Thursday 11 August 2011

इंडोनेशियन भाषेवरील गीर्वाणवाणीची छाप

लेखक व संकलक - सुधीर काळे, जकार्ता
हा लेख ’ई-सकाळ’च्या "पैलतीर" या सदरात प्रसिद्ध झाला आहे. वाचकांच्या प्रतिक्रियाही वाचण्यासारख्या आहेत. दुवा आहे: http://www.esakal.com/esakal/20110615/5124682573298412566.htm
मी जेव्हा इंडोनेशियाला पहिल्यांदा आलो तेव्हा येथील संस्कृतीवरील हिंदू धर्माची छाप व त्यांच्या भाषेतली (या भाषेला Bahasa Indonesia म्हणतात. इथेही Bahasa हा शब्द 'भाषा'वरूनच आला आहे). संस्कृत भाषेतील शब्दांची रेलचेल पाहून थक्क झालो. आपल्या पूर्वजांनी प्रवासाच्या आजच्यासारख्या सोयी नसतानाही इतक्या दूर प्रवास करून, इथे प्रथम बौद्ध धर्मावर (श्रीविजय) आधारित आणि त्यानंतर हिंदू धर्मावर (मोजोपाहित) आधारित साम्राज्ये स्थापली व पुढे इथल्या बहुसंख्य लोकांनी मुस्लिम धर्म स्वीकारल्यानंतरही हिंदू धर्माची छाप आजही इथे-विशेषतः मध्य व पूर्व जावा भागात-दिसून येते. आजही इथले मुस्लिम लोक रामायण-महाभारतावर आधारित नाटके, एकांकिका सादर करतात. आजही आपल्याला विष्णू (Wisnu) हे नाव असलेले मुस्लिम लोक भेटतात. घटोत्कच (गटोट) तर एकदम लोकप्रिय! अर्जुन, भीम (Bima), धर्म (Dharma), लक्ष्मण (इथे या शब्दाला एक नावाव्यतिरिक्त एक आणखीही अर्थ आहे, तो म्हणजे दर्यासारंग-Admiral!), सीता इथे सिता म्हणून वावरते, श्री (Sri) हे नाव आजही तुफान लोकप्रिय आहे व ५-१० टक्के मुलींचे नाव 'श्री' असते.

आता इंडोनेशियन भाषेतील संस्कृत शब्दांकडे वळू या. असे मी वाचले आहे, कीं इंडोनेशियन भाषेने जवळ-जवळ २० टक्के शब्द संस्कृत भाषेतून घेतले आहेत. आता खाली मी मला आतापर्यंत वापरून माहीत झालेले शब्द दिले आहेत. वापरायला आणि शोधायला सोपे जावे म्हणून त्यांची मुळाक्षरांनुसार (alphabetical order) रचना केली आहेत. यापुढे आणखी शब्द आठवतील तसे वेळोवेळी घालेन व ते ठळक अक्षरात असतील.


ही माहिती इथल्या वाचकांना आवडेल अशी आशा आहे.
Acar (आचार) - लोणचे
Angkasa अंकसा - अवकाश [Outer space]
Anugerah, Nugraha (अनुगरा, नुग्राहा) - अनुग्रह
Arjuna (अर्जुना) - अर्जुन, महाभारतातील नांव
Arti (आर्ती) - अर्थ या शब्दावरून आलेल्या या शब्दाचा अर्थ तोच आहे meaning (आपा अर्तिन्या? म्हणजे What does it mean?)
Aryaduta (आर्यादूता) खाली ’Duta’ पहा. या नावाचे हॉटेल जकार्तात आहे
Atau (आताउ) - अथवा
Bagi (बागी) भागणे
Bahagia (बहागिया) - 'भाग्य'वरून आलेला शब्द. पण अर्थ आहे 'आनंदी'!
Bahagiawan-भाग्यवान
Bahasa (बाहासा) - भाषा
Bahaya (बाहाया) - 'भय'वरून आलेल्या या शब्दाचा अर्थ तोच! भय, धोका!
Bahayangkara (बायांकारा) - भयंकर या शब्दावरून आलेल्या या शब्दाचा अर्थ मात्र आहे पोलिस. आहे ना सार्थ शब्द?
Bahu (बाहू) - बाहूवरून आलेल्या या शब्दाचा अर्थ मात्र खांदा!
Bangsa (बांग्सा) - हा शब्द वंश या शब्दावरून आला असावा. अर्थ आहे Nationpeople, race! पण खाली दिलेले negara व negeri हे शब्दही पाहा
Bapak (बापा) - शेवटच्या 'क'चा उच्चार करत नाहींत. बाप, वडील पण जास्त करून वडिलांसाठी आया (ayah) हा शब्द वापरला जातो. bapak जास्त करून आदरार्थी 'श्रीयुत' म्हणून वापरतात
Barat (बारात) - भारत या शब्दावरून आलेल्या या शब्दाचा अर्थ आहे पश्चिम
Basmi (बास्मी) नायनाट करणे (उंदीर, डांस वगैरे). एखाद्या रोगाचे निर्मूलन करणे, एखादी गोष्ट जाळून भस्म करणे ’भस्म’वरून आलेला शब्द
Biaya (बिआया/बियाया) - व्यय खर्च cost
Bijaksana (बिजाक्साना) Wise, farsighted, prudent, tactful, discreet kebijaksanaaan - कबिजक्सनाआन - wisdom, prudence
Biji (बिजी) Seed बीज, अंडाशय
Biksu (बिक्सू), Biksuni (बिक्सूनी) - भिक्षू, बौद्ध भिक्षू, बौद्ध भिक्षुणी (का भिक्षुईण, nun)
Bima (बीमा) - महाभारतातील नाव. डॉ. वर्तक यांनी लिहिलेले भीम हा अतिशय बांधेसूद व चपळ पुरुष होता, असे प्रतिपादन करणारे एक पुस्तक माझ्या वाचनात आलेले असले, तरी आपल्या डोळ्यासमोर भीमाची प्रतिमा एका स्थूल पुरुषाची असते. इंडोनेशियात मात्र तो एक चपळ पुरुष मानला जातो व इथल्या डेक्कन क्वीनला Bima Express म्हणतात
Bisa (बिसा) Poison (It also means 'can'; saya bisa lihat: I can see)
Buana (बुआना) - 'भुवन'वरून आलेल्या या शब्दाचा अर्थ घर नव्हे पण जग, त्रिभुवन!
Budi (बुदी) - बुद्धी या शब्दावरून आलेल्या या शब्दाचा अर्थ मात्र 'विचार' असा आहे! पण बुदीमान म्हणजे मात्र बुद्धीवान (wise, prudent, sensible)
Bupati (बूपाती) - 'भूपती'वरून आलेला शब्द. अर्थ आहे जिल्हाधिकारी, District collector
Busana (बुसाना) 'भूषण'वरून आलेल्या या शब्दाचा अर्थ आहे कपडे, दागिने
Candra (चांद्रा) - चंद्र. खूप पुरुषांचे नाव Candra/Condro असते
Candrasangkala (चांद्रासांगकाला) Lunar calendar सांग हा शब्द आदरार्थी वापरतात. उदा. 'सांग द्विवर्ना' हा शब्द दुरंगी राष्ट्रध्वजासाठी वापरतात
Catur (चातुर) - चतुर? अर्थ आहे ’बुद्धिबळ’
Cempaka - (चंपका) - चाफा
Cenderamata - चंदरामाता Souvenir (शब्दशः अर्थ चंद्राचे नेत्र!)
Cenderawasih - (चंदरावासी) Bird of paradise
Cerita (चरिता) - 'चरित्र'वरून आलेल्या या शब्दाचा अर्थही तोच आहे. story, narrative, account of an event
Cinta (चिंता) - चिंता या शब्दावरून आलेल्या या शब्दाचा अर्थ मात्र प्रेम असा आहे. चिंता सायांग म्हणजे love and affection
Cita (चिता) - feelings
Citra (चित्रा) - चित्र, image
Dada (डाडा) - बहुदा ’धड’ या शब्दावरून आला असावा. अर्थ आहे 'छाती'
Desa (देसा) - आलाय देश या शब्दावरून, पण अर्थ खेडे!
Deva (देवा) - देव
Dharma (धार्मा) - महाभारतातील नांव (शिवाय duty, obligation, service, good deed पुण्य but not exactly religion)
Dhupa (धूपा) - धूप म्हणजे अगरबत्ती!
Dosa (दोसा ) - ’दोष’ वरून आलेला शब्द, पण बहासा इंडोनेशियात अर्थ आहे ’पाप-sin'
Duka (दुका) - दु:ख
Dukacita (दुकाचिता): दु:खचित्त profound sorrow
Duta (दूता) - दूत, राजदूत, ambassador - दूता बसार (मोठा दूत) Kedutaan (कदूताआन) म्हणजे Embassy
Dwi (द्वी) - द्वी. द्वीवार्ना म्हणजे इंडोनेशियाचा लाल-पांढरा द्विरंगी झेंडा (सांग द्वीवार्ना)
Gada (गादा) गदा
Gajah (गाजा) - गज, हत्ती
Gapura (गापूरा) - गोपूर
Garuda (गारुडा) - गरुड. गंमत म्हणजे भारताला आपल्या अधिकृत एअरलाईनचे नाव 'गरुड' असे ठेवायची हिंमत झाली नाहीं, पण इंडोनेशियाच्या अधिकृत एअरलाईनचे नाव आहे Garuda Indonesian Airways!
Guna (गुना) - गुण, उपयोग (आपा गुना न्या-त्याचा काय उपयोग?), गुनावान हे नाव 'तुफान' लोकप्रिय आहे!
Guru (गुरू) तोच अर्थ!
Gatot गटोट - घटोत्कच. महाभारतातील तुफान लोकप्रिय नांव
Indra (इंद्रा) इंद्र (हे नावही खूप लोकप्रिय आहे)
Isteri (इस्तरी) - स्त्रीवरून आलेल्या या शब्दाचा अर्थ आहे पत्नी. स्त्रीला 'परंपुआन (perempuan) असा वेगळा शब्द आहे. puan (पुआन) म्हणजे 'बाईसाहेब' असा आदरार्थी शब्द
Jaya (जाया) - अर्थ आहे ’की जय’! 'इंडोनेशिया जाया' म्हणजे 'इंडोनेशियाकी जय'! १५२७ साली पोर्तुगिजांचा पराभव करून त्यांना त्यांच्या आरमारासह 'कलापा सुंडा' या बंदरामार्फत हाकलून दिल्यानंतर आमच्या शहराचे 'जयाकार्ता' असे पुनर्नामकरण करण्यात आले त्याचा अपभ्रंश होऊन त्याचे जकार्ता झाले
Jelma - (जल्मा) Incarnation/जन्म, creation, transformation, assume a form
Jelamber (जलांबर)
Jiwa (जीवा) - जीव या शब्दावरून आलेल्या या शब्दाचा अर्थ मात्र आत्मा किंवा लोकसंख्या 'बरापा जीवा' म्हणजे किती (सजीव) लोक!
Kaca (काचा) कांच
Kala (काला) Time, Era, Period
Kelahi (कलाही) भांडण. हा शब्द 'कलह' या संस्कृत शब्दावरून आलेला आहे
Kalpataru (काल्पातारू) - कल्पतरू, अर्थ तोच
Karena (कारना) अर्थ 'कारण' मी उशीरा आलो Karena गाडी लेट आली
Karunia (कारुनिया) - कारुण्य या शब्दावरून आलेल्या या शब्दाचा अर्थ मात्र ’बक्षीस, भेटवस्तू’ असा खूप वेगळा आहे!
Karyawan/wati (कार्यावान.वाती) - कार्यवान/वती, कामगार
Kepala: (कपाला) कपाळ, डोकं. एकाद्या खात्याचा प्रमुख असतो kepala bagian
Kirana (किराना) किरण
Kota कोटा म्हणजे शहर (कोट हा संस्कृत शब्द आहे का?)
Kusuma (कुसुमा): कुसुम, फूल
Laba (लाबा) Profit, benefit, gain ’लाभ’वरून आलेला शब्द.
Laksamana (लाक्सामाना): लक्ष्मण पण दर्यासारंग (Admiral) या अर्थाने जास्त वापरतात.
Laksana (लाक्साना): लक्षण, पण अर्थ आहे जरासा तिरकस quality, characteristic, किंवा 'सारखा' (like, resembling)
Maha esa (महा एसा) हा शब्द बहुदा महेश वरून आलेला आहे. अर्थही सर्वश्रेष्ठ असाच आहे. साधारणपणे 'अल्ला' (देव) ला तुहान यांग (जो) महा एसा म्हणतात
Malas (मालास) - Lazy, not inclined to do something 'आळस' वरून आला असावा!
Mega (मेगा) - मेघ, इंडोनेशियाच्या भूतपूर्व राष्ट्राध्यक्षेचं नांव आहे 'मेगावाती सुकार्नोपुत्री'
Mentri मंत्री
Mulia (मुलिया) - मूल्य या शब्दावरून आलेल्या या शब्दाचा अर्थ मात्र आहे थोर, उच्च कुळातला nobleman थोडक्यात ’मौल्यवान’
Nada (नादा) - Intonation, tone, note, pitch of sound/voice
Nadi (नाडी) - नाडी, pulse, artery (पायजम्यातल्या नाडीला मात्र 'ताली-Tali' म्हणतात)
Nama (नामा) - तोच अर्थ
Negara (नगारा) - देश तामू नगारा=शाही पाहुणा (state guest)
Negarawan (नगारावान) - Statesman
Negeri (नगरी) - country, land, village
Neraka (नराका) - नरक
Paduka पादुका पण अर्थ आहे Excellency. साधारणपणे ’श्रीपादुका’ (His Excellency)म्हणतात
Panca (पांचा) - पंच, पाच
Paramaisuri - (परामाईसुरी) - त्रैलोक्यसुंदरी
Paripurna पारिपुर्ना (अर्थ जवळ-जवळ तोच आहे. 'संपूर्ण'. पण विशेषकरून राष्ट्रपती आपल्या अभिभाषणाच्यावेळी जेंव्हा लोकसभा व राज्यसभा यांच्या एकत्र सत्राला (Joint session of the House) संबोधित करतात अशावेळी हा शब्द खासकरून वापरला जातो
Pekaja (पकाजा) Lotus ’पंकज’वरून आलेला शब्द
Pendeta (पंडेता) - पुरोहित, भटजी
Perdana Menteri (परदाना) - प्रधानमंत्री
Peristiwa- (परिस्तिवा) incident, phenomenon , ’परिस्थिती’वरून आलेला शब्द!
Perkara (परकारा) matter, Lawsuit 'प्रकार'वरून आलेला शब्द
Pertama (परतामा) - प्रथम अर्थ तोच. Pertama-tama (परतामातामा)-सर्वात आधी, at the outset
Pidana - Criminal, punishment 'पीडा'वरून आलेला शब्द
Prambanan (प्रंबानान) परब्रह्म. या नावाचे हिंदू देव-देवतांचे प्रसिद्ध देऊळ जोगजकार्ताजवळ आहे
Prasaran (प्रासारान) Introductory 'प्रस्तावना'वरून आला असावा!
Prasarana (प्रासाराना) Preparatory Work, infrastructure
Puasa (पुआसा) - उपवास. रमजान महिन्याला 'बुलान पुआसा' म्हणतात
Pucat (पुचाट) - (अक्षरशः) भीतीमुळे वा आजारपणामुळे म्लानता आलेला, पांढराफटक पडलेला चेहरा!
Purbakala (पुर्बाकाला) - पूर्वकाल अर्थ तोच
Purna, पूर्ण झालेला Purnayudha म्हणजे सेवानिवृत्त सेनाधिकारी
Putra/i (पुत्रा-पुत्री) - पुत्र-पुत्री. या शब्दांचा अर्थ राजपुत्र/राजकन्या असा होतो. म्हणून दुसर्‍यांच्या मुलांबद्दल चौकशी करताना हा शब्द आवर्जून वापरतात
Rahasia (राहासिया) - रहस्य, mystery किंवा confidential या दोन्ही अर्थाने वापरतात
Rajah/Maharajah - अर्थ व उच्चार तोच
Raksasa (राक्सासा) - राक्षस किंवा (आकाराने) प्रचंड
Rama (रामा) राम (प्रभू रामचंद्र)
Rasa (रासा) - रस या शब्दावरून आलेल्या या शब्दाचा अर्थ मात्र -फक्त चवच नाहीं तर भावनासुद्धा-रासा सायांग-प्रेमभावना! 'saya rasa' म्हणजे I feel)
Rupa (रूपा) - रूप या शब्दावरून आलेल्या या शब्दाचा अर्थ मात्र सौंदर्य नव्हे तर form, shape, sort, kind! सरूपा म्हणजे एकासारखा/खी. पण रूपावान म्हणजे सुंदर, पण सुंदारी हा शब्द फक्त स्त्रियांसाठी वापरतात जणू सुंदर पुरुष नसतातच. खरं तर इंडोनेशियात सुरेख दिसणारे पुरुष तूलनेने कमीच आहेत!
Rupiah (रुपिया) - इंडोनेशियाचे चलनसुद्धा 'रुपिया Rp.' (not Rs)
Sahaja (साहाजा) Simple, natural, on purpose 'सहज'वरून आलेला शब्द
Samudera (सामुदरा) Ocean, Sea,
Sangka (सांका) शंका, suspicion (Tersangka: suspect, Prasangka: Prejudice)
Santai (सांताई) Relaxed 'शांत'वरून आलेला शब्द.
Sastra (सास्त्रा) शास्त्र, अर्थ आहे books, literature
Sastrawan/Sastrawati (सास्त्रावान/सास्त्रावाती) - Man/woman of letters शास्त्रीजी किंवा शास्त्रीणबाई
Saudara/ri (सौदारा/री) - 'सहोदर'वरून आलेला शब्द, पण अर्थ नातेवाईक. पण सौदारा सकांडुंग - एका गर्भाशयाचे म्हणजेच सख्खा भाऊ/बहीण (कांडुंग - गर्भाशय)
Sederhana (सदरहाना) 'साधारण'वरून आलेला शब्द. Simple, plain, unpretentious या नावाची उडपी टाईपच्या हॉटेल्सची चेन आहे. ही हॉटेले 'साधारण'च असतात.
Sedia (सडिया) तय्यार! Ready साधारणपणे भेळपुरी प्रकाराच्या खाण्याच्या गाड्यांवर हा शब्द हायला मिळतो. ’सध्या’वरून आलेला असणार
Segera (सगरा) - शीघ्र अर्थ तोच
Sempurna (संपुर्ना) - संपूर्ण, पूर्ण अर्थ तोच
Sendi (संदी) - सांधे, hinge
Senggama (संगामा) - संगम या शब्दावरून आलेला हा शब्द मात्र फक्त शरीरसंगमासाठी किंवा संभोग या अर्थानेच वापरतात
Sentosa (संतोसा) - संतोषवरून आलेल्या या शब्दाचा अर्थ मात्र आहे शांती, peaceful, tranquil सिंगापूरचे संतोसा बेट कांहींनी पाहिले असेल!
Serapah (सरापा) - श्राप, शाप (तोच अर्थ)
Serasi (सरासी) - सराशी एका राशीचे. Harmonious, matching, compatible
Setia (सतिया): सत्य पण अर्थ मात्र loyal. Setia kawan = निष्ठावान मित्र, setiabudi (सतियाबुदी, सत्यबुद्धी)=निष्ठायुक्त विचार असणारा! budi म्हणजे बुद्धी नसून 'विचार'
Singga (सिंगा) सिंह
Sinta (सिंता) (रामाची) सीता
Sisa (सीसा) शेष, शिल्लक),
Surakarta (सुराकार्ता Solo) - जावा बेटाची सांस्कृतिक राजधानी सोलो या शहराचे नाव सुराकार्ता (देवांचे शहर) याचा अपभ्रंश आहे
Sopan (सोपान) - सोपान सज्जन, well-behaved, well-mannered
Sri (or Seri) - श्री. अर्थ आहे 'राणीसाहेबा' असे संबोधन! (खाली पाहा पादुका, स्रीपादुका) Honorific royal title, shining splendour. ५ ते १० टक्के मुलींचे नाव श्री असते
Srikandi (स्रीकांडी) - कदाचित् शिखंडीवरून आलेला असेल, कारण अर्जुनाची बायको व नायिका (heroine) असे दोन अर्थ आहेत
Suami (सुआमी) - स्वामी, नवरा,
Subroto (सुब्रोतो) - सुव्रत. हे नांवही खूप लोकप्रिय आहे.
Suci, Buku Suci (सुची) - शुची. कुराण या पवित्र ग्रंथाला 'बुकु सुचि' (Holy book) म्हणतात
Suka (सुका) सुख या शब्दावरून आलेल्या या शब्दाचा अर्थ सुख असा तर आहेच पण आवडणे असाही आहे. पण सुकाआन (sukaan) म्हणजे प्रिये, प्रियतमे असा आहे (sweetheart, darling)!
Surga (सुर्गा) - स्वर्ग
Surgawi (सुर्गावी) - स्वर्गीय
Surga dunia (सुर्गादुनिया) - भूलोकीचा स्वर्ग
Susila/lo (सुसीला/लो) - सुशील अर्थ तोच! इंडोनेशियाच्या सध्याच्या राष्ट्राध्यक्षांचे नाव आहे सुसीलो बंबांग युधोयोनो, म्हणजे तीनातले दोन शब्द संस्कृत!
Sutra (सूत्रा) - सूत्र, पण अर्थ आहे रेशीम (silk)
Suwarna (सुवार्ना) - सुवर्ण, अर्थ तोच
Tapa (तापा) - तप, अर्थ तोच. (Bertapa=तपश्चर्या करणे)
Teruna, taruni (तरुना, तारुनी) - तरुण-तरुणी, पण खास करून लष्करी 'कॅडेटस'साठी वापरत्तत. आपण जवान म्हणतो तसेच
Telaga (तलागा) - तलाव (कदाचित तमिळ भाषेवरून)
Tembaga (तंबागा) - तांबे
Tetapi/Tapi (ततापी/तापी) - अर्थ तोच! तथापी, परंतू
Tirta (तिर्ता) पाणी
Tirta Amerta तिर्ता अमर्ता ('अमृत'वरून आलेला शब्द)
Tirta Kencana (तिर्ता कंचाना) सुवर्णजल
Tri (त्री) - त्रि. इथे चक्क त्रिसाक्ती-त्रिशक्ति नावाचे विद्यापीठ आहे व १९९८ मध्ये सुहार्तोसाहेबांना खाली उतरवायला इथल्या घटनाच कारणीभूत झाल्या
Ujar (उजार) - उच्चारणे (To state, to say)
Umpama (उंपामा) - उपमा (उंपामान्या म्हणजे उदाहरणार्थ)
Upaya (उपाया) - उपाय या शब्दावरून आलेल्या या शब्दाचा अर्थ मात्र प्रयत्न, साधने असा आहे. याला काय उपाय (solution) असा नाहीं
Usia (उसिया) - आयुष्य या शब्दावरून आलेल्या या शब्दाचा अर्थ मात्र वय. tutup usiya म्हणजे आयुष्य बंद करणे म्हणजे मृत्यू
Wahana (वाहाना) Vehicle, Vehicle for conveying thoughts ('वाहन'वरून आलेला शब्द)
Wanita (वानिता) - वनिता, स्त्री
Warna (वार्ना) - वर्ण, रंग.
Pancawarna - पंचरंगी, पंचवर्णी
Wibava, Wibowo (विबावा, विबोवो) - वैभववरून आलेला असावा, पण अर्थ मात्र Authority, power
Wibisono (विबीसोनो) - (बिभीषण इथल्या पुरुषांचे नाव असते)
Wicoksono (विचोक्सोनो) - हेही इथल्या पुरुषांचे नाव असते
Widya (विदिया) - विद्या
Widyakarya (विदियाकार्या) - विद्याकार्य, University-level work study
Widyawisata (विदियाविसाता) - विद्याविसाता, Study tour
Wijaya, Widjaja, Widjojo (विजाया, विजोयो) - विजय. बर्‍याचदा एकाद्या नावाचे शेपूट म्हणून येते. Wijojo Nitisastro (नीतिशास्त्र) was a very eminent economist of Indonesia. (इथले धनंजयराव गाडगीळ!)
Wira (वीरा) - वीर. अर्थ तोच
Wisnu विष्णू. देवाचे नाव. या नावाची वयस्क मुस्लिम मंडळीही भेटतात
Yudha (युधा) - युद्ध, अर्थ तोच war. महाभारताला इथे 'भारातायुधा' असेही म्हणतात'पुर्नायुधा' म्हणजे निवृत्त सेनाधिकारी/सैनिक, veteran
Samudera (समुदरा) - समुद्र!

उर्दू शब्दही खूप आहेत, कदाचित अरबी किंवा फारसी शब्दावरून आले असतील: प्याला (पियाला-चषक पियाला दुनिया-World Cup), मेजा टेबल, कुर्सी-खुर्ची, पण यावर एक वेगळा लेखच होईल.

No comments:

Post a Comment