Wednesday 28 May 2014

जकार्तामधील 'आम्ही मराठी'च्या सभासदांनी सादर केलेला 'कोल्हापुरी तडका'



जकार्तामधील 'आम्ही मराठी'च्या सभासदांनी सादर केलेला
'कोल्हापुरी तडका'
लेखक: सुधीर काळे, जकार्ता (sbkay@hotmail.com)
कांही दिवसांपूर्वी दिवाळीनिमित्त्य "आम्ही मराठी"ने रागदारी संगीतावर आधारित "दिवाळी पहाट" हा कार्यक्रम सादर केला होता. पाठोपाठ गुढी पाडव्यालाही "सुगम संगीता"चा कार्यक्रमही सादर केला होता. अतीशय उच्च कलागुणांनी नटलेले हे दोन्ही कार्यक्रम जकार्तातील रसिक मराठी मंडळींना खूप भावले होते. त्या उत्साहात एक अगदी वेगळा संगीत-नृत्य या दोन्हींवर आधारित "कोल्हापुरी तडका" हा कार्यक्रम सादर करायचे घाटले व तशी घोषणाही झाली. जकार्तातील तरुण कलाकारांनी मनावर घेऊन हा कार्यक्रम अतीशय कौशल्याने सादर केला व रसिकांची वाहवा व शाबासकी मिळवली!

या कार्यक्रमाची सुरुवात आनंद बापट यांच्या बहारदार शैलीतल्या निवेदनाने झाली. त्यांनी आम्हा प्रेक्षकांना "करवीर एअरवेज"द्वारा कोल्हापूरला नेले व जाता-जाता कोल्हापूरची अनेक वैशिष्ठ्ये व कोल्हापूरच्या अनेक सुपुत्रांची व सुकन्यांची पुनर्भेट घडवून आणली. फेटा बांधलेले वैमानिक, प्रवाशांच्या सेवेतील फेटा बांधलेले परिचारक व नऊवारी नेसलेल्या हवाईसुंदरी यांची जरी उणीव भासली तरी एरवी हा प्रवास फारच मनोरंजक झाला. त्यांनी (व इतर निवेदकांनी) कोल्हापूरचे जागृत देवस्थान असलेले महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिर, रंकाळा तलाव, किल्ले पन्हाळगड, शालिनी स्टूडियो, पंचगंगेचा प्राचीन डौलदार घाट असली प्रेक्षणीय स्थळे व  सुरेश वाडकर यांच्यासारखे गायक, सार्‍या जगात सन्मान पावलेले मंगेशकर कुटुंबीय व सर्वांना आदरणीय असलेले शाहू महाराज अशा नररत्नांबद्दलही सांगितले. निवेदनातील कोल्हापूरचा गूळ,  तांबड्या कटाची मिसळ, तांबड्या-पांढर्‍या रश्श्याचं मटण, लवंगी मिरचीचा ठसका व कोल्हापुरी तडका यासारख्या खास कोल्हापुरी खाण्यांची आठवण करून दिल्यावर सर्वांच्या-खास करून खाबू मंडळींच्या-तोंडाला पाणी न सुटल्यासच नवल!


यानंतर राजेश केळवलकर व समीर आलूरकर यांनी सूत्रधार म्हणून कार्यकमाची सूत्रे हाती घेतली. त्यातले समीर आलूरकर तर कोल्हापूरलाच शिकलेले-वाढलेले! दोघांनी खास कोल्हापुरी थाटात, कोल्हापुरी उच्चारांत, मराठमोळ्या बोलीत व स्वरात सर्व प्रेक्षकांचे दोन-अडीच तास सुंदर मनोरंजन केले.

भारतीय रहिवाशांची संख्या जिथे लक्षणीय आहे अशी चार गृहसंकुले जकार्ता शहरात आहेत. ती म्हणजे 'तमन रसूना', 'तमन कमयोरान कॉन्डोमीनियम', 'कॉन्डोमीनियम
मनारा कलापा गाडिंग' व 'तमन पासाडेनिया' (जिथे मी रहातो). पण वरील चार संकुलांपैकी पहिल्या तीन संकुलांत भारतीयच नव्हे तर मराठी रहिवाशांची संख्यासुद्धा लक्षणीय आहे. आमच्या संकुलात तर फक्त चार मराठी कुटुंबें आहेत. यापैकी तमन रसूना व तमन कमयोरान कॉन्डोमीनियम या दोन संकुलातील मराठी तरुणींनी “कोल्हापुरी तडका”च्या नृत्याच्या कार्यक्रमात हिरीरीने भाग घेतला होता.
 कोल्हापुरी तडका या कार्यक्रमाचा अंतरात्मा होता या दोन संकुलातील हौशी कलाकारांनी सादर केलेली लावणी नृत्ये. "तमन रसूना"च्या नृत्यांचे नृत्यदिग्दर्शन केले होते प्रीती लोखंडेने तर "तमन कमायोरान कॉन्डोमिनियम"च्या नृत्यांचे नृत्यदिग्दर्शन केले होते सुजाता चव्हाणने. या दोघींनी व नृत्यांत  सहभागी झालेल्या नृत्य कलाकारांनी जीव ओतून व अनेक दिवस मेहनत घेऊन व भरपूर तालीम करून हा प्रेक्षणीय कार्यक्रम सादर केला.

ही सर्व नृत्ये इतकी सुरेख बसविली गेली होती कीं व्यावसायिक कलाकारांची बोटंही तोंडात गेली असती. प्रत्येक कलाकाराचे वैयक्तिक नर्तन तर सुरेख होतेच पण एकूण एक नृत्ये सामूहिक नृत्ये होती आणि त्यात या सर्व कलाकारांचे आपापसातले संतुलन व समन्वयसुद्धा लाजवाब होते.
नृत्यांचा कार्यक्रमाची सुरुवात झाली चिमुरड्यांचे नृत्यांनी. “तमन कमायोरान कॉन्डोमिनियम” या गृहसंकुलातील बाल कलाकारांनी नृत्ये सादर केली. यात अथर्व चव्हाण, स्नेहल कदम, अथर्व पाटणकर व इशिता पत्की यांनी भाग घेतला. या बालनृत्याची संकल्पना व नृत्यदिग्दर्शन अर्पिता पाटणकर यांनी केले.
चिमुरड्यांच्या नृत्याचा कार्यक्रम इतका मस्त झाला की त्यावरून पुढच्या कार्यक्रमाच्या उच्च दर्जाची झलक दिसली. सर्वच नृत्य कलाकारांनी दृष्ट लागण्यासारखी नृत्ये सादर केली.
 


बालनृत्यापाठोपाठ जकार्तामधून अलीकडेच सिंगापूरला गेलेल्या विनय पराडकर यांनी “जिवा-शिवाची बैलजोडी” हे गाणे नेहमीच्याच थाटात सादर केले.
या गाण्यानंतर सौ. आरती शुक्ल व सुचित्रा पत्की यांनी संकल्पिलेली व लिहिलेली गावा-शहरातल्या सुवासिनींच्या खास स्वभावविशेषांवरून हलके चिमटे घेणारी "आमची वटपौर्णिमा" ही एकांकिका सादर करण्यात आली. 



या गाण्यानंतर सौ. आरती शुक्ल व सुचित्रा पत्की यांनी संकल्पिलेली व लिहिलेली गावा-शहरातल्या सुवासिनींच्या खास स्वभावविशेषांवरून हलके चिमटे घेणारी "आमची वटपौर्णिमा" ही एकांकिका सादर करण्यात आली. 

या एकांकिकेत पुणेकर (सुचित्रा पत्की), मुंबईकर (स्वाती बारभाई), छोट्या गांवातून आलेली (शीतल गिरासे), दक्षिणेकडील (सुजाता चव्हाण), प्रौढा (रेणू राणा), अत्याधुनिक (आरती शुक्ल) अशा सुवासिनी व पूजा सांगणारे गुरुजी (स्वरूप चव्हाण) ही पात्रे होती. संगीताची बाजू समीर केरकर यांनी सांभाळली.

त्यानंतर नऊवारी साड्या ल्यालेल्या, साजेशा सुरेख अलंकारांत सजलेल्या येथील तरुणींनी खास कोल्हापुरी थाटात सादर केलेल्या बहारदार लावणी नृत्यांना सुरुवात झाली! अगदी व्यावसायिक नृत्यांगनांनीही वाखाणणी करावी अशा प्रतीची ही सारी नृत्ये बसविली होती. या बहारदार 'नृत्यसत्रां'ची सुरुवात 'तमन रसूना' या संकुलात रहाणार्‍या तरुणींच्या नृत्यांनी झाली. त्यांनी 'मेरा दादला', 'ढोलकीच्या तालावर', 'अप्सरा आली', 'आता वाजले की बारा', 'मैं कोल्हापुरसे आयी हूं' आणि 'हिचकी' ही नृत्ये सादर केली.











या नृत्यांनंतर कीर्ती भट्टने "मुंगडा, मुंगडा" हे गाणे सादर केले त्याला सर्व रसिकांनी टाळ्यांनी ताल धरून दाद दिली. पाठोपाठ अमीत कुलकर्णीने "तुझे देखके मेरी मधुबाला, मेरा दिल ये पागल झाला" हे गाणे सादर केले. ते रसिकांना आवडल्याची पावती जागो जाग हास्यांच्या फवार्‍यांतून मिळत गेली.
याच्या पाठोपाठ "तमन कमायोरान कॉन्डोमिनियम"मधील सुजाता चव्हाण व अर्पिता पाटणकर या तरुणींनी "ई-मेल काल इंटरनेटवर केला" ही आधुनिक लावणी ठसक्यात सादर केली. त्यालाही रसिकांनी हातांनी ताल धेरून साथ दिली!
त्यानंतर कौस्तुभ जोशीने "राधा ही बावरी" हे लोकप्रिय गाणे सादर केले. ते त्याने इतके सुरेख म्हटले की प्रेक्षकांनी त्याला "वन्स मोअर" दिला व तो त्या गाण्याचा कांहीं भाग पुन्हा गायला.
पाठोपाठ प्रीती लोखंडेने राती अर्ध्या राती हे गाणे सादर केले. त्यालाही प्रेक्षकांनी उस्फूर्त दाद देऊन पसंतीची पावती दिली.
राजेश केळवलकर व लीना माळवे यांनी भाडेवसूलीसाठी आलेला आंधळा घरमालक व भाडे देणे टाळण्यासाठी बहिरेपणाचे सोंग करणारी बिलंदर भाडेकरू याच्या संवादावर आधारित एक एकांकिका सादर केली. हताश होऊन घरमालक परतल्यावर हीच बिलंदर बाई केवळ घरमालकाची गाठ पडू नये म्हणून बाहेर गेलेल्या आपल्या नवर्‍याला घरी परत बोलावते व तिथेच ही एकांकिका संपते.

 

मग "तमन कमायोरान कॉन्डोमिनियम"मधील तरुणींनी लावण्याची मेडलीच सादर केली. “तमन कमायोरान कॉन्डोमिनियम”च्या नृत्यसमारंभाचे सूत्रसंचालन केले स्वरूप चव्हाण व सुचित्रा पत्की यांनी केले. या मेडलीत "तशी कशी येऊ मी नांदायला", "रेशमाच्या रेघांनी", सदा हरित "बुगडी माझी सांडली गऽऽ" अशा अतीशय लोकप्रिय लावण्या सादर करण्यात आल्या. झाले! प्रेक्षकांनी सारे सभागृहच डोक्यावर घेतले जणू!







थोडक्यात जकार्ताच्या मराठी लोकांनी साजरा केलेला झाली तांबडा-पांढरा "कोल्हापुरी तडका" खरंच झणझणीत जमला होता. अडीच-तीन तास कसे गेले ते कळलेच नाही.
या कार्यक्रमात तर सर्व कलाकारांनी जीव ओतला होता व त्यामागची मेहनत स्पष्ट दिसत होती.
पडद्यामागच्या कलाकारांचे 'अदृश्य' कामही नजरेत भरत होते.
जाता-जाता एक कौतुकास्पद गोष्ट सांगावीशी वाटते. मंचावर मोठ्यांचे नृत्य सुरू असताना चिमुरड्या दोघी-तीघी त्यांचे अनुकरण करताना पाहून खरंच आनंद झाला.
सुनंदा शेंडगे यांच्या देखरेखीखाली शिजलेला 'तांबडा' रस्सा लाजवाब जमला होता व सुरेख जेवणामुळे सर्व उपस्थितांचा "अंतरात्मा तृप्त झाला!"
साचेबंद असलेला, वैविध्य नसलेल्या, अभिनयाला आणि गायनाला फारसा वाव न देणार्‍या व केवळ ठेक्यावर आधारलेल्या पंजाबी भांगड्यापेक्षा किंवा गुजराती दांडियापेक्षा नृत्यकौशल्यात व संगीतामधील वैविध्यात श्रेष्ठ असलेला आणि मुख्यतः ग्रामीण भागात खूप लोकप्रिय असलेला "लावणी" हा मराठी नृत्यप्रकार त्या मानाने कमी लोकप्रिय कां असावा हा विचार हा कार्यक्रम पहाताना माझ्या डोक्याला त्रास देत होता. मला वाटते कीं यातले पहिले आणि महत्वाचे कारण हे असावे कीं महाराष्ट्रात लावणीसारख्या ग्रामीण नृत्यात (इतर नृत्यातही म्हणा) पुरुष कधी फारसा भाग घेत नाहींत त्यामुळे या नृत्याला "सामूहिक" स्वरूप कधीच येत नाहीं. शिवाय अभिनय, नृत्य, गायन, वादन, अर्थपूर्ण काव्य यांचा सुरेख संगम असलेला, भारतीय परंपरेचा (गण/गौळण) अंर्तभाव असलेला हा वैविध्यपूर्ण "लावणी" नृत्यप्रकार "एक शृंगारीक (चावट) नृत्यप्रकार" अशा चुकीच्या व जुनाट, कालबाह्य विचारांवर आधारित कलंकामुळे मागे पडला असावा कीं काय असे मनात आल्याशिवाय रहावत नाहीं. मराठी लोकांच्या "मार्केटिंग"मधील कमतरतेचीही यात भर पडत असावी! कारण दिग्गज गायक तर सोडाच, पण अगदी 'कलका छोकरा' असलेले पंजाबी गायक जेंव्हां जकार्ताला कार्यक्रम करतात तेंव्हां एकाच ढंगाची भांगडा गाणी गात असले तरी प्रक्षकांनाही गायचे आवाहन करत वायरलेस माईक घेऊन प्रेक्षकांत हिंडतात व प्रेक्षक त्यात सहभागीही होतात. या उलट मराठी कलाकार 'सोवळ्या'त असल्यासारखे वावरतात व प्रेक्षकांच्या सहभागाकडे फारसे लक्ष देताना दिसत नाहींत. कुठल्याही कार्यक्रमात प्रेक्षकांशी केलेला सुखसंवादामुळे व प्रेक्षकांना त्यात सहभागी करून घेण्यातील पुढाकारामुळे अशा कलांची व अशा कार्यक्रमांची लोकप्रियता अनेक पटींनी वाढते. याचा मराठी कलाकारांनी विचार करायलाच हवा! शिवाय लावणीचे थोडेसे शहरीकरणही व्हायला हवे असेही मनात आल्यावाचून राहिले नाहीं!