Friday 18 May 2012

जनरल सिंग यांना लक्ष्य कां केले जात आहे?


मूळ लेखक: RSN सिंग; अनुवादक: सुधीर काळे
(या लेखात "जनरल सिंग" म्हणजे आपले लष्कर प्रमुख विजय कुमार सिंग व "कर्नल सिंग" म्हणजे या लेखाचे मूळ लेखक RSN सिंग. दोघांच्या नावांत "सिंग" असल्यामुळे गोंधळ होऊ नये म्हणून हा खुलासा केलेला आहे.)
भारतीयांसाठी आज प्रामाणिक असणे हा एक शापच झाला आहे. जर जनरल सिंग यांनी त्यांना देऊ केली गेलेली लांच खिशात टाकली असती तर ते सत्ता कंपूच्या गळ्यातला ताईत बनले असते आणि सेवानिवृत्तीनंतर एकाद्या राज्याचे राज्यपालपदही त्यांना मिळाले असते.
एका ले. जनरलने आपले लष्करप्रमुख जनरल सिंग यांना लांच देण्याच्या केलेला प्रयत्न त्यांनी एका राष्ट्रीय दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत उघड केला. ही घटना या लेखाचा मूळ लेखक (कर्नल RSN सिंग), कांही जाणकार पत्रकार मंडळी व इतर कांही जणाना आधीपासूनच माहीत होती. लांच देऊ पहाणारा ले. जनरल आणि जनरल सिंग यांच्यामधील या संभाषणाची ध्वनीफीतही उपलब्ध आहे ही बातमीसुद्धा कांहीं नवी नाहीं! भारतीय लष्कराला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणार्‍या लॉबीच्या वतीने आपले लष्करप्रमुख जनरल सिंग यांना लाच देऊ पहाणार्‍या या ले. जनरलच्या प्रतापांची माहिती सदर लेखाचे मूळ लेखक कर्नल सिंग यांनी Whos trying to fix the Army Chief by raking up his age? या त्यांच्या जुलै २०११ च्या लेखात दिलीच आहे. या लेखाचे वितरणही मोठ्या प्रमाणावर झाले आहे.
"तात्रा" नावाच्या वाहनांची अवाच्या सवा किंमतीला विक्री करण्यासाठी दबाव आणणे हाच उद्देश ही लांच देण्यामागे होता. एक विशिष्ठ कंपनी जुनी, वापरलेली "तात्रा" वाहने खरेदी करत होती व ती "भारत अर्थ मूव्हर्स लि. (BEML) या कंपनीमार्फत दुप्पटीपेक्षा जास्त भावाने विकत होती. ३०-४० लाखाला विकत घेतलेली ही वहाने शस्त्रास्त्रे पुरविणारी "लॉबी" आपल्या लष्कराला सुमारे एक कोटी रुपयाला विकत होती असे सांगितले जाते. आपल्यासारख्या करदात्यांकडून जमा केल्या गेलेल्या पैशांचा असा दुरुपयोग करणे आणि लष्कराचे आणि देशाचे असे नुकसान करणे जनरल सिंग यांना पसंत नव्हते. मग या ले. जनरलने उपरिनिर्देशित १४ कोटी रुपयांची लांच जनरल सिंग यांना देऊ केली. तरी जेंव्हां जनरलसाहेब बधले नाहींत तेंव्हां या ले. जनरलने "ही तात्रा वहाने १९८६ पासून खरेदी केली जात असून जनरल सिंग यांच्या आधीच्या लष्करप्रमुखांनी असाच व्यवहार केला होता आणि त्यांचे उत्तराधिकारीसुद्धा असाच व्यवहार करतील" असे जनरल सिंगना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.
जनरल सिंग यांनी ताबडतोब वरील माहिती आपल्या संरक्षणमंत्र्यांना दिली आणि ते जर लष्करप्रमुखपदासाठी योग्य नसतील तर त्यांनी आपला राजीनामा देण्याची तयारीही दाखविली. (जनरल सिंग यांच्या राजीनामा देण्याच्या तयारीतील आशय गर्भित आणि महत्वपूर्ण आहे आणि त्याचे धागेदोरे किती खोल आणि कुठेपर्यंत पसरले आहेत हे अजून उघडकीस यावयाचे आहे.)
वरील घटनेची माहिती आपल्याला देण्यात आलेली होती अशी कबूली आपले सद्सद्विवेकबुद्धीपूर्ण आणि पापभीरू संरक्षणमंत्री अँटनी यांनी राज्यसभेत दिली आणि आपले कपाळ आपल्या ओंजळीत टेकवले. त्यांची आपले कपाळ असे आपल्या ओंजळीत टेकविण्याची कृती त्यांच्या मनातील व्यवहारबुद्धी आणि सदसद्विवेकबुद्धी यांच्यातील संघर्षामुळे होती कीं त्यांच्या वैयक्तिक सचोटी आणि राजकीय लाचारी यांच्यातील संघर्षामुळे होती?
जनरल सिंग यांच्या वैयक्तिक सचोटीमुळे संरक्षणमंत्र्यांना जनरल सिंग यांच्याबद्दल अतीशय आदर आहे आणि हे सहाजीकही आहे कारण स्वत: संरक्षणमंत्रीसुद्धा याबाबतीत त्यांच्यासारखेच आहेत. विधिमंत्रालयाकडून सुरुवातीला जनरल सिंग यांचा त्यांच्या वयाबाबतचा युक्तिवाद नि:संदिग्धपणे मान्य केल्यानंतर संरक्षणमंत्रांनी या वादात जनरल सिंग यांच्या बाजूने जवळ-जवळ निर्णय दिलाच होता पण यावेळी संरक्षणमंत्र्यांपेक्षा जास्त शक्तिशाली लोकांनी त्यांना आपला निर्णय मागे घ्यायला लावला आणि ही केस विधिमंत्रालयाकडे पुन्हा पाठवायची सक्ती केली. यामुळे संरक्षणमंत्र्यांना सदसद्विवेकबुद्धीची टोचणी तीव्रपणे जाणविली. अँटनी यांच्या सदसद्विवेकबुद्धीला याची टोचणी लागून राहिली होती व सत्य आणि न्याय यांच्याविरुद्ध जाणून-बुजून अनेक मार्गांनी केलेल्या कारवाईची भरपाई म्हणून त्यांना अनेक राजकीय प्रलोभने आणि आश्वासने देण्यात आली [असे कांही सूत्रांकडून या लेखाच्या मूळ लेखकांना (कर्नल सिंग यांना) समजले आहे.?]
आपल्या चारित्र्याबद्दलच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी तडजोड स्वीकारणे जनरल सिंग यांना पसंत नव्हते. मध्यस्थांनी खूप प्रयत्न केले पण जनरलसाहेब या तडजोडीला तयार झाले नाहींत व त्यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. त्यांनी यावेळी राजीनामा दिल्यास शस्त्रास्त्रे पुरविणार्या लॉबीच्या मर्जीनुसार ठरविलेला उत्तराधिकारी निवडण्याची योजना उधळली गेली असती. तसेच राजकीय पक्षांना मिळणार्या आर्थिक देणग्यांवर त्याचा परिणाम झाला असता आणि त्यातून प्रतिकूल आणि अस्वीकारार्ह परिणाम झाले असते अशी भीती स्वत:ला सर्वश्रेष्ठ समजणारी नोकरशाहीला वाटत होती व ही नोकरशाही सातत्याने राजकीय नेतृत्वाला ढोसत होती. परिणामत: या नेत्यांकडून जनरल सिंग यांना धमक्या मिळू लागल्या कीं त्यांनी राजीनामा दिल्यास तो मंजूरच होणार नाहीं.
अशा परिस्थितीत जनरल सिंग यांना सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याशिवाय दुसरा मार्गच उरला नाहीं.
सरकार व त्याहीपेक्षा संरक्षणमंत्री अँटनी यांच्याही ज्येष्ठ सत्ताधीशांची पाचावर धारण बसली कारण त्यांना माहीत होते कीं जनरल सिंग यांची केस अजीबात गुंतागुंत नसलेली, साधी, सरळसोट केस होती. मोठे-मोठे कायदेपंडित राहिले बाजूला पण अगदी विधिमहाविद्यालयातील पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यालासुद्धा याबद्दल खात्री वाटली असती. यानंतर जे कांहीं झाले सर्वांना सुपरिचितच आहे. भारतातील प्रत्येक संस्थेने जनरल सिंग यांच्या वयाबद्दलच्या या वादात स्वत:चे नाक कापून घेतले आहे!
लष्करातील अधिकार्यांच्या जन्मतारखांच्या चुकीच्या नोंदींतून उद्भवणार्‍या समस्यांना याआधी लष्कराला तोंड द्यावे लागले नव्हते असे नाहीं. अशा केसेस नित्याच्या आहेत व त्यांच्याबद्दलचा निर्णय योग्यपणे व तांतडीने घेतला जातो. १९९०च्या दशकात सेवानिवृत्तीच्या फक्त एक दिवस आधी कर्नल रमेशचंद्र दीक्षित यांच्या हुबेहूब अशाच एका वयाबद्दलच्या तक्रारीचे तात्काळ निवारण करण्यात आलेले होते. जनरल सिंग यांच्या केसला पहिला आणि शेवटचा अपवाद केले गेले आहे. "शेवटचा अपवाद" असे म्हणायचे कारण म्हणजे संरक्षणमंत्रालयाने किंवा सेनेच्या मुख्यालयाने जनरलासाहेबांच्या केसमध्ये एकदा का MS शाखेतील नोंदीप्रमाणे कारवाई करण्याचा निर्णय दिला कीं त्यानंतर कायदेशीर मार्गाने लष्कराची यादी किंवा MS शाखेची यादी AG शाखेपेक्षा जास्त ग्राह्य धरली जाईल असे कायदेशीर रीतीने ते म्हणूच शकत नाहीं.[]
म्हणजेच जनरल सिंग यांच्या बाबतीतील निर्णय एक कपट, एक फसवणूकच होती. ही फसणूक इतकी अवाजवी आहे कीं या कारवाईने भारताला एक "बनाना प्रजासत्ताका"च्या []पायरीवर आणून बसविले आहे. कुणी रचले हे कपट कारस्थान? हे दोन पाठोपाठच्या माजी लष्करप्रमुखांनी रचले आहे! घृणास्पद आणि किळसवाण्या कपटी भानगडींत सामील झाल्यामुळे यांच्या इज्जतीच्या, प्रतिष्ठेच्या आज ठिकर्या उडाल्या आहेत. उदाहरणार्थ कारगिलच्या युद्धात धारातीर्थी पडलेल्या हुतात्म्यांच्या कुटुंबियांसाठी राखून ठेवलेल्या सदनिका हडप करणार्या आपल्या माजी लष्करप्रमुखांना काय म्हणाल आपण? अशा कृत्यांपेक्षा दुसरे कुठले नीच कृत्य असू शकते? याच माजी लष्करप्रमुखांनी आपल्या वडीलकीच्या नात्याने आपल्यापेक्षा कनिष्ठ असलेल्या जनरल सिंग यांच्यासारख्या अधिकार्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक सचोटीचे आणि नीतिमूल्यांचे रक्षण करायच्याऐवजी जनरल सिंग यांनी एक विशिष्ठ जन्मतारीख मान्य करावी म्हणून त्यांच्यावर सक्ती केली आणि त्यांनी असे मान्य न केल्यास हा विवाद वापरून त्यांच्या व्यावसायिक प्रगतीची आगगाडी रूळावरून घसरविली जाईल अशी गर्भित धमकीही दिली! या माजी लष्करप्रमुखांनी खरे तर लष्कराच्याच मुख्यालयातील एका शाखेने केलेल्या चुकांबद्दल जनरल सिंग यांची माफी मागायला हवी होती! संघटनात्मक निर्बंधांच्या नावाखाली वारंवार केलेल्या आवाहनांच्या दबावापोटी या चुकीच्या जन्मतारखेबाबत जनरल सिंग यांच्याकडून स्वीकृती मिळाल्यानंतर या माजी लष्करप्रमुखांनी सुटकेचा निश्वास सोडला. कारण आता शस्त्रास्त्रे पुरविणार्या लॉबीच्या पसंतीचा उत्तराधिकारी निवडण्याची योजना आता सुरक्षित झाली होती! जनरल सिंग यांनी संघटनात्मक निर्बंधांबाबतचे स्पष्टीकरण देण्यासाठी केलेल्या नंतरच्या आवाहनाबाबत सर्वांनीच कानावर हात ठेवले.
तात्पर्याने अशा लष्करप्रमुखांच्या हाताखाली भारतीय लष्कर आणि लष्करातील अधिकारी सुरक्षित नाहींत.
नोकरशहा या प्रकारात ओढले गेले ते जनरल सिंग यांनी स्वत: लष्करप्रमुख झाल्यावर आपल्या जन्मतारखेच्या चुकीच्या नोंदीचा पाठपुरावा सुरू केल्यावरच. आदर्श चारित्र्य असलेल्या (impeccable credentials ) चार माजी सरन्यायाधीशांनी जनरल सिंग यांच्या बाजूने केलेले मतप्रदर्शनही मंत्रालयाच्या नैतिकतेवर परिणाम करू शकले नाहीं. विधिमंत्रालयाने जनरल सिंग यांची बाजू नि:संदिग्धपणे उचलून धरल्याचाही कांहींही उपयोग झाला नाहीं. हा प्रश्न त्यांनी कांहीं अतिरिक्त महिने काम करण्याचा नसून त्यांच्या इज्जतीचा आहे असे जनरल सिंग यांनी सांगूनही त्याचा उपयोग झाला नाहीं. केवळ राजकीय नेत्यांनी आणि नोकरशहांनीच त्यांची टर उडविली असे नाहीं तर कांहीं सेवानिवृत्त जनरल्सनीही त्यांच्यावर टीका केली.
वारंवार चित्रवाणीच्या वाहिन्यांवर जनतेने त्यांना पाहिलेले असल्यामुळे या सेवानिवृत्त जनरल्सचे चेहरे आता जनतेला चांगलेच परिचित झालेले आहेत. या सर्वांचे गतायुष्य संशयास्पदच आहे. बायकांच्या बाबतीत चारित्र्य चांगले नसल्याबद्दलच्या गुप्तहेरखात्याच्या अहवालामुळे त्यातल्या एकाला सक्तीने राजीनामा द्यावयास लागला होता. दुसर्यावर आपल्या वरिष्ठ अधिकार्याच्या पत्नीबरोबर पळून गेल्याचा ठपका होता आणि तिसरा त्याच्या पदव्या खोट्या असल्यामुळे अडचणीत आला होता. ही आहे जनरल सिंग यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविणार्यांची लायकी!
हे आणि असले लष्करी अधिकारी आपल्या लष्करातली ही घाण कशी कित्येक वर्षांपासून साचलेली आहे याचीच ग्वाही देतात. कारगिलच्या युद्धानंतर यातल्या कांही जनरल्सनी निर्लज्जपणे स्वत:लाच कसे भूषवून घेतले यावरूनही हे स्पष्ट होते. कुठल्याही तर्हेचे शौर्य किंवा युद्धातील डावपेचांबाबतचे कसलेही कौशल्य त्यांनी दाखविलेले नव्हते. यातल्या कांहींना तर घरीच पाठवायला हवे होते. पण त्या काळातल्या राजकारणाने त्यांना वाचविले.
लष्करी सामुग्रीच्या खरेदीशी संबंधित भ्रष्टाचार कांहीं नवा नाहीं. त्याची सुरुवात तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेच सुरू झाली होती. त्यात कृष्ण मेनन यांच्या काळात झालेले जीप खरेदीप्रकरणही होते. "तेहेलका"ने ध्वनीफितींवर आणि चित्रफितींवर "रंगे हाथ" पकडल्यामुळे प्रसिद्धीला आलेल्या भानगडीच्या मुळाशीसुद्धा असला भ्रष्टाचारच होता. मग आता जे बाहेर येत आहे यात नवे ते काय आहे?
आपला लष्करप्रमुख कोण असेल आणि त्याची कारकीर्द किती वर्षें चालेल हे ठरवू शकेल इतक्या उच्च थरावरील प्रभाव या लष्कराला शस्त्रास्त्रे पुरविणार्‍या लॉबीला प्राप्त झाला आहे हीच नवी धक्कादायक आणि घातक गोष्ट म्हटली पाहिजे! या लॉबीची पोच, तिची पाळेमुळे सरकारच्या प्रत्येक महत्वाच्या संस्थांमध्ये अगदी खोलवर घुसली आहेत. या लॉबीने जनरल सिंग यांच्या जन्मतारीखेचे  कुभांड टिकून रहावे म्हणून कोट्यावधी रुपये खर्च केले आहेत असे बोलले जाते. या लॉबीचा प्रभाव इतका खोलवर घुसला आहे कीं प्रत्येक प्रामाणिक भारतीयाला नि:संदिग्धपणे माहीत असलेल्या सत्याचा विजय होण्यासाठी एकादा ईश्वरी हस्तक्षेप घडून यावा लागेल. आणि ते सत्य कोणते? ते आहे  नैतिकदृष्ट्या आणि कायद्याच्या दृष्टीने जनरल सिंग यांची खरी जन्मतारीख १० मे १९५१ हीच आहे आणि दोन माजी लष्करप्रमुखांनी शस्त्रास्त्रे पुरविणार्या लॉबीच्या आज्ञेबरहुकूम त्यांच्यावर लादलेली १० मे १९५० ही त्यांची जन्मतारीख खरी नाहीं! आपल्या लष्करात इतक्या जास्त प्रमाणावर अप्रामाणिक अधिकारी आहेत ही गोष्टही नक्कीच नैराश्य निर्माण करणारी आहे.
या लॉबीने सर्वात आधी जनरल सिंग यांच्या जन्मतारीखेबद्दलचा विवाद उभा करून एक कट रचला, पाठोपाठ त्यांनी "जनरल सिंग-संरक्षणमंत्री" आणि "नोकरशाही-लष्करी अधिकारी" यांच्यात मतभेदांची दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यात आधी जनरल सिंग यांच्या सचोटीची वाखाणणी करून संरक्षणमंत्र्यांच्या अडमुठेपणावर भर दिला, मग परंपरा व आधीपासून रुळलेल्या प्रथा (precedences) वापरून जनरल सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात जाऊ नये असा प्रयत्न केला, नंतर सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका जनरल सिंग यांनी मागे घ्यावी यासाठी या लॉबीने मोहीम सुरू केली, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात जनरल सिंग यांच्या जन्मतारखेबद्दल कांहींच उल्लेख नव्हता म्हणून जनरल सिंग यांच्यावर राजीनामा देण्यासाठी मानसिक दबाव आणण्याचे प्रयत्न केले गेले आणि जेंव्हां जनरल सिंग यांनी राजीनामा देण्यास नकार दिला तेंव्हां त्यांच्या बडतर्फीसाठीही मोहीम याच लॉबीने सुरू केली!
संरक्षणमंत्र्यांच्या ऑफीसमधील संभाषण चोरून ऐकण्यासाठी जनरल सिंग यांच्या सांगण्यावरून तिथे एक छुपा माइक्रोफोन बसवला गेला होता या आवईकडेसुद्धा याच पार्श्वभूमीवरून पाहिले पाहिजे. पण हे कपट इतके निकृष्ठपणे योजले होते कीं ते लगेच कोसळले! हे कपट रचणारी माणसं मात्र अद्यापही शिक्षेची भीती नसल्यासारखे राजरोसपणे मिरवत आहेत. जनरलासाहेबांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रातला मजकूर फुटल्याबद्दलच्या बातमीकडेही याच पार्श्वभूमीवर पाहिले पाहिजे. यासाठी लष्करप्रमुखांना नोकरीवरून काढून टाकण्याची अजब मागणीसुद्धा शस्त्रास्त्रे पुरविणार्या लॉबीच्या आज्ञेवरूनच करण्यात आली होती!
"जनरल सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे" ही मोहीम पूर्वी भारताच्या सुरक्षिततेला बाधा आणण्यास कारणीभूत झालेल्या आणि विस्मृतीच्या पडद्याआड गेलेल्या एका जराजर्जर माजी मुत्सद्द्याला वापरून सुरू करण्यात आली पण हे करणार्यांना इतकेही माहीत नव्हते कीं अशी तरतूद लष्करासंबंधींच्या कायद्यात अंतर्भूतच नाहीं. या मुत्सद्द्याची स्वत:चीच स्थिती डळमळीत असल्यामुळे त्याला "जनरल सिंग यांना नोकरीवरून काढून टाकावे" असे सांगावेसे वाटले नाहीं. या सर्व प्रकरणाबाबत बोलण्याचा कांहींही अधिकार नसलेला आणि लष्कराच्या काम करण्याच्या पद्धतीबद्दल कांहींही माहिती नसलेला आणखी एक माजी मुत्सद्दी जनरल सिंग यांच्यावर टीका करण्यात खास उत्साहाने भाग घेत आहे. असे करण्यात या गृहस्थांना एकाहून जास्त हेतू आहेत हे उघड दिसत आहे. या मुत्सद्द्यानुसार जनरल सिंग यांच्याविरुद्ध उत्तर भारतातून प्रकाशित होणार्या एका दैनिक वृत्तपत्रातील ही अभूतपूर्व मोहीम पंतप्रधानांच्या मूक संमतीनेच होत आहे. हे जर खरे असेल तर एकाद्या पंतप्रधानाने आपल्याच लष्करप्रमुखाविरुद्ध अशा कारवाया करण्याची घटना फक्त "बनाना प्रजासत्ताकां"तच[] होऊ शकते.
कांही वर्षांपूर्वी एक अधिकारी कमांडर नदीम यांना ते सकाळी शांति पथावरील हिरवळीवर आपला नेहमीचा "जॉगिंग"चा व्यायाम घेत असताना त्यांना एका ट्रकने उडविले होते. कांहीं संवेदनशील शस्त्रास्त्रांची खरेदी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. या घटनेमागेही शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणारी लॉबीच होती असा दाट संशय त्यावेळी व्यक्त करण्यात आला होता व त्या संशयाचे अद्याप निराकरण झालेले नाहीं. संरक्षण मंत्रालयातील एक अधिकारी कुमार यशकर सिन्हा आणि त्यांची पत्नी यांचा अलीकडेच झालेला मृत्यूही बुचकळ्यात पाडणारा आहे. आधी पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला आणि मग स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्त्या केली असे पोलिसांना वाटले होते. पण त्या अधिकार्याच्या व्यक्तिरेखेचा अभ्यास केल्यावर तो सुस्वभावी आणि अतीशय चांगल्या चारित्र्याचा गृहस्थ होता व त्याच्यात आणि त्याच्या पत्नीत चांगला वैवाहिक सुसंवाद होता असे आढळून आले. म्हणून त्याच्यात आत्महत्या करण्याची प्रवृत्ती असण्याची शक्यताच नसावी. गुन्ह्याच्या जागी मिळालेल्या पत्रात असलेल्या "कामात वरिष्ठ अधिकार्यांच्याकडून आलेला दबावा" या उल्लेखावरून पोलिसांना त्याच्या आत्महत्येचा संशय आला असावा. पण हे सारेच अजब आहे. कारण कामावरील तणावामुळे आपल्या पत्नीचा खून कुणीच करणार नाहीं. आपल्या पत्नीचा गळा दाबून खून करून कुणीच स्वत:ला पेटवून घेणार नाहीं. असा यातनामय मृत्यू पत्करण्यापेक्षा त्याने स्वत:ला गळफास लावून घेऊन आत्महत्या केली असती. हा अधिकारी संरक्षणमंत्रालयातील एका माहिती मिळविण्याच्या अधिकाराच्या (RTI) केसवर काम करत होता. या अधिकार्याच्या आणि त्याच्या पत्नीच्या हत्येमागेही शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणारी लॉबी असण्याची शक्यता नाकारता येत नाहीं.
शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणार्या लॉबीच्या कारस्थानांनी आपल्या लष्करातील अत्युच्च नेतृत्वाला बरेच डळमळीत करून टाकले आहे असे दिसते. एका माजी लष्करप्रमुखाने शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणारी लॉबी, नोकरशाही आणि राजकीय नेते यांच्या दुव्यातून राजकीय देणग्या मिळविण्याच्या प्रथेचा प्रारंभ केला. बिनीच्या "खेळाडूं"ची आणि बिनीच्या संस्थांची हातघाई आणि क्रौर्य पहाता या मागे २०१४च्या निवडणुकांची प्रेरणाही असू शकेल.
शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणार्या लॉबीच्या आदेशानुसार आपल्या लष्करातील उत्तराधिकाराची योजना बनत आहे ही फारच गंभीर आणि काळजी करण्यासारखी स्थिती आहे. उच्चपदावरील कांहीं अधिकार्यांना बाहेर काढण्यापुरता हा प्रश्न उरला नसून त्यांचा एका पाठोपाठ दुसरी अशी घटनांची शृंखला निर्माण होऊन त्यातून लष्कराच्या संपूर्ण निवड-प्रक्रियेतच बाधा येण्याची आणि परिणामत: भारताच्या संपूर्ण लष्करालाच दगाफटका होण्याची शक्यता आहे.
"एक देश म्हणून भारताचे अस्तित्व टिकून राहील ते केवळ भारतीय लष्कराच्या जिद्दीवर, चिकाटीवर" हे लॉर्ड वेव्हेल यांचे विधान आपले लष्कर एक परिणामकारक आणि निर्दोष संस्था आहे या आधारावर त्यांनी केले होते. ही संस्था आता केवळ तिच्या कडांवरच उसवू लागलेली नसून तिला आता अधिकार श्रेणीच्या शिखराकडूनच धोका निर्माण झालेला आहे. ही घसरण अशीच चालू राहिली तर संपूर्ण भारतच उसवून जाईल. खरे तर आता आपले सरकारच आपला नैतिक अधिकार झपाट्याने घालवत आहे. अशा परिस्थितीत जर हा शेवटचा बुरूजही कोसळला तर आपला देश खरोखरच एक "बनाना प्रजासत्ताक" म्हणूनच जिवंत राहील.
म्हणूनच आपण आपल्या लष्कराला आणि देशाला वाचविले पाहिजे.
---------------------------------------------------------
All opinions in this translated article are of the original author Mr RSN Singh.
(RSN Singh is a former military intelligence officer who later served in the Research & Analysis Wing. The author of two books: Asian Strategic and Military Perspective and Military Factor in Pakistan, he is also a columnist for Canary Trap. This post was first published on Firstpost on April 6, 2012)
Original article can be read on:
http://canarytrap.in/2012/04/06/why-is-gen-vk-singh-being-targetted/
---------------------------------------------------------
टिपा:
[] इथे लिखाण उलट-सुलट झाले आहे असे वाटते. कारण जनरल सिंग यांच्या बाबतीत संरक्षण मंत्रालयाने AG शाखेच्या नोंदीनुसार निर्णय न घेता तो MS शाखेतील नोंदीनुसार निर्णय घेतला. म्हणजेच primacy मिळाली MS शाखेतील नोंदीला!
[] आर्थिक दृष्ट्या फळे, खनिज द्रव्यें यासारख्या फारच मोजक्या साधनसंपत्तीच्या निर्यातीवर अवलंबून असलेल्या आणि संख्येने अगदी छोटा पण अतीशय श्रीमंत असा सत्ताधारी समाज (राजकारणी, उद्योगपती आणि लष्करशहा) आणि संख्येने प्रचंड पण अती गरीब असा कष्टकर्यांचा समाज अशी अतीशय विषम विभागणी असलेल्या राजकीय दृष्ट्या अस्थिर राष्ट्राला "बनाना रिपब्लिक" म्हणतात. अशा राष्ट्रात साधारणपणे "हम (सत्ताधारी) करेसो कायदा" असा सामाजिक न्याय असतो.

Monday 7 May 2012

भारताची "अग्नि"परिक्षा
लेखन आणि संकलन: सुधीर काळे जकार्ता

१९ एप्रिल रोजी भारताने लांब पल्ल्याच्या प्रक्षेपणास्त्राची यशस्वी चांचणी करून सध्याच्या सुरक्षा परिषदेतील इतर सभासदांच्या मांडीला मांडी लावून त्यांच्या "पंक्ती"ला बसायचा सन्मान मिळविला! अशी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे बनविण्याची क्षमता फक्त पाचच राष्ट्रात आजपर्यंत होती: अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, आणि चीन. आता आपण सहावे असे राष्ट्र झालेलो आहोत. (शिवाय नेहमीप्रमाणे "इस्रायल" हे नांव कंसात असतेच, खरे-खोटे देव जाणे!)

परवा यशस्वी चांचणी केलेले प्रक्षेपणास्त्राला अग्नि-५ या नावाने ओळखले जाते! या आधी आग्नि-१ ते अग्नि-४ अशा संज्ञांच्या चार प्रक्षेपणास्त्रांची चांचणी करण्यात आलेली आहे. या सर्व प्रकारच्या प्रक्षेपणास्त्रांची थोडक्यात माहिती या लेखाच्या शेवटी तक्ता-१ मध्ये दिलेली असून विस्तृत माहितीसाठीचे दुवे तक्ता-२ खाली दिलेले आहेत.

या यशस्वी चांचणीवर अनेक देशांच्या सरकारांतर्फे तसेच प्रसारमाध्यमांतर्फे वेगवेगळ्या प्रतिक्रिया प्रसिद्ध झाल्या. त्यापैकी Stratfor या नियतकालिकातील "भारत चीन यांच्यातील कडवी स्पर्धा" हा रॉबर्ट काप्लान यांचा लेख उल्लेखनीय वाटला म्हणून त्या लेखाचा स्वैर अनुवाद सर्वप्रथम खाली देत आहे.

चीनच्या बीजिंग व शांघाई शहरावर अण्वस्त्र हल्ला करू शकणार्याा आपल्या लांब पल्ल्याच्या अग्नि-५ या प्रक्षेपणास्त्राच्या भारताच्या यशस्वी चांचणीनंतर भारत व चीन यांच्यामधील एक नवी सत्तास्पर्धा प्रकाशझोतात आलेली आहे. हे दोन देश एकूण क्षेत्रफळ, लोकसंख्या आणि संपन्न संस्कृती या दृष्टीने आशिया खंडातील प्रमुख देश आहेत.

ही स्पर्धा केवळ अत्युच्च तंत्रज्ञान आणि भौगोलिक राजकारणावर (geopolitical) आधारित असून त्यातून या दोन महासत्तांमधील स्पर्धेत पायाभूत विसंगती आहे हे दिसून येते. आजवर या दोन मोठ्या राष्ट्रांच्या भौगोलिक विस्ताराच्या सीमा कधीच एकमेकांना ओलांडत नव्हत्या किंवा त्यांच्यात कुठल्याही तर्‍हेचा वाद नव्हता. ५० वर्षांपूर्वी हिमालयाच्या सीमारेषेवर मर्यादित लढाई झाली असली तरी तिच्यामागे पूर्वापार चालत आलेला ऐतिहासिक किंवा वांशिक खुन्नस नव्हता.

भारत आणि चीन यांच्यामधील भौगोलिकदृष्ट्या लक्षवेधक गोष्ट म्हणजे त्यांच्यामधील हिमालयाची अभेद्य भिंत! बुद्ध धर्माचा प्रसार जरी भारतामधून चीनमध्ये झालेला असला तरी तो श्रीलंका व म्यांमारमार्गे दक्षिण चीनच्या युनान प्रांतामधून झाला. (नकाशा पहा) एरवी या दोन देशात सांस्कृतिक अशी देवाणघेवाण अपवादानेच झालेली आहे.

पश्चिमेकडील काश्मीरपासून ते पूर्वेकडील अरुणाचलप्रदेशपर्यंतच्या सीमा आखणीवरून दोन्ही देशात तणाव असला तरी या नव्याने सुरू झालेल्या स्पर्धेच्या मुळाशी हा सीमावाद आहे असे वाटत नाहीं. या नव्या स्पर्धेच्या कारणाचे मूळ आहे शस्त्रास्त्रांबाबतच्या नव्या तंत्रज्ञानामुळे या दोन देशांतील प्रत्यक्ष अंतर बदलले नसले तरी "परिणामकारक" अंतर अचानक कमी झाले हे आहे.

तिबेटच्या विमानतळावरील चिनी लढाऊ जेट विमाने भारतावर हल्ले करू शकतात हे खरेच आहे. भारतीय उपग्रहसुद्धा अंतराळातून चीनवर पाळत ठेऊन असतात. या खेरीज हिंदी महासागरात चीन अनेक ठिकाणी अद्ययावत बंदरे विकसित करीत असताना भारत आपल्या नौदलाच्या लढाऊ नौका दक्षिण चिनी समुद्रात पाठवू लागला आहे. म्हणजेच भारत व चीन एकमेकांचे दक्षतापूर्वक निरीक्षण करीत आहेत.दिल्ली आणि बीजिंग येथील युद्धाचे डावपेच आखणारे विशेषज्ञ आता संपूर्ण आशियाखंडाचे नकाशे उलगडून बसले आहेत. जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले आणि वेगात लष्करीकरण करत असलेले हे दोन आशियाई देश एकमेकांच्या प्रभावक्षेत्रांवर अतिक्रमण करीत आहेत हे अगदी स्पष्टपणे दिसत आहे. आणि ही प्रभावक्षेत्रे पूर्वी कधीही नव्हती इतकी आता स्पष्ट, रेखीवपणे दिसू लागली आहेत.

केनया, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि म्यांमार येथील बंदरविकासाच्या प्रकल्पांतून चीनच्या आर्थिक प्रभावक्षेत्राची होत असलेली वाढ त्या देशाच्या हिंदी महासागर क्षेत्रातल्या वाढत्या प्रभावाची द्योतक आहे आणि याचीही भारताला चिंता आहे.

ही तेढ त्यांच्या प्रचंड लोकसंख्येमुळे आणि युरोप-आशियाच्या नकाशावरील त्यांच्या परस्पर भौगिलिक स्थानामुळे निर्माण झालेली असून त्यात भावनेच्या पोटतिडिकेचा लवलेशही नाहीं. या दृष्टिकोनातून पाहिल्यास भारत-चीन स्पर्धेची तूलना अमेरिका-रशियाच्या शीतयुद्धकालीन भावनारहित स्पर्धेशी करता येईल.

भारत-चीनमधील त्यामानाने काबूत ठेवलेल्या स्पर्धेबद्दलचे निराळेपण तिची तूलना भारत-पाकिस्तान स्पर्धेबरोबर केल्यास लक्षात येईल. भारतातील भरपूर लोकसंख्या असलेले गंगा नदीचे खोरे पाकिस्तानच्या भरपूर लोकसंख्या असलेल्या सिंधू नदीच्या खोर्‍यापासून केवळ ५०० किमीवर आहे. अशा तर्‍हेची जी भौगोलिक जवळीक भारत-पाकिस्तान स्पर्धेत दिसते ती भारत-चीन स्पर्धेत नाहीं. धार्मिक घटकामुळे जणू भारत-पाकिस्तान स्पर्धेच्या आगीत तेल घातल्यासारखे होते. उत्तर भारताच्या इतिहासातील भारतावर केलेल्या मुस्लिम चढायांतून पाकिस्तानचा एका आधुनिक अवताराच्या रूपात पुनर्जन्म झालेला आहे असा समज पाकिस्तानात आहे. त्यात भारतीय उपखंडाच्या फाळणीच्यावेळी झालेल्या रक्तपातामुळे ही स्पर्धा आणखीच उत्कट आणि भावनावश बनली आहे.

भारत-चीन स्पर्धेत अशा तर्‍हेची अनेक शतके चाललेली भावनोत्कटता नसल्यामुळे या स्पर्धेमुळे धोरण आखणारे दिल्लीतील उच्चभ्रू लोक एका बाजूने खुष आहेत कारण चीनसारख्या एक महाशक्ती बनण्याच्या मार्गावर असलेल्या राष्ट्राबरोबर भारताची तूलना करण्यात येऊ लागल्यामुळे भारताची शान वाढली आहे असे त्यांना वाटते. आधी भारताबरोबर नेहमी दरिद्री आणि अराजकतेने बजबजलेल्या पाकिस्तानचे नाव जोडलेले असायचे. भारतीय उच्चभ्रूंच्या मनात चीनबद्दल झपाटल्याची भावना आहे. त्या मानाने चीनच्या उच्चभ्रूंना भारताचे इतके महत्व वाटत नाहीं. हे सहाजीकही आहे कारण ही स्पर्धा दोन तोडीच्या राष्ट्रांमधील स्पर्धा आहे व त्यात कमी ताकतीच्या राष्ट्राला बलवान राष्ट्राबद्दल झापटल्यासारखे वाटतेच. ग्रीस व तुर्कस्तानमध्ये अशाच तर्‍हेची असमान स्पर्धा आहे.

भारताच्या संदर्भात चीनची स्वाभाविक, अंगभूत ताकत ही केवळ चीनची भक्कम आर्थिक कुवत किंवा जास्त कार्यक्षम चिनी सरकार नसून त्यात भूगोलाचाही अंतर्भाव होतो. वंशाने "हान" जातीची बहुसंख्य चिनी प्रजा चीनच्या शुष्क पठारी भागात वसलेल्या आणि "हान" नसलेल्या अल्पसंख्य चिनी प्रजेने वेढलेली आहे. त्यात आतला (Inner) मंगोलिया, उइघूर तुर्क आणि तिबेट येथील जनतेचा समावेश होतो. त्याचबरोबर चीन सध्या आपल्या सीमेवरील त्याला धोकादायक वाटणार्‍या राष्ट्रांबरोबरचे तंटे सोडविण्याच्या मागे आहे आणि म्हणूनच चिनी सरकारने अंतर्गत सुरक्षाव्यवस्थेवर नियंत्रण रहावे म्हणून या (हान नसलेल्या) अल्पसंख्यांकाना चीनमध्ये सामावून घेतले आहे.

या उलट केवळ अस्थिर, अस्वस्थ पाकिस्तानच नव्हे तर नेपाळ, बांगलादेश यासारख्या कमजोर राष्ट्रांबरोबरच्या खूप लांबीच्या आणि असुरक्षित अशा सीमांचा भारताला उपद्रव आहे. कारण या राष्ट्रांकडून भारताला निर्वासितांच्या रूपाने उपद्रव होतो. या खेरीज पूर्व आणि मध्य भारतात माओवादी नक्षली बंडाळीची डोकेदुखीही आहेच. परिणामत: भारत आपल्या नौसेनेद्वारे हिंदी महासागरात जरी आपल्या शक्तीचे प्रदर्शन करत असला व चीनविरुद्ध एक तर्‍हेची तटबंदी उभी करत असला तरी भारतीय लष्कराला वर उल्लेखलेल्या देशांबरोबरच अंतर्गत समस्यांमुळे एक तर्‍हेची बंधने आहेतच.

नेपाळ, बांगलादेश, म्यांमार आणि श्रीलंका या देशावरील प्रभावासाठी चीन आणि भारत आपापसात एक प्रकारे खेळत असतातच. तसे पाहिल्यास हे सर्व देश भारतीय उपखंडात मोडतात म्हणजेच चीन आपला संघर्ष भारताच्या अंगणात आणू पहात आहे.

अफगाणिस्तानचे भवितव्य ज्याप्रमाणे भारताच्या दृष्टीने एक निर्णायक कसोटी ठरणार आहे त्याचप्रमाणे उत्तर कोरियाचे भवितव्य हे चीनसाठी निर्णायक कसोटी ठरणार आहे. हे दोन्ही देश भारताच्या आणि चीनच्या शक्तीला आणि साधनसंपत्तीला एक प्रकारची सततची गळतीच आहेत. पण इथे भारताची अफगाणिस्तानबरोबर सीमा नसल्यामुळे तो सुदैवी आहे. या उलट चीन आणि उत्तर कोरिया यांच्यात सामायिक सीमारेषा आहे. अमेरिकेने सैन्य बाहेर काढल्यावर जो हलकल्लोळ अफगाणिस्तानात माजेल त्याचा भारतावर कमी परिणाम होईल पण उत्तर कोरियाच्या सत्तेचा गुंता सोडविताना चीनवर प्रचंड परिणाम होईल कारण कोट्यावधी निर्वासित चीनच्या मांचूरिया भागात घुसण्याची शक्यता आहे.

२०३०च्या सुमारास भारताची लोकसंख्या चीनपेक्षा जास्त होईल पण भारतीय लोकसंख्येत तरुणांचे प्रमाण चीनपेक्षा जास्त असेल. त्यामुळे भारताचे भवितव्य जास्त उज्ज्वल वाटते. भारताची लोकशाही कितीही अकार्यक्षम असली तरी तिला मूलभूत कायदेशीर "औरसपणा"च्या समस्येला तोंड द्यावे लागत नाहीं. पण चिनी सरकार हुकुमशाही मार्गाने सत्तेवर आलेले असल्यामुळे चीनला औरसपणाच्या मूलभूत समस्यांना तोड द्यावे लागू शकेल.

शेवटी प्रश्न रहातो तिबेटचा. भारत आणि चीन यांच्यातील टक्कर हिमालय पर्वताच्या सीमेवर भिडली आहे व त्यात तिबेट भारतीय उपखंडाच्या सीमेवर एकाद्या धक्काशोषकासारखा (buffer, shock-absorber) उभा आहे. त्याचा भौगोलिक फायदा भारताला मिळतो.

चीनचा तिबेटवरील प्रभाव कमी झाल्यास त्याचा भौगिलिक आणि राजकीय फायदा भारताला मिळेल. भारताने तिबेटच्या दलाई लामाला राजाश्रय दिलेला आहे. तिबेटमधील चीनविरोधी उघड असंतोष चीनच्या दृष्टीने गैरसोयीचा आहे तर त्याचा भारताला फायदा आहे. जर चीनला तिबेटमध्ये गंभीर उठावाला तोंड द्यावे लागले तर भारताचा तेथील प्रभाव दिसू येण्याइतका सुधारेल. थोडक्यात चीन आज जरी जास्त मोठी सत्ता वाटत असला तरी या स्पर्धेत भारताच्या बाजूनेसुद्धा अनेक अनुकूल घटक आहेत.

भारत आणि अमेरिका आज औपचारिक रीत्या मित्रराष्ट्रे नाहींत. समाजवादकडे झुकणारे आणि राष्ट्रवादी असलेले भारतीय राजकीय नेतृत्व असे कधीही होऊ देणार नाहीं. पण युरोप आणि आशियाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या हिंदी महासागराच्या किनार्‍यावरील भारताच्या स्थानामुळे भारताची लष्करी आणि आर्थिक वाढ अमेरिकेच्या दृष्टीने फायद्याची ठरते कारण भारत चीनला प्रतिशह देऊ शकतो. आज अमेरिका पश्चिम गोलार्धात एक प्रभावी महासत्ता आहे आणि म्हणूनच पूर्व गोलार्धात दुसर्‍या एकाद्या महासत्तेचा उदय तिला नको आहे. भारत चीनला तोडीस तोड बनल्यास एक जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या डोक्यावरील बोजा कमी होईल व ही एक भारत-चीन स्पर्धेतील जमेची गोष्ट आहे!
Stratforवर प्रसिद्ध झालेला मूळ इंग्लिश लेख खालील दुव्यावर वाचता येईल:
http://www.stratfor.com/analysis/india-china-rivalry-robert-d-kaplan?utm...
सणावारी पक्वांन्नांचे अंमळ जास्त जेवण झालेला आणि आरामखुर्चीत पेंगत बसलेला मनुष्य जसा एकाद्या मोठ्या आवाजाने दचकून जसा जागा होतो तशी दचकून जागृती सार्‍या जगाला-खास करून चीनला-आलेली अहे. चीनने जणू दचकून सांवरून बसत या घटनेची गांभिर्याने नोंद घेतलेली आहे हेच खालील प्रतिक्रिया वाचल्यावर लक्षात येईल.

Stratafor प्रमाणेच Agence France Presse या वृत्तसंस्थेने यावर एक लेख लिहिला आहे व तो मला "एक्सप्रेस ट्रिब्यून" या पाकिस्तानी वृत्तपत्रात वाचायला मिळाला. या लेखात लिहिले आहे कीं भारताला या कामगिरीबद्दल वाटणारा अभिमान बिनबुडाचा नव्हता तर १०० टक्के सार्थ होता. त्यांच्या मते अग्नि-५ला "सामन्याचे नियम बदलणारे प्रक्षेपणास्त्र" (Game changer) असे म्हणायला हवे. हे प्रक्षेपणास्त्र ८० टक्के भारतीय बनावटीचे आहे आणि त्याचा पल्ला संपूर्ण चीन आणि त्याच्याही पलीकडे पोचेल असा आहे. या प्रक्षेपणास्त्रामुळे भारताचे दुस्साहसाविरुद्धच्या प्रतिकाराचे लष्करी सामर्थ्य (deterrence) खूपच सुधारले आहे. आतापर्यंत संपूर्ण चीन आपल्या हल्ल्याच्या क्षेत्रात आणणारी प्रक्षेपणास्त्रे आपल्याकडे कधीच नव्हती.

अग्नि-५ जरी एक तांत्रिकदृष्ट्या मोठी कामगिरी असली तरी चीनसारख्या बलाढ्य राष्ट्राशी बरोबरी करण्याच्या बाजूने टाकलेले एक चिमुकले पाऊल आहे असेच बरेच विशेषज्ञ समजतात. "आपण चीनच्या खूपच मागे आहोत. एकूण प्रक्षेपणास्त्रांची संख्या, पल्ला आणि गुणवत्ता या सर्व बाबींत चीन आपल्या खूपच पुढे आहे" असे एक संरक्षण-विशेषज्ञ आणि दिल्लीतील एका संरक्षणविषयक संस्थेचे ज्येष्ठ "फेलो" सी. राजामोहन यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले कीं प्रेक्षेपणास्त्रांच्या अशा प्रकारच्या प्रात्यक्षिकांवर लक्ष केंद्रित केले गेलेले आहे. म्हणजेच प्रक्षेपणास्त्रांबाबतचे धोरण शास्त्रज्ञ मंडळींकडे असून ते अद्याप सरकारकडे किंवा लष्कराकडे देण्यात आलेले नाहीं.

"आज अभिमानाने तिरंगा स्वत:भोवती लपेटून आपण आनंदोत्सव साजरा करू शकतो पण हे तंत्रज्ञान प्रत्यक्षात कसे राबवायचे याबद्दलच्या खर्‍याखुर्‍या लष्करी डावपेचांची आपल्यात अद्यापही वानवाच आहे. अग्नि-५ ला सर्रास वापरासाठी लष्कराच्या हाती सोपवायला अद्याप बराच अवधी लागेल असे वाटते. तज्ञांच्या मते या प्रक्षेपणास्त्राचा अवकाशमार्ग, अचूकपणा आणि त्याची सर्वंकष क्षमता ठरविण्यासाठी अजून ४-५ वेळा त्याची चांचणी घ्यावी लागेल व त्यानंतरच त्याचे उत्पादन सुरू केले जाईल.

IHS Jane’s या संरक्षणविषयीच्या जागतिक संघटनेतील एक विशेषज्ञ राहुल बेदी म्हणाले कीं भारताचे राजकीय नेतृत्व तिच्या संशोधकांच्या या व अशा महत्त्वाचा संशोधनाचा फायदा घेण्यात अपयशी ठरले आहे.
"भारताची अण्वस्त्रांवर आधारलेली दुस्सहसांविरुद्धची प्रतिकारशक्ती आणि ती कशी वापरता येईल याबाबत भारताच्या नेतृत्वाकडे राजकीय दूरदृष्टीचा आणि आकलनशक्तीचा अभावच दिसून येतो. कारण आपल्या राजकीय नेतृत्वाकडे युद्धाच्या डावपेचांसंबंधीच्या ज्ञानाला खूपच मर्यादा आहेत" असेही बेदी म्हणाले.
अग्नि-५च्या यशस्वी आजच्या चांचणीने भारताची चीनला त्याच्या दुस्साहसांपासून परावृत्त करण्याच्या क्षमतेचा नीट वापर झाला नाहीं तर या चांचणीनंतरच्या हर्षातिरेकाचा भर ओसरायला फारसा वेळ लागणार नाहीं असेही बेदी पुढे म्हणाले. (यांची आणखी कांहीं विधाने पुढेही दिलेली आहेत.)
अग्नि या संज्ञेची ही प्रक्षेपणास्त्रे भारत आपल्या १९८३च्या संकलितपणे पथनिर्धारित प्रक्षेपणास्त्रांच्या (guided missiles) विकसनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा भाग म्हणून बनवत आहे. अग्नि-१ आणि अग्नि-२ ही तूलनेने छोट्या पल्ल्याची प्रक्षेपणास्त्रे भारताचा जुना प्रतिस्पध्याविरुद्ध-पाकिस्तानविरुद्ध-वापरण्यासाठी विकसित केलेली होती पण ३५०० किमीपेक्षा जास्त पल्ल्याची क्षेपणास्त्रे चीनविरुद्ध वापरण्यासाठी विकसित केलेली आहेत.
भारत व चीन या दोन्ही देशांची लोकसंख्या एक अब्जापेक्षा जास्त आहे आणि १९६२सालच्या युद्धातून निर्माण झालेला एकमेकांबद्द्लच्या अविश्वासाच्या इतिहासामुळे त्यांच्यातले संबंध बोचरे आहेत.
म्हणूनच चीनच्या परराष्ट्रखात्याने अग्नि-५च्या चांचणीची नोंद घेतल्याचे सांगितले पण त्यातून निर्माण होणार्‍या तेढीला मात्र मुद्दामच जास्त महत्व दिले नाहीं. "चीन व भारत हे दोन्ही उदयोन्मुख देश असून त्यांच्यात कसलीच स्पर्धा नसून ते एकमेकांना सहकार्य करतात" असे वार्ताहारांना सांगितले.
या चांचणीनंतर अग्नि-५ ने भारताला आंतरखंडीय प्रक्षेपणास्त्रे असलेल्या देशसमूहात नेऊन बसविले आहे असे अभिमानाने सांगण्यात आले पण १९९८च्या अण्वस्त्र-चांचणीशी संबंधित एक शास्त्रज्ञ श्री के. संथानम् यांनी याहीपेक्षा जास्त पल्ल्याची प्रक्षेपणास्त्रे बनविण्याच्या योजनांमागच्या लष्करी प्रेरणेबद्दल आश्चर्य व्यक्त केले. "अग्नि-५ च्या पल्ल्याला डावपेचात समर्पकता आहे पण त्यापुढे जाणारी प्रक्षेपणास्त्रे कशाला? आपल्याला ती वॉशिंग्टनवर डागायची आहेत काय?" असाही प्रश्न त्यांनी विचारला. "आपल्याकडे आंतरखंडीय प्रक्षेपणास्त्रे असण्याची गरज नाहीं. कारण आपण जास्तीत जास्त एक प्रादेशिक महसत्ता आहोत. आणि आजच्या संरक्षणविषयी डावपेचात याहून जास्त पल्ल्याच्या संरक्षणास्त्रांना स्थान नाहीं" असेही ते म्हणाले.
वरील प्रतिक्रियाव्यतिरिक्त न्यू यॉर्क टाइम्सने संकलित केलेल्या कांही गमतीदार प्रतिक्रियाही माझ्या वाचनात आल्या. त्या प्रतिक्रिया खालीलप्रमाणे:
(१) ग्लोबल टाइम्स या चीनमधून प्रसिद्ध होणार्‍या वृत्तपत्राने मतप्रदर्शन केले होते. पण त्या लेखाची संपूर्ण प्रत आणि त्यातील आकृती-१ मला मिळाली ती खाली देत आहे.
"भारताने लांब पल्ल्याच्या अण्वस्त्रवाहनक्षमतेच्या अग्नि-५ या प्रक्षेपणास्त्राची यशस्वी चांचणी झाल्याचे जाहीर केले. त्याचा पल्ला ५००० किमी असून ते चीनपर्यंत पोचू शकते. भारताला आंतरखंडीय प्रक्षेपणास्त्रे बनवू शकणार्‍या मोजक्या देशांच्या "क्लब"चे सभासदत्व हवे होते असे दिसते, पण त्यासाठी अशा प्रक्षेपणास्त्रांचा पल्ला ८००० किमी असायला हवा हे त्यांनी ध्यानात घ्यायला हवे! (खालील आकृती-१ पहा)
प्रक्षेपणास्त्रांच्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने जलद प्रगती केलेली आहे. गेल्याच वर्षी भारताने ३५०० किमी पल्ल्याच्या अग्नि-४ या प्रक्षेपणास्त्राची यशस्वी चांचणी केली होती. भारताची आम जनता भारताच्या लष्करी विकासासाठी चीनलाच संदर्भचिन्ह मानते.
भारताच्या लष्करी शक्ती वाढविण्याच्या मार्गात फारसे अडथळे आलेले दिसत नाहींत. भारत हे अद्याप गरीब राष्ट्र आहे आणि दळण-वळणाच्या सुविधांच्या निर्मितीत खूपच मागे आहे. पण भारतीय जनता भारताने अण्वस्त्रधारी राष्ट्र बनावे यासाठी संपूर्णपणे सरकारला समर्थन देते आणि पाश्चात्य राष्ट्रेसुद्धा अण्वस्त्रांबाबतच्या आणि प्रक्षेपणास्त्रांबाबतच्या भारताने केलेल्या तंत्रज्ञानाच्या करारांकडे दुर्लक्ष करतात. भारताच्या लष्करी खर्चात २०१२मध्ये १७ टक्क्यांनी वाढ झाल्याबद्दल आणि भारत आज शस्त्रास्त्रांची आयात करणारा जगातला सर्वात मोठा देश बनला आहे याबद्दल ते चुप्पी साधून असतात.
भारताने आपल्या शक्तीबाबत फाजील समज करून घेऊ नये. आज त्याच्याकडे चीनच्या कुठल्याही भागावर हल्ला करण्याचा पल्ला असलेली क्षेपणास्त्रे असली तरी चीनबरोबरच्या तंट्यांबाबत त्यांच्या जोरावर उद्धटपण केल्यास त्यांचा कांहींच फायदा होणार नाहीं. भारताने लक्षात ठेवावे कीं चीनची अण्वस्त्रशक्ती जास्त मोठी व विश्वासार्ह आहे. चीनबरोबरच्या शस्त्रास्त्रस्पर्धेत नजीकच्या भविष्यकाळात भारताला आघाडी मिळण्याची कांहींच शक्यता नाहीं. प्रतिसादात पुढे म्हटले आहे कीं भारताने आपल्या पाश्चात्य मित्रांच्या मैत्रीच्या फुगवून सांगितलेल्या मूल्यांकनावर आणि चीनला आवरण्याच्या मोहिमेत भाग घेण्याच्या फायद्यांवर विसंबून राहू नये. या लांब पल्ल्याच्या लष्करी महत्वाच्या प्रक्षेपणास्त्रांचे चीनच्या दुस्साहस-प्रतिकारक्षमतेबरोबर समीकरण मांडून त्या जोरावर चीनची कुरापत काढल्यास ती भारताची चूकच ठरेल.
चीन आणि भारत या दोघांनी शक्य होतील तितके मैत्रीयुक्त संबंध प्रस्थापित करावेत. हे शक्य नसेल तर दोघांनी एकमेकांमधील मतभेद सहन करत शांततामय सहजीवन अवलंबावे.
हे दोन्ही देश नव्याने उभरत आहेत आणि त्यांचे याबाबतची प्रतिष्ठा आणि स्थान पहाता या दोन राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर सहकार्य करावे. प्रक्षेपणास्त्रांच्या विकासातून शक्ति समतोल साधण्याचा प्रयत्न करणे चीन आणि भारत या दोन्ही देशांसाठी अविवेकी ठरेल.
आशिया खंडाची भू-राजकीय परिस्थिती चीन व भारत यामधील संबंधांवर अवलंबून राहील. या विभागात शांती आणि स्थिरता नांदणे दोन्ही देशांसाठी निर्णायक ठरणार आहे. म्हणून या विभागात शांती आणि स्थिरता टिकविणे आणि बाहेरील हस्तक्षेपाबद्दल सावध रहाणे याबाबतची जबाबदारी दोन्ही देशांवर पडते.
चीनशी बरोबरी करण्याच्या भारताच्या इच्छेची चीनला कल्पना आहे. लष्करी महत्वाच्या दृष्टीने भारतासाठी चीन हे एक उचित लक्ष्य असल्याने भारताला एक सलोखापूर्ण प्रतिस्पर्धी म्हणून स्वीकारायला तयार आहे.
कांहीं ऐतिहासिक कारणांमुळे चीन व भारत यांच्यामधील परस्पर संबंध संवेदनशील झाले आहेत. पण वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून पाहिल्यास चीन भारताबरोबरच्या संरक्षणविषयक बाबींकडे फारसे लक्ष देत नाहीं पण भारत मात्र आपले सर्व अवधान/लक्ष चीनवर केंद्रित करतो.
भारत शांत राहील अशी चीनला आशा आहे कारण अशी शांतत दोन्ही देशांना हितकारक आहे.
[ग्लोबल टाइम्सच्या वरील लेखात भारताच्या यशामुळे आलेली चीनच्या मनातील चलबिचल आणि अस्वस्थता स्पष्ट दिसत आहे व ती लपविण्यासाठी कांहींशी दादागिरीची भाषा चीनने वापरली तर त्यात नवल काय? पण काय गर्भित धमकी दिली आहे चीनने!]
                           आकृती-१: ३- ४ आणि ५ या प्रकारच्या अग्नि प्रक्षेपणास्त्रांचे पल्ले
(३) चीनच्या सरकारी China Central Television चा मलम लावण्याचा प्रयत्न! "भारताच्या दृष्टीने ऐतिहासिक क्षण! क्षेपणास्त्रे असलेल्या राष्ट्रांच्या यादीत भारत आता सामील झाला आहे". पण त्यापुढे जाऊन या चित्रवाणीवर आपल्या क्षेपणास्त्रांमधील कमतरता सांगण्यात आल्या. त्यात क्षेपणास्त्राच्या मार्गदर्शक यंत्रणेतील उणीवा आणि तिचे पन्नास टानाचे वजन यांचा उल्लेख प्रामुख्याने करण्यात आला. या प्रचंड वजनामुळे हे प्रक्षेपणास्त्र रेल्वे बोगी किंवा ट्रक यासारख्या हालत्या वाहनांवरून डागणे अवघड होईल व त्याच्यावर प्रतिहल्ला करून ते नष्ट करणे सोपे आहे. त्यामुळे चीनला हे प्रक्षेपणास्त्र धोकादायक वाटत नाहीं.
चीनच्या परराष्ट्रमंत्रालयाच्या प्रवक्ते लियू वे मिन: यांनी या चांचणीला फारसे महत्व नाहीं असे भासवत "भारत व चीन हे स्पर्धक नसून ते सहयोगी साहेत" असे सांगितले. या दोन राष्ट्रांनी मित्रत्वाने सहकारयुक्त वागणूक ठेवावी असेही त्यांनी सांगितले. (बगलमें छुरी मुंहमें राम?)

(४) इस्लामाबद येथील संरक्षणासंबंधीचे विश्लेषक मन्सूर अहमद: या प्रक्षेपणास्त्रामुळे भारताच्या प्रत्युत्तराच्या शक्तीत भर पडली आहे. जर भारताने त्याच्या अणूभट्टीवर चालणार्‍या पाणबुडीवरून डागण्याची क्षमता असलेले अग्नि-५ प्रक्षेपणास्त्र विकसित केले तर त्याचा खूप फायदा होईल. कारण अशा पाणबुडीवरील प्रक्षेपणास्त्राचा विनाश करणे पाकिस्तानला अशक्य ठरेल व त्यामुळे भारताच्या अण्वस्त्रांचा विनाश करता येणार नाहीं.

(५) जिनीव्हा येथील Center for Security Policy वरील विशेषज्ञ ग्रॅहॅम हर्ड: चीनच्या दृष्टिकोनातून ही चांचणी चीनशी समतोल राखण्यापेक्षा चीनला आवर घालण्यासाठी केलेली वाटते. चिनी सरकार सध्या डळमळीत आहे कारण त्याचे वरिष्ठ नेतृत्व सध्या अनेक भानगडीत (scandals) अडकलेले आहे व भारताने या चांचणीची ही योग्य वेळ साधली आहे. त्यामुळे चीनचा संशय वाढेल व पूर्व आशियात भारत-चीनमधील शस्त्रास्त्रस्पर्धा वाढीला लागेल.

(६) IHS Jane’s Defenseच्या आशिया-पॅसिफिक लष्करशक्तीच्या विश्लेषिका पूर्णिमा सुब्रह्मण्यम्: अग्नि-५ मुळे भारताला संपूर्न चीनच्या कुठल्याही भागावर हल्ला करता येईल. अग्नि-५ मुळे चीन व भारत यांच्या प्रक्षेपणास्त्रांच्या तंत्रज्ञानातील अंतर कमी झालेले आहे. पण संख्येने व डावपेचाच्या दृष्टीने चीन अद्याप पुढेच आहे.

(७) अमेरिकन प्रतिनिधीगृहाच्या विश्लेषक सेवेचे अण्वस्त्रप्रसारबंदीचे विशेषज्ञ पॉल केर: संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीच्या भारत व पाकिस्तान या दोघांनी अण्वस्त्रवहनक्षम प्रक्षेपणास्त्रांचे विकसन थांबवावे असे सांगणार्‍या ११७२ क्रमांकाच्या ठरावाचा सर्वांनाच विसर पडलेला दिसतो आहे.

(८) अण्वस्त्रकपात आणि शांती संयुक्त दलाचे संशोधक व स्तंभलेखक प्रफुल्ल बिदवाई म्हणतात, "गरीबांच्या गरजा भागविण्याऐवजी आपण विनाकारण फुकाच्या शस्त्रास्त्रस्पर्धेत गुंतत आहोत ही हास्यास्पद गोष्ट आहे"

(९) "पी.एल.ए."च्या[१] राष्ट्रीय संरक्षणविषयक विद्यापीठातील प्रध्यापक झांग झाओझाँग यांनी ग्लोबल टाइम्सला सांगितले कीं अग्नि-५ ची खरी क्षमता ८००० किमीवरील लक्ष्यांवर हल्ला करण्याची आहे पण इतर राष्ट्रांत काळजी निर्माण होऊ नये म्हणून भारताने जाणूनबुजून आपल्या प्रक्षेपणास्त्राचा पल्ला आहे त्यापेक्षा कमी करून सांगितला.

(१०) "पी.एल.ए."च्या[१] "अकॅडमी ऑफ मिलिटरी सायन्सेस" च्या डू वेनलाँग यांनी ग्लोबल टाइम्सला सांगितले कीं ही आपण केलेल्या प्रक्षेपणास्त्रांच्या चांचणीतील सर्वात जास्त पल्ल्याच्या प्रक्षेपणास्त्राची चांचणी आहे. त्यामुळे आपल्या दुस्साहसाविरुद्धच्या प्रतिकारक्षमतेत वाढ झालेली आहे. हे प्रक्षेपणास्त्र इराणपर्यंतच नव्हे तर त्या पलीकडेही पोचेल. (भाषांतरात घोटाळा झालेला दिसतो. इथे "आपण" आणि "आपल्या"चा "भारत" किंवा "भारताच्या" असा गर्भित अर्थ असावा. शिवाय चुकून चीनच्या जागी इराणचे नांव वापरले गेलेले असावे.)

(११) दिल्लीच्या "इंस्टिट्यूट ऑफ पीस अँड कॉन्फ्लिक्ट"चे एक विश्लेषक जगन्नाथन "द इंडिपेंडंट"शी बोलताना म्हणाले: या प्रक्षेपणास्त्राकडे केवळ "दुस्साहसाविरुद्धची प्रतिकारक्षमता" या दृष्टिकोनातून पाहिले जाईल कारण आपले "प्रथम अण्वस्त्र हल्ला न करण्याचे" धोरण भारताने आधीच जाहीर केले आहे. पण भारताच्या लष्करी महत्वाच्या दृष्टीने भारताची ही एक लांबलचक उडीच आहे.

(१२) DRDO -APचे प्रवक्ते रवी गुप्ता म्हणाले: ही यशस्वी चांचणी भारताच्य दृष्टीने एक ऐतिहासिक दिवस आहे. कारण अग्नि-५ हे एक "खेळाचे नियम बदलणारे प्रक्षेपणास्त्र" आणि तंत्रशास्त्रविषयक चमत्कारच आहे. हे प्रक्षेपणास्त्र एका वेळी एकाहून जास्त क्रिया करू शकते.

(१३) संरक्षण मंत्र्यांचे शास्त्रविषयक सल्लागार व भारताच्या DRDOचे[२] प्रमुख श्री. सारस्वत म्हणाले: आपण हा एकदम सुपरहिट प्रकल्प यशस्वी करून दाखविला! या यशस्वी चांचणीने सार्‍या जगाला एक संदेश दिला आहे कीं भारताकडे या दर्जाची (लांब पल्ल्याची आंतरखंडीय) प्रक्षेपणास्त्रांची संरचना, विकास, निर्मिती करण्याची क्षमता आहे. आता आपण एक प्रक्षेपणास्त्रधारी राष्ट्र बनलो आहोत"
                                                             आकृती-२: भारताची पाच प्रक्षेपणास्त्रे

भारताची यशस्वी चांचणी आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यक्त झालेल्या चिंता खाली देत आहे.
चीन-People’s Daily[३]: "भारताच्या लष्करी शक्तीच्या वृद्धीमागील धोके" या शीर्षकाखाली प्रकाशित झालेल्या लेखात म्हटले आहे कीं अग्नि-५ च्या चांचणीद्वारा भारत विभागीय पातळीवर शक्ति समतोल साधू पहात आहे.
भारत-हिंदुस्तान टाइम्स: एकदा ही प्रक्षेपणास्त्रे भारताच्या लष्करी प्रहार शक्तीत दाखल झाली कीं भारताला आशिया खंडात कुठल्याही राष्ट्रावर हल्ला करण्याची क्षमता लाभेल. त्यात चीनच्या अतिउत्तर विभागाचा आणि युरोपच्या कित्येक राष्ट्रांचा समावेश होतो.
भारत-The Indian Firstpost: या प्रकल्याच्या यशामुळे भारत आंतरखंडीय प्रक्षेपणास्त्रे बनवू शकणार्‍या मोजक्या देशांच्या "क्लब"चा सभासद म्हणून गणला जाईल.
भारत-The Times of India: गेल्या कांहीं दशकांत भारताने प्रक्षेपणास्त्रांची एक मालिकाच विकसित केली आहे. विश्लेषकांच्या मते कमी पल्ल्यांची अग्नि-१ आणि २ पाकिस्तानला दृष्टीसमोर ठेवून निर्मिली गेली होती तर लांब पल्ल्यांची अग्नि-३, ४ आणि ५ चीनला दृष्टीसमोर ठेवून निर्मिली गेली आहेत.
अमेरिका-रॉयटर: अग्नि-५च्या विकसनकाळात चीनबद्दल खूप संदर्भ पुढे आले. आणि ५००० किमीच्या पल्ल्याच्या प्रक्षेपणास्त्रांमुळे भारत आता आपल्या भारदस्त शेजार्‍याबरोबर शक्ती-समतोल साधू शकेल. पण सत्य परिस्थिती बरीच मर्यादशील आहे. चीनच्या शस्त्रागारात आधीपासूनच ५०००-ते १०००० किमी कक्षांची आजमावलेली आंतरखंडीय प्रक्षेपणास्त्रे आहेत. म्हणजेच भारत चीनची कधीच बरोबरी करू शकत नाहीं आणि त्याची गरजही नाहीं.
इंग्लंड-BBC: संरक्षणविषयक विश्लेषक राहुल बेदी म्हणाले कीं अग्नि-५ च्या यशस्वी चांवणीनंतर अण्वस्त्रधारी स्पर्धक असलेल्या चीनच्या कुठल्याही अंतर्गत भागावर दीड टनाचे अण्वस्त्र वाहू शकणारी प्रक्षेपणास्त्रे २०१४-१५ पर्यंत कार्यरत होतील तेंव्हा चीनच्या दुस्सहसाचा प्रतिकार करण्याच्या भारताच्या क्षमतेत लक्षणीय वाढ झालेली असेल.

एक घटना पण किती वेगवेगळे पैलू व त्यानुसार प्रतिक्रिया! पण प्रत्येक भारतीयाला गर्व आणि अभिमान वाटेल अशीच ही "अग्निपरिक्षा" आहे हे नि:संशय!!

एक घटना पण किती वेगवेगळे पैलू व त्यानुसार प्रतिक्रिया! पण प्रत्येक भारतीयाला गर्व आणि अभिमान वाटेल अशीच ही "अग्निपरिक्षा" आहे हे नि:संशय!!

अग्नि प्रक्षेपणास्त्राबद्दल मनोवेधक आणि विस्तृत माहिती
तक्ता-१ विविध प्रकारच्या "अग्नि" प्रक्षेपणास्त्रांचे पल्ले
Name Type Range
Agni-I MRBM 700 – 1,200 km
Agni-II IRBM 2,000 – 2,500 km
Agni-III IRBM 3,000 – 5,000 km
Agni-IV IRBM 2,500 – 3,700 km
Agni-V ICBM 5,000 – 6,000 km
Agni-VI ICBM 6,000 – 10,000 km
(अग्नि-६ अद्याप विकसनशील असल्यामुळे त्याचे आकडे अटकळीचे आहेत.)
MRBM= Medium Range Ballistaic Missile
IRBM= Intermediate Range Ballistaic Missile
ICBM= Intercontinental Ballistaic Missile
-----------------------------------------------------------
तक्ता-२: भारताच्या प्रक्षेपणास्त्रांबद्दलचा अधीक तपशील
नाव वजन वेग लांबी व्यास इंधनाचा
टन किमी/तास मीटर्स प्रकार
Agni-I १२ ९००० १५ १ घनरूपी
Agni-II १६ १४००० २१ १.३ घनरूपी
Agni-III ४८ १८०००+ १७ २ घनरूपी
Agni-IV १७ Mach 20 ? ? घनरूपी
Agni-V ५० Mach 24 १७.५ २ घनरूपी
Agni-VI* ५५ ४० १.१ घन+द्रव
* सध्या विकसित केले जात आहे.
(Mach=आवाजाचा वेग)
या खेरीज कमी वजनाची पण लांब पल्ल्याची व पाणबुडीवरून डागता येणारी "K" या संज्ञेने ओळखली जाणारी प्रक्षेपणास्त्रेसुद्धा सध्या विकसित केली जात आहेत. ("K" हे अद्याक्षर आपले प्रक्षेपण शास्त्रांबाबतचे प्रथितयश विख्यात शास्त्रज्ञ आणि आपले भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष अब्दुल कलाम यांच्या गौरवार्थ या प्रक्षेपणास्त्रांना दिले गेले आहे.)
जास्त माहितीसाठी खालील दुवे वाचता येतील:
अग्नि-१: http://en.wikipedia.org/wiki/Agni-I
अग्नि-२: http://en.wikipedia.org/wiki/Agni-II
अग्नि-३: http://en.wikipedia.org/wiki/Agni-III
अग्नि-४: http://en.wikipedia.org/wiki/Agni-IV
अग्नि-५: http://en.wikipedia.org/wiki/Agni-V
अग्नि-६: http://en.wikipedia.org/wiki/Agni-VI

     आकृती-३: भारताच्या प्रक्षेपणास्त्रांबद्दलचा चीनच्या ग्लोबल टाइम्स वृत्तपत्राने दिलेला तपशील

-----------------------------------------------------------------------------------------------------------
             आकृती-४: भारताच्या प्रक्षेपणास्त्रांच्या विकासाचे टप्पे चित्ररूपात दाखविणारा तक्ता


------------------------------------------
[१] पीपल्स लिबरेशन आर्मी हे चीनच्या सेनेचे अधिकृत नांव आहे.
[२] Defense Research and Development Organization (DRDO).
[३] People’s Daily हे चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या मध्यवर्ती समितीचे मुखपत्र आहे.
[४] Coup d'état