शन, डोळ्यांनी आणि मानेच्या झटक्याने केलेले इशारे सारेच प्रेक्षकांच्या पसंतीची दाद घेऊन गेले.

("इचार काय हाय तुमचा" सादर करताना आरती काळे नगरकर)
राजश्रीने सादर केलेली सदा हरित "बुगडी माझी सांडली गं"लासुद्धा लोकांनी तुफान 'दाद' दिली तर "पिंजरा" या चित्रपटातील "छबीदार छबी, मी तोर्‍यात उभी" आणि "दिसला गं बाई दिसला" या लावण्यातून आरतीने लोकांची मनं जिंकली.

(चुगलि नका सांगु गंsssss, कुणि हिच्या म्हातार्‍याला ग हिच्या म्हातार्‍यालाssss)
सगळ्यात निराळी लावणी (स्नेह तुजशी केला) राजश्रीने सादरी केली विटी-दांडू खेळणार्‍या व्रात्य मुलीची! त्यात खेळण्यातला जोश, विटी दांडूवर पेलण्याची क्रिया, कुणी कुठे उभे रहायचे याबद्दल हुकूम वगैरे सर्व अगदी कप्तानाच्या आवेशाने तिने केले, जणू धोनीच शिरला होता तिच्या अंगात! विटी-दांडूसारख्या खेळावर आधारित इतकी चांगली लावणी असू शकेल यावर विश्वासच बसेना माझा!




(संबळ वाजवताना 'ढोलकीसम्राट' पांडुरंग घोटकर)
आमच्यासारख्या परदेशस्थ मराठी मंडळींना असले श्रवणसुख आणि नेत्रसुख क्वचित् आणि तेही खूप वर्षांनंतर अनुभवायला मिळत असल्याने अजीबात अतिशयोक्ती न करता मी सांगतो हा कार्यक्रम पहाताना कित्येकदा माझे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले.

("पिंजरा"मधील "छबिदार छबी मी तोर्‍यात उभी" ही लावणी सादर करताना)


(मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले कीं बारा" ही "नटरंग"मधील लावणी साजरी करताना राजश्री आणि आरती काळे)
"मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले कीं बारा" ही "नटरंग"मधील लावणीची घोषणा होताच सर्व मराठी मंडळींनी-विशेषतः तरुण मंडळींनी-विक्रमी शिट्ट्या व टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. या गाण्यातील शृंगार, नखरा व आर्जव या सर्व भावना गाऊन दाखविताना कीर्ती बने यांनी आपले अप्रतिम कलाकौशल्य दाखवत आशाताई भोसलेंची आठवण करून दिली!
छबीदार छबी या गाण्यातली "काय रे बत्ताशा, कशास पिळतोस मिशा?" ही ओळ मला पार माझ्या गावी-जमखंडीला-घेऊन गेली. तिथं लहानपणी पाडव्याच्या गुढीबरोबर लहान-लहान मुलांच्या गळ्यात बत्ताशाच्या माळा घालायची प्रथा होती. कदाचित् ग्रामीण महाराष्ट्रात आजही ही प्रथा असेलही.
नृत्यकौशल्यात व संगीतामधील वैविध्यात इतका श्रेष्ठ असलेला आणि मुख्यतः ग्रामीण असलेला व तिथे खूप लोकप्रिय असलेला "लावणी" हा मराठी नृत्यप्रकार त्या मानाने साचेबंद व वैविध्य नसलेल्या, अभिनयाला आणि गायनाला फारसा वाव न देणार्‍या व केवळ ठेक्यावर आधारलेल्या पंजाबी भांगड्यापेक्षा किंवा गुजराती दांडियापेक्षा कमी लोकप्रिय कां असावा हा विचार हा कर्यक्रम पहाताना पुन्हा डोक्यात आला. मला वाटते कीं यातले पहिले आणि महत्वाचे कारण हे असावे कीं महाराष्ट्रात लावणीसारख्या ग्रामीण नृत्यात (इतर नृत्यातही म्हणा) पुरुष कधी फारसा भाग घेत नाहींत त्यामुळे या नृत्याला "सामूहिक" स्वरूप कधीच येत नाहीं. शिवाय अभिनय, नृत्य, गायन, वादन, अर्थपूर्ण काव्य यांचा सुरेख संगम असलेला, भारतीय परंपरेचा (गण/गौळण) अंर्तभाव असलेला हा वैविध्यपूर्ण "लावणी" नृत्यप्रकार "एक शृंगारीक (चावट) नृत्यप्रकार" अशा चुकीच्या कलंकामुळे (जुनाट विचारांवर आधारित) मागे पडला असावा कीं काय असेही मनात येऊन गेले. तसेच इथे मराठी लोकांची "मार्केटिंग"मधील कमतरताही याला कारणीभूत असावी काय असेही मनात आले. कारण दिग्गज गायक तर सोडाच, पण अगदी उदयोन्मुख असलेले सारे पंजाबी गायक जेंव्हां जकार्ताला कार्यक्रम करतात तेंव्हां एकाच ढंगाची भांगडा गाणी तर गातातच पण वर सोबत प्रक्षकांनाही गायचे आवाहन करत वायरलेस माईक घेऊन प्रेक्षकांत हिंडतात. तसे आपण मराठी लोक फारसे करत नाहीं. हेही या तौलनिक पीछेहाटीचे कारण असावे. कुठल्याही कार्यक्रमात प्रेक्षकांशी केलेला सुखसंवादामुळे व प्रेक्षकांना त्यात सहभागी करून घेण्यातील पुढाकारामुळे अशा कलांची व अशा कार्यक्रमांची लोकप्रियता अनेक पटींनी वाढते. तसेच 'लावणी'चे थोडेसे "शहरीकरण"ही व्हायला हवे!
कार्यक्रमाच्या शेवटी राजश्री, आरती व त्यांच्या मातोश्री असलेल्या माझ्या आडनावभगिनींना आणि नावबंधूंना (सुधीर जवळकर) व इतर कलाकारांना शाबासकी देऊन आम्ही घरी परतलो!
(एक ऋणनिर्देशः या लेखाच्या एका वाचकाने (श्री. प्रसन्न केरकर) एक बारकाईचा मुद्दा आपल्या प्रतिसादात सांगितला. ते म्हणतात कीं 'लावणी' हा 'तमाशा'चा एक भाग असतो. तमाशात गण-गौळण असते, 'लावणी'त नसते. म्हणून या समारंभाला "तमाशा दर्शन" हे नांव जास्त उचित ठरले असते. पण कां कुणास ठाऊक, पण हा कार्यक्रम "लावणी दर्शन" याच-कदाचित् चुकीच्या-नावाने सादर झाला.)
एक पूरक वाचन म्हणून द मेकिंग ऑफ 'सांगत्ये ऐका' हा ई-सकाळमध्ये प्रकाशित झालेला मनोरंजक लेख जरूर वाचा http://www.esakal.com/esakal/20101117/4625380670850015419.htm या दुव्यावर!

Friday 4 February 2011

498A कायद्याची काळीकुट्ट बाजू!

लोकसत्ता-चतुरंग दि. १८ डिसेंबर २०१०
हा कायदा ज्या स्वरूपात आहे ते स्वरूप चुकीचे आहे यात शंका नाहीं. जर स्त्रीवर अन्याय होत असेल तर तिने न्यायालयाकडे न्याय मागणे उचितच आहे. पण त्यातल्या "पतीला आणि त्याच्या आप्तांना विनाचौकशी तुरुंगात टाकण्याची तरतूद ही त्याची काळीकुट्ट बाजू आहे.
केवळ या एका कलमामुळे या कायद्याचा प्रचंड गैरवापर होत आहे. आणि जर याबद्दलचे http://ipc498a.wordpress.com/ या कॉपीराईट कायद्याने सुरक्षित दुव्यांसारखे जे अनेक दुवे (आणि त्यात अनेक ’उपदुवे’ही आहेत) आंतरजालावर (links on the internet) उपलब्ध आहेत त्यात या कायद्याने पीडित असलेल्या अनेक पुरुषांचे (आणि त्यातल्या आरोपी स्त्रियांचेसुद्धा) अनेक अनुभव आहेत. त्याचा सूर असाच आहे कीं या कायद्याने जर कुणाचा फायदा झाला असेल तर तो नागरिकाला न्याय देण्यासाठी कंकणबद्ध असलेल्या सरकारी यंत्रणेचा. त्यांना जणू सुगीचे दिवस आलेले आहेत! त्यात न्यायसंस्थेचे नावसुद्धा घालावे का? पण लगेच "न्यायालयाची बेअदबी" या भीतीने खरे बोलायचीसुद्धा चोरी! सुदैवाने आजकाल सत्र आणि उच्च न्यायालयातील भ्रष्टाचाराबद्दल खुद्द सर्वोच्च न्यायालयच कडक ताशेरे झाडत आहे. उदा. अलाहाबदच्या Uncle-type न्यायदानाबद्दल अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने झाडलेले कडक ताशेरे! सार्‍या समाजालाच भ्रष्टाचाराची कीड लागली आहे तिथे न्यायसंस्थेने का मागे रहावे?
या परिस्थितीत होते काय कीं पोलीस कोठडीच्या भयाने पुरुषाची बाजू त्यांच्यावरील आरोप अन्याय्य असूनही सामोपचाराचा मार्ग अवलंबू पहाते. जे कणखरपणे उभे रहातात त्यांना अनेक सांपत्तिक आणि मानसिक अडचणी भोगाव्या लागतात. नोकरी करणार्‍यांना नोकरी जाण्याचे भय तर व्यायसायिकांच्या धंद्याची वाट लागते. अन्याय खरा असेल तर असे होणे ठीकच आहे, पण खरा नसला तरी पुरुषाला आणि त्याच्या आई-वडिलांना आणि बहिणींना अनेक तर्‍हेचा त्रास होतोच.
मग काय करायला हवे? कांहींच जर केले नाहीं तर लग्नसंस्थाच कोलमडून पडेल. आज पाश्चात्य देशांत एकत्र रहाणे नेहमीचे झाले आहे ते भारतातही सुरू होईल, नाहीं झालेच आहे. एकवीसाव्या शतकात जन्मलेली मुले लग्न करतील असे वाटतच नाहीं. मग हे टाळण्यासाठी काय केले पाहिजे?
कुणाहीवर अन्याय झाल्यास त्याचे निवारण करण्यासाठी पोलिसात तक्रार करून न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्यासाठी "योग्य" कायदा करणे बरोबरच आहे. पण आजच्या परिस्थितीत हा कायदा योग्य आहे का? या कायद्यात काय बरोबर आहे आणि काय चूक आहे याचा विचार करायला नको का?.
सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुरुंगवासाची तरतूद रद्द केली पाहिजे. आजच्या स्वरूपात हा कायदा दोघांना सारखे लेखत नाहीं. "Every one is innocent until proven guily" हे आपल्या न्यायसंस्थेचे मूलगामी तत्व आहे. पण केवळ एका "अबला" बाईने तक्रार केली कीं त्या तक्रारीत ज्यांची नांवे आहेत त्यांना चौकशीशिवाय तुरुंगवास करविणे आणि जामीन नाकारणे हा कुठला न्याय? असा (तथाकथित अन्याय करणारे कुठे पळून जाणार आहेत? एवढीच भीती असेल तर त्यांचे पासपोर्ट्स न्यायालयाने ताब्यात घ्यावेत. पण अटक कशासाठी? हे कलम रद्द व्हायलाच हवे.
दुसरे म्हणजे स्त्रीने केलेले खोटे आरोप! ४९८अ कलमाखाली चालविलेल्या अशा खटल्यात पती आणि त्याचे आप्त निर्दोष सुटले तर स्त्रीने त्यांच्याविरुद्द्ध केलेले आरोप खोटे होते हे उघड आहे. मग अशा खोटारड्या फिर्यादी स्त्रीला कठोरात कठोर शिक्षा मिळण्याचे भय हवेच. त्यासाठी पतीला वेगळा खटला करण्याची गरज असू नये.
बर्‍याचदा स्त्रीपेक्षा तिचे आई-वडील तिला असा खटला करायला भरीस टाकतात. त्यामुळे जर अशा खटल्यात पती आणि त्याचे आप्त निर्दोष सुटले तर त्यांच्या व्याह्यांचीही चौकशी होऊन त्यांनाही शिक्षा झाली पाहिजे. फक्त पतीचेच आई-वडील कशाला भरडायचे?
शेवटी न्यायालयातले विलंब! न्यायालयात दाद मागितल्यावर त्याचा निर्णय होण्यासाठी अनेक वर्षें लागतात, तारखा "पडतात" (कीं पाडल्या जातात?), असे करत-करत ५-७ वर्षांनी खालच्या कोर्टात निकाल लागतो, मग उच्च आणि सर्वोच्च न्यायालये आहेतच अपील करायला! असे करत-करत निकाल लागयच्या आधीच त्यातल्या कांहीं आरोपीना देवाकडून बोलावणेही येते! तेंव्हां न्यायसंस्थेच्या आजच्या अवस्थेत स्त्रीला किंवा पुरुषाला न्याय मिळायला इतका वेळ लागतो कीं तो न मिळाल्यातच जमा आहे. म्हणून असे खटले Super-fast track न्यायालयांत चालविले गेले पाहिजेत.
या कायद्याची ही काळी बाजू त्यांच्याच मुलाविरुद्ध, भाच्याविरुद्ध, पुतण्याविरुद्ध किंवा अशा कुणा जवळच्या नातेवाइकाविरुद्ध असा खटला होईपर्यंत शारदाताईंच्या लक्षात येणार नाहीं! आमच्या तरी कुठे आली होती? पण ती भयाण आहे हे मी छातीठोकपणे सांगतो!