Monday 13 June 2011

बिन लादेननंतर बिघडले अमेरिका-पाक संबंध

बिन लादेननंतर बिघडले अमेरिका-पाक संबंध
सुधीर काळे, जकार्ता (sbkay@hotmail.com)
Monday, May 16, 2011 AT 02:00 AM (IST)
Tags: pailteer, sudhir kale, osama bin laden , pakistan , america

१ मे २०११ रोजी (आपला २ मे) अखेरीस ओसामा बिन लादेनला ठार करण्यात अमेरिकेला यश मिळाले. पण या घटनेमुळे पाकिस्तानच्या अमेरिकेबरोबरच्या दगाबाज वागणुकीवरील आणि विश्वासार्हतेवरील (खोट्या) रहस्याचा 'बुरखा’ शेवटी उचलला गेला, ही एक चांगली घटना घडली!
मागे एका लेखात लिहिल्याप्रमाणे अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कधीच परस्पर-विश्वासाच्या किंवा परस्परांबद्दलच्या आदरभावनेच्या पायावर कधीच आधारलेले नव्हते, तर तो फक्त 'सोयीसाठी लावलेला म्होतूर'च होता! पाकिस्तानी दुतोंडीपणा केवळ अमेरिका किंवा भारताबरोबरच्या संबंधाबाबतच होता, असे नाहीं तर तो त्यांच्या स्वतःच्या प्रजेबरोबरच्या बाबतीतही होता. याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे पाकिस्तानचे पंतप्रधान युसुफ राजा गिलानी यांचे 'ड्रोन' विमानांच्या वझिरीस्तानमधील हल्ल्यांबाबतचे अलीकडचे विधान! पाकिस्तानच्या राष्ट्रीय संसदेत सभासदांनी उठवलेल्या गदारोळाला उत्तर देताना त्यांनी 'आम्ही अमेरिकेला हे हल्ले बंद करायला ठणकावून सांगितले आहे', असे विधान केले. पण दुसर्‍या बाजूला अमेरिकेच्या राजकीय नेत्यांना व मुत्सद्द्यांना सांगितले, की ती फक्त 'बोलाचीच कढी' असून, प्रत्यक्षात ते अशी बंदी घालणार नाहींत. 'द्रोणाचार्यां'चे (ड्रोनला मी तर द्रोणाचार्यच म्हणतो) हल्ले त्यांनी चालूच ठेवावे.
पाकिस्तानचा हा दुटप्पीपणा अनेक वर्षांपासून सुरू आहे. 'न्यूक्लियर डिसेप्शन' या पुस्तकात लेखकद्वय लेव्ही आणि स्कॉट-क्लार्क यांनी याची अनेक उदाहरणे दिलेली आहेत. (हे पुस्तक प्रत्येक अमेरिकन, पाकिस्तानी आणि भारतीय नागरिकाने जरूर वाचावे) अगदी अयूब खान हे अध्यक्ष आणि झुल्फिकार अली भुट्टो परराष्ट्रमंत्री असताना (ते पुढे पंतप्रधानही झाले) पाकिस्तानने अमेरिकेची दोस्ती चालू असतानाच चीनशीही चुंबा-चुंबी चालू केली होती. पाकिस्तानने त्यावेळी सीटो (SEATO) आणि सेंटो (CENTO) या लष्करी संघटनांचे सभासदत्व स्वीकारलेले होते. असे असूनही अमेरिकेची पाकिस्तानशी असलेली मैत्री ’जिवश्चकंठश्च’ अशी कधीच नव्हती. त्याचे कारणही पाकच्या दुटप्पीपणाबद्दल अमेरिकेला असलेला संशय हेच होते. भारताने सुरुवातीपासूनच कुणाच्याही लष्करी संघटनेचे सभासदत्व घ्यायचे नाही, असेच ठरविले होते. ना अमेरिकेचे, ना सोवियत संघराज्याचे. त्यामुळे भारताबरोबरच्या संबंधाबाबत अमेरिका नेहमीच बुचकळ्यात पडलेली असायची. कारण भारत धड त्यांच्या कळपातही जात नव्हता आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याइतका नगण्यही नव्हता! याचा परिणाम अमेरिकेच्या पाकिस्तानच्या मैत्रीवर होणे स्वाभाविकच होते व तसेच झाले. भारताविरुद्धच्या युद्धात वापरण्यासाठी लागणारी शस्त्रास्त्रे व दारूगोळा मिळविण्यासाठी पाकिस्तानला अमेरिकेशी मैत्री हवी होती. पण अमेरिका पाकिस्तानला लष्करी आणि आर्थिक मदत देत होती ती साम्यवाद्यांशी (communism) लढण्यासाठी. त्यामुळे ही शस्त्रास्त्रे भारताविरुद्ध वापरायला अमेरिकेची बंदी असायची. अशा तर्‍हेने या मैत्रीत सुरुवातीपासूनच दोघांची तोंडे दोन दिशांना होती! आणि काळाबरोबर या दोन देशांमधील तणाव वाढतच गेला होता.
१९७१ मध्ये बांगलादेशच्या निर्मितीच्या युद्धातील लाजिरवाणा पराभव पाकिस्तानला जिव्हारी लागला होता. या युद्धात झालेल्या पराभवाबद्दल पाकिस्तानने अमेरिकेला योग्य वेळी मदत न केल्यामुळे जबाबदार धरले. (तसे पाहता या युद्धात चीननेही पाकिस्तानला मदत केली नव्हती) इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारताने हे युद्ध इतक्या झटपट आणि निर्णायपणे संपविले, कीं कुणालाही विचार किंवा कृती करायला वेळच मिळाला नाहीं. पण या पराभवामुळे अमेरिका व पाकिस्तान यांच्यातल्या मैत्रीत एक पाचर ठोकली गेली. ती पाचर आजही या दोन देशांतील संबंधांना एका ठराविक पातळीपेक्षा जास्त जवळ येऊ देत नाहीं!
भारताने १९७४ मध्ये 'पोखरण-१'ची आण्विक चाचणी केली. त्यामुळे पाकिस्तानला आणि विशेषतः भुट्टो यांना-धक्काच बसला! त्यांनी लगेच अमेरिकेकडे धाव घेतली आणि भारतीय अण्वस्त्रांपासून संरक्षण मिळावे अशी गळ घातली. पण आपल्या शत्रुत्वाला भिऊन म्हणा किंवा आपल्याशी त्यावेळी शत्रुत्व पत्करायची अमेरिकेची तयारी नव्हती म्हणून म्हणा, अमेरिकेने पाकिस्तानची ही विनंती मान्य केली नाहीं. हेन्री किसिंजर यांनी 'भारताने आण्विक चाचणी घेतली, ही वस्तुस्थिती पाकिस्तानने 'fait accomplished' म्हणून स्वीकारावी असा मानभावी सल्ला दिला. त्यावर भुट्टों म्हणाले, कीं भारताने अणुबाँब बनविला, तर आम्ही (पाकिस्तानी जनता) पाने-गवत खाऊ, भुकेले राहू पण आम्हीही आमचा अणुबाँब बनवूच. आमच्यापुढे दुसरा कुठलाही पर्याय नाहीं. भारताच्या अण्वस्त्राला आमचेही अण्वस्त्रानेच उत्तर असेल'. (If India builds the bomb, we will eat grass or leaves, even go hungry, but we will get one of our own. We have no alternative ...atom bomb for atom bomb).
यापुढे अमेरिकेवर विसंबणे बरोबर नाही, म्हणून भुट्टो यांनी चीनशी दृढ संबंध प्रस्थापित केले. पाकिस्तानच्या अण्वस्त्रनिर्मितीमध्ये चीनचा मोठाच सहभाग होता! डॉ. खान यांनी विघटनशील समृद्ध युरेनियम युरोप व अमेरिकेच्या साह्याने बनविण्यात यश मिळविले असले, तरी अणुबाँबची संरचना (design) त्यांना चीनकडूनच मिळाली होती! भुट्टो यांनी आपल्या मृत्युपूर्व शेवटच्या निवेदनात म्हटले आहे, कीं चीनशी संबंध जोडण्याचे त्यांनी केलेले कार्य त्यांच्या कारकीर्दीतील मोठे कार्य होते!
भुट्टो यांना फाशी दिल्यानंतर जनरल झिया उल हक यांना सर्व पाश्चात्य राष्ट्रांनी वाळीतच टाकले होते. मात्र सर्वच पाकिस्तानी हुकूमशहा सुदैवी ठरले आहेत. ते अतिशय अडचणीत असताना अशी एकादी घटना घडते, की या हुकुमशहांना वाळीत टाकणे तर सोडाच पण उलट लोणी लावण्याची पाळी येते. सोवियत महासंघाने अफ़गाणिस्तानवर आक्रमण केल्यावर झियांचे ’सुगी’चे दिवस आले. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रोनाल्ड रीगन यांनी पाकिस्तानात पैसा आणि शस्त्रास्त्रे ओतली आणि रातोरात वाळीत टाकलेले हुकुमशहा झिया हे रीगन यांच्या मांडीला मांडी लावून व्हाईट हाऊसमध्ये पुख्खा झोडून आले. पण दुटप्पीपणा चालू ठेवून झियांनी चीनबरोबरचे पाकिस्तानचे संबंध मात्र वाढवून आणखी दृढ केले. चीनच्या 'संयुक्त राष्ट्र संघटने'तील प्रवेशाच्या वेळी पाकिस्तानने तैवान ऐवजी चीनला अमेरिकेच्या मनाविरुद्ध समर्थन देणारी मध्यपूर्वेतील राष्ट्रांची फळी उभारून अमेरिकेविरुद्ध चीनला उघडपणे मोठीच मदत केली होती. ते उपकार चीनने आजपर्यंत लक्षात ठेवले आहेत. त्याचे पारितोषिक म्हणून पाकिस्तानच्या अणुबाँब निर्मितीत चीनने खूपच मदत केली.
धाकट्या जॉर्ज बुश यांच्या कारकीर्दीत पुन्हा एकदा वाळीत टाकल्या गेलेल्या मुशर्रफना अल कायदाने केलेल्या ९/११ हल्ल्यानंतर जीवदान मिळाले. ते 'दहशतवादाविरुद्धच्या लढाई'तील खंदे पुरस्कर्ते व त्या लढाईतील अमेरिकेचे सच्चा साथीदार आणि बिनीचा शिलेदार म्हणून समजले जाऊ लागले. इथेही दुटप्पीपणा चालूच होता. मुशर्रफच्या 'कुदेता'नंतरच्या खूपशा अत्युच्च नेमणुकीत अल कायदा व कडव्या इस्लामी लोकांचा सुळसुळाट होता. मुशर्रफ यांच्या काळात अण्वस्त्र तंत्रज्ञानाच्या विक्रीला जणू एकाद्या 'मॉल'चे, 'वॉल-मार्ट'चे स्वरूप आले होते. विक्रीचे काम जोरात सुरू झाले. हे तंत्रज्ञानही इराण, उत्तर कोरिया, लिबिया व इराक या अमेरिकेच्या कट्टर शत्रूंना देण्यात आले. अखेरीस अमेरिकेच्या ते लक्षात आले. त्यांनी जाब विचारताच मुशर्रफने डॉ. खानना 'बळीचा बकरा' बनविले आणि आपल्या पापांचा कबुलीजबाब द्यायला लावून देशाची माफी मागायला लावली.
बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर बर्‍याच प्रमाणात या संबंधांत अंतराय येऊ लागला. अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या काळातच 'जगातील सर्वात धोकादायक जागा' असा पाकिस्तानचा उल्लेख ओबामांनी खूप वेळा केला व पाकिस्तानातील दहशतवाद्यांना मुशर्रफ यांनी मारले नाही, तर 'अमेरिका आपली फौज पाठवून त्यांना मारेल' असेही वचन दिले होते. (अलीकडेच ओसामांना मारून त्यांनी ते खरेही करून दाखविले) निवडून आल्यानंतरच्या पहिल्याच १०० दिवसांनंतरच्या वृत्तपत्रपरिषदेतही त्यांना एका बातमीदाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले होते, कीं पाकिस्तानच्या हातातील अण्वस्त्रे सध्या तरी सुरक्षित आहेत. नजिकच्या भविष्यकाळात पाकिस्तान सरकार कोसळून तालिबानचे किंवा अल कायदाचे सरकार राज्यावर बसेल, अशी शक्यता अजिबात नाहीं. पण तिथले मुलकी सरकार फारच ठिसूळ (very fragile) असून, त्या सरकारकडे शाळा, आरोग्य, कायद्याचे राज्य न्यायसंस्था यासारख्या मूलभूत गरजाही भागविण्याची क्षमता नाहीं म्हणून!
ओबामांना सुरुवातीला पाकिस्तानची मदत नाइलाजास्तव चालू ठेवावी लागली असली, तरी एक तर्‍हेचे audit करण्याची पद्धत त्यांनी सुरू केली होती. (हे audit 'सार्वभौमत्वा'सारख्या 'उदात्त' कारणांसाठी पाकिस्तानला नको होते!) त्याच वेळी ही मदत देत असताना पाकिस्तानला 'दहशतवाद्यांविरुद्धच्या कारवाईत जोर हवा', असा तगादाही ओबामांनी लावला होता. त्यानुसार पाकिस्तानला 'स्वात' खोर्‍यात लष्कर पाठवून मोहीम आखावी लागली. त्यात अनेक दहशतवादी (व प्रजाजनही) मारले गेले. पण हा जाच पाकिस्तानला मान्य नव्हता. पाकिस्तानात पूर आल्यानंतरही अमेरिकेची मदत भरघोस नव्हती. याबद्दल पाकिस्तानने तक्रार केल्यावर 'तुमचे श्रीमंत नागरिक कर देत नाहींत ते आधी वसूल करा', असा दबावही आणला.
ड्रोन हल्ल्यात मरण पावलेल्यांच्या एका पाकिस्तानी नातेवाईकाने अमेरिकेची गुप्तहेर संघटना 'सीआयए'वर खटला भरला. त्या संदर्भात पाकिस्तानी अधिकार्‍यांनी पाकिस्तानस्थित सीआयएच्या केंद्र प्रमुखाचे (जोनाथन बँक्स) नाव गेल्या डिसेंबरमध्ये फोडून एक नवाच पेच निर्माण केला. त्यामुळे बँक्स यांना परत जावे लागले. त्यांच्या जागी आलेल्या नव्या प्रमुखाचे नावही फोडण्यात आल्याचे वृत्त आहे. सध्या 'होय-नाहीं’चा जप चालू आहे!
पकिस्तानबरोबरचे अमेरिकेचे संबंध बिघडत चालले आहेत. या देशांच्या गुप्तहेर व लष्करी संघटना कशा दूर जात आहेत, एकमेकांचे कसे वाभाडे काढत आहेत, याचे वर्णन करणारा एक सुरेख लेख पाकिस्तानच्या 'डॉन' या दैनिकात छापून आला आहे. रेमंड डेव्हिस प्रकरणापासून तर हे संबंध आणखीच बिघडले. लगेच जनरल कयानी यांनी अमेरिकेला आपले 'सल्लागार' (हेर) २५ ते ४० टक्के कमी करायला सांगितले आहे.
आता बिन लादेन पाकिस्तानात अगदी राजधानीपासून ५०-६० किलोमीटर अंतरावरील एका गढीवजा घरातच सापडला. जगातल्या दहा सर्वोत्कृष्ट गुप्तहेरखात्यातल्या पहिल्या क्रमांकाच्या गुप्तहेरखात्याला आपल्या नाकाखाली काय चालले आहे हे माहीत नव्हते यावर कुणाचाच विश्वास नाहीं. त्यामुळे बिन लादेन हे लष्कर व पाकिस्तानी गुप्तहेर संघटना 'आयएसआय'च्या 'संरक्षणा'खाली त्यांच्याच एका सुरक्षित घरात रहात होता, असे आरोप पाकिस्तानातल्या वृत्तपत्रांतूनही होत आहेत! एक्सप्रेस ट्रिब्यून या वृत्तपत्रात एबीसी न्यूजच्या ख्रिस कुओमो यांना दिलेल्या मुलाखतीचा वृत्तांत आलेला आहे. त्यात तर लष्कर आणि 'आयएसआय'मधील कांहीं माथेफिरू लोकांना ही माहिती मिळाली असेल, अशी कबुली देता-देता मुशर्रफ यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांना मात्र ही माहिती नव्हती, असे सांगून स्वत:ची या आरोपातून सुटका करून घेतली आहे. पण यात मुशर्रफ यांचा थेट सहभाग नसला तरच नवल! मुशर्रफ यांना मी तर 'लबाड कोल्हा'च म्हणतो! त्यांना माहिती तर असेलच पण यापुढे जाऊन त्यांनी ही जागा सुरक्षित असल्याचे हेरून ती सुचविली असल्यास त्याबद्दल मला तरी आश्चर्य वाटणार नाहीं. या अविश्वासामुळेच ओसामांना ठार करण्याच्या मोहिमेची कांहींही माहिती पाकिस्तान सरकारला अमेरिकेकडून दिली गेली नव्हती. नौदलाच्या 'सील'च्या या तुकडीने दोन हेलीकॉप्टरमधून येऊन ओसामांना ठार केले. ही हेलिकॉप्टर पाकिस्तानच्या राडारलाही न दिसता आत आली, चाळीस मिनिटे कार्यरत होती. बिन लादेन यांना व बरोबरच्या इतर कांहीं पुरुषांना ठार करून, स्त्रियांना व मुलांना तसेच सोडून तिथले सर्व दस्तावेज, संगणक, संगणकाच्या हार्ड डिस्क्स, फ्लॅश डिस्क्स वगैरे पुरावेवजा सर्व साहित्य घेऊन परत पाकिस्तानबाहेर गेल्यानंतर पाकिस्तानी सरकारला त्याबद्दल सांगण्यात आले. याच्या मिरच्याही सरकार, लष्कर व 'आयएसआय'च्या नाकाला चांगल्याच झोंबल्या आहेत!
पाकिस्तानातील 'डॉन', 'एक्सप्रेस ट्रिब्यून' या सारख्या वृत्तपत्रांत खूप टीकात्मक लेख प्रसिद्ध झाले आहेत. केवळ संपादकीयच नव्हे, तर अनेक स्तंभलेखकांनीही पाकिस्तान सरकारची आणि लष्कर, 'आयएसआय'चीही रेवडी उडविली आहे. आता अमेरिकेचे सांसद उघडपणे पाकिस्तानला देण्यात येणारी मदत थांबविण्याचा आग्रह धरू लागले आहेत. त्यावर कुरघोडी करण्यासाठी लगेच पाकिस्तानी संसदेपुढे भाषण करताना गिलानींनी चीनची 'Pakistan's All-Weather Friend', अशी भलावण करून अमेरिकेला चीनचे बुजगावणे दाखविण्याचा प्रयत्नही केला आहे. त्यामुळे यापुढे काय होणार याकडे सर्व जगाचे डोळे लागले आहेत.
शेवटी अमेरिकेला अफगाणिस्तानातील त्यांच्या सैन्याला रसद पुरविण्यासाठी कराची-पाकिस्तान-खैबर खिंड-अफगाणिस्तान असा सध्या तरी एकच मार्ग उपलब्ध आहे. त्यामुळे अमेरिकेला पाकिस्तानशी मैत्री सांभाळावीच लागेल. दुसरा पर्याय आहे, पण त्यासाठी जॉर्जिया, आर्मेनिया, अझरबैजान आणि तुर्कमेनिस्तान या देशांशी करार करावे लागतील. तसे करता आल्यास अमेरिका पाकिस्तानला वार्‍यावर सोडू शकेल! (नकाशा पहा)
























-----------------------------
प्रतिक्रिया
On 04/06/2011 11:44 PM swapnil joshi said:
हे जरा आपल्या राज्यकर्त्यांना कळले पहिजे उठसूट नवीन मदत आणि नवीन मैत्रीचे गाणे गातात, त्या अयवजी देशतील जनते वर महगाई पासून वाचवण्याची कृपा करा मणजे ,घरच्या दुधावर शेजारचा बोका वाढणार नाही आणि वर आपल्यालाच म्याव करणार नाही .

On 03/06/2011 11:42 PM Sudhir Kale said:
शिंदेसाहेब, Please get rid of your stouborn ad. It is nothing but अ nuisance हा प्रतिसाद कुणाला उद्देशून आहे हे कळले नाहीं! Ad म्हणजे काय? Advice की Advertisement तेही कळले नाहीं?

On 27/05/2011 02:46 AM shinde said:
Please get rid of your stouborn ad. It is nothing but अ nuisance .

On 24/05/2011 07:54 PM नागेश क्षीरसागर said:
सुधीर काळे महत्वपूर्ण माहिती आपण दिल्याबद्दल आपणास खूप-खूप धन्यवाद !!!!!!!!!!!

On 24/05/2011 01:41 PM Sunny Patil said:
धन्यवाद काळे साहेब, अश्या अप्रतिम आणि अपरिचित माहिती बद्दल. खरे सांगायचे तर मी पहिल्यांदा तुमचा लेख वाचला आणि आता तुमचे लेख शोधू लागलो...खरच अप्रतिम...Awasome

On 23/05/2011 08:30 PM nil shinde said:
इतिहासाचा अभ्यास करता अर्याना [आजचा अफगानिस्तान] हा भारताचा हिस्सा होता.ह्याच्या पश्चिम बाजुकडून जेव्हा हल्ला झाला [अलेक्झांदर किव्वा ९ व्या शतकापासून सुरु झालेले इस्लामिक दहशतवादी हल्ले] तेव्हा तो सहज जिन्खला गेला पण पूर्वे व उत्तर बाजूचे [रणजीत सिंग,मराठे,ब्रिटिश,सोव्हियत,अमेरिका] हल्ले तितकेसे यशस्वी नव्हते.ह्याची अनेक भौगोलिक कारणे आहेत.तुर्क मधून अफगान वर चढ़ाई करणे नक्कीच सोपे गेले असते.पण पश्चिमची सेना अफगान मधे जमीनी लढाई करण्यासाठी असमर्थ आहे.पूर्व एशियाई फौजाच हे काम फत्ते करू शकतात

On 21/05/2011 11:22 AM Sudhir Kale said:
अपरिचित-जी आणि अनिल लांडगे-जी, आपल्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद. अपरिचित-जी, भारत-चीन या विषयावर लिहिण्याइतका अभ्यास माझा सध्या तरी नाहीं. पण त्या विषयात डोके घालायचा विचार मात्र आहे!

On 20/05/2011 03:47 PM Aparichit said:
काळे साहेब खूप माहितीपूर्ण लेख आहे तुमचा, अमेरिका व पाकिस्तान यांच्यातील संबध हि तुम्ही खूप सखोलरित्या मांडला आहे. असेच माहितीपूर्ण लिहित राहावे सांगलीकर आणि अमृता ताई यांनी दिलेल्या प्रतिक्रियाशी मी सहमत आहे

On 20/05/2011 10:21 AM anil landge said:
संपवा पाकिस्तान ला. विश्वासअचे नाही.

On 19/05/2011 08:09 PM Sudhir Kale said:
अमृता मॅडम, उदय-जी आणि विक्रांत-जी, आपल्या प्रोत्साहनपर अभिप्रायांबद्दल मनापासून आभार

On 19/05/2011 12:01 AM vikrant,chicago said:
काळेसाहेब, नेहमीप्रमाणे उत्तम आणि अभ्यासपूर्ण लेख. मुत्सद्दीपणात पाकिस्तानला मानावे लागेल. अमेरिकेच्या पैशाने लादेनला, अनेक दहशद्वाद्यांना आणि स्वत: ला पोसून वर चोराच्या उलट्या बोंबा मारून अजून पैसे उकळणे हे पाकिस्तानला वर्षानुवर्षे जमले आहे. पाकिस्तानच्या मदतीतील काही पैसा अमेरिकेतील काही जणांच्या खिशात जात असावा असे मत उघड उघड व्यक्त होऊ लागले आहे. ओबामांनी लादेनला मारण्याचे धाडस केले ते कमालीची गुप्तता राखून हे ह्याच कारणांनी. ओबामांच्या अगदी जवळच्या अनेकांना ह्याची कल्पना दिली नव्हती.

On 18/05/2011 02:47 PM uday mathkar said:
गुड research, very good लिखाण SUDHIR .... पाकिस्तान कधीच निष्पाप असू शकत नाही .. If USA wants to keep Pakistan hiding behind them or cover them then USA will have to pay very high price....

On 18.05.2011 12:02 Amruta said:
लेखन अतिशय अभ्यासपूर्ण आहे. खाली सांगलीकरांनी सांगितल्या प्रमाणे आपण भारत आणि चीन संबंधावर लेख लिहावा अशी अपेक्षा !

On 18/05/2011 08:20 AM Sudhir Kale said:
काजळेसाहेब, आपण म्हणता ते खरे आहे. पाकिस्तानने पब्लिक रिलेशन्समध्ये नेहमीच बाजी मारली आहे! ते कां याचा शोध आपल्या परराष्ट्र खात्याने व आपल्या राजदूतावासांनी (Embassies) घ्यायलाच हवा.

On 18/05/2011 08:16 AM Sudhir Kale said:
शिंदे-जी, काजळे-जी, सुहास-जी, अभी-जी, महेश-जी, गणेश-जी, प्रीतम-जी, मिलिंद-जी, तपकिरे-जी, कानडे-जी, पंकज-जी आणि अस्मिता-मॅडम, आपल्या प्रतिसादांबद्दल आभारी आहे.

On 18/05/2011 08:09 AM Sudhir Kale said:
सांगलीकरसाहेब, नमस्कार! माझ्या शेरो-शायरीचा आपण केलेला उल्लेख वाचून सानंद आश्चर्य वाटले. माझ्या या व्यासंगाशी आपला कुठे आणि कसा परिचय झाला हे समजून घ्यायला आवडेल.

On 17/05/2011 08:01 PM asmita said:
काळेसाहेब , खूपच अभ्यासपूर्ण लेख आहेत . अतिशय सोप्या शैलीत लिहिल्यामुळे विषय समजायला मदत झाली .

On 17/05/2011 03:43 PM पंकज पाटील,चांदवड said:
खूप छान काळे साहेब !!! तुमचे लिखाण खूपच चांगले आहे,तसेच तुमचा आभ्यास पण चांगला आहे .

On 17/05/2011 02:44 PM kanadev said:
काळे साहेब फारच छान लेख आहे.

On 17/05/2011 12:15 PM रतनकुमार तपकिरे said:
खूप छान विश्लेषण ... बऱ्याच दिवसांनी आपला लेख वाचायला मिळाला. (आधीचे २ लेख सुद्धा वाचले.) प्रतिक्रियाही खूप चांगल्या आणि माहितीपूर्ण आहेत... मलातर वाटते हे 'न्यूक्लियर डिसेप्शन' चे पुढचे भाग आहेत. :) ['NUCLEAR DECEPTION' continued ...]

On 17/05/2011 12:08 PM रतनकुमार तपकिरे said:
खूप छान विश्लेषण ... बऱ्याच दिवसांनी आपला लेख वाचायला मिळाला. (आधीचे २ लेख सुद्धा वाचले.) प्रतिक्रियाही खूप चांगल्या आणि माहितीपूर्ण आहेत... मलातर वाटते हे 'न्यूक्लियर डिसेप्शन' चे पुढचे भाग आहेत. :) ['NUCLEAR DECEPTION' continued ...]

On 16/05/2011 06:19 PM Sanglikar said:
काळे साहेब , तुमच्या शेरो शायरी इतकाच हा लेख अभ्यासपूर्ण , विचार करायला लावणारा आहे. चीन भारत संबंध या विषयावर आपण स्वतंत्र लेख लिहावा हि इच्छा .

On 16/05/2011 03:00 PM milindian said:
अमेरिका पाकिस्तानला नाइलाजाने 10 वर्षात 20 अब्ज डॉलर देत असेल तर राजीखुशीने किती देईल याची कल्पनाच नको. अभ्यासपुर्ण लेखाबद्दल मनापासून धन्यवाद.

On 16/05/2011 02:43 PM सुधीर काळे said:
अभीसाहेब, शिंदेसाहबांचे म्हणणे तसे नसावे. ते म्हणत आहेत कीं भारतावर हल्ला करून पाकिस्तानात जाऊन लपून बसलेल्या किंवा हल्ला करण्याच्या उद्देशाने पाकिस्तानमध्ये लपलेल्या अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी आपण अमेरिकेला मदत करू शकतो व तशी करावी. उदा. दाऊद, लष्करे-ए-तोयबाचे लोक वगैरे.

On 16/05/2011 01:42 PM pritam said:
फारच सुंदर काळे साहेब तुमचे लेख अन्ना हझारेंच्या उपोषणा सारखे आहेत.

On 16/05/2011 12:48 PM Ganesh Salunke said:
सर आपले लेख कायमच अप्रतिम असतात.. 'न्यूक्लियर डिसेप्शन' ची प्रकरणे मी सकाळ वर सगळी वाचली आहेत.. No doubt I love to read all your article.. Thank you so much.. Ganesh Salunke

On 16/05/2011 12:20 PM Mahesh said:
काळे साहेब, नेहमी प्रमाणे सुंदर लेख आहे... पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या चलाखी आणि मुत्सद्देगिरी पुढे भारतातील कमी पडतात असेच दिसून येते... आपले सरकार पैसे खाणे आणि विरोधी पक्षांना निष्क्रिय करणे यात जास्त वेळ घालवते असे मला वाटते... धन्यवाद ... - महेश

On 16/05/2011 12:14 PM सुधीर काळे said:
भारताने बिन लादेन पाकिस्तानातच आहे असे अमेरिकेला कळवले होते पण ती बातमी अमेरिकन गुप्तहेरखात्याने गांभिर्याने पडताळून पाहिली नाहीं असा वृत्तांत मी अलीकडे ’टाइम्स’मध्ये वाचला होता. खरे-खोटे किती याची मात्र कल्पना नाहीं!

On 16/05/2011 12:04 PM abhi said:
@ Kiran Shinde भारत आपल्याभूमीवर परदेशी सैन्याला पाय ठेवायची मुभा कधीही देणार नाही. आपण स्वयंपूर्ण आहोत आणि आपल्याला अमेरिकन मदतीची (पाकिस्तान्सारखी) गरज नाही. हा सार्वभौमत्वाचा प्रश्न आहे. अमेरिका भारतात active दहशतवाद्यांसाठी कधीही मोहीम उघडणार नाही. त्यांचाही फायदा भारत आणि पाकिस्तान यांचात भांडणे असतील तरच होईल. पाकिस्तान भारताविरुद्ध लढण्यासाठी अमेरिकेची मदत घेतो. त्याबदल्यात पाकिस्तानच्या जमिनीवर अमेरिकन सैनिक उतरू शकतात. म्हणून भारत-पाक भांडणात us चा फायदा आहे.

On 16/05/2011 11:28 AM सुधीर काळे (मूळ लेखक) said:
जकार्ता पोस्टमध्ये प्रसिद्ध झालेले माझे पत्रः http://tinyurl.com/6axbcfg कराचीच्या महंमद असीम या वाचकाचे सुरेख पत्र या दुव्यावर वाचा: http://tinyurl.com/3ee5u3y माझे जकार्तातील मित्र श्री राम बहुखंडी यांचे पत्रही जरूर वाचा: http://tinyurl.com/69n7exb

On 16/05/2011 11:26 AM Sudhir Kale (Original Author) said:
पूरक वाचन: भाग ३ Pakistan’s military and elite are holding it back: US analyst -The Express Tribune http://tinyurl.com/3e3tyyj The best intelligence agency in the world ‘ISI’ (Siasi Pakistan-4 Aug 2010) http://tinyurl.com/3m28t42 The Emperors’ Clothes A must-read article by Cyril Almeida in DAWN dt. 6th May 2011 http://tinyurl.com/3l76flh किंवा http://www.dawn.com/2011/05/06/the-emperors-clothes.html DAWN editorial "Osama bin Laden" 3/5/2011 http://www.dawn.com/2011/05/03/osama-bin-laden.html

On 16/05/2011 11:24 AM सुधीर काळे (मूळ लेखक) said:
पूरक वाचन: भाग-२ http://www.dirjournal.com/info/the-worlds-best-intelligence-agencies/ (10 best intelligence agencies in the world) http://tinyurl.com/3yvtzq6 (David Cameron in Bangalore 28th July 2010) http://tinyurl.com/3d5gj4u (Davis Miliband in Washington DC 30th April 2011) Abbottabad Raid-Pakistan upset about being kept in the dark (by Kamran Yousaf-Express Tribune-4th May 2011) http://tinyurl.com/3mp7jtt

On 16/05/2011 11:21 AM सुधीर काळे (मूळ लेखक) said:
पूरक वाचनात रस असणार्‍यांसाठी: (भाग-१) The Emperors’ Clothes हा Cyril Almeida यांनी लिहिलेला लेख सर्वोत्तम आहे! http://tinyurl.com/6zrwq2b (The curious case of Osama bin Laden-Hoodbhoy) http://tinyurl.com/3ghxu8g (Imran Khan in “The Independent”) http://www.smashinglists.com/10-best-intelligence-agencies-in-the-world/ (10 best intelligence agencies in the world) http://tinyurl.com/2b7b8w3 (10 best intelligence agencies in the world)

On 16/05/2011 09:45 AM suhas kulkarni said:
पाकिस्तानचा ढोंगीपणा हा सागल्याना समजत नाही.या बद्दल आपण किंवा भारतीय सरकार निष्क्रियता दाखवते. सर्व जगात किंवा जगातील प्रमुख दैनिकामध्ये याबद्दल काहीच बातमी छापून आणण्यासाठी प्रयास करत नाही. त्यामुळे पाकिस्तानचे फावते. काळेसाहेब तुमच्यामूळे आम्हाला हे कळत आहे. आणि हा विचार mauth publisity मार्फत सगलीकडे पसरेल आणि लवकरच पाकिस्तानमध्ये लोककल्याणाचे सरकार स्ताफन होईल अशी आशा करतो. काळेसाहेब keep it up .

On 16/05/2011 07:49 AM अजित काजळे, Sydney, Australia said:
पण हे अमेरिकन राज्यकर्त्यांना काळात नाही हेच जगाचे दुर्भाग्य आहे.........सध्या मी लंडन मध्ये असताना ज्या बातम्या वाचत होतो त्यावरून ह्या लोकांना पाकिस्तान फारच साधे आणि निष्पाप आहे असे वाटते..........काहीही होणार नाही आणि पाकिस्तानला ह्या पुढेहि मदत मिळत राहणार...........सापाला दुध पाजून विष निर्माण करत आहेत हि पाश्यःत राष्ट्रे

On 16/05/2011 06:07 AM kiran shinde said:
भारत सुद्धा यासाठीचा उत्तम पर्याय ठरू शकतो. जर भारताच्या यादी वरील दहशतवादी पाकिस्तअन्मध्ये लपून बसू शकतात तर त्यांना बाहेर काढण्यासाठी भारत अमेरिकेला सहकार्य का करू शकत नाही ?

No comments:

Post a Comment