Friday 23 May 2014


  
बेगडी धर्मनिरपेक्षता आणि सत्तापालट
लेखक: सुधीर काळे, जकार्ता (sbkay@hotmail.com)
सर्वप्रथम मी आपल्या नवनिर्वाचित पंतप्रधानांचे हार्दिक अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो व त्यांच्या समर्थ नेतृत्वाखाली भारताची प्रतिमा सार्‍या विश्वात लखलखीत होवो व भारत सार्‍या विश्वाला एक उदाहरण बनो अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. पंतप्रधान होऊ घातलेल्या मोदींचे व्यक्तिमत्वच असे आहे कीं लोक एक तर त्यांचे खंदे प्रशंसक असतात किंवा त्यांचा तिरस्कार करणारे कट्टर विरोधक तरी असतात. त्यांच्या कामगिरीकडे कुणीही "आपल्याला काय त्याचे?" अशा त्रयस्थपणे, उदासीनपणे पाहूच शकत नाहीं. 
मी गोव्यात काम करत होतो त्याला आता १२ वर्षे झाली. सुमारे तेंव्हांपासून मी नरेंद्र मोदींच्या गुजरातमधील कार्यपद्धतीबद्दल व त्यातून निष्पन्न झालेल्या गुजरातच्या प्रगतीबद्दल वाचत-पहात आलेलो आहे व या अभ्यासातून मी मोदींचा एक खंदा प्रशंसक व समर्थक बनलो आहे. "वाचकांचा पत्रव्यवहार"सारख्या सदरातून मी त्यांच्याबद्दल सातत्याने लिहीतही आलेलो आहे. "कुणालाही फारसे माहीत नसलेल्या" मोदींचे आजच्या "जगप्रसिद्ध व्यक्ती"मध्ये झालेले परिवर्तन व ते करत असतांनाची त्यांची वाटचाल मी अभिमानाने पहात आलेलो आहे. या पुढेही त्यांच्या आंतरराष्ट्रीय कामगिरीबद्दल असेच लिहायला-वाचायला मिळेल अशी मला खात्री आहे व ते करण्याइतके इतके आयुरारोग्य मला देव देईल अशी त्याच्याकडे माझी प्रार्थनाही आहे.
ते तर्कसंगतीने विचार करतात व त्यानुसार सद्यपरिस्थितीला योग्य असा निर्णय घेतला कीं ते सार्‍या शक्तीनिशी व पूर्ण उत्साहाने त्याची कार्यवाही करतात हेच माझ्या मते मोदींच्या यशाचे प्रमुख कारण आहे. त्यांच्या स्वभावात धरसोडवृत्तीचा संपूर्णपणे अभाव आहे हा एक बोनसमुद्दा!
दूरदृष्टी, योजनाबद्धपणे काम करण्याची पद्धत व बारीक-सारीक बाबींकडेसुद्धा लक्ष पुरवून कार्यवाही करणे या गुणविशेषात त्यांचा हात कुणी धरू शकेल असे मला वाटत नाहीं. 'पुलोआ-'च्या (पुरोगामी लोकशाही आघाडी) कारकीर्दीत घडलेला अभूतपूर्व पातळीवरील भ्रष्टाचार व त्या सरकारची अगदी सुमार कामगिरी पाहिल्यानंतर काँग्रेसचे दिवस भरत आल्याचे, 'भाजपा'ला सत्तेवर येण्याची सुवर्णसंधी असल्याचे आणि राष्ट्रीय पातळीवर असलेली 'भाजपा'च्या राजकीय नेतृत्वातील पोकळी त्यांना जाणवली व ती पोकळी भरून काढत त्या नेतृत्वावर दावा करण्याचा निर्णय त्यांनी दोन-एक वर्षांपूर्वीच घेतला. म्हणूनच २०१२ साली त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने जेंव्हां ओळीने तिसर्‍या वेळी विधानसभेची निवडणूक प्रचंड मताधिक्याने जिंकली व गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचा शपथविधी झाला तेंव्हा त्यांनी केलेले भाषण गुजराती भाषेत न करता सार्‍या राष्ट्राला कळावे म्हणून त्यांनी हिंदीतून केले होते. यातच त्यांची महत्वाकांक्षा व दूरद्ष्टी सार्‍या देशाच्या लक्षात आली. त्या आधी त्यांनी तीन दिवसांच्या उपोषणसत्रांद्वारा "सद्भावना अभियोग" चालविला होता. त्यांच्या या सार्‍या पावलांत त्यांच्या वर उल्लेखलेल्या सार्‍या गुणांची भारतीयांना खूप प्रकर्षाने जाणीव होत होती.
त्यांची भाजपाच्या २०१४ सालच्या प्रचारमोहिमेचे प्रमुख म्हणून व पाठोपाठ पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून निवड झाल्यावर त्यांच्यातील वरील गुणांबरोबरच लोकांची नाडी जोखण्यातील त्यांची हातोटी व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्यासाठी अत्याधुनिक तांत्रिक बाबींचा परिणामकारकपणे वापर करण्याचे त्यांचे कौशल्यही लक्षात येऊ लागले. जातीधर्माचा आधार न घेता केवळ "सर्वांचा सर्वांगीण विकास व सुशासन" या बाबींवरच त्यांनी पूर्ण मोहिम चालविली. इतर पक्षांनी (बेगडी) धर्मनिरपेक्षतेचा मुखवटा चढवला, 'शाही' (!) इमामांसारख्या धर्मगुरूंचे 'आशिर्वाद'ही घेतले, पण तरीही मोदींनी आपले मुख्य धोरण बदलले नाहीं. अगदी राममंदिरासारख्या विषयाचा दुरुपयोगसुद्धा त्यांनी कटाक्षाने टाळला!
आजवर भारतात झालेली प्रत्येक निवडणूक पहायचे भाग्य मला लाभलेले आहे. स्वतंत्र भारताच्या १९५२ सालच्या पहिल्या-वहिल्या निवडणुकीत मी केवळ १० वर्षाचा होतो त्यामुळे त्या निवडणुकीवद्दल मला फारसे आठवत नाहीं, पण १९५७ पासूनच्या निवडणुकांच्या आठवणी खूप स्पष्ट आहेत व निवडणुकीचा हंगाम आला की धर्मनिरपेक्षतेचा भाव एकदम कसा वधारतो हे मी तेंव्हांपासून पहात आलेलो आहे. यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकप्रचाराच्या मोहीमेत तर हा विषय रंगमंचाच्या अगदी मध्यभागी होता. भाजपाव्यतिरिक्त इतर सारे पक्ष या मुद्द्यावर एक होऊन जातीयवादी पक्षाला आपली मते न देता धर्मनिरपेक्षतेवर विश्वास असण्यार्‍या पक्षांनाच ती द्याया घोषणेचे पडघम कानठळ्या ब्सेपर्यंत बडवत होते. अर्थातच या प्रचारात काँग्रेस पक्ष आघाडीवर होता व गांधी परिवार हिरीरीने असली भाषणे ठोकत देशभर सभा घेत होता! त्यात त्यांनी शाही (!) इमामासारख्या धर्मगुरूचे समर्थन मिळविण्यासारखी निधर्मवादाला पूर्णपणे न शोभणारी पावलेही उचलली. भविष्यकाळात तरी धर्मगुरू मंडळी त्यांच्या पदाला न शोभणारी अशा प्रकारची कृती करणार नाहींत व सर्व धर्माचे भारतीय असल्या अयोग्य सल्ल्यांकडे दुर्लक्ष करतील अशी आशाही आपण करू या!
वैयक्तिक पातळीवर माझा कधीच असल्या हास्यास्पद बेगडी धर्मनिरपेक्षतेवर विश्वास नव्हता. त्यामुळेच मोदींची "India First" ही धर्मनिरपेक्षतेची नवी सुलभ व्याख्या मला मनापासून पटली. कारण या व्याख्येत फक्त भारताच्या हितांना प्राधान्य दिलेले असून भारताच्या हितांव्यतिरिक्त इतर सर्व बाबींना फाटा दिलेला आहे. भारत हे माझे दैवत असून भारताची राज्यघटना हाच माझा धर्मग्रंथ आहेहे ठासून सांगणारे मोदी मला अधीकच भावले. आपल्या राज्यघटनेनेही सर्व नागरिकांना-मग ते कुठल्याही धर्माचे असोत-समान लेखलेले आहे. त्यामुळे माझ्या मते धर्मनिरपेक्षतेला राज्यघटनेशिवाय इतर कुटलीही व्याख्या लागू होऊ नये व म्हणून इतर कुठली व्याख्याही कुणी वापरू नये असे मला वाटते.
पण स्वातंत्र्यप्राप्तीनंतर वर्षानुवर्षे सत्ताप्राप्तीसाठी बहुतेक सर्व राजकीय पक्ष धर्मनिरपेक्षतेचा सर्रासपणे गैरवापर करताना आपण पहातो. कांहीं नेते केवळ मतांसाठी बेकायदेशीररीत्या भारतात घुसलेल्या बांगलादेशींना आपले राजकीय वजन खर्च करून भारताचे नागरिक बनविण्याची तर अलीकडे ममता बॅनर्जींच्या सारखे नेते केवळ गठ्ठा मतदानाचे तंत्र वापरण्यासाठी आपल्या राज्यातील बांगलादेशींना, ते बेकायदेशीर असले तरी, घालवू देण्यास नव्याने व प्राणपणाने विरोध करणारी देशद्रोही कृत्ये करतात. खरे तर २००५ साली त्या विरोधी पक्षात असताना याच ममता बॅनर्जींनी अशा बेकायदेशीररीत्या पश्चिम बंगालात घुसलेल्या बांगलादेशींना लोकसभेत कसून विरोध करण्याचे देशभक्तीपूर्ण कृत्यही केले होते[१]! अवघ्या नऊ वर्षात केवढा हा बदल? कधी-कधी ममता बॅनर्जीच्या वाणीतला आजचा विखार पाहिल्यावर प्रश्न पडतो की या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत की  बांगलादेशच्या राष्ट्रपती आहेत?
२००१च्या जनगणनेनुसार भारतात ८० टक्क्यापेक्षा जास्त हिंदू, १३.४ टक्के मुसलमान, २.३ टक्के ख्रिश्चन व १.९ टक्के शीख व ०.८ टक्के बौद्ध आहेत[२].  भारताची असामान्यता हिंदूंच्या लोकस्वभावामधे व हिंदुत्वामागील अध्यात्मिकतेमध्ये आहे[३]. शेकडो खेड्यांमध्ये भेटणार्‍या सर्वसामान्य हिंदू लोकांत एक साधीसुधी, उपजत अध्यात्मिकता दिसते व या अध्यात्मिकतेमुळे तो दुसर्‍यांमधील विभिन्नतेचा स्वीकार करतो, मग तो ख्रिश्चन असो, मुस्लिम असो, जैन असो वा अरब असो, फ्रेंच असो वा चिनी असो. या हिंदुत्वामुळे भारतीय ख्रिश्चन फ्रेंच ख्रिश्चनांपेक्षा वेगळा भासतो तर भारतीय मुसलमानही सौदी मुसलमानांपेक्षा वेगळा भासतो[३].
देवत्व वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या धर्मग्रंथांतून प्रकट होऊ शकते या कल्पनेचा हिंदू धर्म, हिंदू माणूस स्वीकार करतो. कदाचित् म्हणूनच असेल कीं सार्‍या जगात ठिकठिकाणी छळल्या गेलेल्या अल्पसंख्यांकांना फक्त हिंदूंनीच आश्रय दिलेला आहे. मग ते कित्येक वर्षांपूर्वी इथे आश्रयाला आलेले सीरियन ख्रिश्चन असोत, वा इराणहून आश्रयाला आलेले पारशी असोत, वा ज्यू असोत, आर्मेनियन्स असोत किंवा अगदी अलीकडे चीनच्या जुलमाला घाबरून आश्रयाला आलेले तिबेटी लोक असोत! ३५०० वर्षांच्या आपल्या इतिहासात हिंदूंनी कधीही दुसर्‍या कुठल्या देशावर लष्करी आक्रमण केलेले नाहीं[४] किंवा तलवारीच्या बळावर किंवा प्रलोभने दाखवून इतर धर्मियांना धर्मातर करण्यास प्रवृत्तही केलेले नाहीं.
म्हणूनच जेंव्हा भारतीय व पाश्चात्य प्रसारमाध्यमें निष्पाप जनतेला मारणार्‍या 'सिमी'सारख्या दहशतवादी संघटनांची बरोबरी एरवी शांत असणार्‍या पण कांहीं तात्कालिक कारणाने संतापून उठून एकाही माणसाचा बळी न घेता एकाद्या चर्चला आग लावणार्‍या हिंदूंबरोबर करतात तेंव्हां खरंच वाईट वाटते. बाबरी मशीदीचा विध्वंस कितीही निंद्य असला तरी त्या विध्वंसात एकाही मुसलमानाचा बळी गेलेला नाहीं हे लक्षात घेतले पाहिजे. उलट सूडाच्या भावनेने घडवून आणल्या गेलेल्या १९९३ सालच्या मुंबई बॉम्बहल्यात शेकडो निष्पाप लोकांची-मुख्यत्वे हिंदूंची-हत्या करण्यात आली होती. तरीही बाबरी मशीदीच्या विनाशाची घटना ही मुंबई बॉम्बहल्ल्यापेक्षा जास्त भयानक होती असा कांगावा अनेक वार्ताहारांकडून केला जावा यापेक्षा जास्त दुर्दैवाची गोष्ट कुठली? अरबांनी केलेल्या आक्रमणापासून हिंदूंना आतंकवादाला बळी जावे लागले आहे. मग तो चौदाव्या शतकाच्या शेवटी एका दिवसात एक लाख हिंदूंचे शिरकाण करणारा तैमूरलंग असो[५] वा धर्मन्यायपीठाद्वारे हिंदू ब्राह्मणांना क्रूसावर चढवून मारणारे पोर्तुगीज असोत!
एका बाजूला या देशात प्रचंड पटीने बहुसंख्य असलेल्या हिंदूंची आज टवाळी केली जाते, त्यांचा तिरस्कार केला जातो व त्यांच्या सर्वात जास्त पवित्र मानल्या जाणार्‍या अमरनाथसारख्या[६] तीर्थक्षेत्रांना अगदी मूलभूत सोयींपासूनसुद्धा वंचित ठेवले जाते तर दुसर्‍या बाजूला भारत सरकार मुस्लिमांना हज यात्रेसाठी सरकारी मदत घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उत्तेजन देते आणि अशी मदत घेणे हे मुस्लिम धर्माच्या विरुद्ध असले तरी अशी मदत नियमितपणे घेतली जाते[३]!
भारतातील हिंदू समाज गेली अनेक वर्षे हा दुटप्पीपणा बघत आलेला आहे व त्यापायी त्याच्या वाट्याला येणारी अवहेलना सोसत आलेला आहे. या बेगडी धर्मनिरपेक्षतेला हा हिंदू समाज आज पूर्णपणे विटलेला असून या धर्मनिरपेक्षतेचे विसर्जन करायला तो सज्ज झालेला आहे.
मोदींची "India First" ही व्याख्या भारतीय मतदाराला आता मनापासून पटलेली आहे हे या निवडणुकीच्या निकालांनी स्पष्ट केलेले आहे. "अबकी बार, मोदी सरकार" या (पहिली ओळ वेगवेगळी असलेल्या) घोषणेने सारा देश मोदीमय झाला त्यात नवल ते काय?
या उस्फूर्त प्रेमाचे कारण काय असावे? मोदी भारताचा सर्वांगीण विकास करतील, नोकर्‍या निर्माण करतील व दंगे-धोपे होऊ देणार नाहींत (गुजरातमध्ये गेल्या १२ वर्षात एकही जातीय दंगल झालेली नाहीं), भारतीय असल्याचा अभिमान नव्याने जागृत करतील अशा अनेक अपेक्षा ठेवून भारतीयांनी आज मोदींच्या नेतृत्वाला इतके अभूतपूर्व समर्थन देऊन त्यांना अशा प्रचंड मताधिक्याने निवडून दिले आहे. मोदी हे जरी एक राजकीय नेते असले तरी त्यांना आज भारतीय जनता एका जादूगाराच्या भूमिकेतच पाहू लागली आहे.
अनेक निवडणुका पाहिलेल्या वार्ताहारांनासुद्धा वाराणशी मतदारसंघात दिसणारा असा उन्माद, अशी कळकळ, अशी पोटतिडीक, असा उत्साह पूर्वी कधीही पहायला मिळालेला नव्हता. गंगेच्या घाटावर जमलेल्या व बाकड्यावर गप्पा मारत बसलेल्या बुद्धिजीवी नागरिकांना-अन् यात नेते, विचारवंत, तत्वज्ञ, विद्वत्ते वा विद्यार्थी वगैरे सारे येतात-विचारल्यास मोकळेपणे दिलेली उत्तरे मिळतात. वाराणशीच्या जनतेला खराखुरा बदल, नगरपालिकेची संरचना व गंगा नदी स्वच्छ करून हवी आहे[७]. म्हणूनच वाराणशीतही मोदी लाखोंच्या मताधिक्याने निवडून आले!
देशाच्या पातळीवर त्यांना चीनच्या व पाकिस्तानच्या अपमानांसमोर निधड्या छातीने उभा रहाणारा नेता हवा आहे[८]. त्यांना विकास, सुबत्ता व नोकर्‍या निर्माण करणारे नवे आर्थिक धोरण हवे आहे. जनतेला शिक्षण क्षेत्रातील व आरोग्य खात्यातील सरकारी सेवांचा उबग आलेला आहे व मोदी सुशासनाद्वारे हे बदल घडवून आणतील असा त्यांना विश्वास आहे.
आतापर्यंत तथाकथित बुद्धीजीवी पत्रकार मोदींच्याबद्दल एक तर्‍हेची घृणाच बाळगत व त्यामुळे मोदींची स्तुती करणार्‍यांना जातीयवादी, मुस्लिमविरोधी, काँग्रेसविरोधी, सोनियाविरोधी वा हुकुमशाहीचा पुरस्कार करणारे अशा (किंवा याहूनही जास्त घाणेरड्या) शेलक्या शिव्या हे पत्रकार देत असत! आश्चर्य हे की "मोदींना समर्थन देणे ही गंभीर चूक आहे" अशी टोकाची मते बाळगणारे हे वार्ताहार सामान्य माणसांनाच नव्हे तर कित्येक अनुभवी व प्रथितयश वार्ताहारांना त्यांच्या लिखाणाद्वारे नियमितपणे भेटत आले आहेत. प्रथितयश संपादक किंवा सार्वजनिक क्षेत्रातील बुद्धिजीवी लोक सोनिया गांधींबद्दल किंवा त्यांच्या मुलाबद्दलचे आपले प्रेम जाहीरपणे व्यक्त करत ते चालते, पण कुणी मोदींची तूलना हिटलरबरोबर केली नाहीं तर ही बुद्धिवादी मंडळी अशांना वाळीतच टाकत! भारतीयांनी या बेगड्या उदारमतवादी वृत्तीला या निवडणुकीद्वारा चपराकच  मारली असून अशा उदारमतवादी लोकांशिवायच जगण्याचा क्रांतिकारी निर्णयसुद्धा या निवडणुकीद्वारे त्यांनी घेतला!
भारतीय जनता मोदींकडून विकासाचीच अपेक्षा करत आहे असे नाहीं तर काँग्रेसला तुम्ही ६० वर्षें दिलीत, मला फक्त ६० महिने (पाच वर्षे) द्याया शब्दात मतांचा जोगवा मागणारे मोदी पाच वर्षांत जणू एकादी जादूची  कांडी फिरवून भारताचा संपूर्ण कायापालट करून टाकतील अशी अभूतपूर्व अपेक्षा भारतीय जनता करत आहे. आधीच्या निवडणुकांत धर्मनिरपेक्षता आणि पक्षनेत्याच्या/उमेदवारांच्या व्यक्तिमत्वाच्या निकषावर निवडणुका लढविल्या व जिंकल्या जायच्या पण जेंव्हां मोदींनी वाराणशीत एका विराट मिरवणुकीने येऊन आपले नामांकनपत्र निर्वाचन अधिकार्‍याकडे सुपूर्द केले त्या दिवशी मनमोहन सिंग म्हणाले होते कीं मोदी-लाट वगैरे कांहींही नसून ही प्रसिद्धीमाध्यमांनी बनविलेली लाट आहे. सारी प्रसिद्धीमाध्यमें मोदींच्या विरोधात आहेत इतकेच नाहीं तर त्यांचा  तिरस्कार करतात हे जणू मनमोहन सिंगांच्या गांवीच नसावे इतके ते वर्तमानकाळात नव्हते कीं काय? कीं त्यांनी "जो हुकुम"चे आज्ञापालन केले?
असे म्हणतात कीं या जगात यशाइतके दुसरे कुठले यश नसते. या मोहिमेच्या शेवटी-शेवटी जसजसे मोदींचे यश सुस्पष्ट होऊ लागले तसतसे या प्रसारमाध्यमांच्या वृत्तीत बदल जरूर दिसू लागला व आतापर्यंत मोदींचा तिरस्कार करणारे वार्ताहार आता मोदींकडे मुलाखतीसाठी गयावयावजा विनंती करू लागलेले आपण पाहिले. आतापर्यंत प्रथितयश संपादकमंडळी व चित्रवाणीवरील चर्चासत्रांची संचालकमंडळी "मोदी गुजरातबाहेर एक जागाही जिंकू शकणार नाहींत" असे छातीठोकपणे सांगायची. बहुतेक बुद्धिवाद्यांच्या कांहींशा डाव्या विचारसरणीमुळे, उदारमतवादी वृत्तीमुळे ते मोदींना घाबरतच आले असावेत कारण मोदी फक्त राजकीय क्षितिजावर बदल आणत नसून एक क्रांती घडवून आणत आहेत हे या सर्व प्रसारमाध्यमांना जाणवू लागले! या मोदी-क्रांतीमुळे आजचे तथाकथित प्रथितयश बुद्धिवादी आता कचर्‍याच्या टोपलीत फेकले जातील हेही त्यांना कळून चुकले असणार!
आणि रोज धर्मनिरपेक्षतावादावर, धर्मांधतेवर आणि मोदी जर पंतप्रधान झाले तर भारताचा कसा सर्वनाश होईल याबाबत एकांगी मते ऐकणार्‍या आपणा भारतीयांना अद्याप नीट आकलन न झालेल्या अनेक गंभीर समस्यांमधील ही फक्त एक झाली! पण जर मोदींच्यामुळे जर गेल्या ६७ वर्षांची बेगडी धर्मनिरपेक्षता व बेगडी समाजवाद मोडीत निघाला तर ती मोदींनी भारताला दिलेली एक मोठी देणगी ठरेल व त्यासाठी बहुतांश भारतीय जनता मोदींची कायम ऋणी राहील.
'भाजपा'ने मोदींची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा करून आपापसातील तंट्यांना तिलांजली दिलीच होती. केवळ मोदींना आपला एक नंबरचा शत्रू ठरवून त्यांना आपले एकमेव लक्ष्य समजण्याचे जे धोरण काँग्रेसने आचरले होते ते खोटे, अन्याय्य व धोकादायक असल्यामुळे त्या धोरणाला, त्या नेतृत्वाला भारतीय मतदारांनी कचर्‍याची टोपली दाखविलेली आहे. मोदींनी आता असत्याशी सत्याच्या आधारावर लढले पाहिजे. आज जगात १०० कोटी हिंदू आहेत, जगातील प्रत्येक सहा लोकांमधला एक हिंदू आहे. या जगातील सर्वात यशस्वी, कायदेपालन करणारा आणि संकलित असा हा समाज आहे. अशा समाजाला आतंकवादी कसे म्हणता येईल?
म्हणूनच मोदींनी सत्ताग्रहण केल्यानंतर आकस म्हणून नव्हे तर एक संशोधनपर अभ्यास म्हणून १९४७ पासून कुठल्या समाजाकडून अन्य समाजाचे किती लोक मारले गेले याची आकडेवारी तयार करून ती प्रसृत केल्यास ती सर्वच भारतीय जनतेला खूप कांहीं सांगून जाईल!
आज सारे जग मोदींना त्यांच्या निवडणुकीतील अभूतपूर्व यशाबद्दल त्यांना शुभेच्छा पाठवत आहे. अमेरिकेसारखा त्यांचा व्हिसा रद्द करण्याची उद्धट, उदाम कृती करणारा देश आज त्याच मोदींना 'व्हाईट हाऊस'च्या भेटीचे निमंत्रण देत आहे. हे मोदींचे कर्तृत्व नजरेत भरण्यासारखे आहे यात शंका नाहीं. अख्ख्या भारताला मोदींचा अभिमान वाटत आहे, कौतुक वाटत आहे व ते भारताला यशाकडे नेऊ पहाणार्‍या नेतृत्वाकडे अपेक्षेने पहात आहेत. प्रत्येक भारतीय त्यांच्या नेतृत्वाखाली भरपूर कष्ट करायला, मेहनत घ्यायला सज्ज झाला आहे. एक समर्थ नेता कसे देशाला आपली मरगळ झटकून पुन्हा कठोर कष्ट उपसण्यास, कार्यान्वित होण्यास प्रेरित करतो याचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे.
मोदींच्या दीर्घायुष्यासाठी, त्यांच्या दीर्घ कारकीर्दीसाठी, त्यांच्या अभूतपूर्व यशासाठी व भारताच्या तेजस्वी भविष्यासाठी मी त्यांचा खंदा पुरस्कर्ता या नात्याने परमेश्वराकडे मनापासून प्रार्थना करू इच्छितो!
-------------------
टिपा:
[१] २००५ साली संतापलेल्या ममता बॅनर्जी लोकसभेत तावातावात म्हणाल्या, बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांची नांवे पश्चिम बंगालच्या मतदारांच्या यादीत आलेली आहेत. याविरुद्ध राज्यसरकारने कांहींही कारवाई केलेली नाहीं. म्हणून हा विषय चर्चेला घेतला गेला पाहिजे.जेंव्हा उपसभापती चरण सिंग अटवाल यांनी या सत्राच्या सुरुवातीलाच या महत्वाच्या विषयावर ४ तासांची विस्तृत चर्चा झालेली आहेअसे सांगून परवानगी नाकारल्यावर ममता बॅनर्जीं भडकल्या व मला जेंव्हा एकादा विषय लोकसभेत उपस्थित करायचा असतो तेंव्हा मला बोलूच दिले जात नाहीं. लोकसभेची सदस्य या नात्याने मलाही माझ्या लोकांना भेडसावणारा विषय उपस्थित करण्याचा हक्क आहेअसे म्हणत व आपल्या हातातले कागद त्यांच्या दिशेने फेकत त्या आपल्या जागेवर येऊन बसल्या व हुंदके देऊ लागल्या! आता याच दीदींना एकाएकी याच बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांचा पुळका कां आला आहे? खाली दिलेल्या दुव्यावर अधीक माहिती वाचता येईल:
[२] विकीपीडिया वरून घेतलेली माहिती
[३] व [७] हा लेख फ्रान्स्वा गोतिये या फ्रेंच लेखकाच्या Hindu Terrorismया लेखातून व तावलीन सिंग यांच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रकाशित झालेल्या A dangerous disconnectया लेखातून स्फूर्ती घेऊन लिहिलेला आहे. मूळ लेखांचे दुवे आहेत: http://www.francoisgautier.com/hindu-terrorism/ आणि http://indianexpress.com/article/opinion/columns/fifth-column-a-dangerous-disconnect/
[४] बांगलादेशाच्या निर्मितीच्या वेळी त्यावेळच्या पूर्व पाकिस्तानात बंगाल्यांचा छळवाद करणार्‍या पाकिस्तानी लष्कराच्या कारवायांमुळे निर्वासितांचा लोंढा भारतात आश्रयाला येऊ लागला व त्यामुळे भारतापुढे अभूतपूर्व समस्या उभ्या राहिल्या. म्हणून भारताचे लष्कर मुक्तीबाहिनी या बांगलादेशी संघटनेबरोबर पूर्व पाकिस्तानात गेले व त्या देशाच्या स्वातंत्र्यानंतर व नव्या सरकारचे गठन होताच आपले लष्कर संपूर्णपणे मायदेशी परतले.
[६] यात मानससरोवरसारख्या अनेक इतर तीर्थक्षेत्रांचाही उल्लेख करायला हवा!
[८] टाइम्स ऑफ इंडियात प्रसिद्ध झालेला डॉ. वॉल्टर अ‍ॅंडरसन या तरुणपणी  अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्रालयाच्या वतीने भारतातील वकिलातीत काम केलेल्या व नंतर  अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्रालयात अनेक पदे भूषविलेल्या अधिकार्‍याचा मोदी भारताला जपान व चीनच्या जवळ नेतीलअसे सांगणारा हा लेख वाचा या दुव्यावर:


(हा लेख 'लोकसत्ता’च्या 'सत्तार्थ’ या 'ब्लॉग'वर कांहीं बदलांसह २३ मे रोजी प्रकाशित झाला)

No comments:

Post a Comment