Saturday 10 September 2011

शांततेसाठी प्रयत्न करणे म्हणजे देशद्रोह होतो काय?

शांततेसाठी प्रयत्न करणे म्हणजे देशद्रोह होतो काय?
मूळ लेखक डॉन दैनिकाचे श्री. कामरान शफ़ी; अनुवाद: सुधीर काळे, जकार्ता, इंडोनिशिया
मूळ लेख http://www.dawn.com/2011/08/23/kudos-and-condemnation.html इथे वाचता येईल.
(हा लेख दिव्य मराठी या संस्थळावर सर्वात आधी प्रकाशित झाला. दुवा आहे http://tinyurl.com/5t4ggd4 किंवा http://divyamarathi.bhaskar.com/article/INT-international-india-pak-relation-2413471.html)
बदलत्या काळानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यात चांगले संबंध प्रस्तापित व्हावे, असे दोन्हीही देशांतील नागरिकांना वाटते. मात्र याला काही उजव्या विचारसारणींचा विरोध होत असतो. विशेषत पाकिस्तानातील मुलतत्त्ववादी विचारांच्या लोकांना भारताबाबत कायमच द्वेष वाटत आला आहे. पाकिस्तानात या लोकांचाच आतापर्यंत बोलबाला होता. आता काहीशी परिस्थिती सुधारत असली तरी काही गट आजही सक्रिय आहेत. मात्र पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना भारत-पाकिस्तान देश मित्रदेश व्हावे, असे वाटत आले आहे. त्यामुळे तेथील कडव्या विचारांच्या लोकांनी त्यांना देशद्रोही ठरविण्यापर्यंत मजल गेली आहे. त्याबाबतच ऊहापोह करणारा लेख कामरान शफी या स्तंभलेखकाने काराचीहून प्रसिद्ध होणार्‍या 'डॉन' या वृत्तपत्रात २३ ऑगस्ट रोजी लिहिला होता. त्या लेखावर आधारित हा लेख...)

गेल्या आठवड्यात एका भाषणात नवाज शरीफ यांनी पुन्हा एकदा भारताशी शांतीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याच्या धोरणाचे जोरदार समर्थन केले. त्यासाठी त्यांची खरंच मनापासून प्रशंसा केली पाहिजे. हे भाषण त्यांनी लाहोर येथे एका आयोजित केलेल्या ‘Building bridges in the subcontinent’ या विषयावरील एका परिसंवादात केले.
दुसर्‍या बाजूला झोंबणार्‍या मुलाखती घेण्याबद्दल प्रसिद्ध असलेल्या एका महिला पत्रकाराने खासगी चित्रवाणीच्या वाहिनीवरून एका लाल टोपी वापरणार्‍या गृहस्थाची (लेखात काही कारणास्तव नावे वापरली नाहीत) मुलाखत घेतली. सध्याचा पाकिस्तान आहे तसाच रहावा असे वाटणार्‍या लष्करशहा देशाचे (Deep State) समर्थन करणार्‍या या गृहस्थाची करावी तितकी निर्भत्सना कमीच पडेल. महिला पत्रकाराने घेतलेल्या या मुलाखतीत संबंधित संस्थेवर व नवाझ शरीफ यांच्यावर प्रहार करण्यात आला. हा परिसंवाद "South Asian Free Media Association (Safma)"या संस्थेने आयोजित केला होता. भारत-पाकिस्तान यांच्यात कायम चांगले संबंध रहावेत, असे वाटणाऱया व स्वता:चे सरकार असताना कायमच भारतापुढे मैत्रीचा हात पुढे करणार्‍या नवाज शरीफ यांच्यावर विशेष करून या गृहस्थानी त्या वाहिन्याच्या माध्यमातून चांगलेच तोंडसुख घेण्यात आले. कारण या गृहस्थाला संबंधित महिला पत्रकाराने एक प्रकारे एक्सपोजरच दिले.
मुलाखत घेणार्‍या या पत्रकारबाईंनी फक्त माजी पंतप्रधान शऱीफ यांचेच फक्त चारित्र्यहनन केले असे नाही, तर आजच्या राष्ट्राध्यक्षांवर म्हणजेच असिफ अली झरदारी यांच्यावरही तोंडसुख घेतले. कारण २००७ साली पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष झाल्याबरोबर झरदारी यांनी "भारत हा आपल्या देशाला असलेला मुख्य धोका नसून आपले खरे शत्रू देशांतर्गतच आहेत"असे उद्गार काढले होते. भारताशी शांतता प्रस्थापित करण्याची सूचना म्हणजे देशद्रोह आहे असेच पाकिस्तानातील काही मुलतत्त्ववादी गटाला कायम वाटत आले आहे. पाकिस्तानमध्ये लोकशाही आहे पण ती नावालाच आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आतापर्यंतच्या पाकिस्तानी लष्करशहांनी भारतासारख्या शेजारी राष्ट्राशी असलेल्या संबंधाबद्दल याबाबत वेगवेगळी भाष्ये केली आहेत. त्यामुळे शांततेसाठी पाऊल उचलणे हा जर देशद्रोह ठरत असेल, असे वाटणाऱयाचा कुणालाही संताप येईल.
कामरान शफी यांनी या परिसंवादाला उपस्थिती लावली. त्यांनी या परिसंवादतील शरीफ यांचे भाषण व्यवस्थित ऐकले. त्यानंतर त्यांनी अतियश आस्थापूर्ण, प्रामाणिक आणि अस्सल देशी विनोदाने नटलेला लेख लिहिला.
शरीफ यांचे भाषण ऐकून या परिसंवादात भाग घेणारे भारतीय सदस्य एकदम खूष झाले. शरीफ यांनी स्वत: अटल बिहारी वाजपेयींना लाहोरला बोलावून मीनार-इ-पाकिस्तान येथे दोन्ही देशांत शांतीपूर्ण आणि सलोख्याचे संबंध प्रस्थापित व्हावेत व त्यांच्यात समेट व्हावा म्हणून एक मैत्रीपूर्ण भाषण केले होते. दुर्दैवाने त्याचवेळी त्यांच्याच लष्करप्रमुखाने गुपचुपपणे कारगिलचे अविचारी आणि अक्कलशून्य दुस्साहस सुरू करून होऊ घातलेला सलोखा थांबला. खरे तर लष्करप्रमुखाने त्यांच्याच पंतप्रधानाच्या पाठीत सुरा खुपसला होता. शांतिपर्व सुरू करायला आलेल्या वाजपेयींच्या बाबतीतही थोडे फार फरकाने हेच झाले. मात्र नवाज शरीफ कायमच पुरोगामी विचार करत आले आहेत. ते चांगले जाणतात की, दोन्ही देशांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी पाकिस्तानला किंवा भारताला शांततेचा मार्ग धरल्याशिवाय आणि परस्पर मैत्रीचा हात पुढे करण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. या सर्व दृष्टीकोनातून या ठिकाणी नवाजसाहेबांनी हे भाषण देणे औचित्यपूर्णच होते. खरे तर असे भाषण करण्याचा हक्क फक्त नवाज शरीफनाच आहे. मैत्रीचा हात पुढे करुनही भारताला कारगिल युद्धाला सामोरे जावे लागले. त्याबाबत भारत सरकारने अनेक चौकशी-समित्यांतर्फे सखोल अभ्यास करण्यात आला. पण पाकिस्तानात मात्र "हा हल्ला का केला गेला"तसेच आपला पराभवा का झाला याबाबत एकही अधिकृत चौकशी करण्यात आलेली नाही.
त्यामुळे संबंधित महिला पत्रकाराने ज्या गृहस्थांची मुलाखत घेतली त्यांनी इतका आकांडतांडव करण्याची गरज खरंच होती काय?. भारत आणि पाकिस्तान पूर्वीची एक व काही कारणास्तव वेगळी झालेली सध्य स्थितीत शेजारी राष्ट्रे आहेत. या दोन देशांनी एकमेकांना सांभाळून घेतले पाहिजे असे म्हणण्यात नवाज शरीफ यांनी काय चूक केली? आपला धर्म आणि संस्कृतीही आपल्याला हेच तर शिकवतात!
भारतीय आणि पाकिस्तानी लोकांच्या संस्कृतीत खूप साम्य आहे, त्यांच्या खायच्या-प्यायच्या सवयीसुद्धा बर्‍याच सारख्या आहेत, या देशांच्यामधील सीमा म्हणजे केवळ जमीनीवरची एक रेषा आहे. भारताने आणि पाकिस्तानने युद्धात वापरायच्या शस्त्रास्त्रांबाबत स्पर्धा न करता ती उद्योग, व्यवसाय व व्यापार या क्षेत्रात करावी असे शरीफ कायमच म्हणत आले आहेत. खरंच आजच्या २१ शतकात व जागतिकीकरणाच्या वातावरणात त्यांची मते पारंपारिक ठरतात काय? "रब-उल-अलिमीन"चा अर्थ सर्व 'मनुष्यजातीचा देव' असा आहे. मात्र काही गट तो फक्त मुसलमानाचांच देव (रब-उल-मुस्लिमीन) आहे, असे म्हणतात. ते शरीफ मान्य करत नाहीत म्हणून त्यांना देशद्रोही किंवा धर्मविरोधी म्हणणे बरोबर आहे काय?.
त्या मुलाखतीत असा विषय घेण्यात आला की, भारत आणि पाकिस्तान यांच्यात काहीही साम्य नाही. याचे उदाहरण देताना त्यांनी "भारतीयांना जे पूजनीय आहे (गोमाता) तिचेच मांस पाकिस्तानी खातात' हा उल्लेख केला. खरे तर, त्यांनी तेवढाच विरोधभास दाखवला व इतर साम्य दाखविले नाही. कारण अशा विचाराच्या लोकांनी भारताला बर्‍याच वर्षात भेट दिलेली नसावी आणि भारतीय हिंदूंशी त्यांचा अलीकडे संबंध आलेला नसावा असे दिसते. कारण इतर साम्य त्यांना दिसत नसेल किंवा मुद्दामहून लक्षात घेत नसतील. काहीही असो.
पण मग मुलाखत घेणार्‍या पत्रकारबाईंनी किंवा त्यांच्या आक्रस्ताळी पाहुण्याने ( मुलाखात देणारे गृहस्थ) जे सांगितले ते त्यांचे स्वत:चे मत होते की, ते त्यांच्या 'बोलविता धन्याची' (लष्करशहांची) री ओढत होते?. हे लष्करशहा भारतला नेहमीच कट्टरशत्रू वाटत आला आहे. तसेच पाकिस्तानने भारताशी शांतीपूर्ण संबंध कधीही स्थापले जाऊ नयेत असेच वाटत आले आहे. त्यामुळे जो कुणी याविरुद्ध बोलेल, म्हणजे शांतीपूर्ण संबंध स्थापले पाहिजेत असे म्हणेल, त्याला देशद्रोह्याचे लेबल चिकटवले जाते. शरीफ यांच्याबाबतीत असेच घडले असे म्हणावे लागेल. कारण त्यांनीच नेहमीच शांततेसाठी प्रयत्न केले आहेत.
या लाल टोपीवाल्या पाहुण्याने आणि अन्वयार्थाने त्या वृत्तवाहिनीने सर्व सावधगिरीचे संकेत बाजूला सारून जाहीर केले 'SAFMA' ही संस्था 'रॉ' या भारतीय गुप्तहेर संघटनेच्या पैशावर चालते! तसेही येथील लष्करशहांना प्रत्येक घटनेमागे रॉ, मोसाद किंवा सीआयए आहे असे वाटते. काही पाकिस्तानातील अभ्यासकांना मात्र अशा पित्त्यांना आवरले पाहिजे, असे वाटते.
पाकिस्तानातील ५१ सन्मानित आणि वरिष्ठ पत्रकारांनी 'SAFMA' संस्थेवरील आरोप खेडून काढले आहेत. त्यानंतर 'SAFMA'ने ही या वाहिनीविरुद्ध, संबंधित महिला पत्रकारर आणि तिच्या चमूविरुद्ध, तसेच अशी माहिती देणाऱया/पुरविणार्‍या अभ्यासकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिलेली आहे.
या खोट्या आरोपांची निर्भत्सना करणार्‍या पत्रकारांच्या यादीत या लेखाचे लेखक शफी आपलेही नाव घालू इच्छितात. पण केवळ या चमूवर कायदेशीर कारवाई करणे पुरेसे नाही तर या कठपुतळ्यांना नाचविणार्‍या त्यांच्यामागच्या लष्करशहांविरुद्ध कारवाई करून त्यांचा चेहरा उघडा करायला हवा असे शफी यांना वाटते. ते म्हणतात, गैर मार्गाने हडप केल्या गेलेल्या सरकारी पैशावर पोसल्या जाणार्‍या बर्‍याच "कठपुतळ्या"अशी कृष्णकृत्ये करण्यात सामील आहेत. तिरस्कार किंवा हाडवैर निर्माण होईल असे खासकरून भारत, अमेरिका व इस्रायलविरुद्ध असले कार्यक्रम प्रक्षेपित करणे हे ही या कृष्णकृत्यात येते. इंटरनेटवरही अशा विचारांची खूप संकेतस्थळे तुम्हाला पाहायला मिळतील.
शफी आपल्या लेखात शेवटी म्हणतात, की सर्व राजकारण्य़ांनी (लोकशाहीवर विश्वास असलेल्या) एकजुटीने राहिले पाहिजे. तसेच काळी कृष्णकृत्ये करणार्‍या संस्थांशी एकत्र लढले पाहिजे. असे केले नाही तर या काळ्या शक्ती एकेकाला गाठून सार्वांचा विनाश करतील.

वाचकांचे विचार

SUDHIR KALE (AUTHOR) (Jakarta, Indonesia)
मंदार-जी,कांहींसा सहमत कांहींसा असहमत!पैसे कमावण्याचे पाकिस्तानला कधी माहीतच झाले नाहीं. सारे कसे खाटल्यावर बसवून दोन ’हरी’ देत होते, आधी अमेरिक व नंतर चीन! त्यामुळे स्वत:च्या पायावर कधी उभाच राहिला नाहीं हा देश. जोवर फुकटचे पैसे मिळत होते तोवर भारताकडे पहाताना एक गुरगूर होती. आता पैसे आटले, बरेचसे लष्कराने खाल्ले व शेवटी जनतेच्या माथी गरीबी आणि हाल-अपेष्टा आल्या.आता जेंव्हां ते भारताकडे पहातात तेंव्हां त्यांना वाटू लागले आहे कीं आपलं कांहीं तरी चुकलंय्. म्हणून आता मैत्रीची भाषा सुरू झाली आहे व तेंव्हांपासून भारताकडे पहायची दृष्टी बदलली.पण आपण त्याचे स्वागतच करावे कारण त्यापायी भांडण संपावे म्हणून.सध्याची मैत्रीची भाषा मनापासूनची असावी असे मला तरी वाटते.अर्थात् लष्कर आणि ISI यांना सुधारायला अजून अवकाश आहे. तोपर्यंत आमेन म्हणून त्या दिशेने तो देश सरकेल अशी आशा करायची व सावधगिरीने त्यांच्या प्रत्येक कृत्याकडे पहायचे.

MANDAR (Pune)
मला असे वाटते कि पाकिस्तान ने आधी आपली नैतिक जवाबदारी काय आहे ह्याचा शोध घ्यावा. पाकिस्तान हा मुळचा गरीब लोकांचा देश झालाय. बेरोजगारी आणि शिक्षणाचा अभाव ह्याच्या मुळे भारताबद्दल फालतू विरोध आहे. मग कोण काय खाते आणि कोण कुणाला मानते हे सगळे प्रश्न दुय्यम होतील. भारता बरोबर मैत्रीचे संबंध जास्ती करून पाकिस्तानला फायदेशीर आहेत. आम्हाला काय मिळेल तर डोक्याच्या त्रास कमी होईल. शेजार शांत असल्याने दोघेही भरभराट पावतील. आपण भांडू त्याचा त्रास उभय देशाना आहे, पण अमेरिका आणि चीन नावाचे "काळ" सोकावत आहेत त्याचे काय ?

SUDHIR KALE (AUTHOR) (Jakarta, Capital of Indonesia)
यामिनी मॅडम आणि सुदेश-जी,जरा तर्कसंगत विचार करायला हवा. गेले वर्षभर पकिस्तानातच "तेहरीक-ए-तालीबन पाकिस्तान" (TTP) या मूळ तालीबानच्या पाकिस्तानी शाखेने पाकिस्तानातच दहशतवादाचा हैदोस घातलेला आहे. (माझे "जकार्ता पोस्ट"ने प्रसिद्ध केलेले या विषयावरचे पत्र वाचा http://tinyurl.com/3g6pxnl या दुव्यावर). गेल्या दोन वर्षात ३००० माणसे या दहशतवादी हल्ल्यांमध्ये बळी पडली आहेत. सध्याच्या राष्ट्राध्यक्षांच्या दिवंगत पत्नी बेनझीर याही आतंकवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावल्या आहेत. तेंव्हां पाकिस्तानी सरकार, पाकिस्तानी जनता, पाकिस्तानी लष्कर, ISI आणि अतिरेकी लोक असा अक्षरश: पंचकोन (Pentagon) पाकिस्तानात तयार झाला आहे. पाकिस्तानी अतिरेकी भारतात जितका हैदोस घालत आहेत त्याच्या दुप्पटीपेक्षा जास्त ते स्वत:च्या देशात घालत आहेत. म्हणूनच नवाज शरीफ किंवा जरदारींच्या भावना मनापासून नाहींत, ते नक्राश्रू ढाळत आहेत, त्यांचे शांतीचे उद्गार मनापासूनचे नाहींत असे आरोप करणे बरोबर नाहीं असे मला वाटते. पहा पटते का!

YAMINI DODAKE (Pune)
सध्याच्या आपल्या देशातील परिस्थितीत कोणताही नेता कोणतीही सुधारणा करू शकेल, असे वाटत नाही. असेच बॉम्बस्फोट होत राहणार आणि लोक विनाकारण आपला जीव गमावत राहणार...

SUDESH KOHALI (Nanded)
एकीकडे पाकिस्तानमध्येच प्रशिक्षण घेऊन आलेले अतिरेकी इते हल्ले करताहेत आणि तिथले नेते मैत्रीपूर्ण नात्याबद्दल बोलताहेत. सगळचं खोटं आहे. सामान्यांची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे.

SANJANA SHINDE (Pune)
दिल्लीमध्ये कालच झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर वेगळा विचार करायला लावणार लेख... खूप धन्यवाद...

MILIND (Canada)
आतापर्यंत प्रत्येकच लष्करशहाने कायमच भारताविरुद्ध भूमिका घेतली आहे. नवाज शरीफ यांच्या मनात नक्की काय आहे, हे देवच जाणो...

SUDHIR KALE (AUTHOR) (Jakarta, Indonesia)
पूर्वी नवाज शरीफसुद्धा लष्कराचा "पुठ्ठा" होता व बेनझीरच्याविरुद्धची पहिली निवडणूक त्याने लष्करशहांच्या पाठिंब्यावर IJI (Islami Jamhoori Ittehad )या पक्षातर्फे लढविली होती. पण त्याच्या दुसर्‍या अधिकारकालात (Term)मध्ये त्याने लष्कराला चांगलेच धारेवर धरले होते. मुशर्रफचे विमान उतरू न देण्याची कृती धिटुकलेपणाची (जरा फाजीलच) असली तरी हुशारीयुक्त नव्हती व त्यामुळे त्यांचीच उचलबांगडी झाली. सौदीमधील ’वनवासपर्वा’ने त्यांना बरीच अक्कल शिकविली आहे असे त्यांच्या अलीकडील बोलण्यावरून वाटते. बघू शरीफसाहेब पुढे काय करतात ते?

SAVITA (India)
खूप सुंदर मांडले आहेत हे विचार. पण नवाझ शरीफ ना कारगिलची माहिती खरच नव्हती असे नाही वाटत. हे पूर्णपणाने मान्य केलेच पाहिजे की अगदी सगळे मुस्लीम सुद्धा लष्करशहांच्या बाजूचे असतील असे नाही. आपल्या राजकारणामधल्या सुप्त हेतूंसाठी भारतद्वेष हे तिथल्या राजकारण्यांचे एक हुकुमी अस्त्र आहे हे सरळच कळते आहे.

SHREYAS (Delhi)
Very nice article... Thanks..

RAJESH (Indore)
आर्टिकल खरंच खूपच छान लिहिलंय... प्रत्येकानेच याचा विचार केला पाहिजे.

AKSHARA (Solapur)
पाकिस्तानातील सत्ता नवाज शरीफ यांच्यासारख्या नेत्याच्या हाती असणे गरजेचे आहे. परंतु शरीफ यांनी तरी आपल्या कारकिर्दीत अतिरेकी कॅम्प नष्ट केले होते का ? कदाचित त्यांना ते शक्यही नव्हते... कारण पाक आर्मीत जिहादी मानसिकतेचे जवान अधिक आहेत. सत्ताधारी कोणीही असला तरी अतिरेकी निर्मिती थांबणे अवघडच वाटते. म्हणून काहीच पर्यंत नको असे नाही. द्वेषावर आधारित कोणतेही काम दीर्घकाळ करता येत नसते. पाक आर्मीतील धुरीनांनाही साबुद्धी येईल, यासाठी वाट पाहणेच आपल्या हातात आहे. पाकिस्तान्प्रती सहानुभूती बाळगले पाहिजे, अतिरेक्यांप्रती नव्हे हे आमच्या देशातील सरकला समजले पाहिजे. अफजल गुरु सारख्या अतिरेक्यांवर दया दाखविणे म्हणजे देश्द्रोहाला प्रोत्साहन.... इस्लामी कट्टरतेला प्रात्साहन आहे, हे सामून घेतले पाहिजे.

SANDESH PAWAR (Solapur)
लेखक शफी यांची तळमळ मनाला भावणारी आहे. परंतु पाकिस्तान फोफावलेल्या जिहादी शक्तींचा बंदोबस्त करणे आजच्या घडीला तरी खूपच कठीण आहे. धर्माच्या नावाखाली मध्ययुगीन संकल्पना बिम्बविल्याने पाकिस्तानात कट्टरवाद मूळ धरला आहे. द्वेषाच्या या आगीतून पाकिस्तानला त्यांच्या समजुतीतला देवच बाहेर काढू शकेल वाटते. समन्वयाचे विचार पाकिस्तानातील लोकांनी अंगिकारले आणि भारताशी असलेले वैर थांबविले तर भारत आणि पाकिस्तानची प्रगती आणि समृद्धी अशक्य नाही. पण हे कसे शक्य होणार ?

ABHAY JAWALE (Latur)
कामरान शफी यांच्या लेखावर आधारित असलेला हा लेख विचार करायला लावणारा आहे. नवाज शरीफ यांची तळमळ खरी आहे, हे पटते. पाकिस्तानातही शांतता हवी, युद्ध नको म्हणणाऱ्यांचा आवाज व्यक्त होऊ लागला आहे, हे चांगले लक्षण आहे.

RAVINDRA (Pune)
भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश खरंच मित्रदेश म्हणून वागू लागले, तर दहशतवादाचा निपटारा नक्की होऊ शकेल. लेखाचा अनुवाद खूपच सुरेख केला आहे.

JAIRAM DESHPANDE (Mumbai)
नवाज शरीफ हे जरी वरवर भारत प्रेमाबद्दल बोलत असले तरी त्यांचा अंतस्थ हेतू काय आहे, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे.

SHAFIQ (Aurangabad)
लेखाचा अनुवाद खूपच छान केलाय. खरंच संपूर्ण जगाच्या भल्यासाठी हे घडायला हवंच.

No comments:

Post a Comment