Tuesday 1 September 2009

कोरी अक्वीनो यांच्या कांहीं हृद्य आठवणी

फिलिपाईन्सच्या माजी राष्ट्राध्यक्षा श्रीमती कोराझॉन (लाडके प्रचलित नांव "कोरी") अक्वीनो यांच्या कांहीं हृद्य आठवणी

दोन दिवसापूर्वी, १ ऑगस्ट रोजी, फिलिपाईन्सच्या माजी राष्ट्राध्यक्षा श्रीमती कोराझॉन (लाडके प्रचलित नांव "कोरी") अक्वीनो काळाच्या पडद्याआड गेल्या. २६ फेब्रुवारी १९८६ रोजी "लोकक्रांती"द्वारा (People Power) हुकुमशहा मार्कोस यांना चारी मुंड्या चित करून त्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले. त्या आधी मार्कोस यांनी अनेक कॢप्त्या लढवून निवडणूक "चोरण्या"चा प्रयत्न केला, पण तो लोकांनी हाणून पाडला. चुकीची मतमोजणी जारी ठेवावी म्हणून ज्या निवडणूक आयोगाच्या कर्मचार्‍यांवर दडपण आणले गेले ते कर्मचारी राजीनामे देऊन बाहेर पडले व मार्कोस यांचे पितळ उघडे पडले. वैधव्याच्या दु:खद अंधाराच्या गर्तेतून बाहेर पडून आपल्या देशाचे राष्ट्रपतीपद मिळवून आपल्या पतीचे स्वप्न साकार करणार्‍या या उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या बाईंच्या आयुष्यातील त्या दोन-तीन दिवसातील घटनांचा एक स्मृतीपट माझ्या डोळ्यांपुढून पुन्हा गेला. त्यातल्याच या कांहीं आठवणी.

१९८६ सालचा फेब्रुवारी महिना होता तो. मी इंडोनेशियाचे दुसर्‍या क्रमांकाचे शहर सुराबाया येथे काम करत होतो. सुहार्तो हे इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष व "सर्वेसर्वा" हुकुमशहा होते. वृत्तपत्रे, नियतकालिके, रेडियो व दूरचित्रवाणी या सर्वांवर सुहार्तोंची पोलादी पकड होती व कुणालाही कुठलेही नागरी स्वातंत्र्य नव्हते. TVRI (टेलीव्हिसी रिपुब्लिक इंडोनेशिया) त्यांच्या "दुनिया दालाम बरिता (बातम्यातले जग)" या रात्री ९ वाजता दिल्या जाणार्‍या बातम्यांमध्ये जे दाखवील तेच फक्त पहायला मिळायचे. आमच्यासारखी परदेशी मंडळी "बीबीसी"वर बातम्या ऐकायचा प्रयत्न करत, पण ते स्टेशन कधीच नीट tune व्हायचे नाहीं त्यामुळे फारच निराशा व्हायची व असहायतेची भावना मनात यायची.

मला अजूनही १९८६ सालची फिलिपाईन्समधली ती लोकक्रांती स्पष्टपणे आठवते. TVRI वर दाखवलेल्या कितीतरी चित्रफिती (video-clips) आजही मनाच्या पटलावर कोरलेल्या आहेत. जवळ-जवळ दहा लाख निदर्शक "एपिफानिओ द लॉस सांतोस ऍव्हेन्यू (EDSA)" या राजवाड्यासमोरील हमरस्त्यावर जमून निदर्शने करीत होते. लष्करी जवान आपापल्या मशीनगन्स त्यांच्यावर रोखून उभे होते. निदर्शकातल्या एका स्त्री-निदर्शिकेने एका बंदूकधारी ’जवाना’च्या हातात कसले तरी फूल दिले आणि गंमत म्हणजे असे कांहीं होईल याची कल्पनाही नसल्यामुळे तो जवान गोंधळून गेला व त्याने ते फूल स्वीकारले आणि मग एकदम तिथला तणाव कमी झाला. ही हृदयस्पर्शी आठवण आजही अगदी ताजी आहे. हुकुमशहा मार्कोस आणि त्याचा लष्करप्रमुख जनरल व्हेर यांच्यामधले संभाषणही TVRI ने दाखविले होते. मार्कोसही या अनपेक्षित कलाटणीने गोंधळून गेला होता आणि त्यामुळे तो कुठलाच निर्णय ठामपणे देऊ शकला नाही व त्यामुळे व्हेर खूपच गोंधळून गेल्याचेही दिसत होते.

जसजसे लोक त्या चौकात "चोरून" निवडून आलेल्या मार्कोस यांच्या (खोट्या) विजयाच्या विरोधात येत राहिले तसतशी मार्कोसच्या पाठीराख्यांमध्ये फूट पडू लागली. तेही लोक मार्कोसच्या राजवटीला विटलेले होतेच, त्यात प्रचंड असंतोषाचे असे विराट दर्शन घडताच सर्वात प्रथम संरक्षणमंत्री एनरीले व पाठोपाठ लष्करी सेनानी जनरल रामोस हे दोघे मार्कोसची बाजू सोडून अक्वीनोबाईंच्या बाजूला आले. (पुढे रामोस राष्ट्रपतीही झाले.) अक्वीनोबाईंनी शपथविधीनंतर जेंव्हा ज. रामोस यांची पदोन्नती केली तेंव्हा त्यांनी पिवळ्या कपड्यात दृढपणे व सुसंस्कृतपणे ऐटीत उभ्या असलेल्या आपल्या नव्या "कमांडर-इन्-चीफ"ना (अक्वीनोबाईंना) ठोकलेला कडक सॅल्यूटही मला आठवतोय व स्त्रीसुलभ डौलात गोड स्मितहास्य करून तो (सॅल्यूट) त्यांनी स्वीकारल्याचे दृश्यही माझ्या मनावर कोरले गेले आहे. शेवटी मार्कोस यांनी फिलिपाईन्समधून पलायन करण्याचा निर्णय घेतल्यावर त्याला व त्याच्या निवडक कुटुंबियांना अमेरिकन तळावर घेऊन जाणारी हेलिकॉप्टर्स TVRI वर दिसली व आनंदाने अंगावर रोमांच उभे राहिले.

अक्वीनोबाई स्वत: दु:खात बुडून गेलेल्या एक विधवा बाई होत्या. निवडणुकीचे डावपेच आखण्य़ासाठी त्यांच्या पतीला भेटायला घरी आलेल्या राजकीय मित्रांचा पाहुणचार करणे एवढाच त्यांचा तोपर्यंत राजकारणाशी संबंध. त्यांचे पती बेनीन्यो (निनॉय) अक्वीनो हे विरोधी पक्षाचे सिनेटर होते व जर मार्कोस य़ांनी "मार्शल लॉ" पुकारून ७३ साली घ्यायच्या निवडणुका रद्द केल्या नसत्या तर मर्कोसला हरवून ते राष्ट्रपतीही झाले असते. पण आधी देशद्रोहासारख्या खोट्या आरोपाखाली तुरुंगवास व नंतर अमेरिकेतल्या स्वत:हून घेतलेल्या हद्दपारीचा काळ संपवून हे निर्भय सिनेटर जिवावरच्या संकटाला न जुमानता १९८३ साली मनीलाला परत आले. त्यांना आपल्याला गोळ्या घातल्या जातील अशी शंका होती म्हणून विमानातून उतरायच्या आधी त्यांनी बुलेटप्रूफ जाकीटही घातले. पण त्यांच्या मानेत गोळ्या घातल्या गेल्या व ते मनीलाच्या विमानतळावर खाली उतरायच्या शिडीशेजारीच धारातीर्थी पडले. त्याच विमानात असलेल्या ’टाईम’ या अमेरिकन नियतकालिकाच्या वार्ताहाराने हे दृश्य विमानाच्या खिडकीतून पाहिले व त्यामुळे सर्व जगाला काय झाले याची माहिती मिळाली. (आज मनीला विमानतळाला उचितपणे त्यांचेच नांव दिलेले आहे.)

निनॉय अक्वीनो हे अतीशय लोकप्रिय सिनेटर होते व केवळ सत्तालालसे पायी त्यांचा निर्घृणपणे भर दुपारी वध करण्यात आला. सत्तापिपासू लोकांना कशी सदसद्विवेकबुद्धी नसते व खुर्चीसाठी ते कसे कुठल्याही थराला जाऊ शकतात याचे हे एक घृणास्पद उदाहरण आहे.

अगदी तरुण वयातही त्यांचा जनमानसावर चांगला पगडा होता. त्यांच्यावरील विश्वासामुळे व त्यांनी मध्यस्ती केल्यामुळे लुई तारुक या कम्युनिस्ट नेत्याने सरकारपुढे आत्मसमर्पण केले व त्यामुळे फाशीऐवजी केवळ तुरुंगवास भोगून तो बाहेर आला.
हद्दपारीच्या काळात अक्वीनो दांपत्य बोस्टनला रहात असे. त्यांच्या त्यावेळच्या शेजार्‍यांनी अक्वीनोबाईंच्या निधनानंतर खालील आठवण सांगितली. ते म्हणतात, "अक्वीनोबाई खूप साध्या बाई होत्या. लोकक्रांतीद्वारा राष्ट्रपतीपदावर चढलेल्यानंतर फिलिपाईन्सचे अध्यक्षपद त्या किती समर्थपणे पेलू शकतील याबद्दल सर्वांनाच शंका होती. पण त्या अतीशय सदसद्विवेकबुद्धीशील व कर्तव्यतत्पर असल्यामुळे ज्या गोष्टीत त्या लक्ष घालतील त्यात त्या यशस्वी होतीलच अशी खात्री तिला ओळखणार्‍या आम्हा सर्वांना होती." आणि तशा त्या यशस्वी झाल्याही.

फक्त फिलिपाईन्सच नव्हे तर सार्‍या दक्षिण-पूर्व आशियाखंडाने अक्वीनोबाई व त्याचे यजमान निनॉय याचे उपकार विसरू नयेत. कारण फिलिपाईन्सच्या पाठोपाठ या भागातल्या इतर राष्ट्रातही लोकशाही रूढ होऊ लागली.

त्यांच्या निधनाने एक लोकशाहीवादी ताराच निखळून पडला आहे. फिलिपाईन्सच्या लोकांच्या दु:खात अखिल जग आज सहभागी झाले आहे. सार्‍या दक्षिण-पूर्व आशियाखंडात मूळ धरलेली लोकशाही हीच त्यांनी जगाला दिलेली देणगी आहे. त्यांच्या आत्म्याला निरंतर शांती लाभो अशीच प्रार्थना सर्व लोक करतील!

सुधीर काळे, जकार्ता

No comments:

Post a Comment