Saturday 15 December 2012

आजची अल कायदा संघटना!



आजची अल कायदा संघटना!
'अल कायदा' आणि तिच्यासारख्या इतर जिहादी संघटनांमुळे निर्माण झालेल्या धोक्याला टक्कर देण्यासाठी ओबामा राजवटीचे प्रयत्न हे यंदाच्या अमेरिकन अध्यक्ष निवडणुकीत एक वादग्रस्त विषय झाले आहेत. दोन्ही बाजूंनी 'राणा भीमदेवी' थाटात भाषणबाजी सुरू आहे. अल कायदाला पार लुळापांगळा केल्याचा दावा ओबामांचे अधिकारी करत आहेत, तर त्यांचे विरोधक ती संघटना पूर्वीइतकीच सशक्त असल्याचे ठासून सांगत आहेत. राजकीय भाषणबाजीत दोन्ही बाजूला थोडा-थोडा सत्यांश असतोच, पण अल कायदाची किंवा जिहादवादाची आपण काय व्याख्या करतो त्यानुसार सत्य पडताळावे लागते. दुर्दैवाने अल कायदाची नेमकी आणि बरोबर व्याख्या न करण्याकडेच राजकीय नेत्यांची आणि प्रसारमाध्यमांची प्रवृत्ती आहे!
अध्यक्षपदी कुणीही निवडून येवो, पण जिहादींचा धोका टिकूनच राहील. म्हणून या दहशतवादाच्या सामन्यांत कोणकोणते खेळाडू आहेत हे ओळखणे महत्वाचे आहे. पण या खेळाडूंना नीट समजण्यासाठी त्यांचे त्यांच्या सर्वसामान्य लक्षणानुसार नेमके वर्गीकरण करण्याची क्षमता आपल्याकडे असायला हवी. म्हणून अल कायदा व जिहादी चळवळीच्या व्याख्यांचा पुनश्च नीट अभ्यास करायचा प्रयत्न 'स्ट्राटफॉर'ने इथे केला आहे.
महाजालांचे महाजाल!
ओसामा बिन लादेन आणि त्याच्या सहकार्‍यांनी स्थापलेली ही संघटना तशी कधीच मोठी नव्हती, त्यात शंभरएक सक्रीय सभासद असायचे. सध्या अयमान अल-जवाहिरी याच्या नेतृत्वाखालील या छोट्या गटाला आपण बर्‍याचदा 'अल कायदा'चा गाभा किंवा 'अल कायदा'चा प्रमुख भाग समजतो. या गटाच्या संस्थापकांनी हजारो कार्यकर्ते आपल्या अफगाणिस्तान आणि सुदान येथील प्रशिक्षण शिबिरात प्रशिक्षण देऊन घडविले असले, तरी सुरुवातीला ते स्वतःला इतर बंधुभाव असणार्‍या गोटांना शिकवून जिहादी युद्धासाठी तयार करणारी एक आघाडीवरची, बिनीची संघटना समजत. जागतिक पातळीवर इस्लामी खिलाफत निर्माण करण्याच्या ध्येयासाठी अशी जिहादी सेना आवश्यक आहे असे त्यांचे मत होते. 'अल कायदा'च्या प्रशिक्षण शिबिरात तयार झालेले बहुसंख्य लढवय्ये अशाच इतर संघटनांचे सदस्य तरी होते किंवा अगदी कट्टर जिहादी होते. त्यातल्या बहुतेकांना मूलभूत निमलष्करी प्रशिक्षण दिले जाई व काही निवडक लोकांना टेहळणी करणे, पाळत ठेवणे, बनावट दस्तऐवज बनविणे आणि बाँब बनविणे या सारखी दहशतवाद्यांची युद्धनीती शिकविली जाई. या निवडक सभासदांमधून अगदी निवडक सभासदांना 'अल कायदा'च्या गाभा समजल्या जाणार्‍या गोटात निमंत्रित केले जाई.
ओसामा बिन लादेन यांचा 'अल कायदा' संघटना उभी करण्यामागे मुस्लिम जगतात जे भ्रष्ट राज्यकर्ते आहेत त्यांच्यावर तसेच अमेरिकेवर हल्ला करणे हासुद्धा एक उद्देश होता. बिन लादेन यांच्या मते अमेरिका अशा भ्रष्ट राज्यकर्त्यांना समर्थन देते. हिजबुल्ला संघटनेने जसे अमेरिकन सैन्याला लेबॅनॉनमधून बाहेर काढले किंवा सोमालियाने जसे अमेरिकन सैन्याला मोगाडिशूमधून माघार घ्यायला लावली होती त्याच पद्धतीने 'अल कायदा'ला मुस्लिम जगतातून अमेरिकेला वेगळे करून हकलून द्यायचे होते.
अशा तर्‍हेने 'अल कायदा' ही संघटना एक महाजालांना जोडणारे महाजाल बनले. हे स्वभाववैशिष्ट्य त्यांच्या प्रशिक्षणपद्धतीतच दिसून येते असे नव्हे तर बिन लादेन यांच्या राणा भीमदेवी छाप भाषणबाजीतही दिसून येते. उदाहरणार्थ, बिन लादेन यांचे १९९८ मधील जागतिक इस्लामी आघाडीबद्दलचे विधान! या विधानाद्वारे ज्यू आणि ख्रिस्ती धर्मयोध्यांविरुद्ध त्यांनी धर्मयुद्ध पुकारले. या विधानावर इजिप्तच्या इस्लामी जिहादचे तात्कालीन प्रमुख अल जवाहिरींची आणि इजिप्शियन इस्लामी गट, जमीयत-उल-उलेमा-ए-पाकिस्तान आणि बांगलादेश जिहाद चळवळ या गटांच्या नेत्यांची सही होती.
अमेरिकेवरील ९/११ च्या हल्ल्यानंतर अमेरिकेने अतिरेक्यांच्या विरुद्ध आपल्या पाचही शक्तींचा दबाव 'अल कायदा'च्या गाभ्याविरुद्ध वापरला. त्या पाच शक्ती आहेत गुप्तहेरखाते, सैन्य, कायद्याची अंमलबजावणी करणारे पोलीसदल, राजनीती आणि आर्थिक दंडयोजना (आर्थिक नाड्या आवळणे)! याचा परिणाम म्हणून 'अल कायदा'च्या अनेक कार्यकर्त्यांना पकडण्यात किंवा ठार करण्यात आले आणि त्यांची मालमत्ता किंवा संपत्ती गोठविण्यात आली. यात बिन लादेन यांचाही समावेश आहे. या कारवायांमुळे ही संघटना मोठी न होता छोटी राहिली आहे व तिची उपद्रवशक्तीही खच्ची झाली आहे. तिचे उरलेले कार्यकर्ते आता एकटे पडून पाकिस्तानच्या अफगाणिस्तानच्या सीमेवरील भागात लपून राहिले आहेत आणि त्यांना एकटे पाडल्याने त्यांच्या हल्ला करण्याच्या शक्तीचेही खच्चीकरण झाले आहे. 'अल कायदा'च्या गाभ्यातील कार्यकर्त्यांकडे आता इतर जिहादींना मार्गदर्शन करणे आणि त्यांना या कामात स्फूर्ती देणे एवढेच काम उरले आहे. अल जवाहिरी आणि आदम गडान यांच्या निवेदनांना प्रसारमाध्यमे प्रमाणाबाहेर प्रसिद्धी देत असली, तरी हा गाभा आता जिहादी चळवळीचा एक छोटासा भाग राहिला आहे. खरे तर गेल्या कित्येक वर्षांत या गाभ्याने एकही दहशती हल्ला घडवून आणलेला नाहीं. असे असले तरी हा गाभा नष्टही झालेला नाहीं. अमेरिकेने आपल्या प्रयत्नात थोडीशी जरी ढील दिली तर तो पुन्हा आपले डोके वर काढेल. पण बिन लादेनसारख्या मोहिनी आणि छाप पाडणार्‍या नेत्याच्या अनुपस्थितीत आणि अल जवाहिरी यांच्यासारखा शीघ्रकोपी नेता लाभलेल्या या संघटनेला पुन्हा असे डोके वर काढणे आता अवघड जाणार आहे.
पण एकूण जिहादी चळवळीचे अस्तित्व 'अल कायदा'च्या या गाभ्यापलीकडेही आहे. स्ट्रॅटफोर[१] संघटनेने गेली कित्येक वर्षे 'अल कायदा'बद्दल वार्षिक भाकितही प्रसिद्ध केले आहे. पण २००९ पासून अल कायदाच्या या गाभ्याला एकटे पाडले गेल्यामुळे आणि तिच्या शक्तीहीनतेमुळे आणि इतर जिहादी गट जास्त सशक्त होऊन वर आल्यामुळे, या भाकिताचे शीर्षक स्ट्रॅटफोरने मुद्दाम म्हणून बदलले. स्ट्रॅटफोरला वाटते, की आता त्यांच्या विश्लेषणाचा रोख 'अल कायदा'च्या गाभ्यावर कमी आणि खरोखर सक्रीय असलेल्या आणि जिहादी चळवळीत अर्थपूर्ण भूमिका निभावणार्‍या घटकांवर जास्त द्यायला हवा. यात अल कायदाचे नाव वापरणारे आणि जिहादी आंदोलनात पाय पक्के रोवून अभे असलेले प्रादेशिक गटसुद्धा आले.
संलग्न आणि असंलग्न घटक
आज ज्या संघटनेला 'अल कायदा' या संज्ञेने सर्वसाधारणपणे ओळखले जाते ती आता जिहादी चळवळीच्या प्रादेशिक दहशतवादी घटकांचे जागतिक महाजाल आहे. या घटकांनी 'अल कायदा'चे नांव आणि त्या संघटनेची विचारप्रणाली स्वीकारली आहे. या प्रादेशिक गटांच्या नेतृत्वातील आणि 'अल कायदा'च्या गाभ्याच्या नेतृत्वातील संबंध बर्‍याच गटांच्या बाबतीत १९८० आणि १९९० या दशकांत सुरू झालेले आहेत.
यातल्या कांही घटकांनी 'अल कायदा'च्या गाभ्याशी संपूर्ण निष्ठा जाहीर केलेली आहे. यालाच स्ट्रॅटफोर संघटना "संलग्न घटक (franchise groups)' या नावाने ओळखते. या घटकात इराक, AQIM-इस्लामी माघरेब (नैऋत्य आफ्रिका) आणि AQAP -अरबी भूशिरातील 'अल कायदा'च्या संघटनांचा समावेश होतो. जरी या संलग्न घटकांनी 'अल कायदा'चे नाव स्वीकारले असले तरी या घटकांची मालकी आणि त्यांचे संचलनाची जबाबदारी स्थानिक नेतृत्वाकडे असते. म्हणजेच स्थानिक नेतृत्वाला 'अल कायदा'च्या गाभ्याच्या मार्गदर्शनापेक्षा आणि प्रणालीपेक्षा वेगळे निर्णय घेण्याची लक्षणीय मुभा असते.
या संलग्न घटकांचे अरबी भूशिरातील 'अल कायदा'चा नेता नस्र अल वहेशी यांच्यासारखे नेते 'अल कायदा'च्या गाभ्याबरोबर अगदी घनिष्ट संबंध ठेवून आहेत आणि त्यांची तत्वप्रणालीसुद्धा 'अल कायदा'च्या गाभ्याच्या तत्वप्रणालीशी अगदी मिळती-जुळती आहे. या उलट AQIM चे अब्द अल वादूद यांच्यासारखे काही इतर नेते अंतर ठेवून आहेत. AQIM च्या कार्यकर्त्यांतच तत्वप्रणालीवरून अनेक कठोर अंतर्गत युद्धेही झालेली आहेत. अल्जेरियाच्या Salafist Group for Preaching and Combat या गटातील कित्येक जुने नेते या संघर्षावरून गट सोडून वेगळेही झालेले आहेत. सोमालीच्या 'अल कायदा'चे नेते फजूल अबदुल्ला मोहम्मद यांचा मृत्यू त्यांची जहरी टीका सहन न झाल्यामुळे शबाब या सोमाली जिहादी गटातर्फे करण्यात आला असे खूप मोठ्याप्रमाणावर मानले जाते.
स्ट्रॅटफोर संघटना ज्याला 'असंलग्न जिहादी घटक' म्हणते तो जागतिक जिहादी चळवळीत 'अल कायदा' म्हणवून घेणारा एक सर्वात विस्तृत घटक आहे. या घटकात 'अल कायदा'च्या गाभ्याकडून किंवा संलग्न घटकांकडून प्रभावित झालेले काही 'एकांडे शिलेदार' आहेत किंवा काही थोड्या व्यक्तींचे छोटे गट आहेत. पण या व्यक्तींचे किंवा या छोट्या गटांचे गाभ्याशी किंवा संलग्न गटांशी थेट संबधही नसतील. असले असंलग्न जिहादी प्रशिक्षणासाठी पाकिस्तानला किंवा येमेनला जातात. इतर असंलग्न जिहादींचा इतर जिहादी गटांशी थेट संबंधही नसतो!
या 'अल कायदा'च्या गाभ्याला, संलग्न गटाला तसेच असंलग्न गटांना बर्‍याचदा 'अल कायदा' या नावाने ओळखले जात असले तरी यांच्या प्रमुख नेत्यांत महत्वाचे मतभेद आहेत हे लक्षात घेतले पाहिजे.
महत्वाची वैशिष्ट्ये व फरक
स्ट्रॅटफोर संघटना वापरत असलेल्या व्यांख्यांमध्ये आणि विश्लेषणांमध्ये काही महत्वाची वैशिष्ट्ये आहेत. सर्व जिहादी कार्यकर्ते 'अल कायदा'शी संलग्न नाहींत किंवा सर्व दहशतवादी इस्लामीसुद्धा जिहादी नाहींत. समाजावर सर्वोत्तम नियंत्रण ठेवण्यासाठी शारिया कायद्याचा उपयोग केला पाहिजे असे समजणार्‍यांना इस्लामी (Islamist) म्हणतात. शारिया लागू करण्यासाठी बळाचा वापर करायला जे तयार असतात ते दहशतवादी इस्लामी. दहशतवादी इस्लामी इस्लाम धर्माच्या दोन्ही पंथांत आहेत. 'अल कायदा' ही सुन्नी दहशतवादी इस्लामींची संघटना आहे तर हिजबुल्ला ही शिया दहशतवादी इस्लामींची संघटना आहे. शिवाय सगळे दहशतवादी मुसलमान इस्लामी नसतात. कांही मुसलमान जनजातींसाठी, प्रांतीय कारणासाठी, वांशिक कारणासाठी किंवा राष्ट्रवादासाठी किंवा मिश्र कारणांसाठी शस्त्रे उचलतात.
इराक, अफगाणिस्तान, येमेन, लिबिया आणि उत्तर मालीसारख्या देशात कित्येक दहशतवादी गट परदेशी सैन्याविरुद्ध, आपल्याच सरकारविरुद्ध किंवा आपापसात (आणि कधी-कधी तिघांविरुद्ध) लढत आहेत. यातले काही जिहादी आहेत तर काही जनजातींनी उभ्या केलेल्या नागरी सेना (militia) आहेत, काही लुटारू, वाटमारे आहेत, काही चोरटा व्यापार करणारे स्मगलर्सही आहेत तर इतर काही राष्ट्रवादीही आहेत. या सर्व गटांना ओळखणे, वेगळे करणे आणि त्यांची वर्गवारी करणे हे एक महाकठीण काम आहे. यातले काहीचे संबंध बदलत असतात तर काही परस्परव्याप्त (overlap) असतात. उदाहरणार्थ, दक्षिण येमेनमधले विघटनवादी कधी जनजातींच्या सैनिकांबरोबर किंवा AQAP शी हातमिळवणी करून सरकारबरोबर लढतात तर कधी भावी मित्रांबरोबरच लढतात. उत्तर मालीमध्येही AQIM, अन्सार दिने, एकीकरण चळवळ, पश्चिम आफ्रिका जिहाद, त्वारेग गट आणि जनजातींच्या सैनिकांचे गट किंवा यासारखे गट असेच कधी आपापसात लढताना तर कधी एक होऊन बाहेरच्यांबरोबर लढताना दिसतात.
जेंव्हां हे गट एकापेक्षा जास्त नावे वापरतात किंवा अनेक गट एकच नांव वापरतात तेंव्हां त्यांचे लक्षणानुसार नेमके वर्गीकरण करणे आणखीच कठीण होऊन बसते. हे गट तारतम्य पाळण्यासाठी (discretion), गोंधळ उडवून देण्यासाठी किंवा जनसंपर्कासाठी अशी वेगवेगळी नावे वापरतात. उदा. AQAP गट दक्षिण येमेनमधील शहरे काबीज करताना किंवा त्या शहरावर राज्य करताना अन्सार अल् शारिया हे नांव वापरतो. तसेच २००४ साली इंग्लंडमध्ये अटक झालेले आणि अलीकडेच अमेरिकेच्या हवाली केले गेलेले जहाल मताचे मुस्लिम धर्मगुरू अबू हमजा अल मास्री यांनीही अन्सार अल् शारिया याच नावाच्या चळवळीचे खूप काळापासून नेतृत्व केले आहे. अलीकडेच अमेरिकन दूतावासावर हल्ला करणारा लिबियाचा जिहादी सशस्त्र गटसुद्धा तेच नाव वापरतो. पण हे वेगवेगळे गट एकच नांव वापरत असले तरी आणि त्यांच्या नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा आपापसात परिचय असला तरी ते एकाच संघटनेचे, महाजालाचे भाग आहेत आणि त्यांची मतप्रणाली एक आहे असा त्याचा अजिबात अर्थ होत नाही.
लिबियात गद्दाफींचा पाडाव होण्याआधीपासूनच तिथे नेतृत्त्वपोकळी निर्माण झाली होती आणि जिहादी आणि इतर दहशतवाद्यांचे तिथे बस्तान बसू लागले होते. इराक, अफगाणिस्तान, सोमालिया आणि अलीकडे लिबिया उत्तर माली आणि सीरिया या देशांत स्ट्रॅटफोर संघटनेचा या बाबतीतला कयास खरा ठरलेला आहे. आणि या देशात शस्त्रास्त्रांची जी मोठ्या प्रमाणावर आयात होत आहे त्यामुळे हा प्रश्न आणखीच अवघड झालेला आहे.
अशा ठिकाणी दहशतवादी इस्लामी संघटनांनी आणि जिहादी संघटनांनी या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन आपले बस्तान व्यवस्थितपणे बसविलेले आहे. म्हणूनच या संदर्भात पाहिल्यास 'अल कायदा'चा गाभा जरी लुळापांगळा झाला असला तरी इतर जिहादी गटांतर्फे ही चळवळ फोफावतच चालली आहे. आतरराष्ट्रीय हल्ले करण्यात स्वारस्य नसलेल्या पण स्थानीय पातळीवर बंडाळ्या करू पहाणार्‍या गटांच्या बाबतीत तरी हे खरे आहे. या बारकाया, या छटा ओळखणे महत्वाचे आहे कारण जसजसे जिहादी गटांची घडण आणि त्यांचे उद्देश बदलत जातील तसतसे त्यांच्या हल्ले चढविण्याच्या पद्धतीही बदलतील.
(sbkay@hotmail.com)
हा लेख सकाळच्या वेब आवृत्तीवर ३० ऑक्टोबर २०१२ रोजी प्रसिद्ध झाला. दुवा आहे:http://www.esakal.com/esakal/20121030/5051177980960008956.htm
-------------------------
[
१] या लेखाचे मूळ लेखक स्कॉट स्ट्युअर्ट हे याच संघटनेशी संलग्न आहेत.
मूळ इंग्रजी लेख वाचा खालील दुव्यावरः
http://www.stratfor.com/weekly/defining-al-qaeda?utm_source=freelist-f&utm_medium=email&utm_campaign=20121018&utm_term=sweekly&utm_content=readmore&elq=cd0a8ab5043c47d6907cb17ad33474ba 


सकाळच्या वाचकांच्या प्रतिक्रिया:
===============
सुधीर काळे - शनिवार, 24 नोव्हेंबर 2012 - 05:19 PM IST
धन्यवाद, तन्वी मॅडम! हा लेखही वाचा! http://www.esakal.com/esakal/20121115/4778547505914392728.htm 
===============
tanvi - शुक्रवार, 23 नोव्हेंबर 2012 - 04:38 PM IST
काळेजी नेहमीप्रमाणे लेख खूपच आवडला. वाचायला थोडा उशीर झाला. विचित्र प्रतीकीयांकडे दुर्लक्ष करा. लेख लिहित राहा. 
===============
Vikrant, Chicago (4th attempt) - गुरुवार, 8 नोव्हेंबर 2012 - 09:06 PM IST
काळे साहेब, अत्यंत उपयुक्त लेख. तसेच भर्तृहरी यांची उक्ती दिलेली प्रतिक्रियाही समर्पक. असभ्य टीकाकारांना काय बोलावे? दुर्लक्षच केलेले बरे. जगातील जवळजवळ सर्व देशांना अल कायदाने फटका बसवला. त्याच्या दुर्दैवी यशामुळे ती संघटना नामशेष होणे दुरापास्त आहे. पण सर्व जगाने अल कायदाकडे बारीक नजर ठेवलीच पाहिजे आणि पुढच्या चालींचा अंदाज घेतलाच पाहिजे. त्या पार्श्वभूमीवर हा लेख प्रकाश टाकणारा आहे. 
===============
सुधीर काळे - रविवार, 4 नोव्हेंबर 2012 - 06:10 PM IST
आशिश-जी, इस्रायल हा माझ्या अतीशय आवडीचा विषय आहे आणि त्या विषयावरचे माझे वाचनही बर्‍यापैकी आहे. इथे ’जकार्ता पोस्ट’वर मी काश्मीर आणि इस्रायलवर खूपदा लिहीत असतो. पण हा विषय फारच अथांगही आहे. त्याला न्याय द्यायचा असेल तर त्यावर एक लेखनमालिकाच लिहावी लागेल आणि त्याला वेळही खूप द्यावा लागेल आणि प्रयत्नही खूप करावे लागतील. थोडक्यात लिहायचा प्रयत्न मी नक्कीच करेन. पण जरा वेळ लागेल. मला माझ्या ’जकार्ता पोस्ट’वरील लेखाचे दुवे सापडले तर ते मी आधी इथे देईन. धन्यवाद. 
===============
ashish aouti - रविवार, 4 नोव्हेंबर 2012 - 10:31 AM IST
आपला लेख Chan आहे . तरी इस्राइल आणि अरब यांच्यातील संघर्ष वर krupya पुढील lekhan करावे. 
===============
Sudhir Kale (Author) - शनिवार, 3 नोव्हेंबर 2012 - 03:23 PM IST
भर्तृहरीच्या प्रसिद्ध कवितेची "अरसिकेषु कवित्व निवेदनम् शिरसि मा लिख, मा लिख, मा लिख" ही दुसरी ओळ मला पाठ होती, पण पहिली ओळ आठवली नाहीं. त्यासाठी सुप्रसिद्ध संस्कृत अभ्यासक श्री सीताराम दातार यांची मला मदत झाली. त्यांचा मी त्याबद्दल आभारी आहे. 
===============
Sudhir Kale, Author - शनिवार, 3 नोव्हेंबर 2012 - 01:01 PM IST
टिळकसाहेब, धन्यवाद! 
===============
Sudhir Kale (Author) - शनिवार, 3 नोव्हेंबर 2012 - 10:52 AM IST
प्रिय रामभाऊ, मन:पूर्वक धन्यवाद. माझी दोन्ही मुले अमेरिकेत पूर्व-पश्चिम किनार्‍यावर स्थायिक आहेत. त्या सर्वांना भेटायला आम्ही दोघे दरवर्षी अमेरिकेला येतोच. आपल्याकडे रहायला येणे अशक्य आहे. आपण कुठे रहाता तेही माहीत नसल्यामुळे भेटही होईल कीं नाहीं हे सांगणे कठीण. पण माझ्या ई-मेलवर आपला फोन नं कळविल्यास मी आपल्याशी नक्की बोलू शकेन. माझ्याकडे 'मॅजिक जॅक'ची आणि iPad ची सोय असल्यामुळे इथूनही बोलता येईल. मी लिहायचे थांबवणार तर नाहींच. त्यात तुमच्यासारखे रसिक वाचक मिळाल्याने मला आणखीच उत्साह मिळतो. इंटरनेटमुळे जपान पासून कॅनडापर्यंत आणि मध्य-पूर्व, आफ्रिका असा जगभर मराठी वाचकवर्ग पसरला आहे व माझ्या ई-मेलवरसुद्धा कित्येक वाचक आपले आभिप्राय लिहितात. त्यात प्रशंसाही असते तर मतभेदही कळतात. पुनश्च धन्यवाद. 
===============
Makarand Tilak - शनिवार, 3 नोव्हेंबर 2012 - 10:38 AM IST
अतिशय माहितीपूर्ण लेख आहे.उत्तम तयारीने लिहिलेल्या या लेखातून श्री.सुधीर काळेंचा अभ्यास ,जागतिक पातळीवर चाललेल्या घडामोडींचे भान आणि मराठी वाचकांसाठी हे सर्व पोचवण्याची धडपड दिसते.आज संपूर्ण जग एक छोटे खेडे बनत असताना त्याच्या कानाकोपऱ्यात चाललेल्या घटनांचा परिणाम आपल्या सगळ्यांच्या जगण्याशी संबंधित असतो.त्यामुळे भारतीय माणसाला हे सर्व माहिती असलेले चांगलेच आहे. सुधीर काळे - तुम्ही लिहित जा.तुमचा लेख आमच्या लक्ष्यात राहील,कोण्या वेणू मामा किंवा प्रीती ने फेकलेली सवंग मते नाही. 
===============
Rambhau - शनिवार, 3 नोव्हेंबर 2012 - 03:38 AM IST
प्रिय श्री सुधीर काळे सर, आपण ई-सकाळ च्या माध्यमाने जे काही लिहिले ते सगळे वाचले. तुमच्या बद्दल भयंकर आदर निर्माण झाला आहे. कधी USA ला आलात तर कळवा, प्रत्यक्षात भेट झाली तर खूप आनंद होईल, आमच्या कडे राहायला आहात तर जास्तच होईल :) आपले आभार मानतो !!! Kindly ignore (and I know you will) the negative comments and please keep writing. We are waiting for your next up-coming articles .... !
===============
Sudhir Kale (Author) - शुक्रवार, 2 नोव्हेंबर 2012 - 05:47 PM IST
Thank you, Mr. Munnabhai & Ms. Nisha. 
===============
nisha - शुक्रवार, 2 नोव्हेंबर 2012 - 02:56 PM IST
i agreed with mr.Kaustubh Morankar .mr.kale your articles are always readable. 
===============
मुन्नाभाई - शुक्रवार, 2 नोव्हेंबर 2012 - 02:02 PM IST
प्रीती आणि वेणू यांनी लेख न वाचताच अभिप्राय ठोकलेले दिसतात. कारण हा लेख पाकिस्तानबद्दल नसून अल कायदा बद्दल आहे व त्यात पाकिस्तानचा फक्त तीन वेळा उल्लेख आहे. (१) जमीयत-उल-उलेमा-ए-पाकिस्तान, (२) तिचे उरलेले कार्यकर्ते आता एकटे पडून पाकिस्तानच्या... आणि (३) प्रशिक्षणासाठी पाकिस्तानला किंवा येमेनला...! बस्स. अल कायदा संघटना अफगाणिस्तानमध्ये स्थापण्यात आली व आता ती सार्‍या मध्य-पूर्वेत आणि उत्तर आफ्रिकेत (मुख्यत: मुस्लिम देशात) गोंधळ माजवून आहे. http://www.worldatlas.com/webimage/countrys/af.htm या लिंकेवर आफ्रिकेचा नकाशा दिसेल त्यात या लेखातले इजिप्त, लिबिया, माली (अल्जीरियाच्या नैऋत्येला) आणि सुदान देश दिसतील. पाकिस्तान मात्र सापडणार नाही. http://www.worldatlas.com/webimage/countrys/as.htm या लिंकेवर आशिया दिसेल व त्यात मध्य-पूर्वेच्या नकाशात येमेन, इराक, अफगाणिस्तान, इराण, सीरिया हे देश दिसतील. इथेही पाकिस्तान सापडणार नाही कारण तो दक्षिण आशियात आहे. आधी हा माहितीपूर्ण लेख वाचा आणि मग अभिप्राय द्या. बाबारेंचा अभिप्राय जास्त योग्य वाटला. 
===============
 Sudhir Kale (Author) - शुक्रवार, 2 नोव्हेंबर 2012 - 08:27 AM IST
Dear Mr Morankar, I really appreciate your kind words & thank you in one sentence that tells my feelings in a nutshell: YOU MADE MY DAY! I write mainly for readers like you. I wonder whether some readers seem to have a “personal” agenda against me. I don’t recall having ever offended any of my readers. If I have, it was unintentional. But some readers are always harsh & some write tangentially. I doubt if the two reader who have written personally degrading responses to this article have even read it before shooting off their responses that don’t even refer to the contents of the article. But readers like you give me the necessary “shot-in-the-arm” that can keep me going! Best wishes 
===============
Sudhir Kale (Author) - गुरुवार, 1 नोव्हेंबर 2012 - 04:40 PM IST
Dear Mr Morankar, I use the word दुवा for links! 
===============
Kaustubh Morankar - गुरुवार, 1 नोव्हेंबर 2012 - 09:00 AM IST
काळे महोदय, तुमचे लेख मी नेहेमीच वाचत असतो, आणि ते प्रचंड माहितीपूर्ण असतात. तसेच तुम्ही संदर्भ लिंक्स (मराठी पर्यायी शब्द आठवला नाही) देखील देता ते आमच्या साठी ज्ञानवर्धक ठरते. सारे जग म्हणजे अण्णा व पाकिस्तान नसले तरी देशाभिमानी व्यक्तीला हे विषय दुर्लक्षितहि करण्या जोगे नाहीत, या लेखात तर त्याचा संबंध देखील नाही. इथे नमूद झालेल्या काही विक्षिप्त प्रतिक्रियांसाठी मी तुमची माफी मागतो पण तुम्ही कृपया लिहिणे बंद किंवा कमी करू नका .. आजचा लेख देखील कुठल्याही प्रकारे आपल्या देशाशी असंबंध नाही आहे उलट हा धोका जगातील प्रत्येक देशाला व पर्यायाने प्रत्येक व्यक्तीला आहे. तुमच्या व्यासंगाचा मी भोक्ता आहे आणि आमच्या स्थानीय आणि वैयक्तिक मर्यादेमुळे तुमचे लेखच आमचे जागतिक पातळीवरील वार्ताहर आहेत. कृपया असेच लिखाण चालू ठेवावे, बाहेर राहून, संसार सांभाळून देखील देश सेवा चालू ठेवण्याचे तुमचे व्रत नक्कीच स्तुत्य व अनुकरणीय आहे. परत एकदा अनभिज्ञ वाचाकांच्यावातीने माफी मागतो आणि तुमच्या पुढील लेखाची वाट पहातो, तुमचा वाचक, कौस्तुभ मोराणकर 
===============
Sudhir Kale - बुधवार, 31 ऑक्टोबर 2012 - 05:22 PM IST
भर्तृहरी या सुप्रसिद्ध संस्कृत कवीने किती योग्य मागणी केली होती हे असले प्रतिसाद वाचल्यावर मला जाणवते! त्याने ब्रह्मदेवाला त्रिवार विनंती केली होती कीं "देवा तुझ्या इच्छेला येतील ती शेकडो दु:खे मला दे. ती दु:खे मी सहन करेन. पण अरसिक माणसाला कविता सांगायचे दु:ख मात्र माझ्या नशीबात लिहू नकोस!" (इतर दु:खशतानि यदृच्छया वितर तानि सहे, चतुरानन! अरसिकेषु कवित्व निवेदनम् शिरसि मा लिख मा लिख मा लिख!) हा लेख पाकिस्तानबद्दलही नाहीं आणि अण्णांबद्दलही नाहीं. कृपया तो नीट वाचण्याची कृपा करा ही विनंती. तुम्हाला हे दोन्ही विषय कुठे दिसले कुणास ठाऊक! 
===============
Venu mama - बुधवार, 31 ऑक्टोबर 2012 - 02:48 AM IST
अरे काययय..... हे... हाट. काळेंना फेस्बुक्च्या आवारा ग्रुपचे. सदस्य केले पाहिजे.
===============
Preeti - मंगळवार, 30 ऑक्टोबर 2012 - 07:38 PM IST
काळे काका नकोकोकोकोको......... कृपया आम्हाला माफ करा, आमच्या साठी जग म्हणजे केवळ पाकिस्तान किंवा अण्णा नाहीत. 
===============
Babare - मंगळवार, 30 ऑक्टोबर 2012 - 06:02 PM IST
सगळेच लुटारू, आणि वाटमारे आहेत. एक अणू बॉंब टाकून खलास करा सगळ्यांना तरच जग सुधारेल.

No comments:

Post a Comment