Saturday 15 December 2012

एकेकाळी तालीबानचे "लाडके" असलेले हमीद मीर एकाएकी "दोडका" कसे झाले?

 हमीद मीर: ’लाडक्या’चा ’दोडका’?

पाकिस्तानी पत्रकार हमीद मीर हे पाकिस्तानबाहेर फारसे कुणाला परिचित नसतील ; पण ' जिओ टीव्ही ' या चित्रवाणीवरील ' कॅपिटल टॉक ' या कार्यक्रमाचे संचालक म्हणून आणि इंग्रजी , उर्दू , हिंदी आणि बंगाली भाषांतील स्तंभलेखक म्हणूनही ते पाकिस्तानात नुसते प्रसिद्धच नाहीत , तर त्यांच्याभोवती एखाद्या चित्रपट नायकाप्रमाणे प्रसिद्धीचे वलय आहे. पण सध्या त्यांच्याबद्दल माध्यमांत जे सनसनाटी मथळे येत आहेत , त्याला कारणही तसेच आहे.

अलीकडे , म्हणजे २६ नोव्हेंबर २०१२ रोजी ते आपल्या घरातून काही कामासाठी बाहेर पडले आणि वाटेत बाजारात काही कारणाने उतरले. तेवढ्या अवधीत त्यांच्या गाडीखाली अर्धा किलो वजनाचा एक शक्तिशाली बॉम्ब ठेवण्यात आला. सुदैवाने तो सुरक्षा अधिकाऱ्यांना दिसला व त्यांनी बॉम्बविनाशक पथकाला पाचारण करून तो निकामी केला व सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला. ताबडतोब या बॉम्बहल्ल्याची जबाबदारी तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या संघटनेने घेऊनही टाकली. चार वर्षांपूर्वी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या दिवशीच हा घातपात झाला हा योगायोग होता का हे चौकशीअंती आपल्याला कळेलच ; पण आतापर्यंत तरी टीटीपीने तसा दावा मात्र केलेला नाही.

मीरसाहेबांचे नाव वाचल्यावर या वर्षाच्या सुरुवातीला , एप्रिलमध्ये , पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष असीफ अली जरदारी यांच्या वैयक्तिक भेटीच्या वेळची एक घटना पुसटशी आठवली. ही भेट वैयक्तिक असूनही भारतीय चित्रवाणीच्या सर्व वाहिन्यांनी या भेटीची चांगलीच दखल घेतली होती. एका वाहिनीवरील कार्यक्रमात हे मीरसाहेब आपल्या बाजूच्या एका स्त्री-वार्ताहराच्या प्रश्नांना उत्तरे देत होते. तिने त्यांना थेट प्रश्न केला की एका बाजूला पकिस्तानी फौज आणि तिची कुप्रसिद्ध गुप्तहेर संघटना पाकिस्तानी अतिरेक्यांना आणि लष्कर-ए-तोयबा या संघटनेचा (किंवा त्या संघटनेचा नवा ' अवतार ' समजल्या जाणाऱ्या जमात-उद-दावा या संघटनेचा) मुखिया हाफीज सईदसारख्यांना छुपे सहाय्य करत आहे ; तर दुसऱ्या बाजूला मुलकी सरकार शांततेचा अखंड जप करत आहे , हे कसे काय ? या हाफीज सईद यांचे आणि अबू जुंदल यांच्यासारख्या अतिरेक्यांचे हात मुंबईच्या भारतीय तसेच परदेशी निष्पाप बळींच्या रक्ताने माखलेले असताना त्यांच्यावर कशी काय कारवाई होत नाहीं ? त्या प्रश्नाला आम्ही ' अशी मदत करत आहोत ' किंवा ' करत नाहीं आहोत ' असे थेट सरळसोट उत्तर न देता मीरसाहेबांनी ' अतिरेक्यांना (त्यावेळी त्यांना स्वातंत्र्यवीर-मुजाहिदीन-म्हटले जात होते) समर्थन आणि प्रशिक्षण द्यायचे हे सारे उद्योग सोविएत सैन्याला अफगाणिस्तानमधून हुसकावून लावण्यासाठी अमेरिकेने सुरू केले होते ' असे गुळमुळीत उत्तर दिले आणि ' आम्हाला दोष नका देऊ ' असे सांगून कानावर हात ठेवण्याचा प्रयत्न केला. पण ते सोयिस्करपणे हे विसरले की , सोविएत आक्रमण १९८९मध्येच संपले असून त्यानंतरचे सर्व प्रताप पाकिस्तानी हुकुमशहांचेच आहेत!
काय आणि कसा दैवदुर्विलास आहे पहा! आज याच हमीद मीर यांच्यावर हल्ला झाला. त्यात ते जरी वाचले असले तरी मस्तवाल टीटीपीच्या एहसानुल्ला एहसान या प्रवक्त्याने कुठल्याशा अज्ञात स्थळावरून फोनद्वारा ' अजाँस फ्रांस प्रेस ' या वृत्तसंघटनेला जाहीरपणे सांगून टाकले की , यावेळी देवदयेने ते वाचले असले तरी ते मीरसाहेबांवर आणखी एक प्राणघातक हल्ला करून त्यांना मारण्याचा प्रयत्न टीटीपी पुन्हा करेल! अगदी अशीच धमकी या संघटनेने मलाला युसुफझाई या मुलीला ती त्यांच्या गोळीबारातून वाचल्यावर दिली होती!
अतिरेक्यांना कुठलाच धर्म नसतो. त्यांनी ज्याच्यावर नेम धरलेला असतो ते लक्ष्य सहजपणे बदलता येते. त्यासाठी अशा संघटनांना पसंत न पडलेली एकादी घटना किंवा हाफीज सईदसारख्या एकाद्या भडकू वक्त्यांचे प्रक्षोभक भाषण पुरते आणि अतिरेक्यांचे डोके फिरले की त्यांचा नेमही बदलतो.

मीरसाहेबांच्याबाबतीतही असेच झाले. एके काळी मुस्लिमांसाठी आणि इस्लामसाठी झटणारे पत्रकार म्हणून टीटीपीच्या गळ्यातला ताईत असलेले लाडके मीरसाहेब एकाएकी असे दोडके झाले , याचे कारण काय ? तर त्यांनी मलाला युसुफझाईवरील जंगली प्राणघातक हल्ल्याचा निषेध केला! हमीद मीर यांच्यावर एकाएकी जीवघेणा हल्ला करायला ९ ऑक्टोबर १९१२ची जी मुलाखत कारणीभूत झाली त्यात मीर यांनी टीटीपीवर थेट हल्ला चढवला होता. या मुलाखतीत ते म्हणाले होते की , ' आपल्या देशात शाळेला जाणाऱ्या एका निष्पाप मुलीवर असा जीवघेणा हल्ला करणारे लोक आहेत. यामुळे व त्यांनी केलेल्या या हल्ल्यामुळे एक देश या नात्याने साऱ्या पाकिस्तानला आपली मान सलज्जपणे खाली घालावी लागत आहे. असा भ्याड हल्ला करू शकणारे आणि वर आपण स्वत:च हे भ्याड काम केल्याची ' वीरगाथा ' साऱ्या वृत्तसंस्थांना फोन करून सांगणारे हे हल्लेखोर स्वत:ला मुसलमान म्हणवून घ्यायला तरी पात्र समजतात काय ? ' (http://m.awaztoday.com/playshow.aspx?pageID=28280&vSource=1 यावर सर्व मुलाखत पहाता येईल.) त्याआधी तीन वर्षांपूर्वी याच ' कॅपिटल टॉक ' वाहिनीवरून मीरसाहेबांना दिलेल्या मुलाखतीत मलाला या धिटुकल्या चिमुरडीने सांगितले होते की , शिक्षणाचा तिचा हक्क ती मिळवणारच , त्यासाठी कुठेही जायची तिची तयारी आहे आणि याबाबतीत ती कुणालाही भीत नाहीं. आताही मलालाने मीरसाहेबांना फोन केला व या धर्मांधतेविरुद्धची तिची निष्ठा व त्यांच्या आणि तिच्यासारख्यांच्या सामूहिक प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल असा आत्मविश्वासही पुन्हा एकदा व्यक्त केला.

सत्य परिस्थिती अशी आहे की , जोपर्यंत लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेले पाकिस्तानी सरकार लष्करावर हुकुमत गाजवू शकत नाही व लष्कराला अशा अतिरेक्यांना मदत न करण्याचा हुकूम देऊन त्यांच्या ' स्ट्रॅटेजिक असेट्स ' चा नायनाट करवून घेत नाही तोपर्यंत पाकिस्तानातील परिस्थितीत बदल होणे शक्य नाही. या सर्व तथाकथित स्ट्रॅटेजिक असेट्स आता लायबिलिटीज झाल्या आहेत. त्यांचे विसर्जन करून पाकिस्तानी सरकारला शांततेच्या आणि भरभराटीच्या युगात प्रवेश करायला हवा. त्यात काही सहाय्य हवे असल्यास भारताची मदतही ते मागू शकतात. दोन देशांतला तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानने उचललेल्या या पावलांना भारत नक्कीच मदत करेल. भारतीय उपखंडात शांतता प्रस्थापित होऊन प्रगतीचा मार्ग तेव्हाच खुला होईल.
हा लेख (छायाचित्राशिवाय) "पाकिस्तानच्या डोईवरील ओझे" या शीरषकाखाली "महाराष्ट्र टाइम्स"मध्ये प्रकाशित झाला. दुवा आहे: http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17500885.cms

No comments:

Post a Comment