Saturday 15 December 2012

धर्माधिष्ठित दहशतवादाची व्याप्ती व तिचे चित्र



धर्माधिष्ठित दहशतवादाची व्याप्ती व तिचे चित्र
(एका पाकिस्तानी खासदाराची खंत)

मूळ लेखक : आयाज अमीर                                        अनुवाद: सुधीर काळे, जकार्ता

अनुवादकाचे दोन शब्द :
बांगलादेश युद्धानंतर पाकिस्तानी लष्करशहांना कळून आले, की भारताबरोबरच्या समोरासमोरच्या युद्धात ते कधीही विजयी होऊ शकणार नाहीत. मग पाकिस्तानी सेनानींनी एका वेगळ्या व्यूहरचनेचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानमधील सोविएत सेनेबरोबरचे युद्ध अमेरिकेने पाकिस्तानच्या मदतीने जिंकले व त्यानंतर त्यांनी  अफगाणिस्तातून पाय काढून घेतला व पाकिस्तानचा मलिदाही बंद केला. या वेळी पाकिस्तानकडे सोवियेत सेनेबरोबर लढण्यासाठी मुजाहिदीन म्हणून प्रशिक्षण दिलेले निमलष्करी लढवय्ये होते. त्यांच्याकडे शस्त्रे होती पण त्यांना लढायला शत्रू उरला नव्हता. मग पाकिस्तानी लष्करशहांनी ब्रिगेडियर मुशर्रफ यांच्या नेतृत्वाखाली हे सारे निमलष्करी लढवय्ये काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करवून आणण्यासाठी पाठवायचा निर्णय घेतला. त्यांना तैनात केल्यानंतर काश्मीरमध्ये व नंतर भारतात इतरत्रही अशा दहशतवादी कारवायांना ऊत आला. त्यातली सर्वात मोठी कारवाई होती २६/११ चा मुंबईवरील हल्ला!
पण ९/११ च्या न्यूयॉर्कवरील कारवाईनंतर परिस्थितीत बदल झाला. अमेरिकेच्या दबावाखाली पाकिस्तान दहशतवादाच्या लढाईत अमेरिकेचा भागीदार बनला व त्या दबावाखाली पाकिस्तानी सैन्याला पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील वझिरीस्तानमधील अतिरेक्यांवर हल्ले करावे लागले. त्यातून 'तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान' (TTP) या 'अल कायदा' 'तालीबान' या संघटनांशी संलग्न असलेल्या नव्या आतंकवादी संघटनेचा जन्म झाला. ही संघटना भस्मासुराप्रमाणे आपल्या जनकावरच उलटली व पाकिस्तानवरच दहशतवादी हल्ले चढवू लागली. मुलकी लक्ष्यांपेक्षा यांचा रोख लष्करी लक्ष्यांवर होता व त्यांनी अनेक नेत्रदीपक व यशस्वी हल्ले चढविले.
या विषयावर 'जकार्ता पोस्ट'मध्ये माझे 'Export Surplus' हे पत्रही प्रसिद्ध झाले होते. ते http://www.thejakartapost.com/news/2009/12/15/letters-export-surplus039.html या दुव्यावर वाचता येईल.
नुकताच आयाज अमीर या पाकिस्तानी खासदाराचा याच विषयावरचा लेख माझ्या वाचनात आला. तो आजच्या परिस्थितीला फारच लागू आहे. त्यातच दोनच दिवसांपूर्वी १ सप्टेंबरला बंगळूरू येथे ११ जणांना आणि नांदेड येथे ४ जणांना अटक करण्यात आली आणि त्यातील दोघांनी पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेच्या (ISI) अधिकाऱ्यांकडून प्रशिक्षण घेतल्याचा उल्लेख आहे.
आयाज अमीर हे समतोल विचार करणारे स्तंभलेखक आहेत. त्यांचे लिखाण अजिबात आक्रस्ताळी स्वरूपाचे नसते. त्यामुळे मला ते आवडते.
या लेखात आयाज अमीर या दहशतवादी संघटनांना निर्मितीसाठी पाकिस्तानी लष्करालाच जबाबदार धरतात. त्यांची खंत या लेखात स्पष्ट दिसते. या लेखाचा अनुवाद मी त्यांच्या परवानगीने केलेला आहे. (अशा अनुवादांसाठी मी त्यांची आधीच परवानगी मागितली होती व ती त्यांनी मोकळेपणाने मला दिली होती.) पुढे-मागे ते जर पाकिस्तानाचे पंतप्रधान झाले तर आपल्या दोन देशातील संबंध नक्कीच सुधारतील असे वाटते.
वाचा तर या लेखाचा मी केलेला अनुवाद.
----------------------------------------------------------------------------------------------------
आपले सरसेनानी ज. कयानी [१] यांच्या 'धर्माधिष्ठित दहशतवादाविरुद्धचे, युद्ध हे आपलेच आहे,' असे जाहीर करणार्‍या भाषणाचा  बारकाईने अभ्यास व्हायची गरज आहे. हे भाषण त्यांनी 'पाकिस्तान मिलिटरी अकादमी'त (Pakistan Military Academy) नुकतेच दिले आणि वर उद्धृत केलेली घोषणा त्या भाषणाचा गाभाच आहे. खरे तर हे धोरण खूप आधीच जाहीर व्हायला हवे होते, पण उशीरा का होईना, ते झाले! 'देर आये, दुरुस्त आये' असेच म्हणा ना!
धर्माधिष्ठित दहशतवाद आता जंगली आणि विषारी होत चालला आहे आणि इतर सर्व समस्यांपेक्षा ही समस्या आता गंभीर होत चालली आहे. अगदी आर्थिक समस्यांपेक्षासुद्धा! आपल्या मानसिकतेची दहशतवादी रूपात दिसणारी ही विकृती आता पाकिस्तानी राज्याचा पायाच खिळखिळा करू लागली आहे, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही!
आपल्या विभाजनातून आणि अर्धा देश (आजचा बांगलादेश) घालविल्याच्या दुःखातून पाकिस्तानने स्वतःला सावरले, आपल्या देशाचा कांहीं भाग घालविल्याच्या दुःखातून जर्मनीने स्वतःला सावरले, तत्कालीन सोविएत संघराज्याचे तुकडे-तुकडे झाले तरी रशिया हा रशियाच राहिला. पण धर्माच्या नावाने, आणि धर्माधिष्ठित दहशतवादाच्या नावाने घातल्या जाणार्‍या हैदोसाला जर आवर घातला गेला नाही, तर पाकिस्तान हा पाकिस्तानच रहाणार नाही. पाकिस्तानचा जन्माच्या मुळाशी धर्म होता. आता तो पाकिस्तानच्या 'इतिश्री'ची 'अथश्री' तर नाही ना ठरणार?
आता हे दहशतवादाविरुद्धचे युद्ध 'आपले' आहे काय, याची चर्चा सुरू झाली आहे. पण या युद्धाला जर 'आपले' म्हणायचे नसेल, तर मग भविष्यकाळातील दुसर्‍या कुठल्याच युद्धाला आपण आपले म्हणू शकणार नाही. 'तेहरिक-ए-इन्साफ पाकिस्तान' (PTI) या पक्षाचे प्रमुख इम्रान खान हे हकीमुल्ला मेहसूदच्या[२] अमिरातीत एक दिवससुद्धा जिवंत राहू शकणार नाहीत. मग इम्रान खान कशाबद्दल बोलत आहेत?
कोणी काहीही म्हणो, पण आज उत्तर वझिरीस्तान व्यावहारिकदृष्ट्या एक स्वतंत्र राष्ट्र बनले आहे. तिथे पाकिस्तानचा ध्वज फडकत नाही, पाकिस्तानी सरकारची (उरली-सुरलीसुद्धा) सत्ता तिथे चालत नाही. आणि सर्व रूप-रंग-छटांचे राजकीय नेते-साम्यवादी ते भांडवलवादी असे सारे-अमेरिकेच्या 'द्रोणाचार्यां'च्या[३] पाक भूमीवरील हल्ल्यांबद्दल (drone attacks) आणि परिस्थिती पार हाताबाहेर गेल्याबद्दल आपापले ऊर पिटत भळाभळा अश्रू गाळत आहेत. ज्या हास्यास्पद भावनाप्रधानतेचा हे नेते फायदा घेत आहेत किंवा ज्या भावनाप्रधानतेचे ते सातत्याने समर्थन करत आहेत त्या वृत्तीत आणि या नेत्यांच्या संकुचित आणि मर्यादित द्रष्टेपणात खूपच साम्यही दिसत आहे.
सर्वसामान्य जनतेच्या तोंडून बाहेर पडणार्‍या आणि चावून-चावून चोथा झालेली तीच-तीच निवेदने केल्याच्या पापांना एक वेळ माफ करता येईल, पण आपल्या सध्याच्या सिद्धांतांचा फेरविचार करण्यात गुंतलेल्या आणि त्याबाबत परस्परविरोधी विचारांमध्ये गोंधळून गेल्यामुळे निर्णय घेऊ न शकणार्‍या शक्तिशाली संस्थांची[४] पापे खूपच मोठी आहेत.
पाकिस्तानातील दहशतवाद हा काही ग्रहदशेमुळे किंवा विश्वकिरणांमुळे (cosmic rays) पसरलेला नाही. दहशतवादाचा हा प्रसार केवळ पाकिस्तानी लष्कराच्या चुकीच्या धोरणांमुळे झालेला आहे हे सखेद नमूद करायलाच हवे! जनरल झिया ते जनरल बेग या सेनानींच्या धोरणविषयक चुकांमुळे हा प्रसार झालेला आहे. त्या अनिष्ट धोरणांच्या कार्यवाहीत 'आयएसआय' (ISI) ही पाकिस्तानी गुप्तहेर संघटना नेहमीच 'बिनीचा मोहरा' होती[५]. 'जिहादी विचारसरणी'ला पाकिस्तान सरकारच्या परराष्ट्रनीतीची कोनशिला बनविले गेले हा आपल्या कायमच्या दुर्दैवाचा भाग आहे. या धोरणांनुसार ज्या दहशतवादी संघटना आपल्याला आता परिचित झालेल्या आहेत व ज्या संघटनांना आपण आता घाबरू लागलेलो आहोत, त्या संघटनांना प्रशिक्षण शिबिरे उभी करण्यास आणि दहशतवाद्यांची भरती करण्यास प्रोत्साहन दिले जाऊ लागले आहे आणि त्यामुळे आणि दुर्दैवाने या संघटनांमार्फत कडवेपणाच्या, धर्मवेडेपणाच्या आणि द्वेषाच्या विषवल्लींची पेरणी करविली जाऊ लागली आहे.
या जिहादी संघटनांचा एक बाह्य साधन म्हणून आणि पाकिस्तानच्या परराष्ट्रनीतीचे विस्तारित अंग म्हणून वापर करायचा, असे 'धोरण' (याला धोरण म्हणता येईल?) पाकिस्तानी लष्कराने ठरविले. पण या धोरणामुळे निर्माण झालेले दुष्परिणाम पाकिस्तानलाच सहन करावे लागत आहेत [६]. हे उलटलेले दुष्परिणाम मूळच्या दुष्परिणामांपेक्षा जास्त विषारी दिसत आहेत. पण हे सारे आता इतिहासजमा झाल्याने त्यावरील चर्चा आपण इथेच थांबवून जनरल कयानी यांच्या भाषणातील 'तात्विक घूम-जाव' घोषणेचे स्वागत करू या, भले ही घोषणा उशिरा आलेली असली तरी!
खरे तर धोरणातील अशा बदलाबद्दलची घोषणा पाकिस्तानच्या राजकीय नेतृत्वाकडून यायला हवी होती. जी धोरणविषयक घोषणा कयानींनी केली, ती खरे तर पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांकडून किंवा त्यांची जागा घ्यायच्या तयारीत असलेल्या विरोधी नेत्यांकडून व्हायला हवी होती. (सध्या पाकिस्तानी प्रधानमंत्री 'इतरत्र गुंतलेले' असल्यामुळे त्यांचा सहभाग तूर्त बाजूला ठेवू! [७]) पण या सर्व नेत्यांचा या विषयावर तोंड बंद ठेवण्याचा निर्णय राजकीय नेतृत्वातील पोकळीच दर्शवितो. मग ही पोकळी भरून काढायचा निर्णय लष्कराने घेतल्यास लष्कराला दोष कशाला द्यायचा?
मग अमेरिकेहून पाकिस्तानला भेट देणार्‍या सर्व महत्वाच्या पाहुण्यानी लष्कराच्या सेनानींची भेट घेण्यासाठी एकच गर्दी केली तर त्यात त्यांचे काय चुकले? निर्णय घेणे ही एक टोकाची बाब झाली पण जर वेगवेगळ्या विचारांचे, कल्पनांचे नुसते मोकळेपणाने मूल्यमापन करायचे असेल तर ते करण्यासाठीचा वेळ, नेतृत्वाच्या पोकळीने पछाडलेल्या इस्लामाबादमध्ये करण्याऐवजी रावळपिंडीत (लष्करी मुख्यालयात) करणे जास्त परिणामकारक आणि उपयुक्त आहे असे या अमेरिकन पाहुण्यांना वाटल्यास त्यांचे काय चुकले?
जनरल कयानींचे पाकिस्तानी लष्करी अकादमीतले भाषण हे एक राणा भीमदेवी थाटात दिलेले पोकळ भाषण न ठरता एक पाकिस्तानच्या धोरणाला कलाटणी देणारे आणि दिशाबदल घडवून आणणारे भाषण ठरावे, अशीच आशा शेवटी कुणीही करेल! त्यासाठी दहशतवादाचा पाकिस्तानवर काय परिणाम झालेला आहे याबद्दल स्पष्ट कल्पना आपल्याला असायला हवी. ही समस्या स्वतंत्र उत्तर वझिरीस्तानच्या अमिरातीमधून येणार्‍या हिंसाचाराच्या लाटांपुरतीच मर्यादित नाही. ती तशी असती तर ती एकाद्या कर्करोगाच्या गाठीप्रमाणे वेगळी करून तिच्यावर इलाज करणे सोपे होते. पण ही समस्या दिसते त्यापेक्षा जास्त गुंतागुंतीची आहे.
उत्तर वझिरीस्तानमधील दहशतवादाचा वैचारिक कैवार घेणारे लोक आपल्यात आहेत, उघड न होता गुपचुपपणे समर्थन करणार्‍या सुप्त संघटना आणि त्यांची आणि मशिदींची मदत-जाळीही (support networks) आपल्यात आहेत. आमूलाग्र परिवर्तनाच्या (radicalisation) वातावरणात क्वेट्टा आणि कोहिस्तानमधील शियांच्या कत्तलीसारख्या घटनांचा या संस्थांना चांगलाच फायदा होत आहे!
याच तर्‍हेच्या इतर घटनासुद्धा सांगता येतील! उदाहरणार्थ मशीदीवरील ध्वनिक्षेपकांचा दुरुपयोग हा एक राष्ट्रीय विरंगुळा बनलेला आहे, वेगवेगळ्या धर्मांत आणि पंथांत  द्वेष निर्माण करण्याच्या घटना रोजच्या झालेल्या आहेत. शेखरपुरा येथील आशिया बीबी या ख्रिस्ती मुलीला धर्मनिंदेच्या आरोपाखाली अटक झाली व त्यातून उपजलेल्या अनेक घटनांची परिणीती शेवटी पंजाबचे राज्यपाल सलमान तासीर यांच्या त्यांच्याच शरीररक्षकाकडून झालेल्या हत्येत झाली! पुढे या शरीररक्षकाला एकाद्या धर्मवीरासारखे गौरवाने वागविले जाणे, त्याला जेव्हा न्यायालयात आणले गेले, तेव्हा तिथल्या वकीलांनी त्याच्यावर गुलाबपुष्पांची वृष्टी करणे, बहावलपूर येथे आणखी एकाला धर्मनिंदेच्या आरोपावरून अटक झालेल्या माणसाला नंतर जेव्हा तुरुंगातून सोडले गेले, तेव्हा संतप्त जमावाने त्याला पेटवून देणे, आणखी एका गरीब ख्रिस्ती मुलीला धर्मनिंदेच्या आरोपाखाली इस्लामाबादजवळ अटक होणे, अशा घटनांचा बहुसंख्य मुस्लिम समाजाला सात्विक संताप न येता तो गप्प राहिला व त्याने कुठल्याही कारवाईची मागणी केली नाही.
शेवटी जेव्हा वरिष्ठ सुरक्षा संघटना आरडा-ओरडा करण्यात प्रवीण असलेल्या मुल्ला-मौलवींचा दुरुपयोग करून खोट्या राष्ट्रवादाच्या भावना भडकविण्यात यशस्वी झाल्या, तेव्हा आमूलाग्र परिवर्तनवादाला अशा तर्‍हेच्या घटनांतून खतपाणी मिळत गेल्यास आणि परिणामतः वैचारिक समर्थन मिळाल्यामुळे धर्माधिष्ठित दहशतवादाची अशा परिस्थितीत जहरी मदिरा बनल्यास यात आश्चर्य ते कसले?
पण यापुढे कांहीं शिया पंथियांचे नव्याने जेव्हा शिरकाण होईल तेव्हा आपण ती घटना केवळ 'वृत्तपत्रात आलेली एक बातमी' म्हणून वाचू आणि खांदे उडवून ती घटना विसरून जाऊन आपापल्या उद्योगात मग्न होऊन जाऊ? त्यानंतरची प्रार्थनेची बांग ऐकू आली, की वरील घटनेचा, त्याबद्दलच्या बातमीचा जनतेच्या सामुदायिक वर्तनावर काहीच फरक पडलेला दिसत नाही?
धर्माधिष्ठित दहशतवादाने ज्या भय-साम्राज्याला जन्म दिला आहे त्या साम्राज्याचा विस्तार उत्तर वझिरीस्तानच्या भौगोलिक सीमांपलीकडे झालेला आहे. या भयसाम्राज्याला जन्म काय अमेरिकेने दिला? आपल्या या एकूण एक दुर्दशांच्या मुळाशी अमेरिका आहे? की या विषवल्लीची पेरणी आपणच केलेली आहे? आणि ही झाली कालची कथा! पण आजही या विषवल्लीला खतपाणी घालून आपण त्याला आपण वाढवतच आहोत, नाही का?
आपल्यापुढे जी समस्या उभी आहे ती एकाद्या लष्करी मोहिमेच्या आवश्यकतेपेक्षा खूपच मोठी आहे हे एव्हाना स्पष्ट आहे. पाकिस्तानच्या प्रतिमेची पार काळवंडलेली आहे आणि आपल्याला जर इक्बाल आणि जिना यांनी निर्मिलेल्या आपल्या देशाची या दुर्दशेतून सुटका करायची असेल, तर ही काळवंडलेली प्रतिमा सुधारण्याच्या कामापासून आपण सुरुवात केली पाहिजे. आपली मने आता बिघडलेली आहेत आणि त्यातली काही बधीरही झाली आहेत व त्यामुळे त्यांची भावना समजण्याची आणि विचार करण्याची शक्ती कमी झाली आहे. म्हणूनच जेव्हा आपल्या डोक्यात संतापाची सणक यायला हवी तेव्हाही आपण शांत रहात आहोत आणि मूग गिळून गप्प बसत आहोत!
आपल्याला अंधारातून बाहेर पडायचे असेल, तर आतापर्यंतच्या सन्मानशून्य आणि विसरून जाण्याजोग्या भूतकाळातील पोकळ घोषणा करण्याची जुनी मनोवृत्ती सोडून दिली पाहिजे. हे युद्ध आपल्यापुढे उभे ठाकले आहे व ते जिंकण्यासाठी पाकिस्तानी मनोवृत्तीची मुक्तता करणे पहिले पाऊल आहे!
आयाज अमीर या पाकिस्तानी खासदाराचा मूळ लेख वाचा या दुव्यावरः
http://www.thenews.com.pk/Todays-News-9-128017-The-scope-and-tapestry-of-religious-extremism
====================
टिपा:
[१] या लेखात सर्व प्रथमपुरुषी उल्लेख मूळ लेखकाने पाकिस्तान व पाकिस्तानी जनतेला उद्देशून केलेले आहेत. उदा. इथे "आपले सरसेनानी" म्हणजे पाकिस्तानचे सरसेनानी!
[२] इम्रान खान हे एके काळचे प्रख्यात क्रिकेटपटू सध्या खूप चर्चेत आहेत कारण येत्या निवडणुकीत त्यांचा पक्ष बर्‍याच जागा मिळवेल व ते कदाचित् पंतप्रधानही बनू शकतील असे मानले जाते. हकीमुल्ला मेहसूद हे अल कायदा व अफगाणिस्तानच्या तालिबान संस्थेशी संलग्न असलेल्या पण पक्क्या पाकिस्तानी अशा "तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP)" या आतंकवादी संघटनेचे प्रमुख (Emir) आहेत. ही संघटनेने सध्या पाकिस्तानमध्ये अनेक दहशतवादी हल्ले घडवून धमाल उडवून दिली आहे. या संघटनेचे वैशिष्टय म्हणजे यांचे बरेच हल्ले पाकिस्तानी लष्करी केंद्रांवर होत असतात.
[३] अमेरिका सध्या अफगाणिस्तान-वझिरीस्तान-अरबस्तानमधील अतिरेक्यांशी लढण्यासाठी "ड्रोन" (Drone) या प्रकारच्या वैमानिकरहित (pilotless) विमानांचा उपयोग करत आहे. या विमानांना मी गमतीने 'द्रोणाचार्य' म्हणतो!
[४] इथे लेखकाला सरकार व लष्कर अभिप्रेत असावे.
[५]  ती आजही बिनीचा मोहराच आहे. पण अशा लेखांमुळे ही परिस्थिती बदलेल अशी आशा करू या!
[६]http://www.thejakartapost.com/news/2009/12/15/letters-export-surplus039.html या दुव्यावर माझे १५ डिसेंबर २००९ रोजी "जकार्ता पोस्ट"मध्ये प्रकाशित झालेले याच विषयावरील पत्र वाचता येईल.
[७] न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल एका पंतप्रधानाचे (यूसुफ राजा गिलानी) पद बरखास्त करण्यात आलेले असून दुसर्‍याचे (राजा परवेज अश्रफ) काय होणार याबाबत अद्याप चित्र स्पष्ट नाही.
====================
हा लेख ५ सप्टेंबर २०१२ रोजी ई-सकाळवर प्रकाशित झाला. दुवा आहे:

No comments:

Post a Comment