Saturday 8 October 2011

स्वप्नांच्या दुनियेपासून वंचित पाकिस्तानी मुले!

हा लेख "ई-सकाळ"च्या संस्थळावर ७ ऑक्टोबर २०११ रोजी प्रकाशित झाला. (http://72.78.249.107/esakal/20111007/4891851462683652728.htm)

(खालील लेख राफिया झकेरिया या ’डॉन’च्या पाकिस्तानी स्तंभलेखिकेने लिहिला आहे. त्या पेशाने वकील असून, अमेरिकेत राजकीय तत्त्वज्ञान आणि संविधानिक कायदा या विषयाच्या प्राध्यापिका आहेत. त्या अमेरिकेतील अॅम्नेस्टी इंटरनॅशनल या संघटनेच्या संचालकपदावर काम करणार्‍या पहिल्या पाकिस्तानी महिला आहेत. मी त्यांना या लेखाचे मराठीत भाषांतर करण्याची परवानगी मागितली असता त्या खूप उत्साहित झाल्या. कारण त्या मूळच्या कोकणातल्या असून त्यांचे कांहीं नातेवाईक मूळचे पुण्याचे आहेत. "मला तुम्ही भाषांतर केलेला लेख जरूर पाठवा. माझ्या आजीला तो वाचायला आवडेल," असे म्हणत त्यांनी मला हा लेख भाषांतरित करण्याची अनुज्ञा दिली! आपल्या दोन देशांतल्या लोकांचे लागे-बांधे कसे आणि किती सखोल आहेत याची जाणीव होऊन मलाही सानंदाश्चर्याचा धक्का बसला. "माझीही मुळे कोकणातलीच आहेत," असे त्यांना सांगायला मी विसरलो नाहीं!)

कराचीतील एका शिक्षिकेने तिच्या वर्गातल्या ७ वर्षे वयाच्या चिमुरडीला एक निबंध लिहायला सांगितला. विषय होता तिला कुठे जावेसे वाटते. कुठलाही देश, कुठलेही शहर किंवा कुठलेही तिला आवडणारे स्थळ, खरे किंवा काल्पनिक-निवडण्याचे तिला स्वातंत्र्य होते. त्या मुलीने आपल्या घरी बसून तो निबंध लिहिला व दुसर्‍या दिवशी आपल्या शिक्षिकेला सादर केला. अख्ख्या जगातील अनेक चांगली-चांगली शहरे व प्रेक्षणीय स्थळे वगळून तिने जे स्थळ पसंत केले होते ते होते कराची शहराच्या एका मोठ्या चौकातला मोठा आणि सुप्रसिद्ध मॉल. या मॉलमध्ये खेळणी आणि चिप्स, चॉकलेट्स आणि इतर च्याव-म्याव खच्चून भरलेले असायचे!

"अगो बाई!" त्या चिमुरडीचा तो निबंध वाचून तिची शिक्षिका उद्गारली! "अख्ख्या जगात तुला इथेच जावेसे वाटते? आणखी कुठे नाहीं?" त्या मुलीने गंभीरपणे होकारार्थी मान हलविली. तिचे आई-बाबा तिला खूपदा तिथे घेऊन जायचे कारण तो मॉल तसा त्यांच्या घराजवळच होता. तरीही तिने सार्‍या जगात तीच जागा सर्वात आवडती म्हणून निवडली होती!

थोडक्यात सांगायचे, तर ती मुलगी बाहेर उभी राहून काचेतून त्या झगझगणार्‍या निऑनच्या दिव्यांनी नटलेल्या दुकानातील तिला हव्याहव्याशा वाटणार्‍या वस्तूंकडे आशाळभूतपणे पहाणार्‍यातली नव्हती. तिने आपल्या शिक्षिकेला सांगितले, कीं ती मक्केला आणि दुबईलाही जाऊन आली होती म्हणजे तशी थोडी-फार हिंडलीही होती! तिची शाळाही उत्तम शाळांपैकी एक होती. उच्चभ्रू समाजातील लोक तिथे आपली मुले पाठवत असत. तिथल्या विद्यार्थ्यांच्या आई-बाबांना कुठल्याही आर्थिक चणचणीशिवाय अशा मॉल्समध्ये रोज जाण्याची आणि आपल्याला आवडणार्‍या वस्तू विकत घेण्याची ऐपत होती. ते आपल्या मुलांसाठी कुठलीही पुस्तके विकत घेऊ शकत होते, त्यांना महागातल्या महाग अशा अत्याधुनिक दूरचित्रवाणीच्या सेटसमोर बसवून हवे ते कार्यक्रम दाखवू शकत होते, काँप्यूटर्सशी किंवा त्यांच्या आयफोनशी खेळू देऊ शकत होते. या मुलांना कधीच मन मारायची गरज नव्हती. त्या चिमुरडीला आणि तिच्या वर्गातली मुला-मुलींना अशा एकाद्या मॉलमध्ये जाण्यापेक्षा जास्त मोठ्या अपेक्षा ठेवणे शक्य होते. पण तरीही त्यांनी असे केले नव्हते!

जिथे सत्यपरिस्थिती नागरिकांना रोज असह्य आव्हाने देत असते तिथे गोड स्वप्ने नजरेसमोरून नाहींशी होतात. त्याबद्दल शोक करणे म्हणजे आपले फाजील लाड करून घेण्यासारखेच आहे. कारण आजच्या कष्टप्रद काळात गोड स्वप्ने पाहायला कुणाला वेळ आहे? अशी स्वप्ने पहाण्यापेक्षा जे आपल्या आवाक्यात आहे, मिळण्यासारखे आहे त्याचीच अभिलाषा बाळगणे उचित ठरेल आणि त्या दृष्टीने त्या चिमुरडीने मॉलमध्ये जाऊन हवे ते खरेदी करण्याचे स्वप्न पसंत केले, त्यात तिचे काय चुकले?

आज पाकिस्तानात सभोवतालचे वातावरणसुद्धा अतिशय कष्टप्रद आहे. पाहावे तिकडे सडणारा कचरा, गाड्यांच्या हॉर्नचा कलकलाट, वीज नसल्यामुळे घामाघूम होऊन झालेली शरीरांची ’किचकिच’...अशा परिस्थितीत स्वप्नरंजन कसे जमेल?

पण जरा आजूबाजूला पाहिले आणि विचार केला, तर त्या चिमुरडीने आपल्या निबंधात निवडलेले स्वप्न म्हणजे केवळ एक मौजमजा, एक शौक असे समजणे चुकीचे ठरेल. कारण तिच्या निवडीत त्या मुलीने पाकिस्तान्यांच्या स्वप्नरंजनाच्या मर्यादा दिसून येत आहेत. या मर्यादांमुळे आपल्याला खूपदा घुसमटायला होते. या मर्यादा आपल्या दृष्टिसुखावर नकळत हल्लाही होत असतो.

सुमार आणि सामान्य गोष्टींच्या पलिकडे जाण्याबाबतची असमर्थता, त्याबाबतीतील निर्बंध नजरेस आणणारा त्या चिमुरडीचा निबंध म्हणजे तिच्या पालकांवरचे, तिच्या वडिलधार्‍यांवरचे एक आरोपपत्रच वाटतो. या वडीलधार्‍यांना वाटणार्‍या अनिश्चिततेच्या आणि अज्ञात बाबींच्या भयांमुळेच या मुलीच्या स्वप्नाला अशा मॉलमधील खरेदीच्या पलीकडे न जाण्याची मर्यादा पडलेली आहे.

आपल्या देशाच्या सीमांच्या आणि त्या सीमांच्या संरक्षणाच्या, आपल्या श्रेष्ठत्वाबाबतच्या झपाटलेपणाच्या भावनेमुळे या देशाच्या नागरिकांची स्वप्नेच बोथट झाली आहेत असे नाहीं, तर इतर गोष्टींवरसुद्धा मर्यादा पडलेल्या आहेत. पाकिस्तानच्या स्वप्नांचा जो शेवट झाला आहे त्याची ऐतिहासिक वाटचाल समजणे अगदी सोपे आहे. जेव्हां कुठलीही माहीत नसलेली, नवी गोष्ट करावयाची भीती आणि वास्तवता यामध्ये सापडून आपल्या आवडी-निवडीवर मर्यादा पडतात तेंव्हां स्वतंत्र नागरिकांची स्वप्ने धुळीला मिळतात.

अशा तर्‍हेने परिस्थिती आहे त्यापेक्षा चांगली करण्याचे प्रयत्न न करता आयुष्य सुमार पण जास्त सुरक्षित करून घेण्यात समाधान मानणारे आणि त्या भयगंडाने पछाडलेले नागरिक ज्या देशात असतात तो देश आपल्या विनाशाकडे चालत जात असतो. असुरक्षिततेची भावना दूर करण्यासाठी चाललेला निकराचा प्रयत्न, अपरिचित शेजार्‍यांना पारखण्यासाठी जातपातीवर अवलंबून असण्याची गरज आणि जनतेने भडकून जाऊ नये म्हणून कला आणि संगीतावर घातलेले निर्बंध वगैरे कारवायांमुळे जनतेतील कांहीं तरी नवे करून पहाण्याची क्षमता हळूहळू पण पद्धतशीरपणे कुचलली जाते. परिणामत: परिचित, सुमार आणि अतिसंरक्षित जनता मागे उरते. अशा तर्‍हेने सोपा करून दिलेला जीवनमार्ग तरुण लोक विचार न करता स्वीकारतात आणि त्यामुळे स्वत:च्या कार्यक्षमतेच्या मर्यादांना स्पर्श करून आणि त्यांच्याही पलीकडे जाऊन स्वतःच्या क्षमतेचा संपूर्ण पल्ला आजमावण्याची त्यांची प्रवृत्ती नष्ट होते.

ज्या देशाची स्वप्ने पहाण्याची क्षमता नष्ट होते तो देश फक्त भूतकाळातील आठवणींवर जगतो. त्याच वेळी सद्यपरिस्थिती या भूतकाळातील आठवणी पुसत जाते. १४ ऑगस्टला येणार्‍या प्रत्येक स्वातंत्र्यदिनी लक्षावधी शाळकरी मुलांना पाकिस्तानच्या स्थापनेच्या वेळी डोळ्यासमोर असलेल्या प्रतिमेचे स्मरण करून दिले जात असले तरी त्या प्रतिमेचे सद्यपरिस्थितीशी कांहींच साम्य नसते! अशा तर्‍हेने प्रतिमेची जागा आत्मवंचना घेते. त्यामुळे घाबरलेली आणि यांत्रिक बनलेली जनता आपल्या मुलांच्या नजरेसमोर जी स्वप्ने ठेवते ती खुरटलेली असतात. मग ती मुले शेजारी असलेल्या मॉलमध्ये खरेदीला जाण्याच्या खुरट्या स्वप्नांपलीकडे पाहूच शकत नाहींत. अप्राप्य असल्या तरी हव्याशा वाटणार्‍या वस्तूंची अभिलाषा धरणे, प्रथमदर्शनी अशक्य वाटणारे प्रयोग करून पहाणे, साहसी स्वप्ने पहाणे मग बंद होते. पण नागरिकांची अशी स्वप्नेंच त्यांच्या कर्तृत्वाच्या आतापर्यंत अज्ञात असलेल्या सीमेचा शोध घेत असतात.

आजचा पाकिस्तानी मध्यमवर्ग आपल्या आवडी-निवडींना मुरड घालण्यात दंग आहे. इथे दिखाऊ धार्मिकतेला किंमत उरली आहे हे तो पहात आहे. त्याला त्याच्या परिस्थितीत एकादी फटही दिसत नाहीं ज्यातून त्याला स्वत:च्या आकलनाच्या सीमांचा शोध घेता येईल. ज्याप्रमाणे पावित्र्याच्या शोधात गेलेले लोक स्वत:च अपवित्र होतात, तसे ’खात्री’च्या शोधात अडकलेले पाकिस्तानी आता परिचित व आव्हानशून्य गोष्टीच्या सीमा स्वीकारू लागले आहेत.

लोकांची स्वप्ने सरहद्दींनी आणि सीमांनी बंदिस्त केली गेली तर त्या स्वप्नांतला साहसाचा भाग लुप्त होतो. या चिमुरड्या मुलीची आणि तिच्या निबंधाची ही गोष्ट एक सत्यकथा आहे व ती मला (लेखिकेला) तिच्या शिक्षिकेने स्वतः सांगितलेली आहे. कल्पनांच्या खच्चीकरणामुळे स्वप्नांच्या बहारदार दुनियेला वंचित झालेल्या मुला-मुलींची अशी खूप उदाहरणे आज पाकिस्तानात आहेत. अशी स्वप्ने पहाण्यासाठी लागणारी मोकळीक किंवा कांहींतरी नव्या, अद्याप अस्तित्वात नसलेल्या गोष्टींबद्दल विचार करण्याची अनुमती या मुलांना न मिळाल्यामुळे असे झाले आहे. हा देश (पाकिस्तान) स्वतःच एक स्वप्न होते. पण स्वप्नांना वंचित झालेल्या या देशातील मुलांना आपल्या भविष्याबद्दल कांहींच रेखता येत नसल्यामुळे त्यांच्यापुढे आहेत ती जुनीपुराणी आणि झिजलेली स्वप्नें. या स्वप्नांची तूलना या मुलांना जुन्या-पान्या, त्याच-त्याच पण खात्रीच्या स्वप्नांशी करावी लागणार आहे.

No comments:

Post a Comment