Saturday 15 December 2012

निमित्त अमेरिकी अध्यक्षांच्या निवडणुकीचे...



निमित्त अमेरिकी अध्यक्षांच्या निवडणुकीचे...


स्वतंत्र लेख, लेखक: सुधीर काळे, जकार्ता 
(sbkay@hotmail.com)

अमेरिकेचे सध्याचे अध्यक्ष डेमोक्रॅटिक पक्षाचे बराक ओबामा आणि त्यांना आव्हान देण्यासाठी रिपब्लिकन पक्षाने निवडलेले मिट रॉम्नी, यांच्या दरम्यान अमेरिकेतील अध्यक्षपदाची अत्यंत चुरशीची निवडणूक नुकतीच पार पडली.
एकंदर सर्वसामान्य मतदानापैकी ओबामांना ५१ टक्के तर रॉम्नी यांना ४८ टक्के मते पडली असली तरी राज्यनिहाय लोकप्रतिनिधींच्या मतदानातील ५३८ मतांच्या मोजणीत मात्र (ज्याला Electoral College म्हणतात) ओबामांना (फ्लॉरिडा राज्याची उशीरा जाहीर झालेली मते धरून) ३३२ तर रॉम्नींना २०६ मते मिळाली! 

निवड होण्यासाठी २७० राज्यनिहाय लोकप्रतिनिधींची मते लागतात. २००० सालच्या निवडणुकीत अल गोर यांना सर्वसामान्य मतदानात बुश यांच्यापेक्षा जास्त मते पडली असली तरी राज्यनिहाय लोकप्रतिनिधींच्या मतदानात त्याना २६६ राज्यनिहाय लोकप्रतिनिधींची मते मिळाली तर बुश यांनी २७१ मते मिळवून कशीबशी बाजीमारली होती. या निवडणुकीची आठवण सर्व प्रसारमाध्यमे वारंवार करून देत होती! इतकेच काय की दोघांना २६९ मते पडल्यास प्रतिनिधीसभा रिपब्लिकन पक्षाकडे तर सिनेट डेमोक्रॅटिक पक्षाकडे असल्यामुळे शेवटी अध्यक्ष रॉम्नी तर उपअध्यक्ष बायडन अशी मोटबांधली जाईल की काय अशी (कु)शंकाही ही प्रसारमाध्यमे जनतेपुढे ठेवत होती. पण असे काहीही न होता शेवटी ओबामा-बायडन ही २००८ सालापासून सत्तेवर असलेली जोडीच सत्तेवर टिकून राहिली व निवडणुकीचा व्यवस्थित निकाल लागल्याने सार्‍या जनतेने निश्वास सोडला.

या निवडणुकीत दोन्ही पक्षांकडून प्रचंड खर्च केला गेला. एका सूत्रानुसार फक्त अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ओबामांनी ९३ कोटी डॉलर खर्च केले तर रॉम्नींनी १०० कोटी! त्यातले बहुतेक डॉलर्स प्रचारार्थ-मुख्यत्वेकरून चित्रवाणीवरील जाहिरातींवर-खर्च केले गेले असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. पण आपल्याकडे किंवा आपल्यासारख्या अविकसित आणि तूलनेने गरीब राष्ट्रांत जसा बराच पैसा-त्यातला बराचसा पैसा काळाअसतो-गरीब मतदारांना प्रत्येक झोपडपट्टीच्या मुखियांद्वारा रोख पैसे देऊन मते विकत घेण्यासाठी खर्च होतो तसा प्रकार अमेरिकेत होताना दिसत नाही. (धाकट्या) बुशसाहेबांच्याकर्तबगारीमुळेअमेरिकेसारख्या श्रीमंत देशातसुद्धा आज काही गरीब कुटुंबे अस्तित्वात आली असली तरी त्यांची संख्या त्यामानाने लहानच आहे आणि त्यांच्या दारिद्र्याला हलाखीचे दारिद्र्य (abject poverty)’ म्हणता येण्यासारखे नाही. शिवाय अशिक्षितपणाचे प्रमाणही कमी असल्यामुळे अमेरिकन मतदारांना आपले मत अमूल्यअसल्याची जाणीवही आहे व ते असे पैशासाठी मते विकणार्‍यातले नाहीत. शिवाय अमेरिकेत एकंदरच नगदव्यवहार कमीच आहे!
असे असले तरी अमेरिकन मतदार कुणाला मते देतील याबद्दल आडाखा बांधणे महा कठीण. माणूस एकादी चूक एकदा करू शकतो, पण इथे तीच चूक दोनदा कां केली गेली त्यामागची कारणे समजत नाहीत. (धाकट्या) बुशसाहेबांना २००० मध्ये निवडून देण्याची चूक क्षम्य मानता येईल पण त्यांना २००४ मध्ये दुसर्‍यांदा निवडून देण्याची चूक मात्र क्षम्य मानता येणार नाही. त्यामुळे हा अमेरिकन मतदार एकाद्या आवेगात, एकाद्या झटक्यात रॉम्नींना निवडून तर नाही ना देणार ही शंकेची पाल मनात चुकचुकतच होती. पण या वेळी मात्र अमेरिकन मतदारांनी योग्य मतदान करून एका सुशिक्षित आणि तारतम्याने वागणार्‍या उमेदवाराला अध्यक्षपदावर दुसर्‍या पदावधीसाठी (term) कायम ठेवले.
(धाकट्या) बुशसाहेबांनी आपल्या आठ वर्षांच्या कारकीर्दीत अमेरिकेची-खास करून अमेरिकेच्या आर्थिक परिस्थितीची-इतकी वाट लावलीआहे की तिला परत सुस्थितीत आणण्यासाठी २०-२५ वर्षे लागतील असे तज्ञांचे म्हणणे आहे. आज प्रत्यक्ष देव जरी अमेरिकेत अवतरला तरी ही पार रसातळाला गेलेली आर्थिक परिस्थिती तोसुद्धा ४ वर्षात दुरुस्त करू शकणार नाही. म्हणून 'ओबामांनी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला सुस्थितीत आणण्यासाठी आणि अगदी आटोक्याबाहेर जाऊ पहाणारे राष्ट्रीय कर्ज आवाक्यात आणण्यासाठी पुरेशा कारवाया केल्या नाहीत' ही रॉम्नींची टीका अगदीच अस्थानी वाटते.
माझ्या मतानुसार ओबामा यांचे आरोग्यसेवेबाबतचे विधेयक खरेच चांगले आहे. कारण त्यात आज पैशाआभावी विम्याच्या संरक्षणाबाहेर असलेल्या गरीबांसाठीसुद्धा विम्याची सोय होती. आरोग्या चांगले असताना विमा उतरविलेला असूनही मोठा आजार झाल्याचे कळल्यावर विमा नाकारणार्‍या स्वार्थी कंपन्यांना तसे करू न देण्याची कायदेशीर तरतूद होती. विमा कंपन्यांनी दादागिरी करू नये म्हणून अशी विम्याची सोय सरकारतर्फे विकत घेण्याचीही पर्यायी सोय ओबामांच्या विधेयकात होती. याला विरोध कां होत होता हे मला कधी कळलेच नाही. म्हणूनच रिपब्लिकन पक्ष या विधेयकाची ओबामा आरोग्यसेवा-Obamacare-या नावाने कुचेष्टा करतो ती अजिबात समर्थनीय नाही असेच मला वाटते. पण २०१० च्या निवडणुकीत काही तरी 'भलतेच' घडले आणि प्रतिनिधीसभा रिपब्लिकन पक्षाच्या ताब्यात गेली आणि सिनेटमधील त्यांचे बहुमतही घटले. असे झाले नसते तर ओबामांवे कर्तृत्व नेत्रदीपक झाले असते. माझी तर खात्री आहे की २०१४ च्या निवडणुकीत प्रतिनिधीसभा पुन्हा डेमोक्रॅट्सच्या ताब्यात न आल्यास आणि सिनेटमध्ये ६० पेक्षा जास्त प्रतिनिधी डेमोक्रॅटिक पक्षाचे निवडून न आल्यास ओबामांच्या कर्तृत्वाचा उंच कमान कुणाला दिसणारच नाही.
अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी रॉम्नींनी ठरविलेल्या योजनेची कोनशिला होती खूप श्रीमंत लोकांवरील कर कमी करायचे. त्यामागचे तत्व होते की असे केल्यास या श्रीमंत लोकांना नव्या धंद्यांत गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन मिळेल व त्यातून नव्या नोकर्‍य़ा निर्माण होतील. पण जगातील सर्वात श्रीमंत माणसात गणल्या जाणार्‍या वॉरन बुफे यांनी उद्विग्नपणे काढलेले उद्गार कुणाच्याच कसे लक्षात राहिले नाहीत? ते म्हणाले होते की त्यांच्या मिळकतीवर ते ज्या प्रमाणात कर भरतात ते प्रमाण त्यांच्या नोकरवर्गालासुद्धा ज्या प्रमाणात कर भरावा लागतो त्यापेक्षा कमी आहे आणि यामुळे त्यांना खूपच लाजिरवाणे वाटते. म्हणून त्यांनी सरकारला श्रीमंतांचे कोडकौतुक बंद करून त्यांच्याकडून जास्त कर वसूल करण्याचे आवाहन केले आहे.
ओबामांनी त्यांच्या २००८ च्या विजयाला उपयोगी पडलेले सर्व पायाभूत घटक आपल्या बाजूला राखण्यात यश मिळविले हेच त्यांच्या विजयामागचे मुख्य कारण आहे. काही ठिकाणी त्यांची पिछेहाट जरूर झाली पण त्यांना अल्पसंख्यांकांचे, तरुण, स्त्री, गरीब आणि सुशिक्षित मतदारांचे भरीव समर्थन लाभले.

'तुम्ही आम्हाला निवडून दिलेत ते आम्हा दोघांची नोकरीआणखी चार वर्षे चालू रहावी म्हणून नव्हे तर आम्ही तुम्हां सर्वांच्या नोकर्‍या सुरक्षित ठेवण्याकडे लक्ष केंद्रित करावे म्हणून. आणि अगदी नजीकच्या भविष्य काळात मी दोन्ही पक्षांच्या लोकप्रतिनिधींशी संपर्क साधून आणि त्यांच्याबरोबर वाटाघाटी करून आपल्या अर्थव्यवस्थेवर आलेले संकट निवारण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे' हे ओबामांचे त्यांच्या विजयानंतरच्या भाषणातील वाक्य माझ्या मनाला खूप स्पर्शून गेले.
तर 'तुम्हा सर्व मतदारांच्या आशा पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या आर्थिक धोरणात योग्य ते दिशाबदल करणारे नेतृत्व आपल्या देशाला देण्याची माझी खूप इच्छा होती पण देशाने दुसरा नेता निवडला. आता ओबामांच्या आणि आपल्या देशाच्या यशासाठी माझी पत्नी अ‍ॅन आणि मी तुम्हा सर्वांसह देवाकडे प्रार्थना करतो' या रॉम्नींच्या उद्गारांनी त्यांच्या अनेक समर्थकांचे डोळे नक्कीच ओलावले असतील.

ही निवडणूक इतकी अटीतटीची आणि चुरशीची झाली की बर्‍याच लोकांना वाटू लागले की अमेरिका आज जितकी दुभंगलेली दिसते तितकी या पूर्वी कधीच दिसली नव्हती. माझ्या भूतपूर्व अमेरिकन बॉसला मी अलीकडे गमतीने म्हणालो होतो तुझ्या देशाचे 'अमेरिकन संयुक्त राज्ये (United States of America)' हे नाव बदलून 'अमेरिकन विभक्त राज्ये (Divided States of America)' असे ठेवायला हवे! तोही हसायचा. चित्रवाणीवरील चर्चासत्रे पाहिल्यानंतर मला असे वाटू लागले होते की ही निवडणूक मोहीम खूप कडवट आणि विखारी होत चालली आहे. पण या निवडणूक-युद्धांपेक्षा जास्त कडवट आणि विखारी मोहिमा आधी झालेल्या आहेत. पण मतदार जरी खूप बरोबरीने आणि खोलवर विभागले गेलेले दिसत असले आणि वरवर पहाता अमेरिका एक समाज म्हणून विभागलेली आहे असे वाटत असले तरी एक 'देश' या नात्याने ती विभागलली आहे असा त्याचा अर्थ होत नाही.
१८२० सालानंतरच्या अध्यक्षपदाच्या बहुतेक निवडणुका नेहमीच चुरशीच्या झालेल्या आहेत[१]. १९६४ च्या निवडणुकीत लिंडन जॉन्सन यांना मिळालेली ६१.५ टक्के मते टक्केवारीच्या दृष्टीने इतर कुठल्याही अध्यक्षाला मिळालेल्या मतांपेक्षा जास्त आहेत. त्यांच्याखेरीज फक्त वॉरन हार्डिंग (१९२०), फ्रॅन्कलिन रूझवेल्ट (१९३६) आणि रिचर्ड निक्सन (१९७२) या तीन अध्यक्षासुद्धा ६० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाली आहेत.
नऊ निवडणुकांत विजेत्या उमेदवाराला ५५ टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाली तर ५० टक्क्यांपेक्षा कमी मते मिळवून निवडणूक जिंकणारे १८ उमेदवार होते. त्या अठरा निवडणुकांत अब्राहम लिंकन यांची पहिली निवडणूक, केनेडींची एक, निक्सन यांची पहिली तर क्लिंटन यांच्या दोन्ही निवडणुका खास उल्लेखनीय आहेत. उरलेल्या १६ निवडणुकांत विजेत्याला ५० ते ५५ टक्क्यांच्या मध्ये मते मिळाली. त्यातल्या कित्येक निवडणुकांत त्यांना जेमतेम ५० टक्के मते मिळाली. याचा अर्थ झाला, की जवळ-जवळ निम्म्या मतदारांनी त्यांच्या विरुद्ध मतदान केले. म्हणजेच निवडणुकांच्या बाबतीत अमेरिका नेहमीच खोलवर विभागलेला देश आहे इतकेच नव्हे तर कित्येक वेळा अध्यक्ष अल्पमताने निवडून आलेले आहेत. गमतीची गोष्ट अशी की ६० टक्क्यांहून जास्त मते मिळविलेल्या चार अध्यक्षांपैकी फक्त फ्रॅन्कलिन रूझवेल्ट यांचीच आठवण अनुकूल राहिली आहे.
थोडक्यात स्वातंत्र्यप्राप्तीनंतरची २०० वर्षे या देशात ५७ निवडणुका झाल्या त्यातल्या पहिल्या ९ निवडणुका आमने-सामने पद्धतीने झालेल्या नाहीत [१]. त्यानंतरच्या ४८ निवडणुकांमध्ये मात्र आतासारख्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांत मतदारांत सतत दुही पडलेली दिसते. त्यात तीन गोष्टी स्पष्टपणे दिसतात. क्वचितच ६०-४० अशा फरकाने निवडणुकांचा निकाल लागला, ५० टक्के-५०टक्के अशा फरकाचे विभाजन जास्त सामान्य आहे ही पहिली गोष्ट. जेव्हा निवडणुकीच्या रिंगणात तीन उमेदवार होते अशा वेळी विजेते उमेदवार ४५ टक्क्यापेक्षा कमी मते मिळवून निवडून येण्याची पाच उदाहरणे आहेत ही दुसरी गोष्ट तर अध्यक्षपदाच्या निवडणुकीत २६ विजेते उमेदवार ५२ टक्क्यापेक्षा कमी मते मिळवू शकले ही तिसरी!
गेली २०० वर्षे अगदी एकतर्फी झालेल्या निवडणुकातसुद्धा ४० टक्के मतदारांनी आणि एरवी त्याहून जास्त मतदारांनी लोकप्रिय विजेत्याविरुद्ध मतदान केले आहे. आणीबाणीची परिस्थिती असताना किंवा विरोधी उमेदवार दुबळा असतानासुद्धा निवडणुकांवर या बाबीचा परिणाम झालेला दिसत नाही. पण १८६० ची अपवादात्मक निवडणूक सोडल्यास[२] अशा दुहीमध्येसुद्धा सरकारला कधीच आव्हान देण्यात आलेले नाही. उलट सततची दुही असूनही असे सरकार जोशात कारभार करू शकलेले आहे.
राजकीयदृष्ट्या उदासीन मतदार
मग या अटीतटीच्या निवडणुका खोलवर रुजलेल्या दुफळीचे लक्षण आहे की हा मतदारांमधील ठोस प्रमाणावर मतदान करायला जाण्याबद्दलच्या उदासीनतेचा परिणाम आहे?
अमेरिकेत निवडणुकीच्या दिवशी सुटी नसते किंवा ही निवडणूक शनिवारी-रविवारीही नसते ही खरेच मोठी गैरसोयीची गोष्ट आहे. कांही मोजक्या राष्ट्रांतच लोकांना निवडणुकीच्या दिवशी अमेरिकन मतदाराप्रमाणे कामावर किंवा शाळा-कॉलेजात जावे लागते. मुलांना शाळेत पोचविणे, स्वतः कामावर जाणे आणि कामावरून घरी परतताना मुलांना शाळांतून घरी आणणे, स्वयंपाक करणे या सर्व व्यापांत मतदान करायच्या कर्तव्याची निकड कांहीशी बोथट होते आणि म्हणून वयस्क, सेवानिवृत्त मतदारच मतदानाबाबत जास्त उत्साही असतात तर तरुण मतदार काहीसे उदासीन असतात. फक्त १८६०[२] मध्ये कडवा दुरावा निर्माण झाला होता त्यावेळी मतदानाचे प्रमाण वाढले होते आणि हिंसाचार उफाळला होता. पण हा एक अपवाद सोडल्यास अध्यक्षपदाच्या निवडणुकांची परिणती असंतोषात कधीही झालेली नाही. म्हणून कमी मतदानाचे मूळ सर्वत्र पसरलेला दुरावा नसून मतदानाबद्दलचे औदासिन्य असावे. दुसर्‍या शब्दात सांगायचे झाल्यास मुलांना त्यांच्या शाळातून वेळेवर घरी आणणे हे अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालाहून जास्त महत्वाचे आहे असेच बर्‍याच मतदारांना वाटते असावे!
दोन्ही उमेदवारांबद्दल सारखीच पसंती असणे किंवा अध्यक्ष आणि राजकारण या दोन्ही बाबतीत मतदारांना वाटणारी उदासीनता हेसुद्धा कमी मतदानाचे आणखी एक कारण असू शकते. ओबामा आणि रॉम्नी हे दोघे जितके जनतेला दाखवितात तितके ते मतदारांना वेगळे वाटत नसावेत आणि कुणीही निवडून आला तरी सारखेचअसे या मतदारांना वाटत असावे म्हणून ते ते मतदान करायलाच जात नसावेत हीसुद्धा शक्यता आहे. अमेरिकेच्या संस्थापक नेत्यांनी बनविलेल्या राज्यघटनेत अध्यक्षपदाला अगदीच दुबळे ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे राजकीयदृष्ट्या उदासीन असलेले मतदार खास करून अध्यक्षांच्या अधिकारांच्या सीमा जास्त धूर्तपणे ओळखत असावेत!
जेव्हा एकाद्या खूप लोकप्रिय विचारप्रणालीकडे लोकमत झुकते तेव्हा ते त्या विचारप्रणालीला उभारी देते. कधी-कधी राष्ट्रीय आणीबाणीमुळे एकादा पक्ष एका गटाला खूप मोठ्या प्रमाणावर आकर्षित करून या स्वतंत्र मतदारांना आपल्याकडेघाऊकपणे खेचू शकतो. आणीबाणीच्या काळात विरुद्ध विचारसरणीबाबत पराकोटीचा खुन्नस व्यक्त करणारे वाक्प्रचार, शब्दप्रयोग बनविले जातात. अशा वेळी ६० टक्क्याइतकी व्यापक अनुकूलता असणार्‍या युती सहजपणे बनू शकतात. पण तरीही ४० टक्के लोकांची मते प्रतिकूल दिसतातच. म्हणजेच ४० टक्के मतदार कुठल्याही परिस्थितीत आपल्या पक्षाच्या विचारप्रणालीपासून विचलित होत नाहीत. पण २० टक्के मतदारांचे मतपरिवर्तन होत रहाते. असे मतदार कधी एका बाजूने तर कधी दुसर्‍या बाजूने मतदान करतात.
पण असे प्रसंग त्यामानाने क्वचित् येतात. अमेरिकेच्या दृष्टीने फारच क्वचित्. अमेरिकेत सर्वसाधारण निवडणुकात मताधिक्य खूपच कमी असते. उदाहरणार्थ ओबामा-रॉम्नी लढतीत दोन्ही उमेदवारांना अगदी सारखीच मते पडली आहेत. याचे कारण असे आहे की दोन्ही पक्षातले कट्टर सभासद आपल्या पक्षांच्या फारशा कट्टर नसलेल्या मतदारांना धरून ठेवू शकत नाहीत, ते मतदार त्या-त्या पक्षाच्या बाह्य कक्षेतच रहातात आणि त्यामुळे हे २० टक्के स्वतंत्र मतदार स्वतःची मते त्यांच्या-त्यांच्या मर्जीनुसार, त्यांच्या कमी-जास्ती उत्साहानुसार (किंवा उदासीनतेनुसार) देतात. त्यामुळे शेवटी मतांची जंत्री केल्यावर त्यातला फरक अगदीच थोड्या टक्क्यांनी इकडे-तिकडे होतो. विजेत्याला ५५ टक्क्यांपेक्षा कमी मताधिक्य मिळालेल्या निवडणुकात ही उदासीनता मोठ्या प्रमाणावर दिसते. अशा निवडणुकांत केवळ ५ टक्के मतदारांनी आपली बाजू बदलली की ती निवडणूक अतीशय चुरशीची होऊन जाते.
पक्षातल्या या कट्टर ढुढ्ढाचार्यांना जरी प्रत्येक निवडणूक अगदी अर्थपूर्ण वाटत असली तरी प्रसारमाध्यमे आणि समालोचकसुद्धा या निवडणुकांकडे त्या दृष्टिकोनातून पहात नाहीत. बहुतेक सार्‍या निवडणुका फारच थोड्या बाबतीत निर्णायक ठरतात आणि लगेच विसरल्याही जातात. बहुतेक मतदारांच्या बाबतीत असल्या मतभेदाची परिणती जास्त संख्येने मतदान करण्याच्या बाजूने होत नाही. बहुतेकांना 'आली आणखी एक प्रक्षोभाला आणि आवाजाला प्रोत्साहन देणारी पण काहीच साध्य न करू शकणारी वांझ निवडणूक' असेच वाटते व त्यामुळे ते मतदानाच्या बाबतीत उदासीनच रहातात.
पन्नास टक्के मतदार मतदानाचा हक्कच बजावत नाहीत हे त्यांच्या निवडणुकांबद्दलच्या नगण्य मताचे द्योतक आहे. समाजाच्या या गटाला या निवडणुकीच्या निकालाशी काहीच देणे-घेणे नसते. त्यामुळेच मतदानाचे प्रमाण खूप कमी होताना दिसते[३].
पण यावेळी निवडून आलेले अध्यक्ष ओबामा हे एक विचारी अध्यक्ष आहेत आणि ते अमेरिकेला आणि सार्‍या जगाला ऐश्वर्याच्या नव्या उंचीवर घेऊन जातील अशी आपण आशा करूया. या कामात माझ्याप्रमाणेच सगळेच लोक त्यांना नक्कीच सुयश चिंततील.
या लेखातील अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबतची माहिती 'स्ट्राटफोर' या संस्थेच्या जॉर्ज फ्रीडमन यांच्या 'U.S. Presidential Elections in Perspective' या लेखावरून घेतली आहे. तसेच अमेरिकेच्या अध्यक्षांच्या निवडणुकीबद्दलची काही माहिती http://en.wikipedia.org/wiki/United_States_presidential_election या दुव्यावरून घेतली आहे.
[१] पहिल्या ९ निवडणुकांत सर्वांत जास्त मते मिळविलेला उमेदवार अध्यक्ष बनत असे व दुसर्‍या क्रमांकावर मते मिळविलेला उमेदवार उपअध्यक्ष बनत असे.
[२] १८६० मध्ये गुलामगिरीच्या प्रश्नावरून अमेरिका अगदी दोन तुकड्यात विभागण्याचा धोका निर्माण झाला होता आणि उत्तर आणि दक्षिण अमेरिकेतल्या राज्यांमध्ये निकराचे यादवी युद्धसुद्धा लढले गेले. पण अब्राहम लिंकन यांनी ते युद्ध जिंकून अमेरिकेला दुभंगू दिले नाही.
[३] भारताच्या बाबतीतही परिस्थिती हळू-हळू अशीच होत चालली आहे. भारतीय मतदारांनासुद्धा सारे पक्ष सारखेच कार्यक्षम किंवा सारखेच भ्रष्ट वाटू लागले आहेत. १९७७ सालची इंदिरा गांधींचा पराजय करणारी आणि १९८० मध्ये त्यांना परत प्रचंड बहुमताने विजयी करणारी निवडणूक सोडली तर आज भारतीय मतदारही उदासीन होत चालला आहे व त्यामुळेच युती सरकारांच्या युगाचा भारतात नव्याने उदय झालेला आहे.
हा लेख १५ नोव्हेंबर रोजी ई-सकाळवर प्रकाशित झाला. दुवा आहे:
http://www.esakal.com/esakal/20121115/4778547505914392728.htm

सकाळच्या वाचकांच्या प्रतिक्रिया:
Sudhir Kale (Author) - रविवार, 2 डिसेंबर 2012 - 09:40 AM IST
Mr Jignesh, I refer to "श्री काळे, आपला व्यासंग प्रचंड आहे यात शंका नाही. तरीसुद्धा आपण श्री ओबामा यांच्या बद्दलचेविधान लिहिले होते. रहम मनुएलबद्दल नाही." Just for academic reasons, I wish to have the article in which I had written about my ex-Boss having called Obama as a Chicago thug! My ex-boss and I may differ on issues, but he never called Obama like that. However, he did call Rahm by that adjective. At the most he might have said that the Chicago's Democratic Party "machinery" (with thugs) will steal the election, but never he said anything like that about Obama. Just trying to clear some cobwebs because you also said under the article by Mr Sonawane " वरदान मिळालेले ओबामा की जन्मजात श्रीमंत रोम्नी": "बाकी एक इंडोनेशियाचे एक शहाणे लेखक हार्वर्ड ओबमाना शिकागोतील एक gangstar म्हणाले होते." I think this is really unfair of you! You can reply to me on my personal e-mail ID "sbkay@hotmail.com" or here as per your choice, but do reply.
===============
सुधीर काळे (मूळ लेखाचा लेखक) - बुधवार, 28 नोव्हेंबर 2012 - 08:50 PM IST
विश्वनाथसाहेब, चांगलेच विषयांतर होतेय्! अमेरिकेची अध्यक्षीय निवडणूक या विषयावरील लेखाला आपण दिलेल्या प्रतिसादातून आपल्याला नेमके काय सांगायचे आहे ते कळले नाहीं! कृपया उलगडा करावा! 
===============
Vishwanath - बुधवार, 28 नोव्हेंबर 2012 - 04:59 PM IST
आपला देश म्हणजे स्वर्ग आहे. इतकी विविधता असून सुद्धा आपण सारे टिकून आहोत. राजवाडे यांचे मानवी संस्कृती वरचे ग्रंथ वाचा म्हणजे कळेल कि आपण कसे आहोत. आपली विभागणी होण्यासारखी हजारो कारणे आहेत तरी आपण सारे एक्जीवपणे राहत आहोत. सुमारे वीस वर्ष पूर्वी मी कतार येथील चाळीस हजार पगाराची नोकरी घेतली नाही कारण मला माझे स्वांतत्र्य गमवायचे नव्हते. पुनर्जन्मावर माझा विश्वास नाही.या माझ्या प्रीय देशात जेवढे आयुष्य व्यतीत करता यईल तेवढे करायचे. 
===============
Sudhir Kale (Author) - मंगळवार, 27 नोव्हेंबर 2012 - 08:23 AM IST
Mr. Shivanchitalz, I haven't come across any reference regarding such expenditures as mentioned by you in my own reading. Could you please give me the links? But I spotted a contradiction in your response. If National Football Association and National Hockey Association are Non-profit organizations, how could they be "making billions" as written by you? Could you please give me the links? Also unless one knows the details about the comedy troupe & objective behind its trip to India, I can't comment on the expenditure of $100,000 spent by US! Could you please give me these details? 
===============
shivanchitalz - सोमवार, 26 नोव्हेंबर 2012 - 06:28 PM IST
sbkay, Washington should and can raise taxes on rich people and bring it to the level that Mr. Buffett is suggesting. However, Washington has the spending problem, not the revenue problem as they make us believe. Do you know that American government paid $100,000 for a comedy troupe to perform in India. Do you know that both National Football Association and National Hockey Association are Non-profit organizations? And we, as taxpayers, pay 91 million dollars to support them when they are making billions.There is enormous fraud, waste and abuse in the system. 
===============
Jignesh - गुरुवार, 22 नोव्हेंबर 2012 - 09:04 PM IST
श्री काळे, वर्णभेदाचा सगळ्यात जास्त फायदा आतापर्यंत गोर्या लोकांन मिळाला आहे ते काळ्या लोकांना संधी न देऊन. श्री ओबामांचे हेच म्हणणे आहे की संधी सगळ्यांना मिळाली पाहिजे. आपापल्या वकुबाप्रमाणे कोणी मित्तल बनेल तर कोणी अधिकारी. ओबामांचा विजय हा अमेरिकन समाजातील जी पारंपारिक सत्तास्थाने आहेत जसे श्रीमंत लोक, चर्च, भ्रष्ट राजकारणी त्यांच्यापासून मुक्ती आहे. त्याला गोर्यांवर बाकी लोकांचा विजय समजणे फार सरळधोपट होईल. गोर्या स्त्रियांनी, तरुण गोर्या लोकांनी ओबामा यांना मत दिले. रिपब्लिकन पक्षाला सरसकट वर्णद्वेष्टे समजणे चुकीचे आहे. त्या पक्षातपण मध्यममार्गी बरेच आहेत पण सध्या तो पक्ष कर्मठ लोकांनी ताब्यात घेतला आहे. जोन बेनर स्वत मध्यममार्गी आहेत पण कर्मठ लोक त्यांचेच ऐकत नाहीत. 
===============
Sudhir Kale (Author) - गुरुवार, 22 नोव्हेंबर 2012 - 02:49 PM IST
मी लक्ष्मी मित्तल यांच्याबरोबर ६ वर्षे जवळून काम केलेले आहे, त्यांची काम करण्याची पद्धत मी जवळून पाहिली आहे. आम्ही बरेच भारतीय अधिकारी रोज एका टेबलावर दुपारचे जेवणही घेत असू. तसेच एकमेकांच्या घरीही वेळोवेळी गेलेलो आहे. त्यांच्या कार्यक्षमतेबद्दल मला माहिती नसेल तर कुणाला असेल? ते एक किरकोळ कारखानदार होते त्याचे आज "पोलादसम्राट" झाले ते अगदी माझ्यासमोर! थोडे-फार माझ्या मदतीनेसुद्धा. त्यांनी भ्रष्टाचार केला कीं नाहीं हे मला माहीत नाहीं पण त्यांच्या यशात त्यांचे कुशाग्र बुद्धिचातुर्य आणि धडाडी हेच मुख्य घटक आहेत हे मात्र खरे! नशीबानेही थोडी-फार साथ नक्कीच दिली. पण मुख्य घटक आहेत बुद्धिचातुर्य आणि धडाडी हे नक्की. सुहार्तोसुद्धा जनतेत लोकप्रिय होते, जनता त्यांचा आदरही करत असे. त्यांनी जर शेवटची निवडणूक लढवली नसती तर ते हिरो ठरले असते. पण नियतीच्या मनात कांहीं दुसरेच होते.
===============
Sudhir Kale (Author) - गुरुवार, 22 नोव्हेंबर 2012 - 02:35 PM IST
जिग्नेश-जी, मग काय मतभेद उरले? मी स्वत: हेच म्हणत आलेलो आहे कीं रिपब्लिकन पक्षाचे बहुतेक सर्व प्रतिनिधी आणि सिनेटर विशेषत: अमेरिकन प्रतिनिधीगृहाचे रिपब्लिकन सभापती जॉन बेनर हे पक्के वर्णद्वेष्टे आहेत आणि ओबामा कृष्णवर्णीय असल्यामुळेच हा पक्ष आणि बेनर त्यांना राज्यकारभारच करू देत नाहीं आहेत. पण याउलट गोरे लोक म्हणतात (यात माझा भूतपूर्व बॉसही आला) कीं वर्णभेदाचा सगळ्यात जास्त फायदा झाला तो ओबामांना. आणि ओबामांच्या पाठीराख्यांचे विश्लेषण केल्यास ते खरेही आहे कारण त्यांना अल्पसंख्यांकांची मते भरपूर मिळाली आहेत (कृष्णवर्णियांची ९३ टक्के, लॅटिन मतदारांची ७१ टक्के व आशियाई अमेरिकनांची ७३ टक्के). पण म्हणून बेनरसारखे लोक त्यांच्या कुठल्याही कार्यक्रमांना यशस्वी होऊ देवू इच्छित नाहींत. म्हणूनच मी लिहिले आहे कीं २०१४मध्ये प्रतिनिधीगृहात बहुमत मिळाले आणि सिनेटमध्ये ६० पेक्षा जास्त प्रतिनिधी डेमोक्रॅटिक पक्षाचे निवडून आले तरच ओबामांच्या कल्पनांना मूर्तस्वरूप येईल. 
===============
Jignesh - गुरुवार, 22 नोव्हेंबर 2012 - 01:47 AM IST
श्री काळे, मी आपणास वर्णद्वेष्टा,जात्यंध म्हणालो नाही. श्री ओबामांच्या धोरणाचा किंवा विचारांचा विरोध असू शकतो. मी त्यांचा समर्थक असूनसुद्धा त्यांच्या काही निर्णयांचा आणि धोरणांचा विरोध करतो. पण अमेरिकेत ओबामांना जो विरोध होतो तो बराच वर्णद्वेष् आधारित आहे. हे आपण त्यांना जी मते पडली त्याचे विशेल्षण केले तर लगेच कळेल. जी गोरी मते त्यांना मिळाली ती बहुतेक बिल क्लिंटन यांच्या मूळे. केवळ 25% गोर्या पुरुषांनी त्यांना मत दिले. छोटे बुश यांच्या कारकिर्दीत सर्व उच्चभ्रू लोकांनी येथेच्छ हादडले. पण भारतात आपण घरचे भांडण रस्त्यावर नेतो अमेरिकेत तसे करता येत नाही.
===============
Yogesh Pingle, Pune - बुधवार, 21 नोव्हेंबर 2012 - 11:01 PM IST
लेखक महोदय, आपण म्हणत आहात कि आपली लोकशाही हि फक्त ६२ वर्षांची असून बाल्यावस्थेत आहे हे काही पटत नाही...या सतत बदलत जाणाऱ्या आणि प्रगत होणाऱ्या जगात आपण असे समर्थन नाही करू शकत..अनेक राष्ट्रे अशी आहेत कि त्यांनी खूप कमी कालावधीमध्ये प्रगती केली आहे... आपण मात्र अजून national character building निर्माण नाही करू शकलो. दुसऱ्या मुद्द्यावर मात्र दुमत नाही...ओबामा हे खाच खूप चांगले व्यक्ती आहेत...युद्धां ऐवजी ते पायाभूत सोयी सुविधा यामध्ये गुंतवणूक करण्याची भाषा करतात...पण गेल्या चार वर्षात त्यांना रिपब्लिकन पक्षाने सहकार्य केले नाही... खरच अमेरिकन नागरिकांनी त्यांना निवडून एक ऐतिहासिक संधी वाया घालवली नाही.... मला वाटते कि ते लिंकन, रूझवेल्ट, केनेडी नंतरचे सर्वात चांगले अध्यक्ष आहेत... बाकी तळटीप क्र. २ चा आदर्श एम के गांधीनी घ्यायला हवा होता...तरीहि आपण गांधीना founding father म्हणतो.. 
===============
preeti - बुधवार, 21 नोव्हेंबर 2012 - 06:16 PM IST
भ्रष्टाचार करणारे लक्ष्मी मित्तल - कार्यक्षम, इंडोनेशियामधला भ्रष्टाचार - consultancy फी, हजारो माणसे मारणारा सुहार्तो चांगला नेता, त्याने केलेला नरसंहार त्यावेळच्या परिस्थितीला धरूनच. छान स्वसमजूत काढता आपण. खरच स्वताला वाटेल तेच खरे मानणारे असल्यामुळे तुम्ही आयओसी (अण्णांचे पाठीराखे) सदस्य म्हणून शोभाल. 
===============
Sudhir Kale (Author) 3rd attempt - बुधवार, 21 नोव्हेंबर 2012 - 03:35 PM IST
मी ओबामांचा पहिल्यापासून प्रशंसक आहे! माझी ’जकार्ता पोस्ट’ आणि”डॉन’मध्ये प्रसिद्ध झालेली पत्रे वाचा खालच्या दुव्यांवर! त्यातले Does Obama stand for change? हे पत्र ओबामांनी भारताविरुद्ध विधान केल्यामुळे त्यांच्या विरोधातले आहे बाकी सर्वात त्यांची प्रशंसाच आहे. तरी मी वर्णद्वेष्टा, जात्यंध? धन्य! आपलेच मन तपासून पहा, जिग्नेश-जी! Obama & racism in America: www.dawn.com/2008/04/18/letted.htm#2 Obama Nomination: http://www.thejakartapost.com/news/2008/06/14/sms-obama-nomination.html Obama victory: http://www.thejakartapost.com/news/2008/11/06/letter-obama-victory.html Obama’s victory is historic: http://www.thejakartapost.com/news/2009/01/28/obama039s-victory-historic.html Obama makes Israel uncomfortable: http://www.thejakartapost.com/news/2009/06/18/letters-obama-makes-israel-uncomfortable.html Does Obama stand for change?: http://www.thejakartapost.com/news/2009/07/30/letters-does-obama-stand-change.html Obama 2.0: http://www.thejakartapost.com/news/2012/11/10/your-letters-obama-2-.html 
===============
Sudhir Kale (Author) 4th attempt - बुधवार, 21 नोव्हेंबर 2012 - 03:33 PM IST
Dear Mr Risbud, I suggest you to read a book "Being Indian" by Mr Pavan Kumar Verma, our current ambassador in Bhutan. It discusses why we are corrupt, why we committed treason (and still do), why democracy succeeded in India, etc. It is a painful experience but takes you to instant adulthood. It holds a mirror in front of the reader. Pl do read it. We get a government we deserve. I also was enamoured by military dictatorship, but not anymore. If you see history of dictatorships in the world, you will conclude that none did any good. There is nothing like 'benevolent' or 'temporary' dictatorship. 
===============
सुधीर काळे (या लेखाचा लेखक) (दुसरा प्रयत्न!) - बुधवार, 21 नोव्हेंबर 2012 - 01:31 PM IST
प्रीतीताई, माझे चीनवरचे दोन लेख वाचले नाहींत वाटते. तसेच महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रकाशित झालेला खालील लेखही http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17151620.cms इथे वाचा. (प्रशस्त वाटत असेल तर) आपला ई-मेल मला माझ्या sbkay@hotmail.com या पत्त्यावर कळवा म्हणजे मी माझे सगळेच लेख तुम्हाला पाठवून देईन. सुहार्तोसाहेबांनी इंडोनेशियाची अजीबात वाट लावली नाहीं. माया केली असेल पण या देशाला खूप प्रगतीवर नेऊन बसविले. आजही लोक त्यांच्या काळच्या गुन्हेगारीरहित परिस्थितीची इथल्या इंडोनेशियन भाषेतील वाहिन्यावर स्तुती करतात. त्यांच्याकडून नक्कीच नरसंहार झाला पण त्यावेळी परिस्थिती अशी होती कीं तसे केले नसते तर ते स्वत:च मारले गेले असते. असो. यानंतरची तुमची फर्माइश ’ब्राझील’बद्दल असेल असा तर्क करून त्या दिशेला वळत आहे. धन्यवाद. 
===============
Sudhir Kale (Author) 3rd attempt - बुधवार, 21 नोव्हेंबर 2012 - 12:46 PM IST
रिसबूडसाहेब, भारतात पहिल्या दिवसापासून आजपर्यंत (दीड वर्षांची आणीबाणी वगळता) लोकशाही राबविली गेली हाच अत्यंत अभिमानाचा मुद्दा आहे. परंतु या लोकशाहीने सगळीकडे भ्रष्टाचार माजविला आहे. पण असे फक्त भारतातच झाले आहे असे नाहीं. इतर लोकशाही राजवटींमध्येही असे झाले आहे. निक्सन यांचे उपराष्ट्रपती स्पिरो अॅेग्न्यू हे यांनासुद्धा राजीनामा द्यावा लागला होता. लिंडन जॉन्सन आणि डिक चेनी यांच्याबद्दलही खूप कुजबूज होती. इतरत्र चालते म्हणून आपणही भ्रष्ट असावे असे नाहीं, पण अगदी चीनचे मावळते पंतप्रधान वेन ज्याबावसुद्धा त्याला अपवाद नाहींत (इथे वाचा त्याबद्दल http://m.indianexpress.com/news/wen-family-s-hidden-billions/1022617/). भ्रष्टाचाराला आपणच जन्माला घालतो व मग तो आपल्या छाताडावर बसतो! एक भ्रष्टाचार सोडला तर आपली लोकशाही तशी बरी चालली आहे. अनेक भाषा बोलणारे, अने धर्म पाळणारे, अठरापगड जातीचे लोक असूनही ती चालली आहे हेच नवल नाहीं कां? आपल्या देशाने इतक्या अडचणी असूनही नेत्रदीपक प्रगती केलेली आहे यात शंका नाहीं आणि ती पाहून मला वाटू लागले आहे कीं देव नक्कीच आहे आणि तोच आपला देश चालवितो आहे!
===============
Preeti - मंगळवार, 20 नोव्हेंबर 2012 - 06:05 PM IST
काळे साहेब जरा इंडोनेशियाबद्दल सुधा लिहा ना. अमेरिकेची लोकशाही किंवा पाकिस्तानमधली हुकुमशाही ह्यांच्या बद्दल लोक अनभिज्ञ आहेत असा बिलकुल नाही. सुहार्तोने लावलेली इंडोनेशियाची वाट असा लेख लिहिला तरी चालेल. 
===============
Kedar Risbud - मंगळवार, 20 नोव्हेंबर 2012 - 12:57 AM IST
काळेसाहेब, ६२ वर्षांच्या 'लोकशाही'ला मी काही 'बाल्यावस्थे'तली म्हणणार नाही. आणि या ६२ वर्षांत जगातील इतर लोकशाही पद्धतींचा अभ्यास करून त्यावरून काही चांगलं शिकणं वगैरे आहे की नाही? की सदैव आपलं माझंच खरं? (दुसराच शब्दप्रयोग करणार होतो, पण काही 'सोज्ज्वळ' लोक त्याला आक्षेप घेतील. असो.) उलट एकूणच भारतीय 'लोकशाही'ची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडतच चालली आहे. आजचा सडलेला समाज सुधारायला अण्णांची आंदोलनं नाहीत तर मर्यादित ठोकशाहीच हवी. आज गुजरातचा अपवाद वगळता काश्मीरपासून तमिळनाडूपर्यंत आणि महाराष्ट्रापासून ईशान्य भारतातील राज्यांपर्यंत सर्व सरकारे, बाळासाहेब ठाकरे म्हणत असत त्याप्रमाणे, या ना त्या कारणाने मुन्नीपेक्षाही बदनाम झाली आहेत. 
===============
Sudhir Kale (Author)-2nd attempt - शनिवार, 17 नोव्हेंबर 2012 - 08:11 AM IST
Mr. Vijaykumar, even my own sister and her husband voted early but it is still not widely used option. Also the Republican Administration in their home state (Florida) apparently put a lot of obstacles in the way as most of the early voters are low-income blue collar, African-American or Latino voters known for their preference for Obama. Though not 100% sure and so I stand corrected, but my own impression is that "early voting" a relatively new phenomenon in USA and has yet to reach all levels of electorate, particularly less educated. This is also the opinion of Stratfor author, but I got a personal input from my own US relatives that early voting is quite a new procedure. Another close relative of mine also voted on the day of voting. [Thanks to "Sandy", it was a holiday this year in his state.] 
===============
Sudhir Kale (Author) - शनिवार, 17 नोव्हेंबर 2012 - 08:07 AM IST
रिसबुडसाहेब, १०० टक्के सहमत! पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. २६ जानेवारी १९५० साली जन्मलेली आपली लोकशाही बाल्यावस्थेत आहे. फक्त ६२ वर्षे वयाची! अमेरिकेची आहे २००+ वर्षे वयाची आणि इंग्लंडची तर शेकडो वर्षे जुनी! तेंव्हां आपल्यालाही जरा वेळ हवाच. फक्त काळजीची गोष्ट इतकीच कीं आपण पुढे चाललो आहोत कीं मागे हेच कळेनासे झाले आहे. म्हणूनच मी अण्णा हजारे यांच्या चळवळीचे समर्थन करतो. आपला समाज किडत चालला आहे त्याला सुधारायला असेच स्वच्छ नेते हवेत! 
===============
Kedar Risbud - शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2012 - 08:01 PM IST
एवढी मोठी निवडणूक अमेरिकेत दर चार वर्षांनी होते, पण 'जनसामान्यांचे लाडके नेते माननीय अमुकअमुक' किंवा 'सर्वसामान्यांचे लोकप्रिय प्रतिनिधी माननीय तमुकतमुक' वगैरेंच्या दंतपंक्ती दाखवणा-या पोस्टर्सनी विद्रुप केलेल्या भिंती, त्यांचे ५०-१०० फूट उंचीचे राक्षसांसारखे अंगावर येणारे cutouts हे प्रकार नाहीत. उलट निवडणुक झाल्यावर विशिष्ट कालावधीनंतरही ज्या उमेदवारांची लहानलहान पोस्टर्सही सार्वजनिक जागांमधून काढली जात नाहीत त्या उमेदवारांकडून दंड आकारण्याची स्थानिक सरकारी व्यवस्थापनांना कायदेशीर मुभा आहे. या लेखासोबतचे फोटो पहा. उमेदवार किंवा विजेता कोणत्याही पक्षाचा असो, अमेरिकेच्या ध्वजाखेरीज इतर कोणताही ध्वज फोटोत नाही. याला म्हणतात राष्ट्रप्रेम. 
===============
Jignesh - शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2012 - 07:24 PM IST
श्री काळे, आपला व्यासंग प्रचंड आहे यात शंका नाही. तरीसुद्धा आपण श्री ओबामा यांच्या बद्दलचे विधान लिहिले होते. रहम मनुएलबद्दल नाही. तुम्ही डेली वरिष्ठ बद्दल लिहिले ते खरे आहे. पण तो जुना इतिहास आहे. त्यावेळी उघड नव नाझी परेड शिकागोच्या रस्त्यावर चालत आणि KKK यांची दहशत काळ्या वस्त्यांवर असे. आज काळ बदलला आहे. गुंड आज रिपब्लिकन पक्षात आहेत पैशाचा माज आलेले. आपण केवळ गोरे आहोत म्हणून महान आहोत असे वाटणारे लोक पराभवानंतर दिल मे दर्द लेके चुपचाप बैठे है. जसे भारतात आपण केवळ ब्राम्हण आहोत म्हणून बुद्धिवान आहोत असे समजणारे बरेच आहेत. IQ १०० च्या कमी असला तरी. 
===============
Sudhir Kale (Author) - शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2012 - 04:36 PM IST
Jignesh-ji, he had called the current mayor of Chicago Mr Rahm Emanuel (incidentally the first Jewish mayor) as thug. Mayor Daley (1955 to 1976) was known for shrewd party politics and was a stereotypical machine politician, and his Chicago Democratic Machine, based on control of thousands of patronage positions, was instrumental in bringing a narrow 8,000 vote victory in Illinois for John F. Kennedy in 1960. A PBS documentary entitled "Daley" explained that Mayor Daley and JFK potentially stole the 1960 election by stuffing ballot boxes and rigging the vote in Chicago. In addition, it reveals, Daley withheld many votes from certain wards when the race seemed close. May be his opinion is based on this event! (You can read more on http://en.wikipedia.org/wiki/Richard_J._Daley) 
===============
vijaykumar - शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2012 - 09:54 AM IST
नोंदणी केलेल्या मतदारांना मतपत्रिका २ आठवडे आधीच पोस्टाने येते, मी माझे मत नेहमी पोस्टाने पाठवतो आणि ह्या वेळेसही माझे मत आधीच पाठवून दिले होते. प्रत्यक्ष जावून तुम्हाला मत द्यावे लागत नाही त्यामुळे लेखकाचा मुद्दा अयोग्य वाटतो. 
===============
sbkay@hotmail.com - गुरुवार, 15 नोव्हेंबर 2012 - 08:22 PM IST
shivanchitalz-ji, good point. But the only answer is what Warren Buffet said. He pays just 11% tax on his income & says he is embarrassed by that. In India, it is common to pay 30% tax in that bracket. Only taxing the 'filthy rich' can solve this problem. I think Obama is on the right track. 
===============
Sudhir Kale (Author) - गुरुवार, 15 नोव्हेंबर 2012 - 06:51 PM IST
Jignesh-ji, why your response has nothing to do with the subject of my article? 
===============
shivanchital@hotmail.com - गुरुवार, 15 नोव्हेंबर 2012 - 06:00 PM IST
People are against Obamacare mainly because they don't like him. However, American health care system is running on empty. They don't have any funds to sustain these programs. They will go bankrupt if they don't act. Most of the American people don't know what's in the Obamacare bill. It has several provisions that might create enormous debt and bankrupt the country. Every year 100 billion dollars are wasted in the Medicare program. That will show you how bad the system is. Also, people are living longer, and that puts enormous burden on the system.Any citizen at age 65, pays approx. $120,000 through taxes in Medicare, and uses approx. $350,000. All this can't continue..... 
===============
Jignesh - गुरुवार, 15 नोव्हेंबर 2012 - 05:53 PM IST
श्री काळे, आपण आपल्या भूतपूर्व अमेरिकन बॉसचा हवाला देऊन श्री ओबामा यांना एक शिकागोचा गुंड असे संबोधित केले होते. अमेरिकेत gangster हा साधारण काळ्या लोकांना हिणवण्याचा शब्द आहे. तेसेही आपली संघीय विचारसरणी white supremacy सारखी आहे. धार्मिक कडवेपणा अमेरिकी कर्मठ लोकांचा सारखाच. फक्त फरक संख्या बलाचा आहे. भारतात लोकशाही असेपर्यंत संघ काही करू शकत नाही. अमेरिकेत मात्र अति सावध राहणे भाग आहे. बाकी काना मागून आले, आमची मजा संपली वगैरे रडणे सारखे.

No comments:

Post a Comment