Tuesday 1 September 2009

कोरी अक्वीनो यांच्या कांहीं हृद्य आठवणी

फिलिपाईन्सच्या माजी राष्ट्राध्यक्षा श्रीमती कोराझॉन (लाडके प्रचलित नांव "कोरी") अक्वीनो यांच्या कांहीं हृद्य आठवणी

दोन दिवसापूर्वी, १ ऑगस्ट रोजी, फिलिपाईन्सच्या माजी राष्ट्राध्यक्षा श्रीमती कोराझॉन (लाडके प्रचलित नांव "कोरी") अक्वीनो काळाच्या पडद्याआड गेल्या. २६ फेब्रुवारी १९८६ रोजी "लोकक्रांती"द्वारा (People Power) हुकुमशहा मार्कोस यांना चारी मुंड्या चित करून त्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले. त्या आधी मार्कोस यांनी अनेक कॢप्त्या लढवून निवडणूक "चोरण्या"चा प्रयत्न केला, पण तो लोकांनी हाणून पाडला. चुकीची मतमोजणी जारी ठेवावी म्हणून ज्या निवडणूक आयोगाच्या कर्मचार्‍यांवर दडपण आणले गेले ते कर्मचारी राजीनामे देऊन बाहेर पडले व मार्कोस यांचे पितळ उघडे पडले. वैधव्याच्या दु:खद अंधाराच्या गर्तेतून बाहेर पडून आपल्या देशाचे राष्ट्रपतीपद मिळवून आपल्या पतीचे स्वप्न साकार करणार्‍या या उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या बाईंच्या आयुष्यातील त्या दोन-तीन दिवसातील घटनांचा एक स्मृतीपट माझ्या डोळ्यांपुढून पुन्हा गेला. त्यातल्याच या कांहीं आठवणी.

१९८६ सालचा फेब्रुवारी महिना होता तो. मी इंडोनेशियाचे दुसर्‍या क्रमांकाचे शहर सुराबाया येथे काम करत होतो. सुहार्तो हे इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष व "सर्वेसर्वा" हुकुमशहा होते. वृत्तपत्रे, नियतकालिके, रेडियो व दूरचित्रवाणी या सर्वांवर सुहार्तोंची पोलादी पकड होती व कुणालाही कुठलेही नागरी स्वातंत्र्य नव्हते. TVRI (टेलीव्हिसी रिपुब्लिक इंडोनेशिया) त्यांच्या "दुनिया दालाम बरिता (बातम्यातले जग)" या रात्री ९ वाजता दिल्या जाणार्‍या बातम्यांमध्ये जे दाखवील तेच फक्त पहायला मिळायचे. आमच्यासारखी परदेशी मंडळी "बीबीसी"वर बातम्या ऐकायचा प्रयत्न करत, पण ते स्टेशन कधीच नीट tune व्हायचे नाहीं त्यामुळे फारच निराशा व्हायची व असहायतेची भावना मनात यायची.

मला अजूनही १९८६ सालची फिलिपाईन्समधली ती लोकक्रांती स्पष्टपणे आठवते. TVRI वर दाखवलेल्या कितीतरी चित्रफिती (video-clips) आजही मनाच्या पटलावर कोरलेल्या आहेत. जवळ-जवळ दहा लाख निदर्शक "एपिफानिओ द लॉस सांतोस ऍव्हेन्यू (EDSA)" या राजवाड्यासमोरील हमरस्त्यावर जमून निदर्शने करीत होते. लष्करी जवान आपापल्या मशीनगन्स त्यांच्यावर रोखून उभे होते. निदर्शकातल्या एका स्त्री-निदर्शिकेने एका बंदूकधारी ’जवाना’च्या हातात कसले तरी फूल दिले आणि गंमत म्हणजे असे कांहीं होईल याची कल्पनाही नसल्यामुळे तो जवान गोंधळून गेला व त्याने ते फूल स्वीकारले आणि मग एकदम तिथला तणाव कमी झाला. ही हृदयस्पर्शी आठवण आजही अगदी ताजी आहे. हुकुमशहा मार्कोस आणि त्याचा लष्करप्रमुख जनरल व्हेर यांच्यामधले संभाषणही TVRI ने दाखविले होते. मार्कोसही या अनपेक्षित कलाटणीने गोंधळून गेला होता आणि त्यामुळे तो कुठलाच निर्णय ठामपणे देऊ शकला नाही व त्यामुळे व्हेर खूपच गोंधळून गेल्याचेही दिसत होते.

जसजसे लोक त्या चौकात "चोरून" निवडून आलेल्या मार्कोस यांच्या (खोट्या) विजयाच्या विरोधात येत राहिले तसतशी मार्कोसच्या पाठीराख्यांमध्ये फूट पडू लागली. तेही लोक मार्कोसच्या राजवटीला विटलेले होतेच, त्यात प्रचंड असंतोषाचे असे विराट दर्शन घडताच सर्वात प्रथम संरक्षणमंत्री एनरीले व पाठोपाठ लष्करी सेनानी जनरल रामोस हे दोघे मार्कोसची बाजू सोडून अक्वीनोबाईंच्या बाजूला आले. (पुढे रामोस राष्ट्रपतीही झाले.) अक्वीनोबाईंनी शपथविधीनंतर जेंव्हा ज. रामोस यांची पदोन्नती केली तेंव्हा त्यांनी पिवळ्या कपड्यात दृढपणे व सुसंस्कृतपणे ऐटीत उभ्या असलेल्या आपल्या नव्या "कमांडर-इन्-चीफ"ना (अक्वीनोबाईंना) ठोकलेला कडक सॅल्यूटही मला आठवतोय व स्त्रीसुलभ डौलात गोड स्मितहास्य करून तो (सॅल्यूट) त्यांनी स्वीकारल्याचे दृश्यही माझ्या मनावर कोरले गेले आहे. शेवटी मार्कोस यांनी फिलिपाईन्समधून पलायन करण्याचा निर्णय घेतल्यावर त्याला व त्याच्या निवडक कुटुंबियांना अमेरिकन तळावर घेऊन जाणारी हेलिकॉप्टर्स TVRI वर दिसली व आनंदाने अंगावर रोमांच उभे राहिले.

अक्वीनोबाई स्वत: दु:खात बुडून गेलेल्या एक विधवा बाई होत्या. निवडणुकीचे डावपेच आखण्य़ासाठी त्यांच्या पतीला भेटायला घरी आलेल्या राजकीय मित्रांचा पाहुणचार करणे एवढाच त्यांचा तोपर्यंत राजकारणाशी संबंध. त्यांचे पती बेनीन्यो (निनॉय) अक्वीनो हे विरोधी पक्षाचे सिनेटर होते व जर मार्कोस य़ांनी "मार्शल लॉ" पुकारून ७३ साली घ्यायच्या निवडणुका रद्द केल्या नसत्या तर मर्कोसला हरवून ते राष्ट्रपतीही झाले असते. पण आधी देशद्रोहासारख्या खोट्या आरोपाखाली तुरुंगवास व नंतर अमेरिकेतल्या स्वत:हून घेतलेल्या हद्दपारीचा काळ संपवून हे निर्भय सिनेटर जिवावरच्या संकटाला न जुमानता १९८३ साली मनीलाला परत आले. त्यांना आपल्याला गोळ्या घातल्या जातील अशी शंका होती म्हणून विमानातून उतरायच्या आधी त्यांनी बुलेटप्रूफ जाकीटही घातले. पण त्यांच्या मानेत गोळ्या घातल्या गेल्या व ते मनीलाच्या विमानतळावर खाली उतरायच्या शिडीशेजारीच धारातीर्थी पडले. त्याच विमानात असलेल्या ’टाईम’ या अमेरिकन नियतकालिकाच्या वार्ताहाराने हे दृश्य विमानाच्या खिडकीतून पाहिले व त्यामुळे सर्व जगाला काय झाले याची माहिती मिळाली. (आज मनीला विमानतळाला उचितपणे त्यांचेच नांव दिलेले आहे.)

निनॉय अक्वीनो हे अतीशय लोकप्रिय सिनेटर होते व केवळ सत्तालालसे पायी त्यांचा निर्घृणपणे भर दुपारी वध करण्यात आला. सत्तापिपासू लोकांना कशी सदसद्विवेकबुद्धी नसते व खुर्चीसाठी ते कसे कुठल्याही थराला जाऊ शकतात याचे हे एक घृणास्पद उदाहरण आहे.

अगदी तरुण वयातही त्यांचा जनमानसावर चांगला पगडा होता. त्यांच्यावरील विश्वासामुळे व त्यांनी मध्यस्ती केल्यामुळे लुई तारुक या कम्युनिस्ट नेत्याने सरकारपुढे आत्मसमर्पण केले व त्यामुळे फाशीऐवजी केवळ तुरुंगवास भोगून तो बाहेर आला.
हद्दपारीच्या काळात अक्वीनो दांपत्य बोस्टनला रहात असे. त्यांच्या त्यावेळच्या शेजार्‍यांनी अक्वीनोबाईंच्या निधनानंतर खालील आठवण सांगितली. ते म्हणतात, "अक्वीनोबाई खूप साध्या बाई होत्या. लोकक्रांतीद्वारा राष्ट्रपतीपदावर चढलेल्यानंतर फिलिपाईन्सचे अध्यक्षपद त्या किती समर्थपणे पेलू शकतील याबद्दल सर्वांनाच शंका होती. पण त्या अतीशय सदसद्विवेकबुद्धीशील व कर्तव्यतत्पर असल्यामुळे ज्या गोष्टीत त्या लक्ष घालतील त्यात त्या यशस्वी होतीलच अशी खात्री तिला ओळखणार्‍या आम्हा सर्वांना होती." आणि तशा त्या यशस्वी झाल्याही.

फक्त फिलिपाईन्सच नव्हे तर सार्‍या दक्षिण-पूर्व आशियाखंडाने अक्वीनोबाई व त्याचे यजमान निनॉय याचे उपकार विसरू नयेत. कारण फिलिपाईन्सच्या पाठोपाठ या भागातल्या इतर राष्ट्रातही लोकशाही रूढ होऊ लागली.

त्यांच्या निधनाने एक लोकशाहीवादी ताराच निखळून पडला आहे. फिलिपाईन्सच्या लोकांच्या दु:खात अखिल जग आज सहभागी झाले आहे. सार्‍या दक्षिण-पूर्व आशियाखंडात मूळ धरलेली लोकशाही हीच त्यांनी जगाला दिलेली देणगी आहे. त्यांच्या आत्म्याला निरंतर शांती लाभो अशीच प्रार्थना सर्व लोक करतील!

सुधीर काळे, जकार्ता

मग ओबामा वेगळे कसे?

नुकत्याच झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत, अगदी "प्रायमरीज"पासून आजपर्यंत, मी राष्ट्राध्यक्ष ओबामा यांचा निस्सीम चाहाता आणि प्रशंसक आहे व मी त्यांचा प्रशंसक राहूही इच्छितो. त्यांच्या "Change we can believe in" या घोषवाक्याबरहुकूम त्यांची वाटचालही चालू आहे असे त्यांनी आतापर्यंत केलेल्या कारवायांवरून व त्यांच्या कांहीं विधानांवरून वाटत होते. उदा. "पाकिस्तान ही या जगातली सर्वात जास्त धोकादायक जागा आहे", "यापुढे पाकिस्तानला दिल्या जाणार्‍या मदतीच विनियोग ज्यासाठी ती दिली गेली आहे त्यासाठीच होत आहे याची कसून तपासणी (audit) केल्यावरच पुढच्या मदतीचे वितरण केले जाईल" अशी विधाने, त्याच्या शपथविधीच्यावेळी मुस्लिम राष्ट्रांना उद्देशून त्यांनी दिलेले दोन संदेश "यापुढे अमेरिका मुस्लिम राष्ट्रांशी परस्पर आदर व परस्पर हितसंबंध यावर आधारित संबंध जोडू इच्छिते" व "जर तुम्ही अमेरिकेविरुद्ध उगारण्यासाठी वळलेली मूठ उघडून आपला हात मैत्रीसाठी पुढे केलात, तर तुम्हाला अमेरिकेचा मैत्रीच्या उद्देशाने पुढे केलेला हात दिसेल" किंवा इजिप्तच्या कैरो या राजधानीतून मुस्लिम राष्ट्रांना उद्देशून केलेले भाषण यासारख्या त्यांनी घेतलेल्या पावलांमुळे माझे त्यांच्याबद्दलचे कौतुक वाढतच गेले.

पण त्यांचे रशिया-अमेरिका संबंध या विषयावरील त्यांच्या भाषणाच्या वृत्तांतातील "In the short period since the end of the Cold War, we've already seen India, Pakistan and North Korea conduct nuclear tests.” हे विधान वाचल्यावर मात्र ते आता वाट चुकू लागले आहेत कीं काय अशी शंका येऊ लागली आहे.

राष्ट्रपती या नात्याने त्यांना अलीकडचा अण्वस्त्रप्रसार व त्यातील अमेरिकेच्या घोडचुका व त्यानंतरचे त्यांच्या "पित्त्या" राष्ट्राचे (पाकिस्तानचे) विविध "प्रताप" याबद्दलची संपूर्ण व संकीर्ण माहिती नक्कीच दिली गेली असणार, तरीही त्यांनी असे विधान करावे याचे खूपच वैषम्य वाटते. पहिली गोष्ट म्हणजे भारताने अणुविषयक व अण्वस्त्रउत्पादना विषयीची विद्या स्वबळावर मिळविली आहे. ही विद्या भारताला कुणी फुकटची दिलेली नाहीं. याउलट "अमेरिकेचा अफगाणिस्तानच्या युद्धामधला व्युहात्मक साथीदार" म्हणून पाकिस्तानला अमेरिकन कॉग्रेसपुढे असत्य माहिती ठेवून, असत्य विधाने करून व तिची मुद्दाम दिशाभूल करून गुप्तपणे अमेरिकेनेच त्याला १९८५ ते १९९० च्या दरम्यान अण्वस्त्रसज्ज राष्ट्र बनविले. एवढेच नाहीं तर F-16 जातीची ६० विमाने ती अण्वस्त्रे वाहून नेऊ शकतील असे फेरबदल (modifications) करून पाकिस्तानला विकली व असे आम्ही केलेलेच नाहीं अशी पूर्णपणे असत्य विधाने प्रतिनिधीगृहापुढे केली हे काय ओबामांना माहीत नसेल? केवळ अशक्य! मग तरीही ते अशी विधाने कां करत आहेत?

मग वाटू लागले कीं ओबामा खरेच "बदल" करू इच्छित आहेत कीं तो एक "गोंडस" मुखवटा आहे? त्यांच्या अशा बेजबाबदार विधानांवरून तरी वाट चुकताहेत की काय असे वाटू लागले आहे. त्यांनी रेगन, बुश-४१ व बुश-४३ यांच्या पावलावर पाऊल टाकून वाटचाल करण्याची चूक अजिबात करू नये.

पाकिस्तानला अमेरिकेने कसे अण्वस्त्रसज्ज केले याची माहिती फारच उदबोधक आहे. (http://www.dawn.com/2007/05/04/top4.htm and http://us.rediff.com/news/report/2009/jun/16/paknuke-us-allowed-pak-to-go-nuclear.htm या लिंक्स् उघडा)

भारताने (किंवा इस्रायलने) ही अणुविद्या चोरून-छुपून अमेरिकेचेच कट्टर वैरी लिबिया, इराण व उत्तर कोरिया या राष्ट्रांना विकली नाहीं. ते ’सत्कृत्य’ पाकिस्ताननेच त्यांच्या ’बदनाम’ अणुतज्ञ अब्दुल कादिर खानतर्फे केले. मग आज ओबामा भारताला "खाया नहीं, पिया नहीं, खाली ग्लास तोडा, बारा आना" या न्यायाने या नीतीशून्य राष्ट्राच्या पंक्तीला कां बसवताहेत? वर आशियातले पहिले अण्वस्त्रसज्ज राष्ट्र असलेल्या इस्रायलचे नांव त्यांनी कां वगळले? ज्यू मतदारांच्या ’मतपेटी’ लक्ष ठेवून? म्हणजे अगदी आपल्या देशातील "सर्वधर्मसमभाव"चा जप करणार्‍या व "भारताच्या राष्ट्रीय संपत्तीवर अल्पसंख्यांकांना पहिला अग्रक्रम (priority) आहे" असे खोटे-खोटे नारे देणर्‍या कॉंग्रेस पक्षाच्या व लालू, मुलायम, रामविलाससारखे इतर पक्षांतील नेत्यांच्या पावलावर पाऊल टाकून. मग ओबामा "वेगळे" कसे?

रेगन, बुश-४१ व त्यांच्या चांडाळ चौकडीने पाकिस्तानला १९९० आधीच अण्वस्त्रसज्ज केले, तर भारताने आपले ५ अण्वस्त्र चांचणी-स्फोट १९९८ मध्ये केले होते. हे याय ओबामांना माहीत नाहीं?

ओबामांनी हे विधान करून भारताच्या दृष्टीने एक नवी डोकेदुखीच निर्माण केली आहे. कीं हे विधान त्यांनी केवळ अनवधानाने केले आहे?

मी इथले दैनिक "जकार्ता पोस्ट" व भारतातले गोव्याहून प्रसिद्ध होणारे इंग्रजी दैनिक "Navhind Times" या दोन वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली व ओबामांचे कौतुक करणारी बरीच पत्रे ओबामांना त्यांच्या व्हाईट हाऊस"च्या (१६०० पेन्सिल्वेनिया ऍव्हेन्यू, वॉशिंग्टन डी.सी.) या पत्त्यावर पाठविली होती, त्यामुळे असेल, पण आज माझे नाव व ई-मेल आय्.डी. ओबामांच्या "शासकीय" यादीत घातले गेलेले आहे. त्यामुळे त्यांची माहितीपर प्रकाशने मला वेळोवेळी येत असतात. त्यातल्याच एका निरोपाचे "reply" बटन दाबून मी माझे निषेधपर पत्र त्यांना व त्यांचा प्रमुख सल्लागार डेव्हिड एक्सलरॉडला (David Axlerod) यांना लिहिलेला आहे. ओबामांना ते वाचायला वेळ कुठला? पण एक्सलरॉड तरी वाचातील व ओबामांना योग्यसा सल्ला देतील अशी आशा करू या.
जास्तीत जास्त भारतीयांनी, त्यातल्या त्यात अमेरिकास्थित भारतीयांनी ओबामांवर अशा तर्‍हेच्या निषेधपत्रांचा "पाऊस" पाडला पाहिजे!

ओबामा कांहींही बोलोत किंवा करोत, भारत अभिमानाने आपली प्रगती करतच राहील व अमेरिकेच्या दुटप्पी धोरणात नक्कीच सहभागी होणार नाही. अमेरिकेने दोस्ती केली तर "सह" व नाहीं केली तर "शिवाय" हेच आपले धोरण राहील व त्या नात्याने भारताला अमेरिकेच्या मदतीची गरज नाहीं. अमेरिकेला मात्र चीनचा काटा काढायला भारताची गरज आहे व ती वाढतच जाणार आहे. अशा वेळी पाकिस्तानचा जसा दुरुपयोग अफगाणिस्तानच्या युद्धासाठी करून घेतला गेला तसा भारताचा दुरुपयोग चीनशी परस्पर लढविण्यात अमेरिकेला करून घेऊ देऊ नये याबद्दल भारताने सतर्क रहावे हेच भारताच्या हिताचे आहे.

- सुधीर काळे, जकार्ता