Saturday 15 December 2012

अण्णा, काय केलंत हे? (उत्तरार्ध)


अण्णा, काय केलंत हे? (उत्तरार्ध)
 
 
लेखक: सुधीर काळे, जकार्ता
हा लेख ई-सकाळ’वर २ ऑक्टोबरला प्रकाशित झाला. दुवा आहे:http://www.esakal.com/esakal/20121002/4843252539677591884.htm
"अण्णा, काय केलंत हे?" या लेखाच्या पूर्वार्धाला (हा उत्तरार्ध आहे) आलेल्या प्रतिसादांच्या प्रचंड संख्येवरून अण्णांच्या प्रचंड पुण्याईची आणि अण्णांनी सार्‍या देशाला कसे प्रभावित केले आहे याची पुन्हा एकदा स्पष्ट प्रचीती येते. हा माझा लेख आतापर्यंतच्या माझ्या लेखातला सर्वात जास्त चर्चिला गेलेला लेख ठरला. या लेखाला एकूण १३८ प्रतिसाद आले. त्यात वाचकांचे प्रतिसाद आहेत ११२, तर वाचकांच्या प्रतिसादांना दिलेली माझी उत्तरे आहेत २६. त्यापैकी सुमारे ४० प्रतिसाद लिहिणार्‍या वाचकांनी माझ्याशी पूर्ण सहमती दर्शविली. बर्‍याच वाचकांनी एकमत किंवा मतभेद न सांगता माझ्या लेखात अंतर्भूत नसलेले स्वत:चे विचार मांडले आहेत. तर कांहीं वाचकांचे माझ्या विचारांशी तीव्र मतभेद आहेत. विरोध नोंदविताना आलेल्या तिरिमिरीत सभ्यतेच्या मर्यादा ओलांडल्याचेही त्यातल्या कांहीं (सुदैवाने अल्प) वाचकांच्या लक्षात आले नसावे. या आधी माझ्या ई-सकाळवरील "शिवसेना पुन्हा उभी राहील?" या लेखालासुद्धा असेच खूप प्रतिसाद आलेले होते, पण अण्णांवरील या लेखाने तो आकडासुद्धा ओलांडला.

मी स्वत: तर अण्णांना दैवतच मानतो. म्हणूनच शेवटच्या उपोषणाला त्यांना यश न आल्याने मी कमालीचा विषण्ण झालो. पण यश न मिळण्यात अण्णांची पुण्याई कमी पडली नाहीं तर ’टीम अण्णा’चे डावपेचच चुकीचे ठरले होते हेच मी पूर्वार्धात लिहिले होते. अरविंद केजरीवाल कितीही कळकळीचे कार्यकर्ते असले तरी त्यांच्या उपोषणाला अण्णांच्या उपोषणाची सर येऊ शकत नाहीं. केजरीवाल यांची प्रकृती अण्णांच्यासारखी ठणठणीतही नसावी आणि त्यांच्यात अण्णांच्यासारखी चिकाटीही नसावी. त्यात असेही वाचनात आले कीं ते मधुमेहाचे रुग्ण आहेत! उपोषणामुळे रक्तात बदल होणार्‍या महत्वाच्या घटकांचा परिणाम ठणठणीत प्रकृतीच्या व्यक्तींवर जितका होतो त्यापेक्षा मधुमेहाच्या रुग्णावर खूपच जास्त होतो. त्यामुळे त्यांच्या रक्ताच्या पृथ:करणाने जेंव्हां गंभीर वळण घेतले तेव्हा काहीं तरी मध्यममार्ग काढण्याशिवाय गत्यंतरच उरले नसावे असेच सर्व वृत्तपत्रांतील बातम्या वाचून वाटते. नाहीं तर आदल्या दिवसापर्यंत "आमच्या घशात जबरदस्तीने अन्न कोंबल्यास ते आम्ही थुंकून टाकू" असे सांगणारे केजरीवाल एकाएकी उपोषणाची सांगता करून राजकारणात सक्रीय भाग घेण्यासाठी राजकीय पक्ष काढण्याकडे का वळले असावेत?

पण अण्णांच्या मनात सक्रीय राजकारणात कधीच पडायचे नसल्यामुळे "आपण राजकारणात पडणार नाहीं आणि निवडणूक लढविणार नाहीं" अशी जाहीर घोषणा त्याच दिवशी त्याच व्यासपीठावरूनच अण्णांनी केली.

आता ’टीम अण्णा’मध्ये एकी राहिली नाहीं हे यानंतरच्या घटनांवरून दिसून आले. उच्चपदस्थ, बुद्धिमान व आदरणीय माणसे जमा करणे सोपे असते पण त्यांच्यातील एकी टिकवून धरणे कर्मकठीण. आपापल्या क्षेत्रात त्यांनी मिळविलेल्या उत्तुंग यशामुळे अशा व्यक्तींभोवती ’होयबां’चा गराडाही असतो. अशा व्यक्तींची मते ठाम असतात व त्या मतांच्या अचूकतेवर त्यांची पक्की निष्ठा असते आणि त्या मतांबद्दल त्यांना प्रचंड आत्मविश्वासही असतो. मग अशा लोकांत सहमती कशी होणार? किरण बेदी आणि केजरीवाल यांची तोंडे अगदी विरुद्ध बाजूला. केजरीवालांना सध्याचे सारेच राजकीय पक्ष भ्रष्टाचारात लडबडलेले आहेत असे वाटते तर किरण बेदींना "उडदामाजी काळे-गोरे" न्यायाने भारतीय जनता पक्ष (भाजप) जरा कमी भ्रष्ट वाटतो आणि आंदोलनाच्या यशासाठी "टीम अण्णा"ने ’भाजप’चे समर्थन घ्यावे आणि अण्णांनी या बाबतीत केजरीवाल यांना आग्रहाने सांगावे असे त्यांना वाटते पण अण्णांना असे करून आपल्या आंदोलनावर जातियतेचा शिक्का बसून द्यायचा नसल्यामुळे त्यांना या बाबतीत अजीबात पुढाकार घ्यायचा नव्हता. मग एकी व्हायची कशी?

शेवटी केजरीवाल एकटेच निदर्शने आयोजू लागले. त्यात त्यांना जनतेचा बर्‍यापैकी पाठिंबा असावा असे प्रसारमाध्यमातील-खासकरून चित्रवाणीवरील-वार्तांकनावरून (coverage) आणि त्या वाहिन्यांनी दाखविलेल्या जनसमुदायाच्या दृश्यांवरून वाटले. त्यानंतर राळेगणसिद्धीला "नवा राजकीय पक्ष काढायचा कीं नाहीं" या विषयावर सार्‍या "टीम अण्णा" सभासदांची निर्णायक बैठक झाली त्यात अण्णांचा आशिर्वाद मिळविण्यात केजरीवाल अयशस्वी ठरले. त्या नंतरच्या प्रसिद्धीमाध्यमांना दिलेल्या त्यांच्या निवेदनात त्यांनी जरी "आम्ही अण्णांना पितृसमान मानतो व चरणस्पर्शासह त्यांचा आशिर्वाद घेऊनच आम्ही पुढील आंदोलने सुरू करू" असे सांगितले असले तरी अण्णांनी मात्र त्यांच्यापासून स्वत:ला दूरच ठेवले. दोन दिवसांपूर्वी आपल्या "ब्लॉग"वर प्रकाशित केलेल्या मतप्रदर्शनात अण्णांनी "टीम अण्णा"मधील दुफळीला केजरीवाल यांनाच जबाबदार धरले असून त्यांना आपले नांव व छायाचित्र वापरायलासुद्धा अण्णांनी मनाई केली आहे. थोडक्यात अण्णा आणि "टीम अण्णा" यांच्यातली दरी आणखीच रूंदावून दोघेही "हा माझा मार्ग एकला" या न्यायाने आपापली वाट चालू लागले आहेत. पण त्यांच्यातील मतभेद फक्त राजकीय पक्ष काढण्यापुरता आणि निवडणुका लढविण्यापुरता असल्यामुळे आणि शेवटी दोघांचे ध्येय भ्रष्टाचारनिर्मूलन हेच असल्यामुळे त्यांचे मार्ग नजीकच्या भविष्यकाळात पुन्हा एक होतील अशी शक्यता नक्कीच आहे. सारी भारतीय आम जनता भ्रष्टाचाराला पार विटली आहेच व ती या आंदोलनाकडे आणि त्यातील विविध घटकांच्या एकीकडे आशेने पहात आहे हेसुद्धा नि:संशय खरे आहे. त्यामुळे योग्य वेळ येताच दोन्ही गट पुन्हा जवळ येतील अशीच शक्यता जास्त वाटते.

आता गांधीजयंतीच्या मुहूर्तावर केजरीवाल आपल्या नव्या पक्षाच्या स्थापनेबद्दल घोषणा करणार आहेत. दरम्यान बाबा रामदेव व माजी सरसेनानी ज. सिंग यांच्याबरोबरही अण्णांची बैठक झाल्याची बातमी वाचनात आली. माझ्या लेखाच्या पूर्वार्धाला कांहीं वाचकांनी दिलेल्या प्रतिसादांना उत्तर देताना मी म्हटले होते कीं अण्णा आणि रामदेव एकत्र आले तर त्याचा आंदोलनाला नक्कीच फायदा होईल. आजही मला असेच वाटते. पण ब्रह्मचर्य सोडल्यास फारसे साम्य नसणार्‍या या दोन व्यक्तीत एकमत कसे होईल आणि झालेच तर ते किती काळ टिकेल हे सांगणे कठीण. सर्व ऐहिक सुखे सोडून संन्यासी आयुष्य कंठणारे अण्णा एकीकडे तर दुसरीकडे एक उद्योगपती असलेले बाबा रामदेव. फक्त भ्रष्टाचाराविरुद्ध लढायच्या मुद्द्यावर आणि त्यामुद्द्यापुरते व्यूहात्मक एकमत (strategic unanimity) झाले तरच यातून कांहीं मार्ग निघेल व त्याचा आंदोलनाला फायदा होईल.

लष्करातील माझ्या परिचयाच्या अधिकार्‍यांबरोबर केलेल्या चर्चेवरून माझे असे मत झालेले आहे कीं ज. सिंग हे बरेच स्वच्छ चारित्र्याचे अधिकारी असून त्यांच्या ज्येष्ठ तसेच कनिष्ठ अधिकार्‍यांत त्यांची प्रतिमा उज्ज्वल आहे आणि त्यांच्याबद्दल त्यांना खूप आदर आहे. पण या पलीकडे यांच्याबद्दल अद्याप मला तरी फारशी कल्पना नाहीं.

या लेखाच्या पूर्वार्धाला आलेल्या प्रतिसादांवरून माझ्या लक्षात एक गोष्ट आली कीं मी जरी अण्णांना दैवत मानणारा असलो तरी या लेखाच्या बर्‍याच (नव्या) वाचकांना अण्णांनी अचानकपणे आपले उपोषण सोडून आम जनतेचा अवसानघात केला असे मत व्यक्त करणारा माझा लेख अण्णांवर टीका करणारा वाटला आणि त्यावरून मला अण्णांबद्दल आदरच नसावा असे त्यांचे मत झाले असावे. याची दोन कारणे संभवतात. पहिले हे कीं माझ्या लेखाचा नेमका रोख वाचकांना नीट समजावून सांगण्यात मी कमी पडलो. दुसरे कारण हे कीं या वाचकांनी माझे या आधीचे ई-सकाळने प्रकाशित केलेले अण्णांवरील लेख वाचले नसावेत. ते लेख आहेत:

(१) http://72.78.249.107/esakal/20110817/5651937013262155158.htm हा १७ ऑगस्ट २०११ रोजी प्रकाशित झालेला पहिला लेख "दुसर्‍या स्वातंत्र्या'कडे आगेकूच!" व

(२) http://72.78.249.107/esakal/20110905/5406316330880290145.htm) हा ५ सप्टेंबर २०११ रोजी प्रकाशित झालेला दुसरा लेख, "दिवस गेला रेटारेटी, चांदण्यात बसून कापूस वाटी!"!

वाचकांनी हे दोन लेख व त्या लेखाखालील प्रतिक्रिया वाचल्यास त्यांना अण्णांच्या बाबतीतल्या माझ्या भावना आणि त्यांच्या आंदोलनाबद्दलची मला वाटणारी आपुलकी यांची जाणीव होईल.

माझ्याशी सहमत असलेल्या वाचकांनी लिहिले आहे कीं मी अगदी त्यांच्या मनातले विचारच जणू मांडले आहेत. "अण्णांनी आंदोलन पुन्हा सुरू करावे व जनतेने त्यात उस्फूर्तपणे भाग घेऊन ते यशस्वी करावे" या माझ्या मतांनाही अशा वाचकांनी ठामपणे दुजोरा दिलेला आहे.

मतभेद असलेल्या बर्‍याच वाचकांना न रुचलेले २-३ मुद्दे आहेत. त्यातला एक आहे मी त्यांच्या आंदोलनाची गांधीजींच्या आंदोलनांशी केलेली बरोबरी! माझ्या लेखनातून अशा बरोबरीचा अर्थ ध्वनित होत असल्यास तीसुद्धा माझ्या लेखनातील कमतरताच म्हणावी लागेल. कारण गांधीजींसारख्या सूर्याबरोबर कुणाचीच तुलना होणे शक्य नाहीं. उपोषण करून स्वत:च्या शरीराला कष्ट देणे, स्वत:कडे कसलीही आर्थिक संपत्ती न ठेवणे, स्वत:चे आचरण एकाद्या तपस्व्यासारखे व्रतस्थ ठेवणे अशा बर्‍याच बाबतीत साम्य असल्यामुळे त्यांच्या आंदोलनावरून गांधीजींच्या आंदोलनाची आठवण होणे सहाजीकच आहे. शिवाय सर्व भारतीय जनता अण्णांना गांधीवादी, गांधीभक्त म्हणूनच ओळखते. सदैव खादीत वावरणार्‍या अण्णांनी देवळातली एक खोली, झोपण्यासाठी ते वापरत असलेली एक खाट आणि एक जेवायची थाळी याखेरीज बाकी सर्व इतरांना देऊन टाकले आहे. गांधीजींप्रमाणेच ग्रामोद्योग आणि ग्रामसेवा याबाबतीतही ते राळेगणसिद्धीत अग्रेसर राहिलेले आहेत. अशा अनेक कारणांमुळे त्यांच्या आंदोलनाची चर्चा करताना गांधीजींची आठवण होते इतकेच. पण गांधीजी सुशिक्षित होते, बॅरिस्टर होते, दक्षिण आफ्रिकेत कांहीं वर्षें त्यांनी वकीलीही केली होती आणि इंग्रजी भाषेवर त्यांचे चांगले प्रभुत्व होते. या उलट अण्णा हे तूलनेने कमी शिक्षण झालेले गृहस्थ असून ते लष्करात एक मालमोटारीचे चालक (Truck driver) होते. त्यामुळे असेल पण विचारप्रगल्भतेत, वाचन-लेखनाच्या बाबतीत अण्णा आणि गांधीजींच्यामध्ये खूपच फरक आहे. त्यांच्या विचारांची उंची गांधीजींच्या विचारांच्या उंचीइतकी नक्कीच नाहीं, नेतृत्वशक्तीतही अण्णांची तूलना गांधीजींच्या नेतृत्वशक्तीबरोबर होऊ शकत नाहीं. पण या बाबतीत एवढी तफावत असली तरी अण्णांची देशाबद्दलची कळकळ, देशसेवेची उर्मी गांधीजींसारखीच उच्च आहे आणि भारतात आज क्वचितच दिसणार्‍या अशा गुणांच्याबाबतीत ते गांधीजींच्यासारखेच थोर आहेत आणि यातच त्यांचे मोठेपण आहे. याच मुद्द्यावरून एका वाचकाने अण्णांनी एका मुलाखतीत केजरीवाल यांची मदत घेतल्याबद्दल (माझ्या मते चुकीची) टीका केलेली आहे. पण केजरीवाल हे IIT चे पदवीधर असून अलीकडेपर्यंत ते एक IAS अधिकारी होते. मग त्यांची मदत घेण्यात अण्णांचे काय चुकले? उलट कांहीं बिकट प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी त्यांनी केजरीवाल यांचे सहाय्य घेतल्याबद्दल अण्णांच्या निगर्वीपणाचे कौतुकच केले पाहिजे.

बर्‍याच लोकांना मी अण्णांच्याबद्दल लिहिण्याला आक्षेप आहे तो केवळ मी जकार्तात बसून लिहितो म्हणून! परदेशाची गोष्टच सोडा, पण जे वार्ताहार, पत्रकार पंतप्रधानांबद्दल, नरेंद्र मोदींबद्दल, नितिशकुमार किंवा ममता बॅनर्जी यांच्याबद्दल लिहितात ते थोडेच दिल्लीत, गांधीनगरमध्ये, पटण्यात किंवा कोलकात्यामध्ये असतात? ते होणार्‍या आणि झालेल्या घटना वृत्तपत्रातील, नभोवाणीवरील आणि चित्रवाणीवरील बातम्या वाचून-पाहून-ऐकूनच लिहीत असतात. मग देशातील वार्ताहारांनी, स्तंभलेखकांनी पुण्यात बसून वाचणे-ऐकणे-पाहणे आणि मी जकार्तामध्ये बसून वाचणे-ऐकणे-पाहणे यात काय फरक आहे? आज आंतरजालाच्या, चित्रवाणीच्या शास्त्रात झालेल्या प्रगतीमुळे सर्व बातम्या आपण कुठेही असलो तरी त्या पहाता येतात आणि त्या घटनांबद्दल, नेतेमंडळींनी घेतलेल्या निर्णयांबद्दल आपण स्वत:ला सहजपणे खूपच अद्ययावत ठेवू शकतो. आज आंतरजालाच्या प्रगतीमुळे मी जकार्तात बसून भारतीय वृत्तपत्रें (इंग्रजी/मराठी), भारतीय चित्रवाणीच्या अनेक वाहिन्या, पाकिस्तानी वृत्तपत्रे, BBC/CNN सारख्या आंतरराष्ट्रीय वाहिन्या सहजपणे ऐकू-पाहू शकतो. मग केवळ परदेशी वास्तव्य आहे म्हणून मी त्याबद्दल लिहू नये हा युक्तिवाद चुकीचा नाहीं कां? म्हणूनच मी जकार्तात बसून केलेल्या भाष्यास केवळ ते दूरून केले आहे म्हणून कमी लेखणे, त्याला उंटावरून गाढवे हाकण्याची उपमा देणे (हो, शेळ्या नाहीं, तर गाढवे! गाढवांना कधीपासून हाकावे लागू लागले कुणास ठाऊक!) हे मला बरोबर वाटत नाहीं.

काही प्रतिसादांतून असे ध्वनित झाले कीं मी भारतीय वंशाचा असलो तरी मी इंडोनेशियाचे नागरिकत्व घेतले आहे कीं काय आणि असे घेतले असल्यास मला भारताबद्दल लिहिण्याचा काय अधिकार? इथे दीर्घकाळ राहिलेल्या माझ्यासारख्या अनेक भारतीयांनी इथले नागरिकत्व घेतलेले आहे. पण ते मुख्यत्वे इथे घर विकत घेता यावे, स्थावर मालमत्त्तेची खरेदी/विक्री करता यावी यासाठी. पण माझ्या मनात तसा विचार कधीही आलेला नाहीं आणि मी आजही भारतीय नागरिक असून इथले नागरिकत्व भविष्यकाळातही मी घेऊ इच्छित नाहीं! त्यामुळे भारताबद्दल आणि अण्णांवर लेख लिहिण्याची माझी पात्रता इतर भारतीयांच्या पात्रतेइतकीच आहे. माझी विचारशक्ती, माझी मतें, माझे भाषेवरील प्रभुत्व नक्कीच वेगळे असेल, पण भारतीय नागरिक म्हणून असलेली पात्रता एकदम बरोबरीची आहे!

काही वाचकांनी मला "दूरून सल्ले काय देता, स्वत: उपोषणाला का नाहीं बसत" असेही विचारलेले आहे! याला खरे तर उत्तर देण्याची गरजच नाहीं. कारण या आंदोलनाबद्दल बातम्या देणारा, त्याबद्दल टीकात्मक लेख लिहिणारा, त्या आंदोलनाच्या यशापयशाचे मूल्यमापन करणारा कुठल्या वृत्तपत्राचा, नभोवाणीचा, चित्रवाणीचा वार्ताहार दिल्लीला जंतर-मंतरला जाऊन उपोषणाला बसला होता? तसे पाहिले तर केवळ एक नैतिक पाठिंबा म्हणून पहिल्या उपोषणाच्यावेळी जकार्तातील बर्‍याच लोकांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषणही केले होते. पण ते केवळ नैतिक पाठिंबा म्हणून. यापलीकडे त्या उपोषणाला फारसा अर्थ नव्हत. मी जकार्ताला जोपर्यंत आहे तोपर्यंत अशा आंदोलनात सक्रीय भाग घेणे मला शक्यच नाहीं. पण ते मुंबईकरांना, पुणेकरांनातरी कुठे शक्य आहे? म्हणून माझ्यावरच्या केवळ मी जकार्ताला राहून दुरून टीका करतो, मुख्य प्रवाहात सामील होत नाहीं अशा टीकेला खरेच कांहीं अर्थ नाही! सगळे पंच कुठे खेळाडू असतात? खेळ व खेळाचे नियम माहीत असणे महत्वाचे, स्वत: खेळू शकतो कीं नाहीं हे पंचाच्या पात्रतेसाठी महत्वाचे नाही.

कित्येक वाचकांनी प्रसारमाध्यमांना दोन्हीकडून बडविले आहे. काही म्हणतात की अण्णांच्या आंदोलनाच्या यशामागे प्रसारमाध्यमेच होती. तर कांहींनी प्रसारमाध्यमे विकली गेल्याचेही आरोप केले आहेत. एका भद्र वाचकाने "आंदोलन करून अण्णांनी काय मिळवले? तर त्यांनी अनेकांची पोटं भरली. त्यातलाच हा एक लेख." असे लिहून मलाही एक भाडोत्री पत्रकार ठरविले आणि शेवटी "विकतच्या प्रसिद्धी माध्यमांनी संपूर्ण सहकार्य करून एका चांगल्या आंदोलनाचा बोजवारा उडवला" असे लिहून ते मोकळे झाले. त्या भद्र वाचकाला मी सांगू इच्छितो की मी इथे जे लेखन करतो ते १०० टक्के विनामूल्य करतो! माझ्या निरीक्षणानुसार बहुदा सर्व चित्रवाण्यांनी व वृत्तपत्रांनी अण्णांना संपूर्ण पाठिंबा दिलेला होता. जकार्ताला आमच्याकडे दिसणार्‍या झीन्यूज, NDTV News, आणि NDTV 24/7 या वाहिन्यांवर तर अण्णांच्या उपोषणाखेरीज दुसरा विषय नव्हता. प्रसारमाध्यमांनी अण्णांना जणू डोक्यावरच घेतले होते. अण्णांनी उपोषण सोडल्यावरच काही अंशी या वाहिन्यांवर टीकेचा सूर ऐकायला मिळाला हे मात्र खरे.

काही वाचकांना माझ्या लेखातील एकादे वाक्य संदर्भाशिवाय घेऊन मी अण्णांवर टीका केल्याबद्दल नाराजी दर्शविली आहे. त्यांनी माझ्या लेखाचा "हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम्| तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः ॥" असे सांगून अर्जुनाला युद्धाला तयार करणार्‍या भगवान श्रीकृष्णाचेच शब्द आठवून आणि उद्दिष्ट सफल होईपर्यंत पाऊल मागे घेणार नाही हा दृढनिश्चयाने आंदोलन पुन्हा उभे करा. अण्णा, अंतिम विजय तुमचाच आहे कारण सत्य तुमच्याच बाजूला आहे! आणि शेवटी 'सत्यमेव जयते'! " हा शेवटचा परिच्छेद वाचला नाहीं की काय अशीच शंका येते!

काही ’खास’ वाचकांच्या प्रतिक्रिया देण्यामागील कारण समजत नाहीं! उदाहरणार्थ "आधी भ्रष्ट देशांच्या यादीत इंडोनेशियाचा नंबर बघ कितवा आहे, तिथल्या लोकांना शिकवा, तिथे लाच देवू नका आणि मग इतरांना शहाणपण शिकवा, हे काळे तिथले कित्येक नियम धाब्यावर पैसे देवून बसवत असतील आणि इथे भ्रष्टाचार मुक्तीवर भाषणे ठोकत आहेत." असे लिहितात. "मी इथे लाच देतो" असे गृहीत धरून लिहायचे त्यांना काय कारण? मी इंडोनेशियन नागरिक नाहीं आणि म्हणून मला इंडोनेशियातील भ्रष्टाचाराबद्दल कांहींच देणे-घेणे नाही! एक भारतीय नागरिक म्हणून मला भारतातील भ्रष्टाचाराबद्दल जितकी काळजी आहे, जितका संताप आहे तितका इंडोनेशियातील भ्रष्टाचाराबद्दल नक्कीच नाही! पण हीन आणि वैयक्तिक (वैचारिक नव्हे) प्रतिसाद इथे आणि इतरत्रही देण्यात या व्यक्तीचा हात कुणीच धरू शकणार नाहीं. एका प्रतिसादात या सभ्य गृहस्थांनी माझ्या "काळे" या आडनावावरून "कला (काळा) कावळा.. पितो पाणी गातो गाणी..." असा हीनतम प्रतिसादही लिहिला आहे. असले व्यक्तिगत प्रतिसाद अर्थातच मला बोचतात, पण आपल्या घटनेनुसार मला आहे तसेच वाचकांनाही लेखनस्वातंत्र्य असल्यामुळे माझी त्याबद्दल फारशी तक्रार नाहीं. पण असे हीनतम प्रतिसाद ’सकाळ’ने खास उभ्या केलेल्या तथाकथित ’मॉडरेशन’चा बुरूज पार करतात याबद्दल मात्र नक्कीच तक्रार आहे!

यापुढे तरी कुणाही लेखकाच्या लेखनाला आलेले व्यक्तिगत हल्ला करणारे हीन, अपमानास्पद प्रतिसाद ते "पास" करणार नाहींत अशी व्यवस्था सकाळचे व्यवस्थापक करतील अशी आशा आहे.

अपेक्षेप्रमाणे असे हीन आणि वैयक्तिक टीका करण्यात धन्यता मानणारे वाचक स्वभावाने अर्थातच भ्याड असतात, आपले पूर्ण खरे नाव लिहिण्याची त्यांना हिंमत नसते. कारण मी माझा ई-मेल पत्ता देऊन त्यांनी त्यांचा मुद्दा त्यांनी जास्त सविस्तरपणे लिहावा असे आवाहन करूनही तसे लिहिण्याची तसदी एकानेही घेतली नाहीं.

वाचकांनी माझ्या लेखनातील मुद्द्यांवर यथेच्छ टीका करावी, पण वैयक्तिक पातळीवरील केलेल्या हीन टीकेमुळे मूळ लेखकाची इज्जत जात नाहीं तर असे प्रतिसाद लिहिणार्‍या वाचकांची आणि ते "पास" करणार्‍या मॉडरेटर्सची जाते हे संबंधितांनी कधीही विसरू नये. त्यातल्या त्यात सुखद वाटणारी बाब म्हणजे असले हीन आणि अभिरुचीशून्य प्रतिसाद देणार्‍यांना या लेखाच्या इतर वाचकांनीच परस्पर झापले आहे. अशा वाचकांना मी इथे धन्यवाद देऊ इच्छितो.

असो. जोपर्यंत मला वाचकांचे प्रोत्साहन मिळत आहे तोपर्यंत मी नक्कीच लिहीत राहीन.

(sbkay@hotmail.com)
SALMAN___S SPECIAL TREAT FOR DELHI ...

वाचकांच्या प्रतिक्रिया
On 25/10/2012 03:58 PM Sudhir Kale said:
Looking at what is coming out of Gadkari's "story", my earlier comment that no political party is clean (coalgate, Lavasa & Purti) and BJP is less 'experienced' seem to be correct. Gadkari should resign without waiting for probe results by way of a good example for future and also to increase the moral pressure on Congress. Let's hope BJP high command does it with grace. I repeat that if our leaders don't mend their ways, there is no other solution than a bloody revolution! Support Anna/Kejriwal
On 18/10/2012 02:27 PM Sudhir Kale said:
देशपांडेसाहेब, आता तेच-तेच लिहिणे होते आहे आपले. त्यामुळे नव्याने लिहिण्यासारखे कांहींच नाहीं. फक्त एकच सांगतो कीं तेहरीर चौकातली निदर्शने शांततेतच चालली होती, फक्त लोक तिथून हलायला तयार नव्हते. तेही होस्नी मुबारक यांना सहन झाले नाहीं व शेवटी जेंव्हां त्यांनी आपले खास हत्यारी रक्षक तिथे घुसविले तेंव्हांच रक्तपात झाला. त्यातही बहुतेक मृत्युमुखी पडलेले लोक निदर्शकच होते!
On 18/10/2012 02:46 AM A Ra Deshpande said:
केजरीवाल ह्यांनी जनपथचा तेहारीर चौक करू म्हणाले होते त्यावरूनच त्यांना व्यक्तींना टार्गेट करून लोकांमध्ये संसदीय प्रणाली आणि न्याय व्यवस्था दोन्हींचा जन्मानासातला विश्वास उद्यावायाचा आहे , एकदा लोक रस्त्यावर दगड हातात घेवून एका तरी संस्थेच्या विरोधात उत्तरले कि मग बलाचा वापर करावा लागतो आणि त्यातून मग पोलिसी आणि सैनिकी संस्थांच्या विरोधात देखील लोक उतरता. ज्या संघीय लोकांना आणि विदेशी लोकांना भारतीय लोकशाही डोळ्यात खुपते त्याचं मात्र ह्यामुळे फावणार आहे
On 17/10/2012 09:36 PM Sudhir Kale (Part3/3, pl publish both parts together) said:
देशपांडेसाहेब, (भाग ३/३) शेवटी येतो लक्ष्मी मित्तलसाहेबांकडे. त्यांच्याइतका कार्यक्षम ’बॉस’ मी पाहिलेला नाहीं. मी उत्पादनक्षेत्रात असल्याने त्यांच्या इतर कारभाराबद्दल मला थेट माहिती नाहीं. पण सध्या भ्रष्ट नेते चर्चेत आहेत. उद्योगपतीला १०० रु.चा फायदा होत असल्यासच तो नेत्यांना १ रु.ची लांच देत असतो हे सर्वांना ठाऊक आहे. पण आंदोलनाची सुरुवात नेत्यांपासून सुरुवात झाली आहे. नेत्यांच्या प्रकरणांची खोलवर चौकशी झाली कीं पाठोपाठ उद्योगपतींचीही होईलच आणि त्यामागील सत्यही बाहेर पडेलच. (समाप्त)
On 17/10/2012 09:33 PM Sudhir Kale (Part2/3, pl publish both parts together) said:
देशपांडेसाहेब, (भाग २/३) सत्तेवर येणार्यांाना त्याची कल्पना असतेच. निदर्शक भडकले आणि त्यांनी ताळतंत्र सोडला तर कायदा-सुव्यवस्था राखायला पोलीसदल असतेच! थोडक्यात आंदोलने करणे हे लोकशाहीसाठी अतीशय योग्य तंत्र आहे. जिज्ञेश यांनी मी "भाजपा"विरुद्ध का लिहीत नाहीं असे विचारले होते त्याचे उत्तर मी "मी कुठल्याही पक्षाला बांधलेला नाहीं" असे माझ्या मते चोख उत्तर दिलेले आहे. कारण राज्य करण्याचा फारसा अनुभव नसल्याने भाजपा अद्याप भ्रष्टाचाराच्या बाबतीत कांहींसा "कलका बच्चा"च आहे. (भाग-३)
On 17/10/2012 09:31 PM Sudhir Kale (Part1/3, pl publish both parts together) said:
देशपांडेसाहेब, (भाग१/३) इंग्रजांच्या जमान्यात लोकशाही होती काय? मोर्चे काढणे वगैरे मार्ग सर्वसाधारणपणे लोकशाहीत वापरले जातात. जे लोकशाहीत निवडणुकीच्या मार्गाने राज्य करतात त्यांना मोर्चा, घेराव वगैरेंना तोंड द्यावेच लागते. अलीकडे शिक्षणाच्या फीमध्ये झालेल्या अभूतपूर्व वाढीविरुद्ध खुद्द इंग्लंडमध्येही प्रचंड निदर्शने झाली होती हे तुमच्या वाचनात आलेले असेलच. तसेच Occupy Wall Street या नावाने अमेरिकेतही निदर्शने झालेली आहेत. निदर्शने करणे हा एकच योग्य लोकशाही मार्ग आहे (भाग-२)
On 17/10/2012 06:59 PM A Ra Deshpande said:
आणि खाली कुणीतरी वाळू चोरीबद्दल सांगितलं आहे त्यावर तुमचं मत काय? त्याच प्रमाणे जीग्नेश्ला केवळ गोल गोल उत्तरे का देत आहात? हे सुधा समजत नाहीये. तुम्ही स्वतकडे बघा , मित्तल ह्यांना direct रेपोर्त करणारे तुम्ही त्यांचा नोकरीचा राजीनामा देण्याचा धाडस नक्कीच केल नसेल तेही सोडून देवू पण भ्रष्ट माणसाला पाठींबा देवून पर्शास्तीपत्रक का देत आहात? अण्णांच्या मागे हे सगळे असेच आहेत स्वत कातडी सांभाळून किंवा भ्रष्टाचार करून दुसर्याला दोषी ठरवणारे.
On 17/10/2012 06:56 PM A Ra Deshpande said:
काळेजी तुम्हाला माझे म्हणणे खरच कळत नाहीये का मुद्दाम कळून न कळल्या सारखे करत आहात? नेत्याने भ्रष्टाचार केला म्हणून त्याच्या घरासमोर घोषणाबाजी करून त्याच्या बायका पोरांना घाबरवण्याची जी आईडिया अण्णांनी दिली ती खरच त्यांच्या अपरिपक्वता दाखवते ह्यावर तुमच मत काय हे विचारलं होता, गांधीजीनी कुठल्या इंग्रज अधिकार्याला टार्गेट केलेला कुणाशी वयक्तिक भांडण केलेला कुणाच्या घरादारावर मोर्चे काढलेले आठवत आहेत का? ह्याला म्हणतात परिपक्वता, चौरा चोरीमध्ये पोलीस स्टेशन जळल्यावर जबाबदारी घेवून आंदोलन मागे घेत.
On 17/10/2012 06:18 PM Sudhir Kale said:
देशपांडे-जी, (भाग-२) त्यांच्या कामाव्यतिरिक्त त्यांची इतर वैयक्तिक कुलंगडी बाहेर काढू नयेत. पण भ्रष्टाचार हा नक्कीच आपल्या कामाच्या सत्तेतून उपजतो. त्याच्यावर टिप्पणी करण्याचा जनतेला नक्कीच हक्क आहे व तो अण्णांनी बजावला तर त्यात कांहींही चूक नाहीं! जरी ’ई-सकाळ’वरील लेखन हा माझा पेशा नसला तरी सुद्धा माझ्या लिखाणातील आशयावर वाचकांनी जरूर टिप्पणी करावी, मतभेद सांगावेत, पण वैयक्तिक भाष्य टाळावे एवढीच माझी अपेक्षा. त्यात माझे कांहींही चुकले नाहीं.
On 17/10/2012 03:14 PM Sudhir Kale said:
देशपांडे-जी, (भाग-१) थोडक्यात सांगायचे तर "ठेविले अनंते, तैसेची रहावे, चित्ती असो द्यावे समाधान!" हेच शेवटी त्रिकालाबाधित सत्य आहे हेच खरे, नाहीं कां? देशपांडेसाहेब, या नेत्यांनी राजकारण हा पेशा म्हणून पत्करलेला आहे. त्यानुसार त्यांनी काम केले पाहिजे ज्यासाठी त्यांना मानधन व इतर सवलती मिळतात व त्यांनी सचोटीने काम करावे अशी मानधन देणार्‍या जनतेची अपेक्षा असते. ते न करता त्यांनी भ्रष्टाचार केल्यास त्यांना जाब विचारायचा त्याच जनतेला हक्क आहे. अण्णांनाही आहे, आपल्यालाही आहे व मलाही आहे. (भा-२ पहा)
On 17/10/2012 03:04 PM Sudhir Kale said:
देशपांडेसाहेब, थोडक्यात सांगायचे तर "ठेविले अनंते, तैसेची रहावे, चित्ती असो द्यावे समाधान!" हेच शेवटी त्रिकालाबाधित सत्य आहे हेच खरे, नाहीं कां?
On 16/10/2012 07:35 PM A Ra Deshpande said:
वैयक्तिक पातळीवरील केलेल्या हीन टीकेमुळे तुम्हाला त्रास होतो तसाच तुमचे अण्णा वैयक्तिक पातळीवरील मंत्र्यांवर टीका करतात त्याच काय? मंत्र्यांच्या घराला घेराव घाला असा आदेश देणे म्हणजे काय ? मंत्र्यांच्या घरात बायका पोरी लहान मुले नसतात का? घेरावातल्या गर्दीचा फायदा घेवून कुठल्या समाजकंटाकाने जमावाला घरावर हल्ला करण्यास प्रवृत्त केला तर? किंवा आग लावली तर - अन्नांमध्ये तसाही जबाबदारी घ्यायचा धेर्य नाही त्यामुळे ते हात वर करतील.
On 16/10/2012 07:14 PM Sudhir Kale said:
रॉबर्ट वाडरा आणि डीएलएफ यांचे 'प्रताप' चित्रवाणीवर पाहिल्यानंतर अण्णा आणि केजरीवाल यांच्या आंदोलनाचे महत्व फारच ठळकपणे स्पष्ट होते. आता तर खेमकांची बदली करून टाकण्यात आली! काल पिग्विजयसिंग यांनी तर सिक्सरच मारली...! म्हणतात काय तर आम्ही (ब्रह्मचारी) वाजपेयींच्या जावयाची किंवा अडवाणींच्या मुलांची कुलंगडी बाहेर काढली नाहींत ते सौजन्य भाजपावाले सोनिया गांधींना का दाखवत नाहींत? (तेरीभी चुप-मेरीभी चुप?) वा भाई वा!
On 15/10/2012 08:40 PM Sudhir Kale (+11) said:
जिज्ञेशसाहेब, माझ्या http://online2.esakal.com/esakal/20120905/5628337931127676072.htm या लेखाला प्रतिसाद देताना वाचक परांजपे गरजले होते कीं "जर वाजपेयी आणि अण्णांना नथीतून तीर मारणार असाल तर आदनावाकडे दुर्लक्ष करण्यात येईन", इथे गोखलेसाहेबांनी मला काँग्रेसवाला ठरविले, आता आपण पुन्हा ’भाजपा’वाला ठरवत आहात. सत्य हे आहे कीं मी घटनांनी प्रभावित होऊन लिहितो. मग पक्षाकडे पहात नाहीं. राजकीय नेत्यांनी भ्रष्टाचारासाठी जणू एक SOP बनविली आहे. ही वापरून ही नेतेमंडळी पैसे थेट स्विस खात्यात पाठवितात?(भाग-२)
On 15/10/2012 06:07 AM Sudhir Kale said:
Dear Swair Paree, you have hit the nail on its head! Thanks. Request pl write to me on my e-mail ID bcz my memory is failing me! My apologies for that.
On 14/10/2012 11:12 PM kirti said:
अण्णा राळेगण मधल्याच चालू असलेल्या वाळू चोरीच्या विरोधात का काही भूमिका घेत नाहीत? त्यांचे एक स्वीय सचिवांचे सख्खे बंधू ह्या धंद्यात सापडले होते त्या बद्दल तुम्हाच्या भाषेतल्या "इमानदार भ्रष्टाचाराचा" समाचार अण्णा का घेताना दिसत नाहीत. केजरीवाल सारख्या धूर्त माणसाविषयी तर बोलायलाच नको. मेलेल्याच्या टाळू वरच लोणी खाणारे भाजप सुधा त्याचा मालेचे मनी.
On 13/10/2012 11:19 PM Jignesh said:
श्री काळे, मी आपणास भाजप चे नेते भ्रष्टाचार करतात त्याबद्दल विचारले होते. आपण मुद्दा चुकवून पतली गल्लीसे निकल गये. जरा रेशीमबाग वाले गडकरीबद्दल लिहा. असे बरेच आहेत. भारतात आल्यास भेट घडवता येईल.
On 13/10/2012 03:32 PM Sudhir Kale (Author) said:
http://online2.esakal.com/esakal/20121010/4703579932422277832.हतं Please open the link to read the above article published in our own 'Sakal' which tells us a lot about the very well educated leaders of the Naxalite movement raging in 33+% of India. That is why I have said that Anna-Kejriwal movement has to succeed because the alternative is a bloody revolution like the French revolution in late 18th century! All Indians therefore should actively support this movement & pray for its success.
On 13/10/2012 12:35 PM Sudhir Kale said:
Dear Mr Prashant, thanks. No, there is absolutely no misunderstanding.
On 12/10/2012 08:20 PM swair paree said:
सुधीर काका, नमस्कार! अपेक्षा आहे ओळखले असावेत. अण्णांच्या आणि केज्रीवालांच्यात झालेल्या मतभेदांचा हा कोण श्रेष्ठ आणि कोण कनिष्ठ याच्याशी काही संबंध नाही, असे मला वाटते. ज्याच्या त्याच्या तत्वांचा, मुल्यांचा हा प्रश्न आहे. त्यांचे रस्ते वेगवेगळे असले, तरी ध्येय एकच आहे. परिणामी यातून जनतेने त्यांना पाठींबा देऊन देशाची प्रकृती सुधारण्यास हातभार लावावा! नाहीतर या देशाला क्षयरोग गाठण्यास वेळ लागणार नाही. भ्रष्टाचाराच्या भस्मासुराने अर्द्द्यापेक्षा जास्त गिळले आहे, थोडे शिल्लक आहे, ते सांभाळावे.
On 12-10-2012 04:05 PM Prashant P said:
I read both articles of yours. Excellent! Nowadays, there are hardly any articles which are writen in pure Marathi with good analysis, Keep it up! One (unsolicited!) suggestion - You should not respond to any comments; however good or bad theymay be. Responding to bouquets & to especially to brickbats, leads to so much unwanted diversions. Hope I'm not misunderstood here..
On 12/10/2012 01:04 PM Nilesh said:
खूपच छान लेख आहे!! काळे साहेब, धन्यवाद!!!
On 12/10/2012 07:50 AM Sudhir Kale (Author) said:
विजय ग्रोक हळेसाहेबांना (Vijay grok hale) मी स्वत:चा "बडवलेला ढोल" माझ्या लेखाच्या कुठल्या वाक्यात ऐकू आला ते कळले तर भविष्यकाळात ते मला टाळता येईल!
On 12/10/2012 07:48 AM Sudhir Kale (Author) said:
भोसले-जी, विरोधी सूर असलेल्या कुठल्या प्रतिक्रियांना उत्तर देताना माझा तोल ढळला ते सांगितलेत तर मी यापुढे तशी काळजी नक्की घेईन. पण मला तरी असे माझे कुठलेच वाक्य आढळत नाही. या उलट मला provoke करण्यासाठी आलेल्या अभिरुचीशून्य प्रतिसादांना उत्तर देतानासुद्धा मी माझा तोल जाऊ देत नाहीं, शिष्टाचार (decorum) पाळतो. तरीसुद्धा माझ्याकडून चुका झाल्या असल्यास जरूर निदर्शनास आणाव्यात, मोघम बोलू नये ही विनंती.
On 11/10/2012 08:33 PM Sudhir Kale (+5) Part2/2, pl publish both parts together) said:
जिज्ञेशसाहेब, (भाग-२) माझी परिस्थिती "पानी तेरा रंग कैसा?" सारखी आहे. मला स्वत:चा रंग नाहीं! मी बातमी वाचतो, ती घटना पहातो आणि जर त्यातून प्रभावित झालो तर त्यावर लिहितो. म्हणूनच तालीबानचा समर्थक आणि काश्मीरमध्ये जिहादी कारवायांचा हैदोस उभा करणार्याि मुशर्रफना भारतात वाटाघाटींसाठी बोलावून, त्यांना अनुचितपणे इज्जत बहाल करून वाजपेयींनी एक घोडचूक केली असे मी लिहिले होते. त्यावेळी मी वाजपेयींचा पक्ष मी पहात नाही! विषयांतराबद्दल क्षमस्व! (SOP means Standard Operating Procedure)
On 11/10/2012 08:27 PM Sudhir Kale (Author) said:
विनायकराव, अण्णांनी पवनचक्कीप्रकल्प सार्या शेतकर्यां ना फायदेशीर आहे म्हणून गावकर्यांरची बाजू घेतली नाहीं कीं त्यात त्यांचा वैयक्तिक फायदा नसल्यामुळे असे केले हे जोवर मला नक्की कळत नाहीं तोवर या घटनेवर टिप्पणी करणे गैरच ठरेल म्हणून मी असे करायचे टाळत आहे. पण पारनेर तालुक्यातून अण्णांच्या आंदोलनांना फारसा पाठींबा नसतो हे विधान पटत नाहीं कारण उपोषणाच्या यशानंतर राळेगणसिद्धीचे सरपंच वगैरे दिल्लीला त्यांच्या सत्कारार्थ गेल्याचे वाचल्याचे स्मरते. म्हणूनच "पिकते तिथे विकत नाहीं" यातला हा प्रकार नसावा
On 11/10/2012 07:40 PM Yashwant said:
काळे साहेब, खरच उत्कृष्ट लेख आहे!!! शेवटी सर्वांनी एवढंच म्हणावे कि " मी पण आण्णा, तुम्ही पण आण्णा, सारा देश आहे आण्णा!!!" गांधीजी नंतर सर्वांत मोठे देशव्यापी आंदोलन आणि त्याला मिळालेला राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय प्रतिसाद आपण सर्वांनी पाहिलेला आहे. भारताच्या कानाकोपऱ्यात आणि घराघरात आण्णा पोहचले. अण्णांची निस्वार्थी वृत्ती, त्याग, देशाविषयी तळमळ ह्याला कारणीभूत आहेत..काही लोक द्वेष भावनेतून टीका करतीलही पण त्याकडे दुर्लक्ष केलेले बरे. स्वातंत्र्य प्राप्ती नंतरची हि सर्वांत मोठी जनजागृती !!!
On 11/10/2012 05:33 PM Sudhir Kale (+4, how often to send?) said:
Mr Deshpande, Mrs Gandhi had sought Israel's help to bomb (using normal, not nuclear bombs) the Pakistani Nuclear facility at Kahuta (not Karachi), not the other way! Israel was ready to help in their own interest, that's all! Israel had experience as it done it by themselves against Iraq. That time dictator Gen. Zia was in power. Ayaz Amir's articles are appearing in democratic Pakistan now & would never have appeared under Zia! And still it is me who is confused? Bravo! भले शाबास!
On 10/10/2012 09:08 PM A Ra Deshpande said:
काळे तिकडे बसून तुम्हाला कामाला लावत आहेत आणि तुम्ही सगळे भांडत बसला आहात. चला मान्य करू अण्णा ग्रेट आहेत पण त्याने काय फरक पडणार आहे? रोज उठून आरोप करणे पुरावे मागितले कि पळून जाणे ह्याने फक्त लोकशाहीची लक्तरे काढली जातात.काळे स्वताच कन्फुज आहेत आधीच्या लेखात (अनुवादित) इस्रैल्ला कराचीत अणुबॉम्ब टाकून द्यायला भारताने मदत करायला हवी होती म्हणतात तर दुसर्या लेखात अयाजला चिकटतात, आधीच इसैलचा ऐकून बॉम्ब टाकला असता तर आयाज राहिला असता का लेख लिहायला? आणि इस्रेलचा ऐकलायला भारत काय मंद बुद्धी आहे का?
On 10/10/2012 06:51 PM धनंजय भोसले said:
इंडोनेशिया मध्ये बसून एवढ्या तावातावाने लेख लिहिणे आणि विरोधी सूर असलेल्या प्रतिक्रियांना उत्तर देताना तोल ढळणे हे काही ठीक नाही. हे प्रकरण एवढे वाढविण्याची काहीही गरज नव्हती. पहिले २ लेख वाचले तेव्हा अण्णा हजारेंचा एक अनुयायी या दृष्टीकोनातून तुम्हास पहिले जात होते. परंतु ह्या शेवटच्या (!) लेखाने मात्र उरली-सुरली पूर्ण गेली. हात दाखवून अवलक्षण झाले आहे. आता तर भारतात अण्णांना मानणारे अगदी थोडे लोक शिल्लक असतील. इंडोनेशिया मध्ये अजून काही शिल्लक आहेत एवढाच या प्रकरणाचा अन्वयार्थ..!!
On 10/10/2012 06:13 PM Sudhir Kale said:
Dear Mr Vinayak Shinde, I believe that corruption is administering slow poison to our country & I give highest respect to any person who takes a stand against it. So Anna, Kejriwal Ms befo are on my heroes' list. If this movement fails, other alt is Naxal type bloody revolution!
On 10/10/2012 05:56 PM vinayak said:
मी स्वतःहा अण्णाच्या राळेगण सिद्धी या गावाशेजारील गावाचा आहे पण मला नाही वाटत कि आण्णा काही देव वैगरे आहेत कारण आमच्या शेजारील नगर तालुक्यात पवनचक्कीसाठी जमीन संपादन करण्यात येणार होती तेथील शेतकरी अण्णा कडे आले व म्हणाले कि आमची जमीन वाचविण्यासाठी तुम्ही आंदोलन करा पण अण्णांनी आंदोलन करण्यास नकार दिला कारण त्यातून त्यांना काहीही फायदा होणार नव्हता आमच्या पारनेर तालुक्यातून अन्नाच्या आंदोलनाना फारसा पाठींबा नसतो कारण लोकांना आण्णा बद्दल सर्वकाही माहिती आहे
On 10/10/2012 05:15 PM vinayak shinde said:
सुधीर काळे साहेब , मला फक्त दोन प्रश्न विचारायचे आहेत - सारखे सारखे उपोषण आणि त्याचा धमक्या देणे योग्य आहे का ? तुमचा लोकपाल आण्याचा एवढा हट्ट का आणि इतके वर्ष जे झाले नाही ते ६ महिन्यात शक्य आहे आसे का आणणा का वाटले ? आणि team आणा म्हणजे सगळा भारत हे समजून हित्लार्शाही योग्य होती का ?
On 10/10/2012 07:39 AM Sudhir Kale (+5) said:
अमोलसाहेब, आधी लिहिल्याप्रमाणे मी देशासाठी च्या शरीराला कष्ट देणार्‍या, स्वत:कडे कांहींही न ठेवणार्‍या व ग्रामोद्धारात स्वत:ला झोकून देणार्‍या अण्णांना दैवत मानतो पण माझे डोळे उघडे आहेत व त्यांच्यात मानवी त्रुटी आहेत याचेही मला पूर्ण भान आहे. मला इथे किंवा माझ्या वैयक्तिक ई-मेलवर आपण उल्लेख केलेल्या video clips चे दुवे पाठविलेत तर मी त्या पाहीन व त्यातल्या मजकुरानुसार माझ्या मतात जरूर ती दुरुस्तीही करेन. तरी ते दुवे जरूर पाठवावेत. तसेच आपल्या प्रतिसादाचा पहिला अप्रकाशित भाग परत पाठवावा! धन्यवाद
On 10/10/2012 06:15 AM Jignesh said:
श्री काळे, इथे आपल्याला पाठींबा देणारे लोक भाजपच्या भ्रष्टाचाराबद्दल काही बोलत नाहीत. आपले लेख आणि कॉमेंट्स कॉंग्रेसलाच दोषी ठरवतात. भाजपेयी आपल्या परीभाषेत "इमानदार भ्रष्टाचारी" आहेत काय? कळावे लोभ असावा.
On 08/10/2012 08:49 PM Amol Pawar (part 2) said:
सुधीरजी, अण्णांचे वीस वर्षापूर्वीचे सहकारी अण्णांबद्दल काय बोलतात याचा जरा शोध घ्या. बाबा आढाव आणि इतर काही प्रसिद्धीपरा:मुख समाजसेवकांचे काय विचार आहेत हेपण जाणून घ्या युट्युबवर वीडीओ आहेत. नुकतेच अभय बंग यांनी त्यांच्या बरोबर येण्यास नकार दिला. सुरेश पठारे सोडून गेले, बिचार्या राजू परुलेकारांवर त्यांनी नाही ते आरोप केले, तसे ते तुमच्यावरही एक दिवस करतील. अण्णा म्हणजे फक्त देव बाकी सगळे काय मूर्ख आहेत काय? अण्णांना देव मानणारे तुम्ही आणि भोंदूबाबांच्या मागे लागणारे दैववादी मेंढरे यात फरक तो काय
On 08/10/2012 06:51 PM Vijay grok hale said:
अशोक साहेब सुधीर काळे हे फक्त स्वतःचा ढोल बडवतात
On 08/10/2012 05:46 PM Praachi Kulkarni said:
+ "मुक्तपीठ"च्या इतिहासात "बाप-पण अनुभवताना" या अस्मिताचा बाबा प्रसाद इनामदार याच्या लेखाला सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळाला आहे,वाचकांkadana!+
On 08/10/2012 01:27 PM Munna Bhai said:
विषयांची योग्य निवड आणि गुणवत्तापूर्ण आशय यामुळे आपले लेख वाचनीय बनतात व त्यामुळेच 'सकाळ'वर ते सातत्याने प्रकाशित होत असावेत. आपली मते प्रत्येक वाचकाला पटतीलच असे नाहीं पण लोकशाहीत असेच हवे! आपण लिहीत रहा!
On 07/10/2012 11:01 PM Kamlesh Bhandari said:
तुमचा पहिले २ लेख नाही वाचू शकलो. हा वाचून आणि प्रतिक्रिया वाचून एवडच सांगतु कि तुम्मी लिहित राहा. पण सकाळ ने तुम्माला व्यासपित दिल हे विशेष, सकाळ चे आभार. तुम्मी मात्र योग्य तेच लिहाल हा विश्वास.
On 07-10-2012 01:36 PM kdchitnis said:
सकाळमध्ये सुधीर काळे यांच्या स्तंभाला मिळणारी इतकी जागा कधी व कशी राखीव झाली याचे रहस्य कळेल का?टाहो फोडून अण्णांना का हो असे केलेत असा अगतिक प्रश्न कशाला?अण्णांची प्रकृती,त्यांचे प्रतिमा यांना जपूनच त्यांना वागावे लागते हे कधी समजणार?अण्णांना कंपनीचा पडलेला घेराव सुटलाय हे किती छान!अण्णांनी उपोषणे करूनच एकट्याने नेतृत्व करावे का?अनेक सेवानिवृत्ताचा जथा त्यांना येऊन मिळणार आहे,कशाला?जनजागृती करण्यास रस्त्यापेक्षा, व फुटकळ आंदोलन्नापेक्षा पक्षाचा पर्याय व आधार अधिक ठोस ठरणारा नाही का?
On 06/10/2012 06:21 PM Sudhir Kale, Author (+3) said:
प्रीतीमॅडम, माझ्या गेल्या लेखाला दिलेल्या प्रतिसादात तुम्ही मला कराचीत रहायचा सल्ला दिला होतात त्याला मी उत्तरही दिले होते ते वाचलेत कीं नाहीं कळले नाहीं! पण मी जकार्ताला रहात असलो तरी भारतात बर्याुचदा येतो व देहही भारतातच ठेवणार आहे तेंव्हां तिथे काय होत आहे याची चिंता मला असणे सहाजीकच आहे. तरी भावनेच्या भरात "तुम्ही केवळ आगीत तेल ओतायच काय करत आहात" असली भाषा कां वापरता? आयुष्याच्या शेवटी भारतातच रहायचे आहे व त्यावेळी भारतातील परिस्थिती सुकर असावी असे वाटणे चूक कसे?
On 06/10/2012 06:19 PM Sudhir Kale +4 (Part 1/3, pl publish all 3 together) said:
(भाग-३) पण आज राज्यकर्ते पार निर्लज्ज झाले आहेत, त्यांच्यात कसलेही औचित्य उरलेले नाहीं आणि पुरेसा वेळ दिला तर मतदार सगळे अपराध विसरून जातात अशा कल्पनेत ते आहेत. राजा, कलमाडी, कन्नामोळी या तिघांच्या पुनर्वसनातून हेच दिसते. म्हणून अठराव्या शतकाच्या शेवटी झालेल्या फ्रेंच राज्यक्रांतीसारखी रक्तलांछित राज्यक्रांती टाळायची असेल तर आज अण्णांचे आंदोलन यशस्वी व्हायलाच हवे. सामान्य माणसाला किंमत उरली नाहीं याबद्दलची चीडच भारतातील नक्षलवाद्यांच्या यशाला कारणीभूत आहे असे मला वाटते. (समाप्त)
On 06/10/2012 06:18 PM Sudhir Kale +4 (Part 1/3, pl publish all 3 together) said:
(भाग-२) हिंदु धर्मात देवांना-त्यांच्यात देवत्व असले तरी-आपण मनुष्यासारखे मानतो. म्हणूनच त्यांची पूजा करताना त्यांना स्नान घालतो, त्यांच्यावर फुले वहातो, त्यांची आरती करतो व त्यांना जेवूही घालतो. असे इतर कुठल्या धर्मात होत असलेले माझ्या माहितीत नाहीं. त्यामुळेच आपल्या देवांकडून कधी-कधी चुका होतात. त्यात ’इंद्र’ हा सगळ्यात ’प्रसिद्ध”! पण तरी त्यांच्यातले देवत्व आपण मानतोच. अण्णांना मी दैवत मानले तरी माझे डोळे उघडे आहेत, त्यांच्या ’ग’च्या बाधेचा, डावपेचांतील चुकांचा मी उल्लेखही केलेला आहे.(भाग-२/३)
On 06/10/2012 06:17 PM Sudhir Kale +4 (Part 1/3, pl publish all 3 together) said:
"भ्रष्टाचार हा चिंताजनक आहे. दोषी आढळणार्यांना कॉंग्रेस सरकार शिक्षा देत आले आहे." असे काल ताईमहाराज गुजराथमधल्या त्यांच्या प्रचारसभेत निर्लज्जपणे गरजल्या! मला तर धक्काच बसला! धन्य आहे या बाईची! ज्यांच्यावर पैसे खाल्ल्याचे आरोप आहेत त्या तिन्ही 'सावांची' स्थायी कमिटीवर वर्णी लागून त्यांचे पुनर्वसनही सुरु झाले. कॉंग्रेसकडे दुसरे लायक नेतेच नाहींत? काल चित्रवाणीवर कॉंग्रेसचा कुणी प्रवक्ता हे कसे कायद्याला धरून आहे हेच तावातावाने सांगत होता. पण असे करण्यात औचित्य नसल्याची खंत कुणाला आहे?(भाग-१/३)
On 06/10/2012 06:05 PM Sudhir Kale, Jakarta said:
आशिश-जी, आज जकार्तात नुकतीच लग्न झालेली, वर्षा-दोन वर्षाची मुलं असलेली भरपूर मराठी माणसं IT सेक्टरमध्ये आलेली आहेत. त्यांच्याकडे पाहून आम्हा बुजुर्गांना खरंच मनापासून् आनंद होतो. गोखलेसाहेबांकडे अजीबात लक्ष देऊ नका! अमेरिकेत जमत असेल तर जरूर जा पण पैशाची बचत करून सचोटीने "माया" जमा करायची असेल तर इंडोनेशिया हा चांगला पर्याय आहे. मी त्या क्षेत्रातला नाहीं पण त्या क्षेत्रातल्या खूप लोकांचा परिचय मात्र आहे! जरूर प्रयत्न करा. त्यात माझा आपल्याला जर कांहीं उपयोग झाला तर मला आनंदच होईल!
On 06/10/2012 05:59 PM Sudhir Kale, Jakarta said:
गोखलेसाहेब, आता मी धन्य झालो. माझ्यावर "नागपूरचे एक्सटेन्शन काऊंटर"असल्याचे आरोप झाले होते त्यातून सावरतो-न सावरतो तर तोवर आपण तर मला पार "पोचवून" दिलेत कीं हो! धन्य आहे आपली. धन्यवाद!
On 06/10/2012 04:54 PM Ashok Gokhale said:
आशिष वेड्या जकार्तात कुठे सोफ्टवेर चे जोब शोधत आहेस? बाहेर ज्याचेच आहे तर अमेरिका युके जे लक्ष ठेव, आशिया पासिफिक मधल्या देश भारता पेक्षा घाण आहेत (Singapore सोडलं तर) इंडोनेशिया आणि Filipinos मध्ये केवळ BPO आणि Call centers आहेत. अमेरिकेच्या फेकलेल्या तुकड्यावर जगणारे देश अशी त्यांची ओळख आहे
On 06/10/2012 04:48 PM Ashok Gokhale said:
सुधीर काळे हा कॉंग्रेसचा माणूस आहे.म्हणजे विचारांनी कॉंग्रेसच्या जवळ असेलेला. हे मला आधीच लक्षात आला होता असो मुद्दाम अण्णांचा अनुयायी म्हणत त्यांना दैवत मानत त्यांच्या अनुयायांमध्ये सामील व्हायचा आणि त्यांच्या चुका , पात्रता जगाला दाखवून द्यायच्या , अण्णा ट्रक driver होते हे तीन तीन वेळा सांगण्याच त्यांची क्षेशानिक पात्रता दाखवून द्यायची, लेखातून अगदी नकळत वाजपेयीन टार्गेट करायचं. डोळे बंद करून दुध पिणाऱ्या मांजराला जस वाटत असत कि जग आपल्याकडे बघत नाही तशी ही गत आहे
On 06/10/2012 12:30 PM Sudhir Kale (Author) said:
संतोष-जी, कीर्तीमॅडमना इतके समर्पक उत्तर मला देता आले असते असे वाटत नाहीं. धन्यवाद! भारताची "लायसेन्स-राज"मधून सुटका करण्याचे खरे श्रेय द्यायला हवे सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय नाणे निधीला आणि त्यानंतर त्यावेळचे आपले पंतप्रधान नरसिंह रावांना. पण राव हे केवळ नेहरू-गांधी घराण्यातले नसल्यामुळे त्यांना जे श्रेय मिळायला हवे होते ते मिळाले नाहीं. राव हे स्वयंप्रकाशित 'तारा' होते तर मनमोहन-जी हे परप्रकाशित 'ग्रह' आहेत हे सर्व भारतीयांनी लक्षात ठेवायला हवे! राव हे आपले सर्वात कार्यक्षम प्रधानमंत्री होते!
On 06/10/2012 08:31 AM Santosh said:
कीर्तीबाई, मंत्री सकाळी ८ ते रात्री २ पर्यंत काम करतात?... विनोद आवडला. आता कोणते "काम" ते पण सांगा. संसदेत सर्व खासदार निदान उपस्थिती तरी लावतात का? (अर्थात तुरुंगात नसतील तर). आणि अर्थमंत्री म्हणून योग्य असणारी व्यक्ती पंतप्रधान म्हणून योग्य असेलच असे नाही. तेव्हा त्यांच्या अयोग्य कारभारावर टीका पण करायची नाही? आज सामान्य माणसाला राजकारणात शिरण्याची गरज आहे कारण कोणाच राजकीय पक्ष स्वच्छ नाही. केजरीवाल नेमके तेच करत आहेत. तुम्हाला घर साफ करायचे नसेल तर निदान त्यांना तरी करू द्या.
On 05/10/2012 05:18 PM Raj said:
अण्णा हे एक प्रामाणिक व्यक्ती आहेत परंतु त्यांच्यात नेतृत्वगुण आणि हुशारी नाही आहे. तसेच त्यांची धार सोड वृत्ती हि सुद्धा घातक आहे.
On 05/10/2012 04:34 PM sbkay@hotmail.com said:
बोरकरसाहेब, तरी बरं, ’कस्पटी’ न म्हणता ’कपटी’च म्हणालात! धन्यवाद..... बंटी-जी, मला नेहमीच तुमच्या एकोळ्या (’one-liners') आवडतात!
On 05/10/2012 04:14 PM Arun said:
I have read your both articles so I would say once upon time Mr. Aana was Criticized by people for whom he was fighting so no wonder if people are criticizing you again.. You carry on your writing.. Such a good article you have written. Thanks for that and waiting for next
On 05/10/2012 03:29 PM sbkay@hotmail.com said:
Dear Mr Ashish, it would be more appropriate if you would write to me on my personal e-mail for job openings.
On 05/10/2012 03:28 PM Preeti said:
सुधीर साहेब कुणी तरी खरच बोलाल होता कि तुम्ही तिथे बसून त्रागा व्यक्त करू शकण्यापलीकडे काही करू शकत नाही किंवा इथे काय भ्रष्टाचार होतोय त्याचा तुमच्या जीवनावर तिथे काहीच फरक पडत नाहीये (देशभक्ती वैगेरे गावगप्पा सोडून) त्यामुळे तुम्ही केवळ आगीत तेल ओतायच काय करत आहात, जस लंडनमध्ये बसून बीबीसी इजिप्त आणि सिरीयात करत आहे. राग मानून घेवू नका पण ही वस्तुस्थिती आहे.
On 05/10/2012 01:59 PM Ashish said:
काळेसाहेब तुमचे लेख चांगले आहेत. बाय द वे माझ्यासाठी काय जॉब आहे का तुमच्या इथे जकार्ताला? मी Software Professional आहे. बराच अनुभव आहे. काय असेल तर सांगा.
On 05/10/2012 07:16 AM D Borkar said:
काळे काका, तुमच्या लेख वाचून अन्नान्बद्दल तुमच्या मनात कपटी आदार आहे असे वाटते.
On 04/10/2012 11:04 PM Suyash Baramatikar said:
>Lashkaraatana पळून गेला होता-Driverchi नोकरी सोडून,हे ज्या माणसाबद्दल ऐकायला मिळालं, तो माणूस कुणाचा दैवत कसा होऊ शकतो....B.R.Aambedkar Had Requested Then Union Government To Give Reservation To अप्रगत मंडळी For 10 Years Only.Congress Politicians Continued Reservation For Vote Bank.सामाजिक अभिसरण गेलं गावाला-समाजाची वाट लागली.अखंड हिंदुस्थानची फाळणी व्हायची असली,तर ती स्वता:च्या प्रेतावरून असं जे म्हणाले होते, त्यांनी वरन त्या काळातले ५५ कोटी नापाकिस्तान्ला बहाल करायला लावले होते!>नंदनवन ?
On 04/10/2012 05:30 PM prakash nashik said:
काळे सर उशिरा प्रतिसाद दिल्या बद्दल दिलगीर आहे .. पण वेळ काढून आणि शोधून प्रतिसाद देतो आहे ... कोणी पण १०० % पूर्ण नसतो ... म्हणून निगेटिव कोमेंत कडे लक्ष नका देवू ..लोक काही पण फालतू सारख लिहितात मर्यादा सोडून पण .... मी तुमचे लेख नियमित वाचतो .. नुक्लीयार Diception चे सर्व लेख वाचले .. तुमचे लेख खरच प्रभावी आहेत .... असाच चांगल लिहित राहा आणि उद्वूग्न होऊ नका .. तुमचा नियमित वाचक ... फालतू कोमेंत बघायाच्ये असतील तर पैलतीरी चे लेख बघा
On 04/10/2012 12:57 PM Kirti said:
काळेजी तुमच्या वर थोडी लोकांनी टीका केली तर तुम्ही इतके उद्दिग्न झालात, जरा विचार करा तुम्ही किंवा सामान्य लोक, विरोधी पक्ष, खुद टीम अन्ना जेव्हा पूर्ण आयुष्य संसदेत घालवणाऱ्या, सकाळी आठ ते रात्री दोन पर्यंत काम करणाऱ्या मंत्र्यांना लक्ष करते तेव्हा त्यांना काय वाटत असेल? ज्या पंतप्रधानांनी अर्थमंत्री असताना भारताचा चेहरा बदलून टाकला त्यांना आयएएसचा जोब सुधा नीट न करता आलेले केजरीवाल जर घडी घडीला दोषी ठरवत असतील तर त्यांना काय वाटत असेल.
On 04/10/2012 10:30 AM Sudhir Kale (Author) said:
अत्रे-जी, घटशेंद्र-जी, तानाजीसाहेब, पांडुरंग पाटील-जी, अमोल कांबळे-जी, केशव-जी, अमोल बेणे-जी, घोरपडे-जी, राम-जी, प्रशांत-जी, श्री. बाळासाहेब, दीपक बनसोडे-जी, अनिरुद्ध मराठे-जी, उन्मेश देशपांडे-जी, बापू-जी, सिद्धार्थ जोशी-जी आणि मोहन-जी: मन:पूर्वक धन्यवाद. विक्रांत-जी, आपल्या ३ भागातील प्रतिसादातला पहिला भाग प्रसिद्ध झालेला नाहीं तो परत पाठवावा. अण्णांनी भ्रष्ट नेत्यांशिवाय सार्‍या देशाच्या सदसद्बुद्धीला आवाहन करून आणि तिला जागृत करून मोलाचे कार्य केलेले आहे!त्यांना यश मिळो हीच देवाकडे प्रार्थना!
On 04/10/2012 09:35 AM Santosh said:
२. लेखाचा उत्तरार्ध केवळ व्यक्तिगत हेतूने भरलेला आहे. तुमच्यावरील प्रतिक्रिया बद्दलची व्यक्तिगत चीड इथे व्यक्त करून सकाळ ची पाने कशाला फुकट दवडत आहात? त्याने कोणता सामाजिक हेतू साध्य होणार आहे? तुमच्याकडून हि अपेक्षा नव्हती..
On 04/10/2012 09:27 AM Santosh said:
काळेजी.. १.तुमचे पूर्वीचे लेख बर्यापैकी वस्तुनिष्ठ असत पण इथे मात्र तुम्ही अण्णांना दैवत आणि गांधींना सूर्याची उपमा देऊन घोर निराशा केलीत. या दोनही व्यक्तीकडे काही चांगली तत्वे होती पण त्यांनी काही चुकाही केल्या. त्यावर वस्तुनिष्ठपणे टिपण्णी करण्याचे धाडस दाखवा. अण्णांच्या बाबतीत ते थोडेफार केलेत पण गांधींच्या बाबतीत ते करण्याचे धाडस तुम्हाला झाले नाही. मुळात गांधीवादाने सर्व प्रश्न सुटत नाहीत हे सत्य जाणून घ्या. म्हणजे अण्णांचे आंदोलन का यशस्वी झाले नाही याचे उत्तर मिळेल. २.लेखाचा उत्तरार्ध..
On 03/10/2012 09:52 PM Bunty.. said:
काळे काय केलंत हे?
On 03/10/2012 07:55 PM Aniruddha Marathe said:
DJ आपली प्रतिक्रिया बरोबर आहे. अण्णांचा समर्थक लेख लिहितो त्याची मते प्रमाण मनालीच पाहिजे असे थोडीच आहे? मुद्दा असा आहे कि जी लोक अण्णांना भंपक समजतात आणि अण्णांच्या स्वभावातल्या आणि आंदोलनातल्या त्रुटींवर टीका करतात त्यांना देखील आपले मत मांडता आले पाहिजे. त्यांच्या योग्य टीकेला काळेसाहेबांनी काहीच उत्तर दिले नाही असे वाटते. अहंकार आणि महत्वाकांक्षा या दोन गोष्टींनी या चांगल्या आंदोलनाची पुरेपूर वाट लावली.
On 03/10/2012 02:31 PM DJ said:
काळे साहेब, अण्णा हजारे यांना तुम्ही स्वतःचे दैवत मानता हे सिद्ध प्रमाण मानून तुमचे लेख वाचले तरच ते पटतात. एखादा भक्त देवाची जी स्तुती गेल ती स्वाभाविक म्हणावी लागते. परंतु त्याच वेळी इतर राजकीय विश्लेषकांचे लेख वाचून माझ्या सारखे सामान्य लोक सुद्धा विचार करू लागलेत. आणि आता तर हे मनोमन पटले कि अण्णांचे आंदोलन हे तकलादू पायावर उभे होते म्हणूनच ऐन लढाईच्या वेळी ते कोसळले आणि टीम अण्णा सहित तुमच्या सारख्या सर्व पाठीराख्यांचे हसे झाले. 'अण्णा हे काय केलेत?' हे निराशावादी शीर्षक त्याचेच द्योतक आहे.
On 03/10/2012 02:23 AM vikrant,chicago said:
..३ सुसंस्कृत, सुविद्य आणि शान्तिभूशानान्सारखे कायदेपंडित देशाला भ्रष्टाचारी दानवांच्या जाचातून मुक्त करतील. हे सर्व कठीण आहे पण अशक्य नाही. ह्यामुळेच अशा विचारधारा जागृत ठेवणारे आपल्यासारख्यांचे लेख प्रसिद्ध व्व्हावेत हि सदिच्छा! सकाळने हे तिन्ही भाग प्रसिद्ध करावेत अशी सुबुद्धी त्यांना होवी हि सदिच्छा!
On 03/10/2012 02:18 AM vikrant,chicago said:
..२. टीम अण्णा मध्ये फुट असेल पण देशप्रेम आणि सद्सद्विवेकबुद्धी नक्कीच आहे. केजरीवाल , शांतीभूषण यांनी नवीन पक्ष स्थापन केला आहे त्याला तरुण लोकांनी आणि विद्यार्थ्यांनी साथ द्यावी आणि कोन्ग्रेस आणि इतर भ्रष्टाचाराची ग्लानी आहेल्या जुन्या खोडांना पाळता भुई स्थिती होईल अशी जबरदस्त झेप घ्यावी. 'यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत:,अभ्युधान अधर्मस्य तादात्मानाम सुजाम्याहम| परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम धर्मासंस्थार्पनाशय संभवामि युगे युगे|' याची प्रचीती होईल आणि केजारीवालान्सारखे ..3
On 03/10/2012 01:38 AM mohan said:
अरे पण अन्ना मुलेच का होईना जन लोकपाल इतका फेमेस झाला नाही तर केजरीवाल आणि दोस्र्या कोन्ताय्ही लोक मुले हे शक्य झाले नसते हे सर्वाना मान्य करावे लागेलच.
On 03/10/2012 12:38 AM Siddharth Joshi said:
आज भारतीय नागरिकांना फक्त स्वताचा विचार व स्वताचे आचरण सगळ्यात उच्च म्हणून मिरविण्याची सवय लागली आहे. आम्ही सांगतो ते बरोबर हीच त्यांची प्रवृत्ती आहे. बरोबर तेच आमचे हि प्रवृत्ती भारतीयान मद्धे येण्यास अजून अवकाश आहे. याचे म्हत्वाचे कारण म्हणजे भारतीय नागरिक स्वतचे डोके चालवत नाही. असो तुंम्ही लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणे सुरु ठेवा.
On 03/10/2012 12:38 AM bapu said:
काळेसाहे लोकांच्या फालतू कोमेंत कडे लक्ष देऊ नका. आपल्यकडे लोकशाही असल्याचा फक्त पुढारी नवे तर सामान्य लोक पण गैर्फैदा घेतात आणि काहीही विचार न करता टीका करतात. तुम्ही l मी तुमचे न्युक्लिएअर दिस्पेशिअन चे मराठीमध्ये अनुवाद केलेले पुस्तक वाचले आहे. खूप छान आहे ते.
On 02/10/2012 11:47 PM Unmesh Deshpande said:
सर तुम्ही लिहित रहा! गजेंद्र रस्त्याने जाताना श्वान्दिक भुंकतच राहणार. तुमच्या लेखनामुळेच एक दिवस क्रांती घडून येईल.
On 02/10/2012 11:31 PM Aniruddha Marathe said:
भारतामध्ये व्यक्तिस्वातंत्र्या आहे त्य्माळू कोणीही आपले मत प्रदर्शित करू शकतो जरी ती व्यक्ती इंडोनेशियात असली काय आणि इतर कोणत्या देशाची नागरिक असली काय! मला एक आक्षेप जरूर नोंदवावासा वाटतो. जो मनुष्य अण्णांना दैवत मानतो तो मनुष्य निष्पक्ष टीकाटिप्पणी कशी करेल. घटकाभर हा विषय बाजूला ठेवा, पण दैवत मानणार्याला लेखाची संधी दिली जाते तर जो अण्णा भंपक आहेत अशा विचाराच्या लोकांना देखील आपले मत लेखाद्वारे मांडता आले पाहिजे.
On 02/10/2012 11:24 PM deepak bansode said:
श्री काळे ह्या आंदोलनाला आलेल अपयश हे आंदोलनाच्या सुरवातीपासूनच दिसत होत कोणाच कोणाशीही ताळमेळ नव्हता. बेदी केजरीवाल हे नोकरशाह उमेदीच्या काळातील सरकाने दिलेल्या त्रासाबद्दल सरकारला ब्लाक्मैल करत होती. अन्न कधी एक म्हणायचे आणि परत नाही ... मुळात कायदे हे संसदे मध्ये बनतात हे अनाडी अण्णा IAS बेदी / केजारीवालाही समजल नाही याच आचार्य वाटत नाही कारण त्यांचा नाटकी पणा सारखा दिसायचा प्रसिद्धी आणि प्रसिद्धी ने तरलेल आणि मारलेल एक आंदोलन म्हणून इतिहास याची नक्कीच दाखल घेईल
On 02/10/2012 11:00 PM Balasaheb said:
"मी स्वत: तर अण्णांना दैवतच मानतो" This is a statement that is more emotional and less realistic. Anytime a human being is equated to GOD, it becomes very difficult to involve in objective critisism. No human, no matter how geart he/she is, should ever be elevated to the status of GOD. Mahatma Gandhi, Veer Savarkar, Shivaji Maharaj and many other leaders always insisted that they get their inspiration from GOD but they are not GOD! More in my next message.
On 02/10/2012 10:33 PM Prashant said:
काळे साहेब आपले दोन्ही लेख खूप छान आहेत.अन्ना आणि केजरीवाल यांनी दोन वेगवेगळ्या दिशांनी लढणे गरजेचेच होते.केवळ आंदोलनांनी बदल होणे अशक्य होते.राजकारणाची आणि आंदोलनाची ताकद एकत्र झाल्यावर result लवकर आणि कायमस्वरूपी मिळतील.नाहीतर आत्ताच्या राजकारण्यांकडून जन्लोक्पाल्बिलाची अपेक्षा karane tyanchyasathi बेड्या बनवा आणि म्हातारपण तुरुंगात काढा अशी असेल
On 02/10/2012 10:13 PM Ram said:
काळे kaka , प्रत्येक विषयवार लेख पाडणे सोडा हो. जरा कुठे काही खुट्ट झाला कि आला तुमचा लेख. या जगात अनेक गोष्टी होत असतात आणि पुढेही होतील त्यातील २/3 महत्वाच्या असतात बाकी सोडून द्यायच्या. प्रत्येक विषयवार आपले मत असलाच पाहिजे का ?
On 02/10/2012 09:37 PM Ghorpade dattatraya dadahari said:
मला आपण लिहिलेले लेंख सर्वच अप्रतिम .AAPAN लिहित राहा .धनयवाद
On 02/10/2012 09:27 PM amol bene said:
काळे सर अशा लोकांचा तुम्ही फार विचार करू नका . तुम्ही जे लिहित आहात ते सध्या चाललेल्या घडामोडी बद्दलच आहे आणि ते लिहिणे देखील सर्वच्या हिताचे आहे.पण हे मात्र नक्की आहे कि जे काही आण्णा च्या आंदोलनामुले झाले ते अजून चांग्गले झाले असते जर हे आंदोलन चालू राहीले असते तर ,पण हे आंदोलन मधेच बंद झाल्यामुले त्याच्याबद्दल शंका निर्माण झाल्या आहेत .
On 02/10/2012 09:21 PM Keshav said:
भगवान श्रीकृष्ण आणि राम यांना सुद्धा नावे ठेवणारे लोक होते आणि आहेत.. तुम्ही सगळ्यांचे तोंड नाही बंद करू शकणार.. तुमचे लेख खूप चांगले असतात.. आणि तुम्ही इतरांचा विचार न करता लिहित राहावे हि विनंती.. मी 'अण्णा' विषयी खूप लेख वाचले.. तुमच्या सारखे उत्कृष्ट लिखाण क़्वचितच वाचायला मिळते.. धन्यवाद..
On 02/10/2012 09:14 PM amol kambale said:
kale sir, you wrote what many of us think, and who sees things in practical way. so, please neglect personal remarks. But, i think home ministry of indian government should look into this matter, as like in case for facebook and twitter.
On 02/10/2012 08:20 PM pandurang patil said:
तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, कुनालाही कुणाच्या भावना दुखविण्याचा काही अधिकार नाही. पण तुम्ही काळजी करू नका, बोलणारे बोलतच राहतात आणि त्यांच्या पुढे अवघे जग गेलेले असते. तुमचा लेख अगदी छान आहे.
On 02/10/2012 07:20 PM Tanaji said:
सुधीर निगेतीवे प्रतिक्रिया चा विचार करू नका. तो व्यक्ती आपल्या मतानुसार प्रतिक्रिया देत आसतो. तसेही निदकाचे घर शेजारीच आसवे. आणणा लाडायचे होते ते आपल्याच लोकांशी.आणि त्यामुळे लोक हि विभागले जातात. काही लोक सरकारच्या पाठीशी होते त्यामुळे संख्याबळ मिळणे खूपच कठीण.त्यामुळे काही प्रोब्लेम नाही पण तुमचा मुद्दा आहे तो मांडत राहा. लिहित राहा भाहेर राहून आपल्या देशाची काळजी आहे तेही खूप आहे आजकाल. नाहीतर खूप लोक आहेत ती गेलेत आणि तिकडचेच झालेत.आजून तुम्ही भारताचे नागरिक आहात.आपले म्हणणे मांडा.
On 02/10/2012 06:53 PM Vibhuti Ghatshendra said:
प्रतिसादास , प्रतिसाद , उत्तम संवाद झाला तरुणाई बोलती केली आपणही सकाळच्या व्यासपीठावर आलात . असा संवाद अण्णा बरोबर तरुणांना आवडेल . हा विषय अति गंभीर बनविणे योग्य नाही .जेथे प्राणवायू व भ्रष्ट वायू एकाचा वेळेस नाका तोंडात इच्छा नसतांना जातो . तेथे कोण दोस्त व कोण दुश्मन लढाई स्वतःशी आहे. संसदीय संस्था वाचवून सकारात्मकतेने लढणे योग्य होईल. अण्णा टोपी मी जपून ठेवली आहे. तरीही देशात जे चालले आहे ते म्हणजे पंतप्रधान यांना अवमानित करणे ते अतिशय क्लेशदाई आहे
On 02/10/2012 04:55 PM atre said:
काळे सर तुम्ही लिहिलेले जवळपास सगळे lekh mi वाचले आहेत .. इथल्या "khas" प्रतिक्रियांवर जास्त लक्ष देऊ नका .. तुम्ही लिहीत राहा .. mala फार आवडत तुमचे abhyaspurn lekh wachayala

No comments:

Post a Comment