Sunday 30 October 2011

'तेहरीक-ए-तालिबान'चे पाकिस्तानबद्दलचे डावपेच

लेखक: सुधीर काळे
हा लेख सर्वप्रथम ’ई-सकाळ’च्या पैलतीर सदरात दि. २९ ऑक्टोबर २०११ रोजी प्रसिद्ध झाला. दुवा आहे:
http://72.78.249.107/esakal/20111029/5314141164214683280.htm

[तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (पकिस्तानी तालिबान चळवळ-Student Movement of Pakistan-TTP) ही वेगवेगळ्या इस्लामी आतंकवादी गटांची व्यापक संघटना असून २००७च्या डिसेंबरमध्ये असे १३ गट बाइतुल्ला मेहसूद या नेत्याच्या नेतृत्वाखाली एक झाले (कांहीं बाहेरही आहेत). संघटनेचे मुख्य कार्यक्षेत्र अफगाणिस्तानच्या सीमेवर असलेला पाकिस्तानचा "फाता"[१] हा प्रदेश आहे. या संघटनेची जाहीर उद्दिष्टें पाकिस्तान सरकारला प्रतिकार करणे, पाकिस्तानमध्ये शारि’या कायदा लागू करणे आणि एकत्र येऊन अफगाणिस्तानमधील नाटोच्या सैन्याविरुद्ध लढणे अशी आहेत. (२००९मध्ये बाइतुल्ला मेहसूद मारला गेला).

उद्या त्यांचा विजय होऊन त्यांनी जर पाकिस्तानमध्ये सत्ता काबीज केली तर ते त्यांचे डावपेच भारताविरुद्धही वापरतील. म्हणून त्यांच्याबद्दल माहिती असणे हितावह आहे. हाच या लेखाचा उद्देश].

Prof. Syed Irfan Ashraf यांचा TTP's Pakistan Strategy हा लेख DAWN या पाकिस्तानी वृत्तपत्रात दि. 24th October 2011 रोजी प्रकाशित झाला. या लेखाचे हे भाषांतर. ते पेशावर विश्वविद्यालयात पत्रकारिता (Journalism) या विषयाचे प्राध्यापक आहेत. त्यांच्या लेखातील कांहीं शब्दांचे अर्थ मला नीट कळले नाहींत म्हणून मी त्यांच्याशी पत्रव्यवहार केला असता त्यांनी अतीशय तत्परतेने त्यांची उत्तरे दिली. त्यातला बराच भाग टिपांमध्ये वापरलेला आहे. मूळ लेख http://www.dawn.com/2011/10/24/ttp%E2%80%99s-pakistan-strategy.html इथे वाचता येईल.

पाकिस्तानबरोबरचे सर्व "हिशेब चुकते करण्यास" आणि पाकिस्तानच्या आणि अफगाणिस्तानच्या आपापसातील अविश्वासाचे पर्व संपविण्याच्या प्रयत्नांना खीळ घालण्यास पाकिस्तानी तालिबान आंदोलन (TTP) आता सक्षम झालेले आहे.

गेली दोन-एक वर्षे कोशावस्थेत काढल्यानंतर आता ‘TTP’ च्या दुसर्‍या स्तरावरील नेतृत्वाने आपला मीडियाबरोबरचा संपर्क वाढविलेला आहे आणि त्यांनी आता पाकिस्तानी फौजेवर संघटितरीत्या आणि आत्मविश्वासाने प्रतिहल्ले करण्याच्या नव्या पर्वात पाऊल टाकले आहे.

अलीकडेच पंतप्रधान गिलानींच्या अध्यक्षतेखाली एक सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. TTP च्या कारवायांवर अंकुश ठेवण्यासाठी तालिबानला चर्चेसाठी आमंत्रित करण्याचा ठराव या परिषदेत संमत करण्यात आला. त्यानंतर वार्ताहारांबरोबर टेलिफोनद्वारा केलेल्या वार्तालापात तालिबानच्या नेत्यांना या ठरावाबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी TTP चे उपप्रमुख श्री फकीर महंमद यांनी अशा चर्चेची शक्यता फेटाळून लावली कारण त्यांच्या मतें "पाकिस्तान हे आता एक विश्वासार्ह राष्ट्र राहिलेले नाहीं"[२].

हे आतंकवादी हल्ली पाकिस्तान सरकारचे कां ऐकेनासे झाले आहेत? आणि सीमेपलीकडून होणार्‍या हल्ल्यांना एकाएकी असे उधाण येण्यामागील कारणे काय आहेत? दोनेक वर्षांपूर्वी पाकिस्तानी लष्कराने आपली स्वातमधील लष्करी मोहीम इतकी उग्र केली कीं "फाता" भागातील आपल्या शिबिरांतून पाकिस्तानवर असे हल्ले करणे TTP ला अशक्य होऊन गेले आणि त्यातूनच या समस्येचा उगम झाला.

स्वात विभागात कार्यरत असलेल्या तालिबानच्या पावलावर पाऊल टाकत वझीरिस्तानमधून शेकडो आतंकवादी बजौर विभागातील आतंकवाद्यांना येऊन मिळाले आणि त्यांनी एकत्र येऊन बजौरच्या पश्चिमेला असलेल्या अफगाणिस्तानमधील नुरिस्तान आणि कुनार या दोन प्रांतांच्या सीमेवरील महत्वाची नवी ठिकाणे व्यापली.

या स्थलांतरानंतर तालिबान संघटनेने या दोन प्रांतांत आपले बस्तान बसविण्यासाठी खूप कष्ट उचलले. इमारती लाकडाच्या धंद्याशी संबंधित असलेला माफिया आणि तालिबानविरोधी स्थानिक उच्चभ्रू नेते TTP च्या नेत्यांना कुनारमध्ये आपले बस्तान बसू देणार नाहींत हे माहीत असल्यामुळे त्यांनी प्रभावी माजी राज्यपाल मलिक झरीन खान आणि अतिरिक्त दहा लोकांचे खून केले. त्याचा परिणाम म्हणून दीर या शहराजवळील "शाही"पासून चित्राल या शहराजवळील अरुंडूपर्यंतची ८५० किमी लांबीची सीमारेषा या आतंकवाद्यांच्या प्रभावाखाली आली.

असे केल्याने पाकिस्तानी लष्करातील डावपेच आखणार्‍या तज्ञांनासुद्धा हेवा वाटावा असे यश TTP च्या आतंकवाद्यांनी मिळविले.
आपल्या पुनर्गठनामुळे आणि आपापसातील सुधारित संपर्कव्यवस्थेमुळे (networking) परिस्थितीची सारी सूत्रे आता TTP हातात होती. त्यांनी आता पाकिस्तानच्या नैऋत्य भागात दहशतवादाचे थैमान घालायला सुरुवात केली. कारण त्यांना तिथल्या स्थानीय सशस्त्र जनतेला[३] कुठल्याही भावी सुरक्षा करारात भाग घेण्यापासून परावृत्त करायचे होते. ग्रीस देशाच्या एका धर्मादायी संस्थेच्या कार्यकर्त्याचे दोन वर्षांपूर्वीचे अपहरण हा या तर्‍हेचा पहिला प्रसंग होता. बांबोराइत खोर्‍यातून केलेले सहा कामगारांचे अपहरण ही दुसरी घटना होती. त्यापैकी तिघांचा नंतर शिरच्छेद करण्यात आला होता. [४]

हे सहाजण मूळचे "वरच्या दीर"चे[५] रहिवासी होते. इथल्याच स्थानीय सशस्त्र जनतेने (civilian militia) वरच्या दीरच्या "धोग दारा" भागातून अफगाणिस्तानी तालिबान्यांना कित्येक आठवड्यांच्या घनघोर धुमश्चक्रीनंतर हाकलून दिले होते. म्हणून त्यांच्यावर सूड उगविण्यासाठी या सहा जणांचे अपहरण करण्यात आले होते. अशा तर्‍हेने वैयक्तिकरीत्या सूड उगविण्याचा कित्ता TTP ने त्यानंतरच्या कित्येक सीमापार केलेल्या पद्धतशीर घुसखोर्‍यांत गिरविला. दीर आणि चित्रालच्या वेगवेगळ्या ठिकाणी TTP च्या लोकांनी केलेल्या अशा घूसखोर्‍यात १८० माणसे, तीही बहुतांशी सुरक्षादलांची, मारली गेली.
दरोश येथील गुप्तहेर खात्याच्या अधिकार्‍याने मान्य केले कीं त्यांना अशा हल्ल्यांबद्दल कांहींशी पूर्वसूचना असायची व ते त्याबद्दलचे अहवालही सरकारकडे पाठवत असत. तरी या बेलगाम हल्ल्यांना सरकारकडून परिणामकारक प्रत्युत्तर मिळत नव्हते आणि स्थानिक अधिकार्‍यांना या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याची हिंमत नसायची.

निवडून आलेले लोकप्रतिनिधीही काळजीत पडले होते. "जसजशी आतंकवाद्यांची ताकत वाढत होती तसतशी पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यामधील गुप्तमाहितीची घेवाण-घेवाण, मार्गदर्शनपर बैठका आणि लष्करी अधिकार्‍यांच्या परस्पर-भेटी याबद्दलचा आमचा विश्वास कमी होत चालला होता" असे चित्रल विभागाचे प्रमुख मुजफ्फर अली यांनी सांगितले.

अलीकडेच सुरक्षादलाच्या जवानांना तिथे पाठविण्यात आलेले आहे. पण या मोहिमेला लगेच यश मिळेल अशी अपेक्षा करणे चुकीचे ठरेल असे निरीक्षकांचे मत आहे. पण कांहीं विश्लेषक हे मान्य करत नाहींत. त्यांच्या मते पाकिस्तानी सैन्याला भुलवून त्यांना जास्त धोकादायक आघाडीवर खेचणे हाच या आतंकवाद्यांचा मूलभूत उद्देश आहे. आतंकवादाबाबतच्या एका तज्ञाच्या मतें अपहरण करणार्‍या आणि स्थानिक पैसेवाल्यांना भाडोत्री सैनिक पुरविणार्‍या संस्थांसाठी डवपेचांच्या दृष्टीने महत्वाची नूरिस्तानची जागा आणि आतंकवादामुळे कणखर बनलेले नूरिस्तानचे लोक अशा सीमापार चकमकींसाठी आदर्श आहेत.

पाकिस्तानने सैन्य तैनात केल्याने आतंकवाद्यांच्या कारवायांवर कसलाच अंकुश बसला नाहीं आणि यात आश्चर्य वाटायचे कारण नाहीं. एका आठवड्याच्या आतच खालच्या दीर[६] भागात चकमकी सुरू झाल्या. पाठोपाठ आणखी दोन-तीन चकमकी झाल्या आणि त्यात १५ आतंकवद्यांना कंठस्नान घातल्याचा दावा अधिकार्‍यांनी केला. पण या हल्ल्यांमुळे सीमेच्या अफगाणिस्तानच्या बाजूला रहाणार्‍या नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे हे सर्वात जास्त भयावह आहे.

सीमेवरील या चकमकींमुळे काबूल येथे उस्फूर्त निदर्शनांनी जोर धरला आणि त्यामुळे पाकिस्तान व अफगाणिस्तान या देशांमधील संबंधांत तणाव वाढला. पख्तूनिस्तानमधील दहशतवादी कृत्यांचा आढावा घेतल्यास असे दिसून येते कीं लोकमताचा फायदा नेहमीच TTP ला मिळतो. इथेही सीमेवरील प्रतिगामी संस्कृतीचा फायदा TTP च्या आतंकवाद्यांना मिळतो व ते सरकारच्या नाजूक परिस्थितीचा पूर्ण फायदा घेतात. याही वेळी पाकिस्तानची परिस्थिती नाजूकच आहे.

आतंकवाद्यांचा एक-कलमी कार्यक्रम आहे आणि तो म्हणजे पाकिस्तानवर जबरदस्त वार करणे. या पार्श्वभूमीवर जर आतंकवाद्यांच्या ताकतीचा अभ्यास केल्यास TTP कडून पाकिस्तानला असलेला धोका स्थलांतरानंतर प्रमाणाबाहेर वाढला आहे.
अलीकडेच मीडियाला पाठविलेल्या निवेदनात TTP च्या सरदारानी भलतीच थेट स्वरूपाची भाषा वापरलेली आहे. अफगाणिस्तानमध्ये कार्यरत असलेल्या नाटोच्या फौजांवर हल्ले करण्याआधी आम्हाला पाकिस्तानी लष्कराबरोबरचा आमचा हिशेब चुकता करायचा आहे असे TTP च्या स्वात विभागाचे माजी प्रवक्ते सिराजुद्दिन यांनी सांगितले.

पाकिस्तानच्या नैऋत्य विभागाला अस्थिर करण्याच्या TTP च्या प्रयत्नांना हाणून पाडण्यासाठी पाकिस्तानने १०,००० सैनिक तिथे तैनात केले आहेत, पण तरीही त्यांचे हे उद्दिष्ट किती यशस्वी होईल याचे आताच भाकित करणे सोपे नाहीं. पण हे काम वाटते त्यापेक्षा जास्त गंभीर आणि कठीण आहे हे नक्की.

सगळ्यात आश्चर्याची गोष्ट ही कीं TTP ने चित्राल येथे २७ ऑगस्टला केलेल्या हल्ल्याला मदत केल्याबद्दल पाकिस्तानने नाटोलाच दोष दिला आहे. यात पाकिस्तानचे ३१ सैनिक धारातीर्थी पडले होते. एक मित्रराष्ट्र एका खतरनाक आतंकवादी संघटनेला दुसर्‍या मित्रराष्ट्राविरुद्ध सहाय्य करेल यावर विश्वास ठेवणेच कठीण. पण हे प्रत्यक्ष पाहिलेल्यांच्या साक्षी फारच बोलक्या आहेत.

या चकमकीच्या भागाला मी (अश्रफसाहेबांनी) दिलेल्या अलीकडच्याच भेटीत नाटोने TTP च्या आक्रमणाला हवाई संरक्षण दिले होते हे उघड दिसत होते! यावेळची नाटोंच्या विमानांची उड्डाणे नेहमीची "टेहेळणीची उड्डाणे" होती या विधानांबद्दल मला (अश्रफसाहेबांना) शंका आहे कारण सीमेपासून कांही मीटर्स अंतरावर उभे असलेले अझीझुल्ला म्हणाले, "आम्ही इथेच रहातो आणि हवाईदलाची नेहमीची टेहळणीसाठी केलेली उड्डाणे आणि असामान्य हवाई हालचाली यांच्यातील फरक आम्हाला नक्कीच समजतो!"

लगेच यानंतर काबूलवर दोन हल्ले पाठोपाठ झाले आणि एका आत्मघातकी बाँबहल्ल्यात अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष बरहानुद्दिन रब्बानी ठार झाले. या घटनांनंतर या प्राणघातक युद्धात कोण काय करत आहे हे कांहींसे स्पष्ट झाले. अमेरिकन अधिकार्‍यांनी तर काबूलवरील या हल्ल्यांचा "पाकिस्तानच्या समर्थनाने हक्कानी आतंकवाद्यांच्या टोळीने सूडभावनेने केलेला प्रतिहल्ला" असा अर्थही लावून टाकला.
या पार्श्वभूमीवर एकमेकांवर दोषारोप करण्याचा हा सततचा प्रकार पाहून एक गोष्ट स्पष्ट होते. ती म्हणजे पाकिस्तान आणि अमेरिका या दोन देशांमधील वितुष्ट इतके विकोपाला गेलेले आहे कीं पाकिस्तानला आणि अफगाणिस्तानला अफगाणिस्तानचे अवघड त्रांगडे गुण्यागोविंदाने रक्तपात न होऊ देता आपापसात सोडवताच येणार नाहीं. "तुम्ही आमच्या शत्रूंना मदत करा, आम्ही तुमच्या शत्रूंना मदत करू" या तत्वावर सारे काम चालले आहे असेच अनुमान एका संरक्षणविषयक विश्लेषकाने केले!

टीप -

[१] Federally Administered Tribal Areas. यात पाक अफगाण सीमेवरील डोंगराळ भाग येतो. त्यात उत्तर आणि दक्षिण वझीरिस्तान आणि इतर कांही भाग मोडतात. खालील नकाशे पहा.

http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/0/06/Swat_NWFP.svg/558px-Swat_NWFP.svg.png

http://fata.gov.pk/images/stories/fata1.png

http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/5/5e/Federally_Administered_Tribal_Areas_in_Pakistan_%28claims_hatched%29.svg/750px-Federally_Administered_Tribal_Areas_in_Pakistan_%28claims_hatched%29.svg.png

[२] यांचेही मत भारतासारखेच?-अनुवादक

[३] मूळ लेखकाने ई-मेलद्वारा दिलेली माहिती: जेंव्हां पकिस्तान सरकारला आतंकवाद्यांशी युद्ध करायचे असते तेंव्हां ते non-tribal भागात तिथल्या जनतेला सुरक्षा-मंडळे निर्माण करण्याची विनंती करते तर tribal भागात "लष्करी" लोकांना हे काम सांगितले जाते. लष्करी म्हणजे स्थानीय सशस्त्र जनता (Civilian Militia). हे लोक सुरक्षेसाठी नागरिकांची मंडळें स्थापन करतात आणि ही मंडळे पाकिस्तानी सैनिकांच्या बाजूने आतंकवाद्यांशी लढतात. त्यामुळे आतंकवादी नेहमी या सुरक्षा-मंडळातल्या लोकांना त्यांनी पाकिस्तानी सैनिकांना मदत करू नये म्हणून धमक्या देतात. या मंडळातले बरेचसे लोक पंजाबच्या आतल्या भागातून-खेड्यापाड्यातून-आलेले असतात आणि त्यांना फाता विभागाबद्दल फारशी जाणीव नसते. आतंकवादी नेहमीच गनिमी पद्धतीने लढतात आणि त्यामुळे या सुरक्षा मंडळांची मदत फारच निर्णायक ठरते. म्हणून कुठेही हल्ला करायच्या आधी जनतेने सैन्याची बाजू घेऊ नये म्हणून आतंकवादी त्याबद्दल सखोल अभ्यास करतात. यासाठी ते त्यांना धमक्या देतात, बर्‍याच लोकांना अतीशय क्रूरपणे ठार करतात आणि जे लोक सैन्याला पाठिंबा देतात त्यांचा अनन्वित छळ करतात. तरीही स्वातमधील मोहिमेनंतर खूप पठाणांमध्ये तालिबानविरोधी लोकमत तयार झाले आहे आणि ते तालिबानविरुद्ध सशस्त्र लढा द्यायला तयार होतात. शत्रूबरोबर असे एकत्र होऊन लढायची पठाणांची परंपराच आहे.

[४] Upper Dir

[५] मूळ लेखकाने ई-मेलद्वारा दिलेली माहिती: स्थानीय सशस्त्र जनता पठाणी परंपरेनुसार स्वेच्छेने शत्रूविरुद्ध लढा जाहीर करून एकत्र येते. दोन-एक वर्षांपूर्वी मलकांड डिव्हीजनमधील वरच्या दीर जिल्ह्यातील धोग दारा विभागातील सात खेडी एकत्र आली आणि त्यांनी तालिबानविरुद्ध युद्धाची घोषणा केली. या खेडूत लढवय्यांनी अफगाणी तालिबानच्या एका गटावर हल्ला केला. हे अफगाणी तालिबानचे लोक धोग दाराच्या आसपास रहात होते आणि त्यांनी पाकिस्तानमध्ये आणि अफगाणिस्तानमध्ये आत्मघाती हल्ले सुरू केले होते. या तालिबान्यांना खेडूत लढवय्यांनी तिथून पिटाळून लावले. म्हणून या तालिबान्यांनी सूड घेण्यासाठी धोग दारातील या सहाजणांचे चित्रालमधून अपहरण केले आणि त्यांना ठार केले आणि सर्वांना जणू एक संदेशच दिला कीं जे लोक तालिबानशी लढतील त्यांना योग्य संधी मिळताच अशीच शिक्षा दिली जाईल.
[६] Lower Dir

Friday 21 October 2011

अमेरिका मुर्दाबाद!

(कामरान शफ़ी यांनी लिहिलेला हा लेख (Hate America, Crush America) २९ सप्टेंबर २०११ रोजी "एक्सप्रेस ट्रिब्यून"मध्ये सर्वप्रथम प्रकाशित झाला होता आणि त्याचा मी केलेला अनुवाद ’ई-सकाळ’च्या ’पैलतीर’ या विभागात २२ ऑक्टोबर २०११ रोजी प्रसिद्ध झाला. या लेखात आलेले प्रथमपुरूषी उल्लेख लेखकाबद्दलचे आहेत.)
पाकिस्तानातील एका बाजारात ’अमेरिका मुर्दाबाद’च्या घोषणा देणार्‍या पाकिस्तानी नागरिकांचा "वॉल स्ट्रीट जर्नल"मध्ये गेल्या बुधवारी प्रसिद्ध झालेला फोटो खूप लोकांनी पाहिला असेल. पाहिला नसेल तर तो http://si.wsj.net/public/resources/images/P1-BC689_MULLEN_G_20110927184752.jpg इथे पहाता येईल. सगळ्यात पुढे डाव्या बाजूला संतापाने वेडा-वाकडा झालेल्या चेहर्‍याचा एक दाढीवाला माणूस आणि त्याच्या आजूबाजूला यथा-तथा कपडे घातलेले १०-१५ लोक! पण नीट पाहिल्यास दिसेल कीं खरी परिस्थिती तशी नाहीं कारण या निदर्शकामागील हे लोक छद्मीपणे हसताना दिसत आहेत!
त्या निदर्शकांच्या हातात फलक आहेत आणि ते निदर्शक वार्ताहारांच्या पुढे-पुढे करत आपापले फलक कॅमेर्‍यांच्या भिंगांसमोर आणत आहेत. फलकांवर "अमेरिका मुर्दाबाद", "अमेरिकेला चेचून टाका" यासारख्या घोषणा लिहिलेल्या आहेत. यातले बहुसंख्य निदर्शक जहालमतवादी वृत्तपत्रांच्या पाठिंब्यावर जमविलेले होते[१]. ओसामा बिन लादेन यांच्या मृत्यूनंतरही "ISI झिंदाबाद"च्या फलकांसह अशीच निदर्शने इस्लामाबादला झाली होती!
यातल्या "अमेरिकेला चेचून टाका" या फलकाने मला (मला म्हणजे कामरान शफींना) ४१ वर्षे मागे नेले आणि त्यावेळच्या "भारताला चेचून टाका" मोहिमेची आठवण करून दिली. ही मोहीम पाकिस्तानी लष्कराने एका लाहोरहून प्रकाशित होणार्‍या उर्दू वृत्तपत्राच्या सहकार्याने उभी केली होती[२]. आजच्या तरुण पिढीतील पाकिस्तानी वाचकांना या ४१ वर्षांपूर्वीच्या मोहिमेची माहितीसुद्धा नसेल. कारण ही मोहीम पाकिस्तानच्या त्यावेळी झालेल्या विभाजनाच्या निषेधार्थ होती. या विभाजनात स्वतंत्र बांगलादेशच्या निर्मितीने पाकिस्तानचा अर्धा भूभाग कापला गेला होता आणि तिचे अर्ध्याहून जास्त नागरिक विभक्त होऊन ’बांगलादेश’चे नागरिक झाले होते.
त्यावेळी आपण एका आर्थिकदृष्ट्या दुबळ्या[३] पण आपल्याहून खूप मोठ्या देशाला चेचून टाकायला निघालो होतो. तसे पहाता शस्त्रास्त्रांबाबत आपली आणि भारताची बर्‍यापैकी बरोबरी होती. पण यावेळी काय परिस्थिती आहे? यावेळी आपण कुणाला चेचून टाकायला निघालोय्? आपण निघालोय अमेरिकेला चेचून टाकायला! जगातल्या एकुलत्या एक महासत्तेला! आपले लष्कर आपल्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसाठी, आर्थिक मदतीसाठी आणि नैतिक पाठिंब्यासाठी ज्या महासत्तेच्या औदार्यावर अवलंबून असते आणि ज्या महासत्तेच्या पाठिंब्याच्या बळावरच पाकिस्तानी सरकार सार्‍या जगावर गुरगुरत "दादागिरी" करत असते त्याच महासत्तेला चेचून काढायला आपण निघालो आहोत!!
अलीकडेच "अमेरिकेला चेचून टाका" मोहीमवाल्या एका जिहादी लेखकाने त्याच्या ब्लॉगवर "अमेरिका पाकिस्तानच्या मदतीला कशी आली" याबद्दल नेमकी माहिती वाचकांना देण्यासाठी त्याच्या ब्लॉग-वाचकांना आवाहन केले आहे. मी (शफीसाहेबांनी) जेंव्हां १९६५ सालच्या भारताबरोबरच्या लढाईनंतर पाकिस्तानी खड्या सैन्यात कमिशन घेतले (इमर्जन्सी कमिशन नव्हे) त्यावेळी मी जे पाहिले ते खाली देत आहे.
मी पाकिस्तान मिलिटरी अकादमीत प्रशिक्षण घेत असताना आम्हाला ब्रिटिश काळातल्या "No.4 Mk 1" या बोल्ट-ऍक्शनवाल्या रायफलवर आणि .३०३ लाईट मशीन गन (LMG) वर प्रशिक्षण दिले गेले होते. मे १९६६ मध्ये आम्ही जेंव्हां आमच्या पहिल्या तुकडीत (unit) प्रवेश करते झालो त्यावेळी आम्हाला अमेरिकन बनावटीची अर्ध स्वयंचलित (semi-automatic) .30 M-1 रायफल आणि .30 Browning स्वयंचलित रायफल (BAR) light machine gun आणि .३० भारी machine gun दिली गेली. ही सारी शस्त्रें कोरियन युद्धाच्या वेळची उरली-सुरली शस्त्रें होती व ती त्या युद्धाच्या समाप्तीनंतर पाकिस्तानकडे वळविण्यात आली होती.
आम्हाला भली मोठी M38 Willys जीपही मिळाली होती. आम्ही गमतीने तिला "छोटी विली" (Little Willy) म्हणायचो. फारच तगडी असलेली ही जीप नेऊ तिथे जायची व पडेल ते काम करायची. पुढे हिचा M-38 A-1 असा नवा (आणि सुधारित) अवतारही आला. ही जीपही कुठेही जायची आणि कांहींही करायची. ही M38 तावी नदीतून नेलेले मला आजही आठवते. त्यावेळी तिचा exhaust pipe पाण्याखाली दोन फूट होता. याखेरीज पाऊण टनी डॉज गाडी, अडीच टनी कार्गो गाडी आणि पॅटन रणगाडे व F-86, F-104, F-16 जातीची लढाऊ विमाने, C-130 ही सैनिक आणि माल वाहून नेणारी विमाने आणि ORION-P3C ही पाणबुडी-विनाशक (Anti-submarine) विमानेही मिळाली होती. (सारी ORION-P3C विमाने अलीकडेच अल कायदाच्या आतंकवाद्यांच्या मेहरान येथील नाविक हवाई तळावरील हल्ल्यात नष्ट झाली ही किती नामुष्कीची गोष्ट आहे!). या खेरीज नौदलातील जहाजे, क्रूझर्स, पाण्यातील सुरुंग काढणारी जहाजेही अमेरिकेकडूनच मिळाली होती. हा सारा इतिहास इतक्या सहजपणे विसरणार्‍या आपल्या (पाकिस्तानी) लोकांचा धिक्कारच केला पाहिजे!
अमेरिकेची क्षमा मागण्याचा माझा मनसुबा नाहीं. कारण मी अमेरिकेकडून जास्त सहाय्य मिळावे म्हणून कांही मूलभूत बदल करणार्‍या अयूब खानपासून ते जुलमी झिया आणि वाईट चिंतणार्‍या मुशर्रफपर्यंतच्या लष्करशहांना पाठिंबा देणार्‍या त्यांच्या धोरणाचा पुरस्कर्ता मुळीच नाहीं. मी फक्त गेल्या कित्येक दशकांच्या आपल्या लष्करासंबंधीच्या अमेरिकेच्या औदार्याची माहिती इथे देत आहे. दुर्दैवाने आपले लष्कर या औदार्याला (तथाकथित) राष्ट्रीयतेच्या नांवाखाली ओळखत नाहीं असे वाटते.
हे कृत्य म्हणजे बेइमानीची आणि दुटप्पीपणाची हद्दच आहे. हा प्रचार केवळ स्वत:च्या उणीवापासून व अलीकडील अबताबादच्या (Abbottabad) बिन लादेनच्या हत्त्येपासून आणि मेहरान येथील नाविक हवाईतळावरील पीछेहाटीपासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी केला जात आहे. या घटनांमुळे आपल्या लष्कराचा नाकर्तेपणा आणि भोंगळपणा सार्‍या जगाला दिसलेला आहे. अशा लटक्या उन्मादाने आणि दुराग्रहाने रचलेली निदर्शनें वापरून असल्या समस्या दृष्टिआड सारता येतात. या समस्यात मग "नाहींशी" केलेली माणसे आणि सलीम शहजादसारख्या वार्ताहाराचा अमानुष आणि निर्दय खून वगैरेसारख्या गोष्टीही येतात.
सलीम शहजाद यांच्या अमानुष खुनानंतर ISI ने अतीशय आढ्यतेने आपल्या "चमचा" मीडियाद्वारा जाहीर केले होते कीं ते त्याच्या खुनाचा छडा लावण्यात कसलीही कसर ठेवणार नाहींत आणि त्यांच्या खुन्याला पकडतील. खरे तर या खुनाच्या संशयाच्या सार्‍या खुणा ISI च्याच दिशेनेच बोट दाखवीत होत्या. आता या खुनाला चार महिने होऊन गेले पण त्यांच्या खुन्याला अद्यापही अटक झालेली नाहीं. थोडक्यात ISI वाले जी ऐट मिरवतात त्यात कांहींच दम नाहीं.
पुन्हा एकदा आपल्या ’रोमेल’ आणि ’गुडेरियन’ची[४] ऐट दाखविणार्‍या आपल्या सेनाधिकार्‍यांच्या लुटपुटीच्या "सात्विक" संतापाकडे वळू. अमेरिकेवर ते किती अवलंबून आहेत आणि कसे अमेरिकेच्या मिठीत आहेत हे या सेनाधिकार्‍यांना चांगले माहीत आहे. अमेरिकेने सार्‍या जगापुढे त्यांचा दुटप्पीपणा जाहीर केलेला आहे. आपले लष्कर कसे वाईट लोकांशी शय्यासोबत करत आहे हे सार्‍या पाकिस्तानी जनतेला माहीत झाले आहे मग अमेरिकेला राग आल्यास त्यात त्यांचे काय चुकले? आणि अफगाणिस्तानमधील भावी राजवटीत मोलाचे स्थान मिळविण्याच्या उद्देशाने वापरले जाणारे चुकीचे परराष्ट्र धोरण अद्यापही तसेच आहे. मग तालीबान, आणि तालीबानचे मित्र हक्कानी वगैरे पाकिस्तानच्या दृष्टीने चांगले कसे? कारण त्यांची आतापर्यंतची कृत्ये एकजात वाईटच आहेत.
---------------------------------------
[१] त्या मानाने भाड्याने घेतलेली तट्टेही खूप कमी दिसत आहेत!-अनुवादक
[२] पाकिस्तानी मीडिया आणि पाकिस्तानी वृत्तपत्रें त्यांच्या लष्कराला आणि ISI संस्थेला Deep State या नावाने संबोधतात!
[३] हे मूळ लेखक कामरान शफी यांचे मत आहे आणि १९७१ साली ते बर्‍याच अंशी खरेही होते!
[४] दुसर्‍या महायुद्धातले सुप्रसिद्ध आणि पराक्रमी जर्मन सेनाधिकारी. इथे लेखकाने सध्याच्या पाकिस्तानी सेनाधिकार्‍यांची टर उडविण्यासाठी त्यांची उपमा दिलेली आहे!
(पाकिस्तानी फौजेतील माजी वरिष्ट अधिकारी श्री कामरान शफ़ी हे पाकिस्तानचे खूप विख्यात स्तंभलेखक आणि समालोचक आहेत. त्यांनी डेली टाइम्स, डॉन सारख्या वृत्तपत्रांत लेखन केलेले असून सध्या ते ’एक्सप्रेस ट्रिब्यून’साठी लिहितात. वरील लेख ’एक्सप्रेस ट्रिब्यून’मध्येच २९ सप्टेंबर २०११ रोजी सर्वात प्रथम प्रसिद्ध झाला होता. बेनझीर भुत्तोंच्या पहिल्या पंतप्रधानपदाच्या काळात त्यांचे वृत्तपत्र सचिव होते.)

Thursday 13 October 2011

अलविदा जगजीतसिंग!

जगजीत सिंग यांच्या गायनाबद्दलच्या माझ्या आठवणी
(हा लेख "दिव्य मराठी" या संस्थळावर दि. १५ ऑक्टोबर २००१ रोजी प्रसिद्ध झाला. लेखाचा दुवा आहे:
http://divyamarathi.bhaskar.com/article/DMS-alvida-jagjit-singh-sudhir-kale-2501645.html?HT5)
लेखक: सुधीर काळे, जकार्ता

पोलाद बनविण्यासारख्या नीरस कामात सारी व्यावसायिक हयात 'घालवलेला' इसम या नात्याने माझे कला क्षेत्राशी नाते तसे 'चुलत'सुद्धा नाहीं. संगीताच्या/काव्याच्या जगात मी एक नाचीज माणूसच. माझे संगीताशी नाते आहे ते केवळ एक हौशी श्रोता म्हणूनच. पण मी जगजीत सिंह यांच्या गायनाचा प्रचंड चाहता आहे.

त्यांचे गायन मी जवळ-जवळ १९७५-८० सालापासून सातत्याने ऐकत आलेलो आहे. मी त्यावेळी मुकुंद या पोलाद बनविणार्‍या प्रख्यात कंपनीत 'Kalwe Steel Plant Division'चा प्रमुख म्हणून काम करत होतो व आम्ही कंपनीच्या कळव्यातील कॉलनीत राहात असू. बाहेर जाणे फारसं व्हायचं नाहीं, गेलो तरी आठवड्यातून एखाद्या वेळी. त्यामुळे बर्‍याचदा घरी आलो कीं "दूरदर्शन-एक्के-दूरदर्शन" हाच पाढा असायचा आणि जे दाखविले जाईल ते आम्ही (मुकाट्याने) पहायचो. मला त्या काळात हिंदी सिनेसंगीत ऐकायची खूप आवड होती व माझी आवडती हिंदी गाणी टेप-प्लेयरवर ऐकणे हाही एक विरंगुळा असायचा.

मी जगजीत सिंह यांचे गायन सर्वप्रथम ऐकले ते दूरदर्शनच्या वाहिनीवरच. त्यावेळी ते नव्यानेच प्रसिद्धीस येऊ लागले होते. गझल हा काव्य (आणि गान)प्रकारही आजच्याइतका लोकप्रिय झाला नव्हता. उर्दू भाषा समजायची नाहीं. म्हणजे उर्दूतील बहुतांश क्रियापदांचे हिंदी क्रियापदांशी (व म्हणूनच संस्कृत क्रियापदांशी) बरेच साम्य असल्यामुळे गझल ऐकताना असे वाटायचे कीं आपल्याला अर्थ कळतोय बरं कां, पण लक्ष देऊन ऐकल्यावर समजून यायचे कीं तो फक्त एक भासच होता. शिवाय सिनेसंगीताच्या मानाने गझलांच्या चालीत फारसे वैविध्यही नसायचे.

शेवटी अर्थही कळत नाहीं व संगीतही काहींसे गंभीर धाटणीचे आणि चालींमध्ये फारसे वैविध्य नसलेले इत्यादी कारणांमुळे मी उर्दू गझलांपासून (आणि जगजीत सिंह यांच्या गायनापासून) तसा दूरच राहिलो.

पुढे मुकुंदमधील एका मुस्लिम सहकार्‍याला न समजलेल्या उर्दू शब्दांचा अर्थ विचारायचा सपाटा लावला. खरा अर्थ कळल्यावर "युरेका-युरेका"ची नशा यायची. पण असे किती दिवस चालणार? मग मी देवनागरीतील शब्दकोषाचा शोध सुरू केला. शब्दकोष खूप पाहिले पण त्यातले उर्दू शब्द उर्दू लिपीत असल्यामुळे त्या माझ्यासारख्याला उर्दू लिपी न येणार्‍याला उपयोगी नव्हते. शेवटी (मरहूम जरीना सानी) आणि डॉ. विनय वाईकर यांनी संकलित केलेल्या "आईना-ए-गझल" हा शब्दकोश हातात पडला आणि एखादे घबाड मिळावे तसा आनंद झाला[१]. त्यात शब्दार्थच आहे असे नाहीं तर त्या शब्दाचा उपयोग कसा करतात हे वाचकाला कळावे म्हणून जवळ-जवळ १०,००० अत्यंत सुंदर, अर्थपूर्ण शेरही दिलेले आहेत. हा शब्दकोष घेतल्यावर मात्र गझलांचा अर्थ कळू लागला आणि गझला ऐकायची गोडी वाढू लागली आणि मग मात्र मी जगजीत सिंग यांच्या गायनाच्या पार प्रेमात पडलो व त्यांचे गायन जास्त-जास्त आवडू लागले.

त्यांच्या आवाजातला "दर्द" मला फार भावायचा. अर्थ कळायला लागल्यापासून त्यांच्या आवाजातली मिठ्ठास, आवाजातला दर्द, आधुनिक वाद्यवृंदाचा वापर (पूर्वी गझल गायकांच्या साथीला केवळ ’तबला-पेटी’च असायची, पण जगजीत सिंह आपल्या साथीला भारतीय आणि पाश्चात्य वाद्येही वापरायचे) या त्यांच्या गायकीतील सर्व बाबींपेक्षा मी त्यांच्या गझलांच्या "निवडी"च्या सर्वात जास्त प्रेमात पडलो. जगजीत सिंह यांच्या आवाजातला ’दर्द’ खूप आवडतो तर त्यांच्या पत्नी चित्रा सिंह यांच्या गायनाच्या बाबतीत त्यांचा आवाज व त्यांच्या गाण्यातला डौल, गाण्याची सहजता या बाबी मला खूप आवडतात.

हळू-हळू जगजीत सिंह आणि चित्रा यांचे गायन ऐकण्याचा मला आणि सौ.ला छंदच लागला. अर्थ चांगला व चालीही कांहींशा सोप्या, मग आणखी काय हवे? आजही त्यांनी निवडलेल्या गझलांच्या अर्थानेच मी मंत्रमुग्ध होतो.

आता जगजीत सिंह यांच्या मी ऐकलेल्यापैकी मला आवडणार्‍या गझलांकडे वळतो. (बर्‍याच मी ऐकलेल्या नाहींत.)

बर्‍याचदा त्यांनी निवडलेल्या कांहींशा गंभीर गझलांमध्ये खट्याळ शेर यायचे व मजा वाटायची. ज्यांनी सईद राहींनी लिहिलेली त्यांची "कोई पास आया सवेरे सवेरे" ही गझल ऐकले आहे त्यांना तिच्या शेरात दोन्ही रस दिसतील.

"कहता था कल शब संभलना-संभलना,

वही लडखडाया सवेरे सवेरे"

असा कवीच्या मित्राबद्दलचा हा खट्याळ शेर संपतोय्-न संपतोय् तोच....

"कटी रात सारी मेरी मयकदेमें,

खुदा याद आया सवेरे सवेरे"

या ओळींचे गांभिर्य माझ्या हृदयाला स्पर्शून जाते.

तसेच "बडी हसीन रात थी" या गझलेतील

"मुझे पिला रहे थे वो कि खुदहि शम्मा बुझ गयी,

गिलास गुम, शराब गुम, बडी हसीन रात थी"

हा शेर आपल्याला प्रियकर-प्रेयसींच्या अंधारातील प्रेमचेष्टांचा मखमली स्पर्श जाणवून देतो तर त्यातलाच पुढचा शेर

"लबसे लब जो मिल गये, लबसे लबही सिल गये,

सवाल गुम, जवाब गुम, बडी हसीन रात थी"

हा शेर ऐकल्यावर प्रश्नोत्तरे "बंद" व्हायचे कारण लक्षात येऊन चेहर्‍यावर नक्कीच हास्य उमटते.

त्यांच्या "बाद मुद्दत उन्हे देखकर यूं लगा, जैसे बताब दिलको करार आ गया" या गझलेतील दुसर्‍या कडव्याचा अर्थ किती बहारदार आहे! दारूच्या प्याल्यात दारू ओतणार्‍या "साकी"ला "आज तेरी जरूरत नहीं" असे हा शायर कां सागत आहे? कारण बिन पिये बिन पिलाये, खुमार आलेला आहे!

"तिश्न नजरें मिली, शोख नजरोंसे जब,

मय बरसने लगी, जाम भरने लगे!

साकिया आज तेरी जरूरत नहीं

बिन पिये बिन पिलाये, खुमार आ गया!

"कल चौदहवी की रात थी, शब-भर रहा चर्चा तेरा.." ही गझल गुलाम अली आणि जगजीत अशी दोघांनी आपापल्या चालीत गायलेली आहे, पण मला तर जगजीत यांचीच चाल आवडते. तसेच दिलके दीवारों-दर पे क्या देखा" या गझलेत "तेरी आँखोंमें हम ने क्या देखा" असा प्रश्न करत ते "कभी कातिल कभी खुदा देखा" असे बहारदार उत्तर देतात, आणि शेवटी "फिर न आया खयाल जन्नत का, जब तेरे घर का रास्ता देखा" असेही प्रेयसीला सांगून मोकळे होतात! ही गझलही माझी खूप आवडती आहे.

आणखी एक सुंदर गझल आहे "होठोंसे छूलो तुम" आणि त्यातले शेवटचे कडवे तर लाजवाब आहे:

"जगने छीना मुझसे, मुझे जो भी लगा प्यारा,

सब जीता करे मुझसे, मैं हरदम ही हारा,

तू हारके दिल अपना, मेरी जीत अमर कर दो"

असे आपल्या प्रेयसीला सांगत हा प्रियकर तिच्या प्रेमाची परिणामकारकपणे पण कारुण्यपूर्ण याचना करतो आहे.

त्याकाळी अदलीब शादानी यांची "देर लगी आनेमें तुमको, शुकर है फिरभी आये तो" ही गझलही माझी आवडती गझल होती. त्यातला हा शेर किती अर्थपूर्ण आहे:

शफक धनुक महताब घटायें तारे नगमें बिजली फूल

उस दामनमें क्या क्या कुछ है, वो दामन हाथमें आये तो...!

वा क्या बात है!!

त्यांनी संगीत दिलेल्या "अर्थ" या चित्रपटातील त्यांची "झुकी झु़की सी नजर..", "तुमको देखा तो ये खयाल आया" आणि "तुम इतना जो मुस्कुरा रहे हो" ही तीन गीते मला खूपच आवडतात.

त्यांची अतिशय खट्याळ असलेली (आणि म्हणूनच मला आवडती) गझल आहे अमीर मीनाई यांनी लिहिलेली "सरकती जाये है रुखसे नकाब आहिस्ता, आहिस्ता" ही! त्यात "आहिस्ता-आहिस्ता" हा "रदीफ" आहे. तरुण मंडळी अगदी आजही ही गझल तंद्रीत गातात. मला आवडते ते हे शेवटचे कडवे: शायर म्हणतो कीं माझी निर्दय प्रेयसी माझी मान निर्दयपणे कापत असली तरी मी तिला प्रेमाने म्हणतो की "बाई, काप पण जरा आहिस्ता-आहिस्ता"!

वो बेदर्दीसे सर काटे "अमीर" और मैं कहूं उनसे

हुजूर आहिस्ता-आहिस्ता, जनाब आहिस्ता-आहिस्ता"

त्यांच्या मला सर्वात जास्त आवडणार्‍या दोन गझला आहेत "ये दौलत भी लेलो, ये शोहरत भी लेलो..." ही पहिली आणि सरफरोशमधील "होशवालों को खबर क्या" ही दुसरी.

त्यापैकी ’ये दौलत भी लेलो’मधील मक्ता (शेवटचा शेर) माझा आवडता आहे:

कभी रेतकी ऊंचे कीलोंपे जाना, घरोंदे बनाना बनाके मिटाना,

वो मासूम चाहतकी तस्वीर अपनी, वो ख्वाबों-खिलौनोंकी जागीर अपनी,

न दुनियाका गम था न रिश्तोंके बंधन,

बडी खूबसूरत थी वो जिंदगानी"

हा शेर प्रत्येक वेळी माझ्या डोळ्यात पाणी आणतो.

"होशवालोंको" ही गझल तर जगजीतजींच्या डोक्यावरील मुकुटच आहे! त्यातलाही मक्ता फारच हृदयाला भिडतो

"हम लबोंसे कह न पाये उनको हाल-ए-दिल कभी,

और वो समझे नहीं है खामोशी क्या चीज है"!

वाह वा क्या बात है!

गायनाची गोडी लावण्यात व उर्दू भाषेशी परिचय करून देण्यात सिंहाचा वाटा होता, डॉ. विनय वाईकर आणि त्यांच्या "आईना-ए-गझल" या शब्दकोषाचा. म्हणून जगजीत सिंह गेल्यावर मला त्यांची खूप आठवण झाली आणि मी त्यांना नागपूरला फोन करून तसे सांगितलेही. त्यावेळी त्यांच्या सौ.नी (मीनाताईंनी) जगजीत सिंग यांच्या "जिंदादिली"च्या दोन हृद्य आठवणी सांगितल्या त्या इथे सांगायलाच हव्यात.

"आईना-ए-गझल"चे हस्तलिखित तयार झाल्यावर डॉक्टरसाहेब प्रकाशक शोधू लागले, पण त्यांनी संपादित केलेल्या या "रत्ना"ची त्यावेळी कुणाला पारखच झाली नसावी बहुदा. शेवटी त्यांनी हे पुस्तक स्वत:च प्रकाशित करायचे ठरविले. १९७८ साली त्याला ५०,००० रुपये खर्च येईल असा अंदाज होता व तेवढी रक्कम कशी उभी करायची असा प्रश्न त्यांच्यापुढे पडला. कुणी तरी त्यांना सांगितले कीं तुम्ही जगजीत सिंह यांना भेटा, त्याप्रमाणे हे दांपत्य त्यांना प्रत्यक्ष भेटले. जगजीतजींनी ते हस्तलिखित पाहिले आणि एक पैसाही मानधन न घेता एक पूर्ण कार्यक्रम त्यांना दिला व त्यातूनच "अमित प्रकाशन"ची स्थापना झाली व "आईना-ए-गझल" प्रकाशित झाले.

सौ. मीनाताई दुसरी आठवण सांगत होत्या....! एकदा जगजीत सिंह छिंदवाडाला मैफल करून रात्री परत येत होते तेंव्हा वाटेत चहासाठी एका ठिकाणी थांबले. तिथे त्यांना एका ट्रक ड्रायव्हरने ओळखले. तो बिचकत-बिचकतच त्यांच्याकडे आला आणि त्याने त्यांच्या गायनाची मनापासून तारीफ केली. एका आड जागी ट्रक ड्रायव्हरसारखा रसिक श्रोता भेटल्यामुळे सदगदित झालेल्या जगजीत सिंह यांनी त्यांना छिंदवाड्याच्या कार्यक्रमात मिळालेली शाल त्या ट्रक ड्रायव्हरला पांघरली व हातात श्रीफळ ठेवले.

माझी खात्री आहे कीं त्या ट्रक ड्रायव्हरने ती शाल आजही त्यांची आठवण म्हणून जपली असणार!

अशा थोर गायकाला आणि जिंदादिल मनुष्याला भावपूर्वक आदरांजली! आज जगजीत सिंह यांच्या (आणि चित्राजींच्या) एका गाजलेल्या गझलेतील या ओळी ओठावर येतात.....

मिलकर जुदा हुए तो, न सोया करेंगे हम

इक दूसरेकी यादमें, रोया करेंगे हम.....

आँसू छलक छलक के, सतायेंगे रात भर

मोती पलक-पलकमें, पिरोया करेंगे हम.....

जब दूरियोंकी याद, दिलोंको जलायेगी

जिस्मोंको चाँदनीमें, भिगोया करेंगे हम.....

गर दे गया दगा हमें, तूफानभी 'कतिल'

साहिलपे कश्तियोंको, डुबोया करेंगे हम.....

अलविदा, जगजीत सिंह! तुम्ही तुमच्या गझलांच्या रूपाने अमर आहात!!

टिपा:

[१] या शब्दकोशामुळेच मला मत्ला (गझलेचा पहिला शेर), मक्ता (गझलेचा शेवटचा शेर), रदीफ (गझलेच्या पहिल्या दोन्ही शेरात शेवटी येणारा आणि नंतरच्या शेरात दुसर्‍या ओळीत येणारा शब्दसमुदाय), काफिया वगैरे गोष्टी कळू लागल्या. गझलेतील कडव्यांना ’शेर’ म्हणतात हेही तिथेच कळले.

कांहीं शब्दांचे अर्थ: (१) तिश्न-तहानलेली, प्यासी (२) शोख-खट्याळ, नटखट (३) मय-मद्य (४) जाम-मद्याचा प्याला (५) खुमार-नशा (६) शफक-अरुणिमा, संधिप्रकाश (७) धनुक: इंद्रधनुष्य (८) महताब-चंद्र (९) घटा-ढग (११) जिस्म-शरीर (१२) साहिल-किनारा (१३) कश्ती-नाव

"गझल"चे अनेकवचन "गझलें" आहे (गझलियात हे अनेकवचनसुद्धा वापरतात). पण मी इथे त्याचे "गझला" असे मराठीकरण केले आहे.

Saturday 8 October 2011

स्वप्नांच्या दुनियेपासून वंचित पाकिस्तानी मुले!

हा लेख "ई-सकाळ"च्या संस्थळावर ७ ऑक्टोबर २०११ रोजी प्रकाशित झाला. (http://72.78.249.107/esakal/20111007/4891851462683652728.htm)

(खालील लेख राफिया झकेरिया या ’डॉन’च्या पाकिस्तानी स्तंभलेखिकेने लिहिला आहे. त्या पेशाने वकील असून, अमेरिकेत राजकीय तत्त्वज्ञान आणि संविधानिक कायदा या विषयाच्या प्राध्यापिका आहेत. त्या अमेरिकेतील अॅम्नेस्टी इंटरनॅशनल या संघटनेच्या संचालकपदावर काम करणार्‍या पहिल्या पाकिस्तानी महिला आहेत. मी त्यांना या लेखाचे मराठीत भाषांतर करण्याची परवानगी मागितली असता त्या खूप उत्साहित झाल्या. कारण त्या मूळच्या कोकणातल्या असून त्यांचे कांहीं नातेवाईक मूळचे पुण्याचे आहेत. "मला तुम्ही भाषांतर केलेला लेख जरूर पाठवा. माझ्या आजीला तो वाचायला आवडेल," असे म्हणत त्यांनी मला हा लेख भाषांतरित करण्याची अनुज्ञा दिली! आपल्या दोन देशांतल्या लोकांचे लागे-बांधे कसे आणि किती सखोल आहेत याची जाणीव होऊन मलाही सानंदाश्चर्याचा धक्का बसला. "माझीही मुळे कोकणातलीच आहेत," असे त्यांना सांगायला मी विसरलो नाहीं!)

कराचीतील एका शिक्षिकेने तिच्या वर्गातल्या ७ वर्षे वयाच्या चिमुरडीला एक निबंध लिहायला सांगितला. विषय होता तिला कुठे जावेसे वाटते. कुठलाही देश, कुठलेही शहर किंवा कुठलेही तिला आवडणारे स्थळ, खरे किंवा काल्पनिक-निवडण्याचे तिला स्वातंत्र्य होते. त्या मुलीने आपल्या घरी बसून तो निबंध लिहिला व दुसर्‍या दिवशी आपल्या शिक्षिकेला सादर केला. अख्ख्या जगातील अनेक चांगली-चांगली शहरे व प्रेक्षणीय स्थळे वगळून तिने जे स्थळ पसंत केले होते ते होते कराची शहराच्या एका मोठ्या चौकातला मोठा आणि सुप्रसिद्ध मॉल. या मॉलमध्ये खेळणी आणि चिप्स, चॉकलेट्स आणि इतर च्याव-म्याव खच्चून भरलेले असायचे!

"अगो बाई!" त्या चिमुरडीचा तो निबंध वाचून तिची शिक्षिका उद्गारली! "अख्ख्या जगात तुला इथेच जावेसे वाटते? आणखी कुठे नाहीं?" त्या मुलीने गंभीरपणे होकारार्थी मान हलविली. तिचे आई-बाबा तिला खूपदा तिथे घेऊन जायचे कारण तो मॉल तसा त्यांच्या घराजवळच होता. तरीही तिने सार्‍या जगात तीच जागा सर्वात आवडती म्हणून निवडली होती!

थोडक्यात सांगायचे, तर ती मुलगी बाहेर उभी राहून काचेतून त्या झगझगणार्‍या निऑनच्या दिव्यांनी नटलेल्या दुकानातील तिला हव्याहव्याशा वाटणार्‍या वस्तूंकडे आशाळभूतपणे पहाणार्‍यातली नव्हती. तिने आपल्या शिक्षिकेला सांगितले, कीं ती मक्केला आणि दुबईलाही जाऊन आली होती म्हणजे तशी थोडी-फार हिंडलीही होती! तिची शाळाही उत्तम शाळांपैकी एक होती. उच्चभ्रू समाजातील लोक तिथे आपली मुले पाठवत असत. तिथल्या विद्यार्थ्यांच्या आई-बाबांना कुठल्याही आर्थिक चणचणीशिवाय अशा मॉल्समध्ये रोज जाण्याची आणि आपल्याला आवडणार्‍या वस्तू विकत घेण्याची ऐपत होती. ते आपल्या मुलांसाठी कुठलीही पुस्तके विकत घेऊ शकत होते, त्यांना महागातल्या महाग अशा अत्याधुनिक दूरचित्रवाणीच्या सेटसमोर बसवून हवे ते कार्यक्रम दाखवू शकत होते, काँप्यूटर्सशी किंवा त्यांच्या आयफोनशी खेळू देऊ शकत होते. या मुलांना कधीच मन मारायची गरज नव्हती. त्या चिमुरडीला आणि तिच्या वर्गातली मुला-मुलींना अशा एकाद्या मॉलमध्ये जाण्यापेक्षा जास्त मोठ्या अपेक्षा ठेवणे शक्य होते. पण तरीही त्यांनी असे केले नव्हते!

जिथे सत्यपरिस्थिती नागरिकांना रोज असह्य आव्हाने देत असते तिथे गोड स्वप्ने नजरेसमोरून नाहींशी होतात. त्याबद्दल शोक करणे म्हणजे आपले फाजील लाड करून घेण्यासारखेच आहे. कारण आजच्या कष्टप्रद काळात गोड स्वप्ने पाहायला कुणाला वेळ आहे? अशी स्वप्ने पहाण्यापेक्षा जे आपल्या आवाक्यात आहे, मिळण्यासारखे आहे त्याचीच अभिलाषा बाळगणे उचित ठरेल आणि त्या दृष्टीने त्या चिमुरडीने मॉलमध्ये जाऊन हवे ते खरेदी करण्याचे स्वप्न पसंत केले, त्यात तिचे काय चुकले?

आज पाकिस्तानात सभोवतालचे वातावरणसुद्धा अतिशय कष्टप्रद आहे. पाहावे तिकडे सडणारा कचरा, गाड्यांच्या हॉर्नचा कलकलाट, वीज नसल्यामुळे घामाघूम होऊन झालेली शरीरांची ’किचकिच’...अशा परिस्थितीत स्वप्नरंजन कसे जमेल?

पण जरा आजूबाजूला पाहिले आणि विचार केला, तर त्या चिमुरडीने आपल्या निबंधात निवडलेले स्वप्न म्हणजे केवळ एक मौजमजा, एक शौक असे समजणे चुकीचे ठरेल. कारण तिच्या निवडीत त्या मुलीने पाकिस्तान्यांच्या स्वप्नरंजनाच्या मर्यादा दिसून येत आहेत. या मर्यादांमुळे आपल्याला खूपदा घुसमटायला होते. या मर्यादा आपल्या दृष्टिसुखावर नकळत हल्लाही होत असतो.

सुमार आणि सामान्य गोष्टींच्या पलिकडे जाण्याबाबतची असमर्थता, त्याबाबतीतील निर्बंध नजरेस आणणारा त्या चिमुरडीचा निबंध म्हणजे तिच्या पालकांवरचे, तिच्या वडिलधार्‍यांवरचे एक आरोपपत्रच वाटतो. या वडीलधार्‍यांना वाटणार्‍या अनिश्चिततेच्या आणि अज्ञात बाबींच्या भयांमुळेच या मुलीच्या स्वप्नाला अशा मॉलमधील खरेदीच्या पलीकडे न जाण्याची मर्यादा पडलेली आहे.

आपल्या देशाच्या सीमांच्या आणि त्या सीमांच्या संरक्षणाच्या, आपल्या श्रेष्ठत्वाबाबतच्या झपाटलेपणाच्या भावनेमुळे या देशाच्या नागरिकांची स्वप्नेच बोथट झाली आहेत असे नाहीं, तर इतर गोष्टींवरसुद्धा मर्यादा पडलेल्या आहेत. पाकिस्तानच्या स्वप्नांचा जो शेवट झाला आहे त्याची ऐतिहासिक वाटचाल समजणे अगदी सोपे आहे. जेव्हां कुठलीही माहीत नसलेली, नवी गोष्ट करावयाची भीती आणि वास्तवता यामध्ये सापडून आपल्या आवडी-निवडीवर मर्यादा पडतात तेंव्हां स्वतंत्र नागरिकांची स्वप्ने धुळीला मिळतात.

अशा तर्‍हेने परिस्थिती आहे त्यापेक्षा चांगली करण्याचे प्रयत्न न करता आयुष्य सुमार पण जास्त सुरक्षित करून घेण्यात समाधान मानणारे आणि त्या भयगंडाने पछाडलेले नागरिक ज्या देशात असतात तो देश आपल्या विनाशाकडे चालत जात असतो. असुरक्षिततेची भावना दूर करण्यासाठी चाललेला निकराचा प्रयत्न, अपरिचित शेजार्‍यांना पारखण्यासाठी जातपातीवर अवलंबून असण्याची गरज आणि जनतेने भडकून जाऊ नये म्हणून कला आणि संगीतावर घातलेले निर्बंध वगैरे कारवायांमुळे जनतेतील कांहीं तरी नवे करून पहाण्याची क्षमता हळूहळू पण पद्धतशीरपणे कुचलली जाते. परिणामत: परिचित, सुमार आणि अतिसंरक्षित जनता मागे उरते. अशा तर्‍हेने सोपा करून दिलेला जीवनमार्ग तरुण लोक विचार न करता स्वीकारतात आणि त्यामुळे स्वत:च्या कार्यक्षमतेच्या मर्यादांना स्पर्श करून आणि त्यांच्याही पलीकडे जाऊन स्वतःच्या क्षमतेचा संपूर्ण पल्ला आजमावण्याची त्यांची प्रवृत्ती नष्ट होते.

ज्या देशाची स्वप्ने पहाण्याची क्षमता नष्ट होते तो देश फक्त भूतकाळातील आठवणींवर जगतो. त्याच वेळी सद्यपरिस्थिती या भूतकाळातील आठवणी पुसत जाते. १४ ऑगस्टला येणार्‍या प्रत्येक स्वातंत्र्यदिनी लक्षावधी शाळकरी मुलांना पाकिस्तानच्या स्थापनेच्या वेळी डोळ्यासमोर असलेल्या प्रतिमेचे स्मरण करून दिले जात असले तरी त्या प्रतिमेचे सद्यपरिस्थितीशी कांहींच साम्य नसते! अशा तर्‍हेने प्रतिमेची जागा आत्मवंचना घेते. त्यामुळे घाबरलेली आणि यांत्रिक बनलेली जनता आपल्या मुलांच्या नजरेसमोर जी स्वप्ने ठेवते ती खुरटलेली असतात. मग ती मुले शेजारी असलेल्या मॉलमध्ये खरेदीला जाण्याच्या खुरट्या स्वप्नांपलीकडे पाहूच शकत नाहींत. अप्राप्य असल्या तरी हव्याशा वाटणार्‍या वस्तूंची अभिलाषा धरणे, प्रथमदर्शनी अशक्य वाटणारे प्रयोग करून पहाणे, साहसी स्वप्ने पहाणे मग बंद होते. पण नागरिकांची अशी स्वप्नेंच त्यांच्या कर्तृत्वाच्या आतापर्यंत अज्ञात असलेल्या सीमेचा शोध घेत असतात.

आजचा पाकिस्तानी मध्यमवर्ग आपल्या आवडी-निवडींना मुरड घालण्यात दंग आहे. इथे दिखाऊ धार्मिकतेला किंमत उरली आहे हे तो पहात आहे. त्याला त्याच्या परिस्थितीत एकादी फटही दिसत नाहीं ज्यातून त्याला स्वत:च्या आकलनाच्या सीमांचा शोध घेता येईल. ज्याप्रमाणे पावित्र्याच्या शोधात गेलेले लोक स्वत:च अपवित्र होतात, तसे ’खात्री’च्या शोधात अडकलेले पाकिस्तानी आता परिचित व आव्हानशून्य गोष्टीच्या सीमा स्वीकारू लागले आहेत.

लोकांची स्वप्ने सरहद्दींनी आणि सीमांनी बंदिस्त केली गेली तर त्या स्वप्नांतला साहसाचा भाग लुप्त होतो. या चिमुरड्या मुलीची आणि तिच्या निबंधाची ही गोष्ट एक सत्यकथा आहे व ती मला (लेखिकेला) तिच्या शिक्षिकेने स्वतः सांगितलेली आहे. कल्पनांच्या खच्चीकरणामुळे स्वप्नांच्या बहारदार दुनियेला वंचित झालेल्या मुला-मुलींची अशी खूप उदाहरणे आज पाकिस्तानात आहेत. अशी स्वप्ने पहाण्यासाठी लागणारी मोकळीक किंवा कांहींतरी नव्या, अद्याप अस्तित्वात नसलेल्या गोष्टींबद्दल विचार करण्याची अनुमती या मुलांना न मिळाल्यामुळे असे झाले आहे. हा देश (पाकिस्तान) स्वतःच एक स्वप्न होते. पण स्वप्नांना वंचित झालेल्या या देशातील मुलांना आपल्या भविष्याबद्दल कांहींच रेखता येत नसल्यामुळे त्यांच्यापुढे आहेत ती जुनीपुराणी आणि झिजलेली स्वप्नें. या स्वप्नांची तूलना या मुलांना जुन्या-पान्या, त्याच-त्याच पण खात्रीच्या स्वप्नांशी करावी लागणार आहे.

Friday 7 October 2011

ध्येयवाद, कट्टरपणा आणि धर्मांतरांबाबतचा उत्साह

(हा लेख दि. ५ ऑक्टोबर २०११ रोजी "दैनिक भास्कर" च्या "दिव्य मराठी" या संस्थळावर सर्वप्रथम प्रकाशित झाला. दुवा आहे: http://tinyurl.com/6xg65sq or
http://divyamarathi.bhaskar.com/article/article-on-situation-about-higher-education-in-pakistan-2479872.html?HT5=)
हाजराताईंच्या एका मित्राने आपल्या "डॉक्टरेट" पदवीबद्दल चौकशी करण्याच्या उद्देशाने अमेरिकन विद्यापीठातील एका प्राध्यापकाची भेट घेतली. त्याच्या काळजीचे मुख्य कारण होते अनेक देशांतील विद्यापीठातील अनुदानाच्या रकमेत होत असलेली कपात. अमेरिकेतील सद्य:स्थितीत त्याला अनुदान मिळण्याच्या शक्यतेबाबत चौकशी करता त्याला जे उत्तर मिळाले ते विचार करायला लावणारे होते. "तुम्ही जर पाकिस्तानबद्दल प्राथमिक संशोधन करणार असाल, तर सध्याच्या परिस्थितीतही तुम्हाला आवश्यक तेवढे अनुदान मिळू शकेल" असे त्याला सांगण्यात आले.

पाकिस्तान, पाकिस्तानी समाज आणि पाकिस्तानी नागरिक यांच्या अनेक पैलूंवर विश्वासार्ह शैक्षणिक संशोधनाचा स्पष्ट अभाव असल्याचे आणि त्यामुळे पाकिस्तानबद्दलचा कुठलाही प्रस्ताव अमेरिकेत प्राथमिक आणि मूलभूत संशोधनाचा विषय होऊ शकत असल्याचे सांगून त्याचा फायदा त्या विद्यार्थ्याला होईल असे प्राध्यापक महोदयांनी त्याला सांगितले. पाकिस्तानने सार्‍या जगापुढे उभ्या केलेल्या विलक्षण समस्यांचा अर्थ लावण्यासाठी पाश्चात्य राष्ट्रातील शिक्षणसंस्था निकराची खटपट करीत असून, त्या संस्थांना वाटणारे वैफल्य शैक्षणिक क्षेत्राबाहेरील क्षेत्रांतही आलेले आहे.

पाकिस्तानमधील सद्य:स्थितीने गोंधळलेल्या जनतेला या परिस्थितीचे आकलन कुठल्या दृष्टिकोनातून करून घ्यायचे, याचा विचार करायलासुद्धा वेळ नाही. आपले डोके पाण्याच्या पातळीच्या वर ठेवण्यासाठी रोजच्या जीवनात करावी लागणारी धडपड पाकिस्तानी जनतेच्या आयुष्याचा केंद्रबिंदू बनलेली आहे. त्यामुळे या परिस्थितीची कारणमीमांसा करणे ही एक निरर्थक धडपड असून, भविष्यात तिचा काहीच उपयोग होणार नाही. म्हणूनच ती अर्थशून्य आहे, असेच पाकिस्तानी जनतेला वाटते.

दोन पावले मागे हटून विचार केला तर बर्‍यापैकी शिकलेल्या आणि सुसंस्कृत पाकिस्तान्यांना पाकिस्तान बाहेरून कसा दिसतो याची जाणीव त्यांना होऊ लागली आहे. जिथे अशक्य वाटणार्‍या गोष्टी शक्य होतात, पण शक्य वाटणार्‍या गोष्टी होत नाहीत असे हे राष्ट्र. एक विसंगती आणि गोंधळांनी भरलेले राष्ट्र म्हणजे पाकिस्तान असेच त्यांना वाटते!

अलीकडेच हुकूमशाहीशी झालेल्या झुंजीतून बाहेर पडलेल्या आणि देशात सगळीकडे फोफावलेल्या बंडाळीत आणि युद्धसम परिस्थितीत गुंतलेल्या या देशातील वृत्तपत्रस्वातंत्र्याबाबत हाजराताईंना वारंवार विचारले जाते. सत्य परिस्थिती अशी आहे की, पाकिस्तानी इतिहासाच्या पूर्वकालातील वृत्तपत्रस्वातंत्र्याच्या तुलनेत आज त्याला मिळणारे वृत्तपत्रस्वातंत्र्य खूप क्षेत्रांत आणि पूर्वीपेक्षा बरेच जास्त आहे. त्या स्वातंत्र्यात सरकार हस्तक्षेप करत नाही. आज पाकिस्तानी जनतेला स्वातंत्र्य मिळत आहे. पण त्यातही काही मर्यादा आहेत. काही विषय पत्रकारांना वर्ज्य आहेत. उदा: धर्माच्या निंदेविरुद्धचा कायदा (Blasphemy Law), राज्यघटनेत धर्माचे स्थान या विषयांवर बोलण्यास सक्त मनाई आहे. धर्माबद्दल बोलणे एकंदरीतच बेकायदा मानले जाते. असेच इतरही काही विषय आहेत. वर्ज्य विषयांवर बोलण्यापासूनची भीती ही सरकारी यंत्रणेपेक्षा बिनसरकारी यंत्रणेकडून आहे हे महत्वाचे.

पाकिस्तान अप्रगत राहिला आहे. कारण त्याच्या अर्थसंकल्पातील खूपसा पैसा लष्करावर खर्च करावा लागतो. त्यातला काही अतिरेक्यांविरुद्धच्या आणि बंडखोरांविरुद्धच्या लढ्यांत खर्च होतो. पण पूर्वेकडून येऊ शकणार्‍या पण अस्पष्ट धोक्याला तोंड देण्यातही लक्षणीय पुंजी खर्च होते. कुणी म्हणेल की मग लष्करी खर्च कमी करून टाका! पण प्रत्यक्ष परिस्थिती पहाता ते इतके सोपे नाही.

पाकिस्तानबद्दल मत बनवायला बाहेरच्या लोकांना फार जड जाते. पण तरीही जगाच्या पाठीवर कित्येक भागांत कित्येक सुशिक्षित लोक पाकिस्तान, पाकिस्तानातील परिस्थिती आणि ती येण्याची मूळ कारणे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातले काही प्रयत्न स्वार्थी हेतूंनी केलेले असतीलही. पण तरी सत्य परिस्थिती अशी आहे की, पाकिस्तानातील गोंधळात काही ठराविक पॅटर्न दिसतो काय याचा शोध घेण्यासाठी अनेक समित्या, उपसमित्या, तज्ज्ञमंडळे, संशोधक, विश्लेषक, शैक्षणिक क्षेत्रातले तज्ज्ञ आज कार्यरत आहेत.

दरम्यान, पाकिस्तानी लोक या शोधात मदत होईल असे काय करत आहोत? आपल्या भोवती चाललेल्या उग्रवाद, कडवेपणा, असहिष्णुता आणि हिंसा यांच्याकडे पाहिल्यास आपण फारसे काही करत नाही असेच प्रथमदर्शनी त्यांना वाटते. पूर्वी अज्ञान, द्वेष, आकस यासारख्या प्रवृत्ती फक्त गुन्हेगारांच्या आणि अतिरेक्यांच्या बाबतीत पहायला मिळायच्या, पण गेल्या काही वर्षात त्या पाकिस्तानी समाजातही पहायला मिळत आहेत. अशा वाढत जाणार्‍या प्रवृत्तीचे दर्शन आपल्याला वाढत्या अतिरेकी हल्ल्यांतून, सामूहिक हिंसेतून दिसते.

सामान्य लोकांतही या असहिष्णुपणाची आणि उग्रवादाची लागण का झाली आहे? याचे उत्तर काही प्रमाणात आल्डस हक्सलीच्या एका टिप्पणीत दिसते. त्यात ते म्हणतात की, माणसाच्या ६७ टक्के दु:खांचा उगम त्याच्या मूर्खपणा, द्वेषभावना, कर्मठपणा आणि धर्मांवरील त्याच्या आवेशातच असतो आणि या गोष्टी तो धार्मिक किंवा राजकीय नेत्यांच्यावतीने करत असतो. हे वर्णन थेटपणे पाकिस्तानला लागू पडते आणि त्यातला धर्माबद्दलचा आवेश हा भाग तर दिवसेंदिवस शिकलेल्या पण तरीही अज्ञानी होत चाललेल्या समाजाचा गुणविशेष होऊ लागला आहे.

एखादी विचारसरणी जेव्हा जीवनात यशस्वी होते तेव्हा ती रूढ होऊन जाते. अशा रूढ विचारसरणीच्या शिक्षणामुळे उग्रवाद टाळता येतो. याचे कारण असे सांगता येईल की, शिकलेले लोक नाउमेद झालेले नसतात. पाकिस्तानात जरी अनेक प्रकारचे ध्येयवाद प्रचलित असले तरी फारच थोडे विचार, फारच थोड्या कल्पना तेथे उदयाला आलेल्या आहेत. परिणामत: सध्याची हेकट परिस्थिती बदलण्यासाठी लागणारी साधनसामुग्री फारच अपु‍र्‍या प्रमाणात पाकिस्तान्यांकडे आहे. पाकिस्तानमध्ये शहाणे आणि सुजाण लोक आहेत. पण त्यांची संख्या फार थोडी असल्यामुळे अत्याग्रह, अटकळी आणि वदंता यांच्याबाबतच्या कल्लोळात त्यांचे मत, विचार कुणाला ऐकूच जात नाहीत. चांगल्या कल्पना, चांगले विचार मनात येणे हे सुसंस्कृत समाजाचे लक्षण आहे व ते आणण्यासाठी आणि नव्या कल्पनांचे स्वागत करण्याची मन:स्थिती जोपासण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. अशा सुशिक्षित समाजात उग्रवादाला किंवा कडवेपणाला वाव नसतो. कारण तिथे द्वेषभावना किंवा मूर्खपणा या अवगुणांना थारा मिळत नाही.

आज पाकिस्तानाच्या लोकसंख्येत तरुणांची संख्या प्रमाणाबाहेर वाढली आहे. पण यातली ७० लाख मुले प्राथमिक शालेय शिक्षण पूर्ण व्हायच्या आधीच बाहेर पडलेली आहेत. तर आणखी ३० लाख मुले कधीच शाळेत पाऊल टाकणार नाहीत. जर ती शाळेत किंवा कॉलेजात गेलीच तरी आज तिथे ज्या प्रतीचे शिक्षण दिले जात आहे त्याचा त्यांना फायदा होईलच असे नाही? यावर एकच सोपा उपाय तो म्हणजे सर्वाधिक निधी शिक्षण क्षेत्रात गुंतवून, तरुणांसाठी अधिक आर्थिक तरतूद करणे हा होय. पण, दुर्देवाने पाकिस्तानात आजमितीस तरी काहीच सोपे नाही!

(स्तंभलेखिका श्रीमती हाजरा मुमताज यांचा लेख डॉन दैनिकात २६ सप्टेंबर २०११ रोजी प्रसिध्द करण्यात आला आहे. त्या लेखावर आधारित...)
वाचकांच्या प्रतिक्रिया:

SUDHIR KALE (Jakarta)

आज पाकिस्तानी वृत्तपत्रें वाचल्यास लक्षात येते कीं तिथले स्तंभलेखक खूपच योग्य मुद्दे ठामपणे मांडतात आणि त्यावरून पाकिस्तानात प्रथमदर्शनी तरी खूप व्यक्तिस्वातंत्र्य आणि लेखनस्वातंत्र्य आहे असे दिसते. पण हे फक्त मी आंग्लभाषिक वृत्तपत्रांपुरते बोलू शकतो. त्यांच्या उर्दू वृत्तपत्रांत काय छापले जाते ते मला माहीत नाहीं. एका स्तंभलेखकाला मी लिहिले होते की आपण उर्दू भाषेतील वृत्तपत्रातही असे लेख लिहिता कां? तर ते म्हणाले होते कीं "आमच्या अशा लेखांना उर्दू वृत्तपत्रात फारशी मागणी नाहीं पण इंग्लिश वाचणार्‍यांनासुद्धा सुधारण्याची गरज आहे व त्यामुळे आमचे लेखन तसे कारणी लागत आहे." आज ’डॉन’ आणि ’एक्सप्रेस ट्रिब्यून’ या वृत्तपत्रातील स्तंभलेखन वाचल्यास लक्षात येते कीं हे लेखक जनजागृतीचे मोठे काम करत आहेत. म्हणून मी त्यांचे अनुवाद लिहीत रहाणार आहे व ’दिव्य मराठी’ ते प्रकाशित करेल अशी मला आशा आहे. सर्व प्रोत्साहनपर प्रतिसादांबद्दल धन्यवाद. सुधीर काळे

====================

सुधीर काळे (जकार्ता)

श्री. सुचित केळकर-जी,भारताबद्दल माहिती भारतात भरपूर मिळत असते. पण पाकिस्तानाबद्दल त्याप्रमाणात मिळत नाहीं आणि मराठीत तर त्याहून कमी. म्हणून मी पाकिस्तानबद्दल लिहिणे पसंत करतो.

====================

SHEKHAR GUPTA (Mumbai)

पाकिस्तानमधील सर्वच प्रश्न हळूहळू तीव्र रूप धारण करणार आहेत. त्यामुळे शेजारील राष्ट्र या नात्याने भारताच्या समस्याही वाढणार आहेत.

====================

VYANKATESH SATPUTE (Nagar)

Dhanyawad kale saheb, eka veglya vishyacha lekh wachayla milala.

====================

PREETI (London)

lekh awadala. Khup abhar.

====================

MAHESH (Solapur)

या ठिकाणी मला कंदहार विमान अपहरण झाले होते तेन्वाची एक बातमी आठवते. इंडिया टुडे या नियतकालिकेत ती प्रसिद्ध झाली होती. अतिरेक्यांना जसवंत सिंग घेऊन जात होते, त्या विमानात हे इंडिया टुडेचे पत्रकारही होते. या पत्रकाराने त्या अतिरेक्यांना म्हटले, 'तुम्ही चुकीचे करत आहात, यामुळे इस्लाम बदनाम होते. कुराणात असे कुठे म्हटले आहे वगैरे...' पत्रकाराच्या या उपदेशावर अतिरेक्याने प्रतिप्रश्न केला, की 'तुम्ही कुराण वाचले आहे ? इस्लाम काय आहे हे तुम्ही सांगू नका...' भावार्थ असा की आजही कुराणाचा चुकीच्या पद्धतीने अर्थ लावला जात आहे आणि त्यातून जिहाद. असे होणे खूपच धोक्याचे आहे. लेखिका म्हणते त्याप्रमाणे पाकिस्तानात धर्म चिकित्सा करायला बंदी आहे. तो कायदा हाताविल्याशिवाय धर्म चिकित्सा होणार नाही.... आणि ते झाल्याशिवाय कट्टर वाद थांबणार नाही... विचित्र कोंडी आहे ही.... नियतीच्या मनात काय आहे कुणास थ्वूक ?

====================

1 0 | आपत्तिजनक

SUNIL (Latur)

आपण आपल्या देशाबाहेर काय चालले आहे, याकडे सहसा लक्ष्य देत नाही. या आत्ममग्न वृत्तीमुळेच एक हजार वर्षांची गुलामी या देशावर आली होती. बाहेरच्या दिशात काय सुरु आहे, त्यातल्या त्यात आपल्या शत्रू देशात काय सुरु आहे, याबद्दल जाणीव विकसित करणारा हा लेख स्तुत्य आहे. ''धर्माबद्दलचा आवेश हा भाग तर दिवसेंदिवस शिकलेल्या पण तरीही अज्ञानी होत चाललेल्या समाजाचा गुणविशेष होऊ लागला आहे.'' हे वर्णन तर खूपच मार्मिक आहे. आज अनेक अतिरेकी म्हटले तर उच्च शिक्षित आहेत. पण कृती मात्र मध्ययुगीन आहे. धर्माबद्दलचा आवेश किंवा माझाच धर्म खरा, इतर धर्मियांना जगण्याचाही अधिकार नाही - ही विचारधारा थोपाविल्याशिवाय पाकिस्तानच नव्हे जगातील अतिरेकी निर्मिती थांबणार नाही असे वाटते. चांगला विषय मांडल्याबद्दल धन्यवाद.

====================

SHASHIKANT SATHE (Mundhava)

all knows that america used pakistan to unstable south asia. know they will help pakistani students for research. I think it is very funny. Pakistani leaders will never change.

====================

MILIND SHINDE (Pune)

पाकिस्तानवर आज ही वेळ का आली, याचा कोणीतरी शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करतोय, हे निश्चितच आनंददायक वाटते

====================

SUCHIT KELKAR (Thane)

पाकिस्तानवर एवढे चिंतन करण्यापेक्षा काळेसाहेबांनी भारताबद्दलही लिखाण करावे. आपल्या देशातही अनेक सामाजिक, आर्थिक प्रश्न आहेत. त्याकडे लक्ष दिले नाही तर ते सुद्धा पुढील काळात उग्र रूप धारण करणार आहेत.

====================

PRIYA PATHAK (Kolhapur)

really nice article.

====================

SANDIP CHITRE (Mumbai)

पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी आता खरंच चिंतन करण्याची वेळ आली आहे. त्यांनी आता भूमिका घेतली नाही, तर पुढे त्या देशाचे भवितव्य अंधकारमय असणार, यात तिळमात्र शंका नाही. काळेसाहेब धन्यवाद या अनुवादित लेखाबद्दल...

====================