Friday 7 October 2011

ध्येयवाद, कट्टरपणा आणि धर्मांतरांबाबतचा उत्साह

(हा लेख दि. ५ ऑक्टोबर २०११ रोजी "दैनिक भास्कर" च्या "दिव्य मराठी" या संस्थळावर सर्वप्रथम प्रकाशित झाला. दुवा आहे: http://tinyurl.com/6xg65sq or
http://divyamarathi.bhaskar.com/article/article-on-situation-about-higher-education-in-pakistan-2479872.html?HT5=)
हाजराताईंच्या एका मित्राने आपल्या "डॉक्टरेट" पदवीबद्दल चौकशी करण्याच्या उद्देशाने अमेरिकन विद्यापीठातील एका प्राध्यापकाची भेट घेतली. त्याच्या काळजीचे मुख्य कारण होते अनेक देशांतील विद्यापीठातील अनुदानाच्या रकमेत होत असलेली कपात. अमेरिकेतील सद्य:स्थितीत त्याला अनुदान मिळण्याच्या शक्यतेबाबत चौकशी करता त्याला जे उत्तर मिळाले ते विचार करायला लावणारे होते. "तुम्ही जर पाकिस्तानबद्दल प्राथमिक संशोधन करणार असाल, तर सध्याच्या परिस्थितीतही तुम्हाला आवश्यक तेवढे अनुदान मिळू शकेल" असे त्याला सांगण्यात आले.

पाकिस्तान, पाकिस्तानी समाज आणि पाकिस्तानी नागरिक यांच्या अनेक पैलूंवर विश्वासार्ह शैक्षणिक संशोधनाचा स्पष्ट अभाव असल्याचे आणि त्यामुळे पाकिस्तानबद्दलचा कुठलाही प्रस्ताव अमेरिकेत प्राथमिक आणि मूलभूत संशोधनाचा विषय होऊ शकत असल्याचे सांगून त्याचा फायदा त्या विद्यार्थ्याला होईल असे प्राध्यापक महोदयांनी त्याला सांगितले. पाकिस्तानने सार्‍या जगापुढे उभ्या केलेल्या विलक्षण समस्यांचा अर्थ लावण्यासाठी पाश्चात्य राष्ट्रातील शिक्षणसंस्था निकराची खटपट करीत असून, त्या संस्थांना वाटणारे वैफल्य शैक्षणिक क्षेत्राबाहेरील क्षेत्रांतही आलेले आहे.

पाकिस्तानमधील सद्य:स्थितीने गोंधळलेल्या जनतेला या परिस्थितीचे आकलन कुठल्या दृष्टिकोनातून करून घ्यायचे, याचा विचार करायलासुद्धा वेळ नाही. आपले डोके पाण्याच्या पातळीच्या वर ठेवण्यासाठी रोजच्या जीवनात करावी लागणारी धडपड पाकिस्तानी जनतेच्या आयुष्याचा केंद्रबिंदू बनलेली आहे. त्यामुळे या परिस्थितीची कारणमीमांसा करणे ही एक निरर्थक धडपड असून, भविष्यात तिचा काहीच उपयोग होणार नाही. म्हणूनच ती अर्थशून्य आहे, असेच पाकिस्तानी जनतेला वाटते.

दोन पावले मागे हटून विचार केला तर बर्‍यापैकी शिकलेल्या आणि सुसंस्कृत पाकिस्तान्यांना पाकिस्तान बाहेरून कसा दिसतो याची जाणीव त्यांना होऊ लागली आहे. जिथे अशक्य वाटणार्‍या गोष्टी शक्य होतात, पण शक्य वाटणार्‍या गोष्टी होत नाहीत असे हे राष्ट्र. एक विसंगती आणि गोंधळांनी भरलेले राष्ट्र म्हणजे पाकिस्तान असेच त्यांना वाटते!

अलीकडेच हुकूमशाहीशी झालेल्या झुंजीतून बाहेर पडलेल्या आणि देशात सगळीकडे फोफावलेल्या बंडाळीत आणि युद्धसम परिस्थितीत गुंतलेल्या या देशातील वृत्तपत्रस्वातंत्र्याबाबत हाजराताईंना वारंवार विचारले जाते. सत्य परिस्थिती अशी आहे की, पाकिस्तानी इतिहासाच्या पूर्वकालातील वृत्तपत्रस्वातंत्र्याच्या तुलनेत आज त्याला मिळणारे वृत्तपत्रस्वातंत्र्य खूप क्षेत्रांत आणि पूर्वीपेक्षा बरेच जास्त आहे. त्या स्वातंत्र्यात सरकार हस्तक्षेप करत नाही. आज पाकिस्तानी जनतेला स्वातंत्र्य मिळत आहे. पण त्यातही काही मर्यादा आहेत. काही विषय पत्रकारांना वर्ज्य आहेत. उदा: धर्माच्या निंदेविरुद्धचा कायदा (Blasphemy Law), राज्यघटनेत धर्माचे स्थान या विषयांवर बोलण्यास सक्त मनाई आहे. धर्माबद्दल बोलणे एकंदरीतच बेकायदा मानले जाते. असेच इतरही काही विषय आहेत. वर्ज्य विषयांवर बोलण्यापासूनची भीती ही सरकारी यंत्रणेपेक्षा बिनसरकारी यंत्रणेकडून आहे हे महत्वाचे.

पाकिस्तान अप्रगत राहिला आहे. कारण त्याच्या अर्थसंकल्पातील खूपसा पैसा लष्करावर खर्च करावा लागतो. त्यातला काही अतिरेक्यांविरुद्धच्या आणि बंडखोरांविरुद्धच्या लढ्यांत खर्च होतो. पण पूर्वेकडून येऊ शकणार्‍या पण अस्पष्ट धोक्याला तोंड देण्यातही लक्षणीय पुंजी खर्च होते. कुणी म्हणेल की मग लष्करी खर्च कमी करून टाका! पण प्रत्यक्ष परिस्थिती पहाता ते इतके सोपे नाही.

पाकिस्तानबद्दल मत बनवायला बाहेरच्या लोकांना फार जड जाते. पण तरीही जगाच्या पाठीवर कित्येक भागांत कित्येक सुशिक्षित लोक पाकिस्तान, पाकिस्तानातील परिस्थिती आणि ती येण्याची मूळ कारणे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातले काही प्रयत्न स्वार्थी हेतूंनी केलेले असतीलही. पण तरी सत्य परिस्थिती अशी आहे की, पाकिस्तानातील गोंधळात काही ठराविक पॅटर्न दिसतो काय याचा शोध घेण्यासाठी अनेक समित्या, उपसमित्या, तज्ज्ञमंडळे, संशोधक, विश्लेषक, शैक्षणिक क्षेत्रातले तज्ज्ञ आज कार्यरत आहेत.

दरम्यान, पाकिस्तानी लोक या शोधात मदत होईल असे काय करत आहोत? आपल्या भोवती चाललेल्या उग्रवाद, कडवेपणा, असहिष्णुता आणि हिंसा यांच्याकडे पाहिल्यास आपण फारसे काही करत नाही असेच प्रथमदर्शनी त्यांना वाटते. पूर्वी अज्ञान, द्वेष, आकस यासारख्या प्रवृत्ती फक्त गुन्हेगारांच्या आणि अतिरेक्यांच्या बाबतीत पहायला मिळायच्या, पण गेल्या काही वर्षात त्या पाकिस्तानी समाजातही पहायला मिळत आहेत. अशा वाढत जाणार्‍या प्रवृत्तीचे दर्शन आपल्याला वाढत्या अतिरेकी हल्ल्यांतून, सामूहिक हिंसेतून दिसते.

सामान्य लोकांतही या असहिष्णुपणाची आणि उग्रवादाची लागण का झाली आहे? याचे उत्तर काही प्रमाणात आल्डस हक्सलीच्या एका टिप्पणीत दिसते. त्यात ते म्हणतात की, माणसाच्या ६७ टक्के दु:खांचा उगम त्याच्या मूर्खपणा, द्वेषभावना, कर्मठपणा आणि धर्मांवरील त्याच्या आवेशातच असतो आणि या गोष्टी तो धार्मिक किंवा राजकीय नेत्यांच्यावतीने करत असतो. हे वर्णन थेटपणे पाकिस्तानला लागू पडते आणि त्यातला धर्माबद्दलचा आवेश हा भाग तर दिवसेंदिवस शिकलेल्या पण तरीही अज्ञानी होत चाललेल्या समाजाचा गुणविशेष होऊ लागला आहे.

एखादी विचारसरणी जेव्हा जीवनात यशस्वी होते तेव्हा ती रूढ होऊन जाते. अशा रूढ विचारसरणीच्या शिक्षणामुळे उग्रवाद टाळता येतो. याचे कारण असे सांगता येईल की, शिकलेले लोक नाउमेद झालेले नसतात. पाकिस्तानात जरी अनेक प्रकारचे ध्येयवाद प्रचलित असले तरी फारच थोडे विचार, फारच थोड्या कल्पना तेथे उदयाला आलेल्या आहेत. परिणामत: सध्याची हेकट परिस्थिती बदलण्यासाठी लागणारी साधनसामुग्री फारच अपु‍र्‍या प्रमाणात पाकिस्तान्यांकडे आहे. पाकिस्तानमध्ये शहाणे आणि सुजाण लोक आहेत. पण त्यांची संख्या फार थोडी असल्यामुळे अत्याग्रह, अटकळी आणि वदंता यांच्याबाबतच्या कल्लोळात त्यांचे मत, विचार कुणाला ऐकूच जात नाहीत. चांगल्या कल्पना, चांगले विचार मनात येणे हे सुसंस्कृत समाजाचे लक्षण आहे व ते आणण्यासाठी आणि नव्या कल्पनांचे स्वागत करण्याची मन:स्थिती जोपासण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. अशा सुशिक्षित समाजात उग्रवादाला किंवा कडवेपणाला वाव नसतो. कारण तिथे द्वेषभावना किंवा मूर्खपणा या अवगुणांना थारा मिळत नाही.

आज पाकिस्तानाच्या लोकसंख्येत तरुणांची संख्या प्रमाणाबाहेर वाढली आहे. पण यातली ७० लाख मुले प्राथमिक शालेय शिक्षण पूर्ण व्हायच्या आधीच बाहेर पडलेली आहेत. तर आणखी ३० लाख मुले कधीच शाळेत पाऊल टाकणार नाहीत. जर ती शाळेत किंवा कॉलेजात गेलीच तरी आज तिथे ज्या प्रतीचे शिक्षण दिले जात आहे त्याचा त्यांना फायदा होईलच असे नाही? यावर एकच सोपा उपाय तो म्हणजे सर्वाधिक निधी शिक्षण क्षेत्रात गुंतवून, तरुणांसाठी अधिक आर्थिक तरतूद करणे हा होय. पण, दुर्देवाने पाकिस्तानात आजमितीस तरी काहीच सोपे नाही!

(स्तंभलेखिका श्रीमती हाजरा मुमताज यांचा लेख डॉन दैनिकात २६ सप्टेंबर २०११ रोजी प्रसिध्द करण्यात आला आहे. त्या लेखावर आधारित...)
वाचकांच्या प्रतिक्रिया:

SUDHIR KALE (Jakarta)

आज पाकिस्तानी वृत्तपत्रें वाचल्यास लक्षात येते कीं तिथले स्तंभलेखक खूपच योग्य मुद्दे ठामपणे मांडतात आणि त्यावरून पाकिस्तानात प्रथमदर्शनी तरी खूप व्यक्तिस्वातंत्र्य आणि लेखनस्वातंत्र्य आहे असे दिसते. पण हे फक्त मी आंग्लभाषिक वृत्तपत्रांपुरते बोलू शकतो. त्यांच्या उर्दू वृत्तपत्रांत काय छापले जाते ते मला माहीत नाहीं. एका स्तंभलेखकाला मी लिहिले होते की आपण उर्दू भाषेतील वृत्तपत्रातही असे लेख लिहिता कां? तर ते म्हणाले होते कीं "आमच्या अशा लेखांना उर्दू वृत्तपत्रात फारशी मागणी नाहीं पण इंग्लिश वाचणार्‍यांनासुद्धा सुधारण्याची गरज आहे व त्यामुळे आमचे लेखन तसे कारणी लागत आहे." आज ’डॉन’ आणि ’एक्सप्रेस ट्रिब्यून’ या वृत्तपत्रातील स्तंभलेखन वाचल्यास लक्षात येते कीं हे लेखक जनजागृतीचे मोठे काम करत आहेत. म्हणून मी त्यांचे अनुवाद लिहीत रहाणार आहे व ’दिव्य मराठी’ ते प्रकाशित करेल अशी मला आशा आहे. सर्व प्रोत्साहनपर प्रतिसादांबद्दल धन्यवाद. सुधीर काळे

====================

सुधीर काळे (जकार्ता)

श्री. सुचित केळकर-जी,भारताबद्दल माहिती भारतात भरपूर मिळत असते. पण पाकिस्तानाबद्दल त्याप्रमाणात मिळत नाहीं आणि मराठीत तर त्याहून कमी. म्हणून मी पाकिस्तानबद्दल लिहिणे पसंत करतो.

====================

SHEKHAR GUPTA (Mumbai)

पाकिस्तानमधील सर्वच प्रश्न हळूहळू तीव्र रूप धारण करणार आहेत. त्यामुळे शेजारील राष्ट्र या नात्याने भारताच्या समस्याही वाढणार आहेत.

====================

VYANKATESH SATPUTE (Nagar)

Dhanyawad kale saheb, eka veglya vishyacha lekh wachayla milala.

====================

PREETI (London)

lekh awadala. Khup abhar.

====================

MAHESH (Solapur)

या ठिकाणी मला कंदहार विमान अपहरण झाले होते तेन्वाची एक बातमी आठवते. इंडिया टुडे या नियतकालिकेत ती प्रसिद्ध झाली होती. अतिरेक्यांना जसवंत सिंग घेऊन जात होते, त्या विमानात हे इंडिया टुडेचे पत्रकारही होते. या पत्रकाराने त्या अतिरेक्यांना म्हटले, 'तुम्ही चुकीचे करत आहात, यामुळे इस्लाम बदनाम होते. कुराणात असे कुठे म्हटले आहे वगैरे...' पत्रकाराच्या या उपदेशावर अतिरेक्याने प्रतिप्रश्न केला, की 'तुम्ही कुराण वाचले आहे ? इस्लाम काय आहे हे तुम्ही सांगू नका...' भावार्थ असा की आजही कुराणाचा चुकीच्या पद्धतीने अर्थ लावला जात आहे आणि त्यातून जिहाद. असे होणे खूपच धोक्याचे आहे. लेखिका म्हणते त्याप्रमाणे पाकिस्तानात धर्म चिकित्सा करायला बंदी आहे. तो कायदा हाताविल्याशिवाय धर्म चिकित्सा होणार नाही.... आणि ते झाल्याशिवाय कट्टर वाद थांबणार नाही... विचित्र कोंडी आहे ही.... नियतीच्या मनात काय आहे कुणास थ्वूक ?

====================

1 0 | आपत्तिजनक

SUNIL (Latur)

आपण आपल्या देशाबाहेर काय चालले आहे, याकडे सहसा लक्ष्य देत नाही. या आत्ममग्न वृत्तीमुळेच एक हजार वर्षांची गुलामी या देशावर आली होती. बाहेरच्या दिशात काय सुरु आहे, त्यातल्या त्यात आपल्या शत्रू देशात काय सुरु आहे, याबद्दल जाणीव विकसित करणारा हा लेख स्तुत्य आहे. ''धर्माबद्दलचा आवेश हा भाग तर दिवसेंदिवस शिकलेल्या पण तरीही अज्ञानी होत चाललेल्या समाजाचा गुणविशेष होऊ लागला आहे.'' हे वर्णन तर खूपच मार्मिक आहे. आज अनेक अतिरेकी म्हटले तर उच्च शिक्षित आहेत. पण कृती मात्र मध्ययुगीन आहे. धर्माबद्दलचा आवेश किंवा माझाच धर्म खरा, इतर धर्मियांना जगण्याचाही अधिकार नाही - ही विचारधारा थोपाविल्याशिवाय पाकिस्तानच नव्हे जगातील अतिरेकी निर्मिती थांबणार नाही असे वाटते. चांगला विषय मांडल्याबद्दल धन्यवाद.

====================

SHASHIKANT SATHE (Mundhava)

all knows that america used pakistan to unstable south asia. know they will help pakistani students for research. I think it is very funny. Pakistani leaders will never change.

====================

MILIND SHINDE (Pune)

पाकिस्तानवर आज ही वेळ का आली, याचा कोणीतरी शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करतोय, हे निश्चितच आनंददायक वाटते

====================

SUCHIT KELKAR (Thane)

पाकिस्तानवर एवढे चिंतन करण्यापेक्षा काळेसाहेबांनी भारताबद्दलही लिखाण करावे. आपल्या देशातही अनेक सामाजिक, आर्थिक प्रश्न आहेत. त्याकडे लक्ष दिले नाही तर ते सुद्धा पुढील काळात उग्र रूप धारण करणार आहेत.

====================

PRIYA PATHAK (Kolhapur)

really nice article.

====================

SANDIP CHITRE (Mumbai)

पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी आता खरंच चिंतन करण्याची वेळ आली आहे. त्यांनी आता भूमिका घेतली नाही, तर पुढे त्या देशाचे भवितव्य अंधकारमय असणार, यात तिळमात्र शंका नाही. काळेसाहेब धन्यवाद या अनुवादित लेखाबद्दल...

====================

No comments:

Post a Comment