Monday 3 September 2012

अण्णा, काय केलंत हे?

अण्णा, काय केलंत हे? (लेखक: सुधीर काळे, जकार्ता)

(हा लेख १६ ऑगस्ट २०१२ रोजी ई-सकाळवर प्रकाशित झाला व त्याला (मी दिलेली उत्तरे वगळून) अनुकूल-प्रतिकूल-तटस्थ असे १०० पेक्षा जास्त प्रतिसाद आले. हा माझ्या लेखांसाठीचा एक नवा विक्रमच आहे! सकाळचा दुवा आहे: http://online2.esakal.com/esakal/20120816/5683344458547640765.htm)

३ ऑगस्ट २०१२ रोजी उपोषणाची सांगता करण्याचा अण्णांचा निर्णय मनाला विषण्णतेचा चटका लावून गेला. असे वाटले, की अतिशय पूजनीय, साक्षात त्यागमूर्ती असलेल्या ज्या व्यक्तीला सार्‍या देशाने एका उत्तुंग आसनावर (pedestal) बसविले होते, त्या व्यक्तीने सार्‍या राष्ट्राचा आज जणू अवसानघातच केला. गेल्या वर्षीच्या ऑगस्टमधील उपोषणानंतर तर त्यांनी मला 'संभवामि युगे युगे', असे अर्जुनाला सांगणार्‍या भगवान श्रीकृष्णाची आठवण करून दिली होती. पण मुंबईच्या त्यांच्या उपोषणाकडे जनतेने केलेल्या दुर्लक्षामुळे मनात शंकेची पाल चुकचुकतच होती. ज्या दिवशी 'टीम अण्णा'ने उपोषण सुरू केले त्याच दिवशी ’सकाळ’ने दिलेल्या त्याबद्दलच्या बातमीखाली लिहिलेल्या माझ्या प्रतिसादात मी लिहिले होते, की उपोषण सुरू करण्याच्या आधी जरूर तो सारासार विचार 'टीम अण्णा'ने केलाच असणार आणि अशा विचारांती उपोषण सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे, तर ते उपोषण त्यामागील हेतू साध्य होईपर्यंत त्यांनी ’आमरण’ चालू ठेवावे अन्यथा आत्ताच थांबवावे. पण झाले विपरीतच! केवळ १० दिवस उपोषण करून आपला कुठलाही हेतू साध्य झालेला नसताना, अचानकपणे उपोषणाची सांगता करणे म्हणजे केवळ या आंदोलनाच्याच नव्हे, तर अशा सार्‍या भावी आंदोलनांच्या परिणामकारकतेवर अक्षरशः बोळा फिरविण्यासारखे आहे.

या वेळी 'टीम अण्णा'चे सगळेच आडाखे चुकलेले दिसतात.

'टीम अण्णा'पैकी चौघांनी अण्णांच्या चार दिवस आधीपासून उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला ही पहिली मोठी चूक. कारण अण्णा उपोषणाला बसेपर्यंत या बिचार्‍या अनुयायांच्या उपोषणाला जनमानसाने काहीच किंमत दिली नाही. त्यामुळे त्यांचे चार दिवसांचे उपोषण वायाच गेले. अण्णा उपोषणाला बसल्यानंतर जनता पुन्हा त्यांच्या आंदोलनात भाग घेऊ लागली होती. ३ ऑगस्ट रोजी त्यांची प्रकृतीही ठणठणीत होती. त्यांचे उपोषण पाचव्या दिवसात प्रवेश करते होईपर्यंत, त्या आधी चार दिवस उपोषण सुरू केलेल्यांची प्रकृती ढासळू लागली होती. त्यामुळे या आंदोलनाचा दबाव सरकारवर पडण्याऐवजी तो दबाव प्रकृती ढासळू लागलेल्या 'टीम अण्णा'च्या चार कार्यकर्त्यांवर पडला व त्यांची पंचाईत झाली. अरविंद केजरीवाल हे एक अतिशय मनस्वी आणि प्रामाणिक कार्यकर्ते आहेत, असे मला मनापासून वाटते. ते डावपेच आखण्यात आणि वातावरणनिर्मितीतही कल्पक आणि कुशल आहेत. पण अद्याप त्यांच्या व्यक्तिमत्वात आणि नेतृत्वात अण्णांच्या व्यक्तिमत्वाची आणि नेतृत्वाची उंची नाही, अण्णांना मिळालेली महनीयता अद्याप त्यांना प्राप्त झालेली नाही. आज जे महनीयतेचे तेजस्वी वलय फक्त अण्णांच्या डोक्यामागे आहे, ते या कार्यकर्त्यांच्या डोक्यामागे नाही! सध्या त्यांची तपश्चर्याही तेवढी नाही. त्यामुळे त्यांच्या प्राणांना अण्णांच्या प्राणाइतकी किंमत सरकारने (व जनतेनेही) दिली नाही. त्यामुळे आजच्या घडीला तरी एक स्वतंत्र आंदोलक म्हणून नव्हे तर केवळ अण्णांचे सहाय्यक म्हणूनच त्यांना जनता ओळखते आणि म्हणूनच चार दिवस आधीपासून उपोषण सुरू करण्याचा त्यांचा डावपेच पार चुकीचा ठरला व हे आंदोलन सुरू होता-होताच पराभवाच्या भोवर्‍यात सापडून गटांगळ्या खाऊ लागले. या चुकीच्या डावपेचांमुळे हे आंदोलन विजयी होण्याची आशा ते सुरू होण्याआधीच मावळली होती.

दुसरी चूक झाली उपोषण सोडण्याच्या कारणांची! कोण कुठली २३ ’आदरणीय’ माणसे एक आवाहन करतात काय आणि 'टीम अण्णा' आपले उपोषण थांबवते काय! काय किंमत आहे या २३ जणांना अशा आंदोलनाबाबत निर्णय घेण्याची? अणांना उपोषण सोडायची गळ घालण्याऐवजी या सर्व आदरणीय व्यक्तींनी अण्णांच्या मांडीला मांडी लावून उपोषणाला बसायला हवे होते. ते राहिले बाजूला. ही मंडळी अण्णांना आवाहन काय करतात आणि कालपर्यंत 'ही आत्महत्या नसून ते आमचे भारतमातेच्या चरणी केलेले बलिदान आहे, आमच्या तोंडात अन्न कोंबले तर आम्ही ते थुंकून देऊ व घशाखाली उतरू देणार नाही' अशा घोषणा करणारी 'टीम अण्णा' उपोषण आवरते काय घेते, सारेच विपरीत व अनाकलनीय. कसेही करून उपोषणाच्या धोक्यातून बाहेर पडण्यासाठी शोधलेली ती जणू एक तरकीबच होती असे कुणाला वाटले तर त्यात काय आश्चर्य?

आणखी एक गोष्ट स्पष्ट झाली. ऑगस्ट २०११च्या उपोषणाला मिळालेल्या अभूतपूर्व प्रसिद्धीमुळे, त्याला जनमानसातून मिळालेल्या बुलंद समर्थनामुळे, पाठिंब्यामुळे आणि शेवटी त्या उपोषणाच्या यशस्वी सांगतेमुळे सार्‍या 'टीम अण्णा'ला एक उन्मादच चढला असावा व ’ग’ची बाधाही झाली असावी. त्या उन्मादाच्या भरात 'टीम अण्णा'ने अनेक चुका करून स्वतःच आपले अवमूल्यन करून घेतले. 'टीम अण्णा'ची अनेक निवेदने खूपदा दर्पोक्ती वाटावी इतकी उद्धट होती. पाठोपाठ 'टीम अण्णा'त फाटाफूटही होऊ लागली. कारण उच्चपदस्थ व आदरणीय माणसे जमा करणे सोपे असले तरी त्यांच्यात एकमत घडवून आणणे व एकी कायम ठेवणे महा कर्मकठीण. प्रत्येकाला आपल्यालाच काय ते समजते, बाकीच्यांनी त्यांच्या आदेशाचे निमूटपणे पालन करावे असेच अशा लोकांपैकी बर्‍याच जणाना वाटते. आपापल्या क्षेत्रात त्यांनी मिळविलेल्या उत्तुंग यशामुळे त्यांच्याभोवती ’होयबां’चा गराडाही असतो. त्यामुळे अशा अनेक व्यक्ती एकत्र आल्यावर त्यांच्यात एकमत होणे अशक्यच. अण्णांसारखा दृढनिश्चयी नेताच त्यांना एकत्र ठेवू शकतो. पण इथे असे झाले नाही असेच दिसते.

त्यात किरण बेदीने वरच्या वर्गाच्या तिकिटाचे पैसे घेऊन खालच्या वर्गाने प्रवास करून पैसे वाचविल्याच्या बातम्याही बाहेर आल्या. भले ते पैसे त्यांनी सत्कार्यासाठी वापरले असतीलही. पण या घटनेमुळे त्यांचे चारित्र्यहनन तर नक्कीच झाले. अशा कांहीं घटनांमुळे वैतागून असेल, पण अण्णांनी अचानकपणे दोन-एक आठवडे 'मौनव्रत' आरंभले. हेतू कितीही उदात्त असला तरी त्याचा परिणाम अण्णांच्या डोक्याभोवतीच्या उदात्ततेच्या वलयाचे तेज कमी होण्यातच झाला. परिणामतः मुंबईला आरंभलेल्या त्यांच्या उपोषणाला जनमानसातून अगदीच किरकोळ प्रतिसाद मिळाला.

माझ्या मनात आले, की महात्मा गांधींनी जेव्हा-जेव्हा उपोषण केले तेव्हा-तेव्हा ते एकट्याने केले. त्यांना 'टीम-गांधी'ची तशी गरज भासली नाही. 'एकला चलो रे' हाच त्यांचा खाक्या होता. त्यांनी अनुयायी मिळविण्याचा प्रयत्नही केला नसावा. कदाचित् गांधीजींना अनुयायांची गरजच भासली नसेल. त्यांचे हेतूच इतके उदात्त असायचे आणि त्यांचा निर्धारही इतका दृढ असायचा कीं त्यांच्या चळवळी नेहमी 'मैं अकेला चला था जानिब-ए-मंझिल मगर, लोग तो मिलते गये, कारवाँ बनता गया'च्या थाटात वाढतच जायच्या. त्यामुळे त्यांना अनुयायांची कधी ददात पडल्याचे कुठे वाचनात आलेले नाही. महात्माजींच्या पावलावर पाऊल टाकणार्‍या अण्णांच्या लक्षात ही गोष्ट आली होती की नाही हे मला माहीत नाही, पण सर्व घटनांकडे पहाता नसावी असेच वाटते. महात्माजींच्या अनुयायात पं. नेहरू, वल्लभभाई यांच्यासारखे उत्तुंग व्यक्तिमत्वाचे, वजनदार नेते असूनही ते सारे महात्माजींच्या शब्दाबाहेर नसत. महात्माजींच्या निर्णयांचे पूर्णपणे आज्ञापालन केल्यामुळे व त्यांच्या एकछत्री कारभारामुळे महात्माजींना यशही मिळत गेले. त्यामुळे त्यांच्या शब्दाला एक तर्‍हेचा वजनही प्राप्त होत गेले. आज काँग्रेसमध्ये सोनिया गांधींच्या आणि शिवसेनेत बाळासाहेबांच्या शब्दाला ते स्थान आहे. अण्णांच्या शब्दांनाही तो मान मिळाला असता. पण का कुणास ठाऊक, तो मिळाला नाही किंवा त्यांनी तो वापरला नाही हेच खरे!

आज भारताला नेस्तनाबूत करण्यासाठी बाहेरच्या शत्रूची गरज नाही. बजबजलेल्या भ्रष्टाचारामुळे तो आतूनच पोखरला जात आहे. अशा वेळेला अण्णांनी हाती घेतलेले व्रत यशस्वी होणे फारच जरूरीचे आहे. नाही तर आणखी ४०-५० वर्षांत भारत परत एकदा गुलामगिरीता तरी जाईल किंवा त्याचे तुकडे पडून ते एकमेकांच्या उरावर बसतील. त्यामुळे अण्णांच्या आंदोलनाला यशाशिवाय दुसरा पर्यायच असू शकत नाही. इतके उदात्त व अतीशय निकडीचे ध्येय पुढे ठेवून सुरू केलेले आंदोलन असे कुणाच्याही अवसानघातामुळे असे मागे घेणे देशाला परवडणारेच नाही. या आंदोलनाला यशस्वी करण्याची जबाबदारी आपणा सर्वांवर आहे. अण्णांच्यावर आहे. त्यांच्या 'टीम अण्णा'तील सभासदांवर आहे. सर्व नेत्यांनी एकत्र बसून डावपेच आखून सध्याची भ्रष्ट व्यवस्था मोडून काढून तिथे स्वच्छ व्यवस्था स्थापणे व सध्याच्या भ्रष्ट सरकारला 'चले-जाव'चा महात्माजींचाच १९४२ सालचा आदेश देऊन त्यांना पिटाळून लावणे ही दोन उद्दिष्टे समोर ठेवून त्यात यश मिळविले पाहिजे. अन्यथा या देशाचे काही खरे नाही.

अण्णांना एक कळकळीची विनंती. कुणीही काहीही म्हणोत पण आपल्याला जे योग्य, उदात्त वाटते त्याच्यावर विश्वास ठेवून आंदोलन पुन्हा उभे करा.'

हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम्‌| तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः ॥' असे सांगून अर्जुनाला युद्धाला तयार करणार्‍या भगवान श्रीकृष्णाचेच शब्द आठवून आणि उद्दिष्ट सफल होईपर्यंत पाऊल मागे घेणार नाही हा दृढनिश्चयाने आंदोलन पुन्हा उभे करा. अण्णा, अंतिम विजय तुमचाच आहे कारण सत्य तुमच्याच बाजूला आहे! आणि शेवटी 'सत्यमेव जयते', सत्याचाच विजय होतो!